नैतिकता
नैतिकतेची संकल्पना ही स्थळ आणि काळ यांवर
अवलंबून आहे. एखाद्या समाजात एखादी बाब ही अनैतिक असेल तर कदाचित दुस-या समाजात
ती नैतिक असू शकेल. परंतू काही नैतिक तत्त्वे मात्र सार्वकालिक आणि वैश्विक असायलाच हवीत. जसे भ्रष्टाचार हा
सर्वदूर नैतिक नाहीच. इतरही नैतिकतेच्या अशा अनेक बाबी आहेत ज्या वैश्विक दृष्ट्या समान आहेत . महाराष्ट्रातील दोन घटनांमुळे जनतेसमोर नैतिकता काय असते हे प्रकट झाले आहे. या दोन घटना खालील प्रमाणे आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन असलेली गाडी आढळून आल्यानंतर एकापाठोपाठ एक अशा घटना उजेडात येऊ लागल्या. वाझे , मनसुख हिरेण , परमवीर सिंग यांचा लेटर बॉम्ब , या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसूल करून आणण्याचे सांगितले असा झालेला आरोप , “वाझे लादेन आहे का ?” या वाक्यानंतर पुढील सर्व प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांचे चुप्पी साधणे या सर्वांमुळे महाराष्ट्र व देशाचे राजकारण ढवळून निघाले. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होऊ लागली , विरोधी पक्षाने राज्यभर आंदोलन केले परंतू त्यांनी राजीनामा दिला नाही. परमवीर सिंग व जयश्री पाटील यांच्या याचिकेनंतर हाय कोर्टाने या प्रकरणात सी बी आय चौकशीचे आदेश दिले. या निर्णयानंतर "या पदावर राहणे आता नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही" असे आपल्या राजीनाम्यात अनिल देशमुख यांनी म्हटले. खरे तर त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला असता तर त्या राजीनाम्याला नैतिक जबाबदारी स्विकारून दिलेला राजीनामा असे म्हटले गेल्या असते. परंतू कोर्टाने आदेश दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागला तरीही नैतिक जबाबदारी समजून राजीनामा देत आहे असे अनिल देशमुख यांच्या म्हणण्याने जनतेला देशमुखांची नैतिकता कळून चुकली आहे. ही झाली पहिली घटना.
100 कोटींच्या या
प्रकरणाच्या धामधुमीतच एक दुसरी घटना सुद्धा समोर आली. ती म्हणजे गजानन महाराज संस्थानचे
निधी परत करण्याची घटना. सरकार कडून संत गजानन महाराज शेगांव संस्थानला कोविड
रूग्णालयाच्या उभारण्यासाठी म्हणून 10 कोटी रुपयांचा निधी आला होता. संस्थान ने कोविड
रुग्णालय उभारले व त्यासाठी संस्थानला 2 कोटी रुपयांचा खर्च आला. 8 कोटी रुपये
शिल्लक राहिले. गजानन महाराज संस्थान हे देशभरात एक नामांकित संस्थान म्हणून ओळखले
जाते. दर्शन , महाप्रसाद , स्वच्छता कोरोना काळात दर्शनाची केलेली सुनियोजित
व्यवस्था , लाखो लोकांना होत असलेली वैद्यकीय सेवा इत्यादी अनेक कामे गजानन महाराज
संस्थानात अगदी “Systematic” पद्धतीने होतात. या सर्वांमागे शिवशंकरभाऊ पाटील या कर्मयोगी
व्यक्तीचे नेतृत्व , संस्थानाप्रती त्यांची आत्मीयता , तळमळ हे आहे. संस्थान आपल्या कृतीतून अनेकदा आपला
आदर्श जनतेपुढे प्रस्थापित करीत आले आहे. तसे कित्येक दाखले आहेत. कोविड रूग्णालय उभारणीत
प्राप्त झालेल्या 10 कोटींच्या निधीतील शिल्लक राहिलेले 8 कोटी रुपये संस्थान ने सरकारला
साभार परत केले आहे. संस्थानच्या नैतिक वाटचालीत ही आणखी एक जमेची बाजू झाली आहे. गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शेगांव नगरीबाबत देशातील कित्येक
भाविकांना आस्था आहे, महाराजांवर त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे. याबरोबरच गजानन महाराज
संस्थानच्या कार्याचा मोठा प्रभाव जनमानसावर पडला आहे. संस्थान पासून अनेकांना प्रेरणा
मिळत आहे. उरलेला 8 कोटी रुपयांचा निधी परत करून संस्थानने आपली नैतिक वाटचाल दाखवली
आहे, आपला नैतिक आदर्श पुनश्च प्रकट केला आहे.
उपरोक्त दोन घटनांचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे काढता येईल. आपल्या पदाचा , सत्तेचा दुरुपयोग करून निलंबित वाझेला पुन्हा कर्तव्यावर घेणे , त्याला घेतल्यावर त्याला मुंबईतील 1650 बार कडून लाखो रुपयांची वसुली करण्यास सांगणे या सर्व प्रकरणात नाचक्की झाल्यानंतरही नैतिकतेचा आव आणणे याला काय म्हणावे ? हे जे आरोप होत आहे यातील सत्य , असत्य काय हे पुढे येईलच परंतू ' यत्र धूमः तत्र वन्ही ' अर्थात जिथे धूर आहे तिथे आग असतेच. या लेटरबॉम्बच्या विस्फोटातून जो आरोपांचा जो धूर निघत आहे याचाच अर्थ तिथे नक्कीच भ्रष्टाचाराची मोठी आग असेलच. ऐन कोरोना महामारीत गरीब जनता त्रस्त असतांना , व्यापर उदीम ठप्प असतांना , अनेकांच्या नोकरीवर गदा येत असतांना नेत्यांचे हे असे भ्रष्टाचाराच्या क्लृप्त्या शोधणे , वसुलीचे आदेश देणे मुळीच योग्य नव्हे. एकीकडे नेत्यांनी कोट्यावधी रुपयांच्या वसुलीचे आदेश देणे , त्यांचे सरकारी तिजोरीवर डोळा ठेवणे , त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्यांनी नैतिकतेचा मोठा आव आणणे तर दुसरीकडे गजानन महाराज संस्थान शेगांव ने निस्वार्थ , निरपेक्ष , निस्पृह भावनेने कार्य करीत प्राप्त निधीतून उरलेली रक्कम ही जनतेची आहे याचे भान ठेवत ती सरकार तिजोरीत जमा करण्याची कृती करून नैतिकतेचे भान समाजापुढे ठेवणे. या दोन उदाहरणातून नैतिकता ती काय असते हे जनतेच्या समोर स्पष्टपणे आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा