Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/१२/२०२१

Part 9- Jay Bharat ,Food Culture of Khamgaon

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-9

अमृत महोत्सवी "जय भारत"

आजच्या या हॉटेल मध्ये गेल्या बरोबर मोठी टापटीपता दिसते. मोठे गंध लावलेला , स्वच्छ कपडे असलेला, चित्तवृत्ती प्रसन्न असलेल्या हॉटेलच्या “कुक” कडे पाहून  येथील पदार्थ चांगले असतीलच याची खात्री ग्राहकास वाटते. 

लेखासह दिलेले भगतसिंग यांचे  चित्र पाहून  व शीर्षकात सुद्धा अमृत महोत्सव, जय भारत असे शब्द वाचून अनेकांना खाद्य पदार्थांच्या लेख मालिकेत भगतसिंग यांचे चित्र व शीर्षक असे कसे? हा प्रश्न निश्चित पडला असेल. पण हा लेख खाद्य संस्कृती बद्दलच आहे . भगतसिंग यांचा फोटो का ? व शीर्षकाचा संदर्भ या  लेखात पुढे येईलच.

    खामगांवातील गांधी चौका जवळच एक खुप जुने उपहारगृह आहे. 

“धर्म, जाती, भेद मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी”  

हे महात्मा फुले यांचे वाक्य सर्वश्रुत आहे त्यानुसार कुणाचीही जात, धर्म, पंथ याचा उल्लेख हा अनावश्यकच असतो व तसा उल्लेख शक्यतो टाळायलाच हवा. पण तरीही या हॉटेलबाबत लिहितांना तो उल्लेख करावाच लागत आहे कारण हे हॉटेल म्हणजे शिख कुटुंबियांव्दारे संचलित खामगांव शहरातील एकमेव हॉटेल आहे. नवीन एखादे हॉटेल सुरु झाले असल्यास माहित नाही. परंतू खामगांव शहराच्या बाहेर शिख समाज बांधवांचे काही नामांकित असे ढाबे मात्र आहेत. हे हॉटेल चांगले ऐसपैस आहे. डाव्या हाताला मालकाची बसण्याची जागा. हॉटेल मध्ये प्रवेश करतांनाच एक भट्टी आहे. हॉटेल मध्ये प्रवेश केल्या बरोबर मालकाच्या समोर म्हणजे उजव्या हाताला बसण्याची व्यवस्था आहे. ग्राहकांना बसण्यास आजही जुन्या पद्धतीचे बेंच व टेबल आहेत. आत गेल्या बरोबर टापटीपता दिसते. मोठे गंध लावलेला , स्वच्छ कपडे असलेला, चित्तवृत्ती प्रसन्न असलेल्या हॉटेलच्या “कुक” कडे पाहून  येथील पदार्थ चांगले असतीलच याची खात्री ग्राहकास वाटते. या हॉटेलचा व माझा परिचय मी लहान असतांनाच झाला आहे. म्हणजे लहानपणी हॉटेलमध्ये खाण्या करीता व ते सुद्धा एकटाच असा मी क्वचितच गेलो आहे. हॉटेल मध्ये मला एकटेच जाऊन खाणे आवडत सुद्धा नाही. मी गेलो होतो ते खवा आणण्या करीता, वडीलांनी  पाठवले होते म्हणून. येथील खवा प्रसिद्ध आहे. या हॉटेल मालकांची एक डेअरी सुद्धा आहे. या डेअरीतील दुध व दुग्धजन्य पदार्थ खामगांववासी पसंद करतात. गावरान तुप तसेच पनीर हे सुद्धा प्रसिद्ध आहे. खामगांव शहर व लगतची 80 टक्के हॉटेल्स येथूनच पनीर नेतात. गावरान तुपास सुद्धा खुप मागणी असते. खवा आणण्यासाठी म्हणून मी जेंव्हा सर्वप्रथम या हॉटेल मध्ये गेलो होतो तेंव्हा माझे चित्त वेधून घेतले ते हातात पिस्तूल घेऊन ऊभे असलेल्या भगतसिंगांचे चित्राने. मी या हॉटेल मध्ये जेंव्हाही जातो तेंव्हा माझी दृष्टी हे बोलके, आकर्षक चित्र खिळवून ठेवते. आत भगतसिंग या महान क्रांतिकारकाचे चित्र व हॉटेलचे नांव “जय भारत” यावरून हॉटेलचे संस्थापक हे नक्कीच प्रखर देशप्रेमी असतील याची खात्री पटते. पुर्वी अनेक हॉटेल व दुकानांमधुन थोर नेते व क्रांतीकारकांची चित्रे दिसत. आता त्यांची जागा “मॉडर्न आर्ट“ ने घेतली आहे. जय भारत हॉटेल मधील भगतसिंग यांचे चित्र मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून कायम आहे.  चिनी विषाणू कोरोनाच्या संकटाच्या आधी जनुना तलावावर आम्हा मित्र मंडळीचे पोहायला जाणे नित्याचे होते. जनुना तलावावरून पोहुन आलो की आम्हाला तीव्र भुक लागलेली असायची मग आम्ही बरेचदा या हॉटेलमध्ये उदराग्नीचे शमन केले आहे. मिसळ, समोसा अशा चवदार पदार्थांचा आम्ही आस्वाद घेतला आहे. इतरही अनेक पदार्थ चविष्ट असतात, लस्सी सुद्धा चांगली मिळते. खव्यासाठी तर जय भारत हॉटेल प्रसिद्धच आहे. भगतसिंग व इतर कित्येक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. याच वर्षी या हॉटेलची सुद्धा स्थापना झाली. त्यामुळेच या हॉटेलच्या संस्थापकाने हॉटेलचे नामकरण "जय भारत" असे केले असावे. क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला, त्याच सुमारास फाळणीमुळे हिंदूंसह शिख समाज बंधूंना अपरिमित हाल सहन करावे लागले. कित्येकांना भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. पण त्या हाल अपेष्टा, आप्तस्वकीयांचे निधन, आया बहिणींवर झालेले अनन्वित अत्याचार सहन करून दु:ख पचवून शिख बांधव फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुनर्जीवित झाले. पोपली कुटुंबीयांनी सुद्धा डेअरी , हॉटेल असा आपला व्यवसाय उभारला. मालक मितभाषी आहे. मामा/आग्रा चाट या हॉटेल प्रमाणे हे हॉटेल सुद्धा विशिष्ट पदार्थासाठी प्रसिद्ध नसून येथील सर्वच पदार्थ हे रुचकर असतात. आठवडी बाजार येथून जवळच असल्याने खामगांव शहरातील गर्दीच्या ठिकाणी हे हॉटेल आहे. ग्राहकांची वर्दळ असली तरी हॉटेलची टापटीपता मात्र कायम राखलेली असते. हॉटेल मालक पोपली कुटुंबीय हे खामगांव शहरातील जुने व सुसंस्कृत म्हणून परिचित आहे. आपल्या व्यवसायातच त्यांचे सर्व लक्ष केंद्रित असते. डेअरी मध्ये जा किंवा हॉटेल मध्ये जा ग्राहकाशी अत्यंत चांगल्या पद्धतीने संभाषण ते करतात. खामगांवच्या खाद्य संस्कृतीबाबत लिहितांना जुन्या हॉटेल्सचा समावेश या लेख मालिकेत केल्या गेला आहे. म्हणून या जुन्या हॉटेल्सपैकीच एक, खात्रीलायक पदार्थ मिळण्यासाठी प्रसिद्ध व भारताचा जयजयकार आपल्या नांवातून करणा-या, देश जसा आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहे त्याप्रमाणेच आपल्या स्थापनेचा अमृत महोत्सव साजरा करणा-या अशा जय भारत हॉटेलचा समावेश या मालिकेत न करून कसा चालला असता ? 

२३/१२/२०२१

Part 8- 51 yr old hotel ,Food Culture of Khamgaon

 खामगांवची खाद्य संस्कृती भाग-8

 ...51 साल पुरानी दुकान इधर है

हे हॉटेल साधेच आहे. आज जसा दुकानांचा किंवा हॉटेलचा लुक एकदम झकपक असतो तसा काही या हॉटेलचा सेटअप नाही पण पदार्थ मात्र चविष्ट असतात. अनेक जुने खामगांव निवासी येथे हमखास जातातच. शिवाय जे लोक खामगांव सोडून उदरनिर्वाहासाठी इतस्तत: गेले आहेत त्यातील अनेक खवय्ये खामगांवला आले की या हॉटेल मध्ये जातातच.

खामगांवातील पोलीस स्टेशन कडून महावीर चौकाकडे जातांना अग्रसेन चौकाच्या पुढे उजव्या बाजूला एक गल्ली आहे. अनेकांनी ही गल्ली कोणती ते ओळखले असेल. लॉन्ड्री व्यवसायिकांची गल्ली म्हणून ही  गल्ली  ओळखली जाते. याच बाजूने या गल्लीत गेल्यावर डाव्या बाजूने  एक हॉटेल होते. माझ्या आठवणीप्रमाणे या हॉटेल मध्ये बसण्याची सुविधा नव्हती. सर्व खाद्य पदार्थ मांडून ठेवले असत. ग्राहक गेला की त्याला त्याच्या आवडीचा पदार्थ “सर्व्ह” केला जाई. उभ्या-उभ्या खाल्ले की चालले पुढे. दहीवडे , पाणी पुरी हे येथील खास पदार्थ होते. मी सहावीत होतो. आमचे नॅशनल हायस्कूल मधील हाडाचे शिक्षक श्री संगारे सर पुर्वी याच गल्लीत राहात होते. त्यामुळे या गल्लीतून जातांना हे हॉटेल मला माहित झाले होते. हे दुकान तेंव्हा व त्यापुर्वी पासून खूप प्रसिद्ध होते. अनेक लोक  येथे जात असत. परंतू या हॉटेलला काही नांव नव्हते पण बहुदा मामाजी हॉटेल असे नांव होते असे मला पुसटसे आठवते. हे हॉटेल एक जुन्या, जर्जर झालेल्या इमारतीत असल्याने पुढे ते बंद झाले असे मला वाटले होते. ब-याच वर्षांपुर्वी एक दिवस मी या रस्त्याने काही कारणास्तव चाललो असता माझा एक मित्र मला याच उपरोक्त गल्ली जवळच भेटला आम्ही बोलत होतो तेंव्हा माझे लक्ष याच गल्लीच्या कोप-यावर असलेल्या हॉटेलच्या भिंतीकडे गेले. त्या भिंतीवरील “कॅची टॅगलाईन” ने माझे चित्त वेधले. भिंतीवरील ती टॅगलाईन होती. 

“बाबुजी आपका ध्यान किधर है ? धोबी गल्ली की 51 साल पुरानी दुकान इधर है |” 

( ही  टॅगलाईन या दुकानावर जशी होती तशीच लिहिली आहे, आज भारत देश तांत्रिक दृष्ट्या खुप पुढे गेला आहे परंतू वैचारिक गुलामी कायमच आहे. हल्ली कुणाला कशाचा राग येईल काही नेम नाही त्यामुळे वरील टॅगलाईन वरून विनाकारण कुणीही व्यक्ती अथवा समाज यांनी गैरसमज करून घेऊ नये ही हात जोडून विनंती.) ही टॅगलाईन वाचून मला आश्चर्य वाटले. जे हॉटेल बंद झाले असे मी समजत होतो ते तर सुरु आहे.  पण ते नवीन जागेत स्थानांतरीत झाले आहे. नवीन जागेत गेल्यावर हे तेच हॉटेल आहे म्हणून अनेक जणांना ठाऊक नव्हते. तशी ही नवीन जागा म्हणजे जुन्या जागेपासून 10-12 पाऊलांच्या अंतरावरच आहे. फक्त जुन्या जागेत जाण्यासाठी वळण घेऊन गल्लीत जावे लागे तर नवीन जागा गल्लीच्या कोप-यावरच आहे. मी व मित्राने मग दही पुरी खाल्ली होती. सँडो बनियन व फुलपँट असा वेष असेलेले मालक स्वत:च “सर्व्ह करीत” होते. मालकांचा चेहरा परिचित वाटला, ते सुद्धा माझ्याशी चांगली ओळख असल्यासारखे बोलत होते. छोट्या गावात ओळख निघतेच. जुजबी बोलणे झाले. त्यानंतर मी अनेकदा येथे गेलो. हे हॉटेल तसे साधेच आहे. आज जसा दुकानांचा किंवा हॉटेलचा लुक एकदम झकपक असतो तसा काही या हॉटेलचा सेटअप नाही पण  पदार्थ मात्र चविष्ट असतात. अनेक खामगांवकर विशेषत: जे येथे अनेक वर्षांपासून राहात आहेत ते येथे हमखास जातातच. शिवाय आज जे खवय्ये लोक खामगांव सोडून उदरनिर्वाहासाठी इतस्तत: गेले आहेत ते जर खामगांवला आले तर या हॉटेल मध्ये हमखास जातात. या लेख मालिकेत आपण खामगांव येथील अनेक हॉटेल मधील प्रसिद्ध पदार्थांबाबत जाणून घेत आहोत. तसा या हॉटेल मध्ये मात्र विशेष प्रसिद्ध झालेला असा एक पदार्थ नाही तर येथील अनेक पदार्थ लोकांना आवडतात. त्यात पाणी पुरी , दही पुरी  , दहीवडे, भजे यांचा समावेश आहे. 

खामगांव हे शहर जरी बुलडाणा जिल्ह्यातील मोठे शहर असले तरी ते महानगर नाहीच त्यामुळे येथे हॉटेल सुद्धा खुप नाहीत. परंतू तरीही जी काही आहेत त्यातील काही पदार्थ हे खामगांव व परिसरातील खेड्यांत खुप प्रसिद्ध झाले आहेत. 

     कोरोना विषाणू महामारीमुळे देशभर लॉकडाऊन होते. या दरम्यान खवय्यांना “हॉटेलिंग” करता आले नाही. त्यामुळे मध्यंतरी लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतरच्या काळात येथे अनेक नवीन हॉटेल, चहाचे स्टॉल्स सुरु झाले आहेत. पण या लेख मालिकेत खामगांवात 50 पेक्षा अधिक वर्षांपासून ग्राहकांना खाण्यापिण्याची सुविधा देणा-या हॉटेल्स बाबत आपण जाणून घेत आहोत. नवीन हॉटेल्स बद्दल पुन्हा कधी तरी लिखाण होईलच. मामाजी हॉटेल्स मध्ये मी बरेच वर्षे झाले गेलो नाही, मागील वर्ष तर लॉकडाऊन मध्येच गेले. मी जरी येथे गेलो नसलो तरी येथील पदार्थांच्या चवी बरोबरच या हॉटेलची ओळख सांगणारी “बाबुजी आपका ध्यान किधर है ? धोबी गल्ली की 51 साल पुरानी दुकान इधर है |” ही “कॅची टॅगलाईन” सुद्धा माझ्या स्मरणात राहिली. ही “कॅची टॅगलाईन” पाहुनही आता 10 पेक्षाही अधिक वर्षे उलटून गेली. म्हणजे आता हे हॉटेलला 60/65 पेक्षाही अधिक वर्षे झाली असावीत. मला 60 वर्षांपुर्वीचा काळ डोळ्यासमोर आला. त्या काळात सिनेमाचे सुवर्णयुग होते. बहुतांश सिनेमातील नायक हा गरीब व मध्यमवर्गीय असा असे. तेंव्हाचे खामगांवातील मध्यमवर्गीय, गरीब घरचे, साध्या पोशाखातील तरुण राजेंद्रकुमार, शम्मी कपूर , देव आनंद, धर्मेंद्र, यापैकी कुण्या एका नटाचा मधुर गीते असलेला सिनेमा या हॉटेल जवळच्या गजानन टॉकीज मध्ये पाहून याच हॉटेल मधे दहीवडादी खाऊन सायकलवर घरी परतत असावेत. असा वेगवेगळा काळ पाहिलेले हे हॉटेल या स्पर्धेच्या युगातही घट्ट पाय रोवून उभे आहे.

(आग्रा चाट भांडार हे हॉटेल)

१६/१२/२०२१

Part 7- Ice candy , Food Culture of Khamgaon

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-7

 सुरेश कुल्फी 



कुल्फीवाल्याच्या भूमिकेतील चॉकलेट हिरो देव आनंदचे  संग्रहित चित्र 
बालपणी अनेकदा खाल्लेल्या त्या सुरेश कुल्फीवाल्याच्या कुल्फीची चव स्मरणात राहिली. आजच्या डालडा असलेल्या आईस्क्रीमपेक्षा ती चव नक्कीच सरस होती. आजही कुल्फी हा शब्द ऐकलावाचला की सुरेश हे नांव सुद्धा आठवतेच. त्या कुल्फीवाल्याच्या प्रामाणिकपणाच्या व्यवसायामुळे त्याचे नांव आजही आठवत असावे.

मागील भागापासून पुढे...

 जिलेबी फापडा या लेखा संदर्भात खिलोशिया यांच्याशी थंड पदार्थांविषयी सुद्धा चर्चा झाली होती. तसे आता थंडीचे दिवस पण तरीही थंड पदार्थांविषयीची ही चर्चा आजच्या कुल्फी बाबतच्या या भागाचे कारण ठरली.

      1980 च्या दशकातील उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही बालाजी प्लॉट मधील आमच्या घराच्या आंगणात रात्री बाहेर झोपत असू. जमिनीवरच गादया टाकल्या जात असत. साप, विंचू याची भीती कधी मोठ्यांनी आम्हाला दाखवली नाही. त्यामुळे आमच्या मनात सुद्धा ते भय उत्पन्न झाले नाही. त्या काळात खामगांवात मोजक्याच घरी टीव्ही आले होते. आमच्याकडे मात्र नव्हता. त्यामुळे दिवेलागणी नंतर लवकरच शांतता होत असे. टीव्हीच आलेला नसल्याने मालिकांचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे महिला मंडळी गप्पा मारायच्या. जेवण झाले की अंगणात अंथरूण पसरायची. झोपेपावेतो अंथरुणे थंड पडायची. आमच्या समोरच्या घरात एक भला मोठा पिंपळ वृक्ष होता. अजूनही तो डौलात उभा आहे. मी तिकडे गेलो की त्या महाकाय अश्वत्थ वृक्षाकडे बरेचदा पाहत राहतो. मला नेहमी त्याचे वय किती असेल ? मी त्याला लहानपणापासून ओळखतो तसा तो पण मला ओळखत असेल का? असे प्रश्न पडतात. या पिंपळाच्या पानाची सळसळ ऐकू यायची. तेंव्हा ध्वनी प्रदूषण पण किती कमी होते. वाहने कमी असल्याने विनाकारण पँ पॅं पी पी पों पों असे हॉर्नचे आवाज व्हायचे नाही. वाजलाच तर लुना किंवा स्कुटरचा बारीक ट्रीक ट्रीक असा हॉर्न वाजे. "पिपल झुमे मोरे आंगना थंडी थंडी छांव रे" या एका गीतातील ओळी प्रमाणेच उन्हाळ्यात त्या पिंपळ वृक्षाचा मोठा आधार वाटायचा. आम्ही गादीवर पडल्या पडल्या तारे न्याहाळत असू. आजोबांनी अनेक ता-यांची ओळख करून दिली होती.  "ते बघा ते  सात तारे ते सप्तर्षी आहेत बर, तो ध्रुव, तो शुक्रतारा.मग धृव बाळाची गोष्ट अशी ते माहिती ते देत. त्यांचा ग्रह, तारे पंचांग यांचा चांगला अभ्यास होता, आमच्या जन्मपत्रिका त्यांनीच बनवल्या होत्या. 

     थोड्यावेळाने आम्ही ज्याची वाट पाहात असू तो मंजूळ असा टिंग टिंगआवाज यायचा. हा घंटीचा आवाज असायचा एका कुल्फीवाल्याच्या गाडीचा. सुरेश कुल्फीअसे त्या गाडीवर लिहिलेले असे. वडील मग ही कुल्फी आम्हाला घेऊन द्यायचे. मोठ्या आकाराची ती कुल्फी खाल्ली की एक शीत लहर शरीरात प्रवाहित होत असे. त्याकाळात ही कुल्फी खामगांवात फार प्रसिद्ध होती. रात्री घरपोच विकल्या जाणारी ती कदाचित एकमेव अशी कुल्फी होती. सुरेश कुल्फीवाला मला आजही आठवतो. काळा-सावळा ,कुरळे केस, पँट-शर्ट आणि चेह-यावर हास्य, बोलण्यात मृदूता. 

"जिंदगी है क्या सून मेरी जान, प्यार भरा दिल मिठी जुबान" 

या पंक्तींप्रमाणे त्याच्या जिभेवर सुद्धा साखर असे. ही कुल्फी तेंव्हा 1/2 रुपयात मिळायची तरीही ती तेंव्हाची महागडी कुल्फी होती. कुल्फी खाता-खाता खुप गप्पा होत असत. तदनंतर झोप लागून जायची. आज काल बाहेर झोपणे, गच्चीवर झोपणे फार कमी झाले आहे. सर्वांकडे कुलर, एसी आले आहेत. परंतू उन्हाळ्यातील रात्री येणा-या नैसर्गिक थंड हवेची सर त्या कुलर, एसीच्या हवेला नाही. बालपणी अनेकदा खाल्लेल्या त्या सुरेश कुल्फीवाल्याच्या कुल्फीची चव स्मरणात राहिली. आजच्या डालडा असलेल्या आईस्क्रीमपेक्षा ती चव नक्कीच सरस होती. आजही कुल्फी हा शब्द ऐकला, वाचला की सुरेश हे नांव सुद्धा आठवतेच. कदाचित त्या कुल्फीवाल्याच्या प्रामाणिकपणाच्या व्यवसायामुळे त्याचे नांव आजही आठवत असावे. दोन चार वर्षानंतर सुरेश कुल्फीवाला येणे बंद झाले होते. त्याचे येणे का बंद झाले हे काही कळले नाही.

    लोकांची आवड आता झपाट्याने बदलत आहे. जाहिराती, ब्रँड यांना लोक भुलत आहेत. जे साधे आहे, चांगले आहे, ज्याची जाहिरात नाही त्याला आता खराब समजले जात आहे. आईसकांडीत पूर्वी अळ्या आहे अशी अफवा अधून-मधून पसरत असे व त्या कारणास्तव प्रसंगी ती नाकारली सुद्धा जात असे. आज आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या अनेक आईस्क्रीमवर यात वनस्पती तेलाचा वापर केला आहेअशी स्पष्ट सूचना दिली असते. अनेक ठिकाणी अन्न व औषधी प्रशासनाने जास्त प्रमाणात डालडाअसलेल्या आईस्क्रीम केंद्रांवर धाडी टाकल्या आहेत. आकर्षक वेस्टनाला ग्राहक भुलतो. आज जनतेजवळ पैसा चांगला खुळखुळतो आहे. क्रयशक्ती वाढली आहे. परंतू आपण काय खातो याकडे बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. पूर्वी 10,20,50 पैस्यांची आईस कांडी घेणारे आज बक्कळ कमावत आहेत परंतू आज दिसायला जरी चांगले असले, महागडे असल्रे तरी आजच्या अन्नातखाद्य पदार्थात भेसळ मात्र जास्त आहे. आईस्क्रीम म्हणून चक्क डालडा पोटात जातो आहे. साधा बर्फ व रंग यांचा वापर करून बनवलेली ती आईस्कांडी आजच्या भेसळयुक्त, डालडायुक्त आईस्क्रीम पेक्षा निश्चितच कितीतरी पटीने सरस होती. एके दिवशी महागडा चोकोबार घेतांना सहज आईस्कांडी, आईssssस्कांडी वाला, त्याची गाडी हे सर्व चित्र डोळ्यासमोर तरळले. आज सुरेश कुल्फीवाला कुठे असेल कुणास ठाऊक ? लोक तर त्याला विसरले सुद्धा असतील, पण तो जिथे कुठे असेल तिथे प्रामाणिकपणा व सचोटी, हसतमुखाने, गोड बोलून केलेल्या व्यवसायामुळे क्षेम , कुशल असेल असे निश्चित वाटते. मी चाखत तर तो ब्रँडेड चोकोबार होतो परंतू आठवण होत होती त्याच सुरेश कुल्फीवाल्याची व तोंडात चव घोळत होती त्याच्या कुल्फीची.

( 2019 मध्ये लिहिलेल्या "आईस्कांडी" या लेखातील काही भाग वरील लेखात घेण्यात आला आहे. )

"आईस्कांडी" या पुर्वी लिहिलेल्या लेखाची लिंक ⇩

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/05/article-in-memory-of-ice-candy-its.html

For Old Bollywood Song Lovers 

https://www.youtube.com/watch?v=YvK4JVLWCWk

                                                                            क्रमश:

०९/१२/२०२१

Part 6- Jilebi, Food Culture of Khamgaon

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-6

जलेबी,फापडा 

आता या उपहारगृहाची रचना बदलली आहे. पुर्वीचा रचना आजही डोळ्यासमोर आहे. दोन बाजूला दुकानातील दोन माणसे त्यांच्या बाजूला म्हणजे ग्राहकांच्यासमोर सर्व खाद्य पदार्थ , मध्ये तराजू. ग्राहकाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर जुन्या पिढीतील लोकांचे फोटो. अशी काहीशी ती रचना होती. बरेचदा आम्ही जिलेबी घरी घेऊन जात असू. जिलेबी घेतांना एका सछीद्र तांब्यातून कढईवर तांब्या गोल-गोल फिरवून त्या कढईत गोलाकार अशी जिलेब्यांची माळ बनवणा-या त्या माणसाला पाहून तेंव्हा मला मोठे अप्रूप वाटत असे.

मागील भागापासून पुढे...

   मागील लेखात चिवड्याबद्दल लिहितांना फरसाण आठवत होते व या फरसाण वरून खामगांव शहरातील एक जुने उपहारगृह व मिठाईच्या दुकानाची आठवण झाली. पण प्रथम मराठी लेखाचे शीर्षक जिलेबी,फापडा असे देण्याऐवजी जलेबी,फापडा असे देण्याचे कारण म्हणजे जलेबी,फापडा असा शब्दप्रयोग तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेमुळे चांगलाच प्रचलित झाला आहे व मराठीत सुद्धा लोक जलेबी,फापडा असे म्हणत आहे म्हणूनच मग जलेबी,फापडा हे शीर्षक. आता मला ज्या मिठाईच्या दुकानाची आठवण झाली होती त्याविषयी. तसे तर हे दुकान माझ्याच काय माझ्या आधीच्याही पिढीच्या जन्माच्या आधी स्थापन झालेले म्हणजे तब्बल 120 वर्षे जुने. कसे असेल त्यावेळचे खामगांव ? खामगांवची बाजारपेठ ? इतकी वर्षे आधी येथे कितीतरी दूर अंतराहून लोक व्यापारासाठी आले व इथलेच झाले. आजच्या या दुकानासमोरच म्हणजे महावीर चौक, मोठ्या देवी जवळील "महाराष्ट्र हेअर कटिंग सलून" या दुकानात वडील मला बालपणी केश कर्तन करायला म्हणून नेत असत. लहान मुलांची कटींग ही खुर्ची वर एक लाकडी पाटी टाकून होत असे. मनसुख काका व रणछोड काका धामेलीया असे दोघे बंधू येथे कटिंग करून देत असत. आता खाद्य पदार्थांच्या लेखात कटिंगच्या दुकानाचा विषय आल्यावर ज़ेवतांना पहिल्याच घासात केस निघाल्यावर जशी गत होते तशी होऊ नये म्हणून सांगावेसे वाटते की, या कटींगच्या दुकानाच्या म्हणजेच केश कर्तनालयाच्या (Salon)  अगदी समोर आजचे हे जिलेबी फापड्याचे दुकान आहे.  गर्दी असली की आपला कटिंगचा नंबर येईतो बसून रहावे लागे. मग समोरच "खिलोशिया" व "भगवानजी गोविंदजी" असे भल्या मोठ्या "फाँट साईझ" मध्ये दुकानांच्या नावांच्या पाट्या असलेली दोन दुकाने दिसत असत. एका दुकानात एक माणूस खाली बसून एका तेलकट पाटावर फापडा बनवत बसलेला असे तर दुस-या दुकानात बनियान व लुंगी नेसलेला एक माणूस जिलेब्या तळत बसलेला असे. माझ्या कटिंगला वेळ असला की मग मी फापडा व जिलेबी बनवण्याच्या त्या दोन माणसांच्या कृती न्याहाळत असे. बरेचदा आम्ही जिलेबी घरी घेऊन जात असू. जिलेबी घेतांना एका सछीद्र तांब्यातून कढईवर तांब्या गोल-गोल फिरवून त्या कढईत गोलाकार अशी जिलेब्यांची माळ बनवणा-या त्या माणसाला पाहून तेंव्हा मला मोठे अप्रूप वाटत असे. खिलोशियांच्या या दुकानांच्या नावांचा अर्थ मात्र मी तेंव्हा काही वेगळाच काढला होता. हिंदी मध्ये खाऊ घालणे याला खिलाना असे म्हणतात त्यानुसार खिलोशिया मधील “खिलो” मला खाण्यासंबंधीचा शब्द वाटत होता. पुढे ते आडनांव आहे हे समजल्यावर माझे मलाच हसू आले होते. तसेच दुस-या दुकानाचे भगवानजी गोविंदजी हे नांव म्हणजे मला देवांचे नांव हॉटेलला दिले आहे असे वाटायचे. पण हे नांव म्हणजे मालकाचे नांव आहे हे सुद्धा नंतर समजले. गुजराथ मधील राजकोट जवळील खिलोस या गावातून आलेल्या भगवानजी गोविंदजी यांनी 1902 या वर्षी खामगांवात आपला मिठाईचा व्यवसाय सुरु केला. 120 वर्षांपासून थाटलेला भगवानजी यांच्या कुटुंबियांचा हा व्यवसाय खामगांवकरांना मिष्टान्न तसेच उन्हाळ्याच्या दिवसात थंड पदार्थ उपलब्ध करून देत आहे तर भगवानजी यांच्या भावांच्या पिढ्या अकोला शहरात यशस्वी व्यवसाय करीत आहे. भगवानजी गोविंदजी व खिलोशिया या दोन्ही दुकानात जिलेबी फापडा या व्यतिरिक्त अनेक पदार्थ, मिठाई उपलब्ध असते. आता या दोन्ही उपहारगृहाची रचना काळानुरूप बदलली आहे. भगवानजी गोविंदजी या दुकानाची पुर्वीची रचना आजही डोळ्यासमोर आहे. दोन बाजूला दुकानातील दोन माणसे त्यांच्या बाजूला म्हणजे ग्राहकांच्या समोर सर्व खाद्य पदार्थ, दुकानातील दोन माणसांच्या मध्ये तराजू. ग्राहक दुकानदाराकडे तोंड करून उभा असल्यावर ग्राहकाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर दुकानदाराच्या जुन्या पिढीतील लोकांचे फोटो. अशी काहीशी ती रचना होती. 

खिलोशिया यांची पुर्व पिढी
आज ही रचना जरी बदलली असली तरी "जलेबी वो ही है |" येथील गरम जिलेबी खाण्याची लज्जत काही औरच. सोबत फापडा व मिर्ची असेल तर "सोने पे सुहागा". जिलेबी शुद्ध दुधासोबत खाणे पौष्टीक असल्याचे सांगितले जाते. मी कित्येकदा खाल्ली सुद्धा आहे व मला आवडली सुद्धा आहे. या जिलेबी महात्म्यामुळे बालपणी ऐकलेली एक गोष्ट सुद्धा येथे सांगावीसी वाटते. माझी आजी आम्हा भावंडांना खुप गोष्टी सांगत असे. त्यातील एक गोष्ट म्हणजे एका डाकूची होती, ती खरी होती की कल्पनिक हे मात्र काही माहीत नाही. पण फार वर्षांपुर्वी कुणी एक डाकू होता तो त्याच्या घोड्याला म्हणे जिलेब्या खाऊ घालत असे. हा डाकू निधन पावल्यावर त्याच्या घोड्याने अन्नत्याग करून प्राण सोडल्याची अशी ही कथा होती. भूतदया ही आपली परंपरा, आपली संस्कृतीच आहे मग त्याला डाकू सुद्धा कसा अपवाद ठरेल. असो ! जिलेबी हा बनवण्यास कठीण असा पदार्थ भारतात कैक वर्षांपासून बनवला जातो व सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. पण जिलेबी खावी ती गरमच. थंडी झालेली जिलेबी खाण्यात मजा नाही. खरे तर ही लेखमालिका खामगांव शहरातील खाद्य संस्कृतीबाबतची आहे पण तरीही जिलेबीच्या अनुषंगाने येथे बुलडाणा शहरातील कारंजा चौकातील हनुमान जिलेबी या फक्त भजे व जिलेबी मिळणा-या लोकप्रिय दुकानाचा सुद्धा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. बुलड़ाण्यातील हे दुकान सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. भगवानजी गोविंदजी हे खामगांवातील चविष्ट जिलेबी मिळणारे दुकान म्हणजे बालवयात सर्वात मोठे दुकान असे दुकान वाटायचे. आहेच ते ! खिलोशिया मध्ये लस्सी सुद्धा खुप चांगली मिळते. पुर्वी येथे कुल्फी सुद्धा मिळत असे. फार पुर्वी भगवानजी गोविंदजी मध्ये वरच्या मजल्यावर आईस्क्रीम खायला गेल्याचे सुद्धा आठवते. नंतर मात्र वरच्या मजल्यावरची ती बसण्याची व्यवस्था बंद झाली. येथे विविध प्रकारची मिठाई मिळते तसेच येथील केशर पेढा सुद्धा प्रसिद्ध आहे. पण सर्वात जास्त प्रसिद्ध फापडा व जिलेबी. सकाळी 8 च्या ही आधी येथे फापडा व जिलेबी बनवण्यास सुरुवात होते व अनके लोक त्याचा आस्वाद घेतात. आज खामगांवात अनेक उपहारगृहे आहेत, जिलेबी विक्री केंद्रे आहेत परंतू भगवानजी गोविंदजी खिलोशिया परिवार त्यांच्या व्यावसायिक पद्धतीने, ग्राहकांना उत्तमोत्तम  पदार्थांची योग्य व तत्पर सेवा त्यांच्या नव्याने सुरु झालेल्या इतर शाखांसह देत आहे. गुजराथ मधून दूर खामगांवात येऊन यशस्वी व्यवसाय करून नावलौकिक कमावणा-या खिलोशिया परिवाराची 120 वर्षांची यशस्वी वाटचाल नवीन उद्योजक व हॉटेल व्यावसायिक, व्यवसायात उतरलेल्या (पडलेल्या नाही) नवीन मराठी तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.   

                                                   क्रमश:

०२/१२/२०२१

Part 5- Chiwada, Food Culture of Khamgaon

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-5

ले लो भाई चिवडा ले लो

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रसिद्ध असा चिवडा मिळतो. पण हे प्रसिद्ध पदार्थ बहुतांश मोठ्या शहरातीलच असतात. छोट्या शहरातून विक्री होणारे पदार्थ हे  सुद्धा रुचकर, चविष्ट असूनही त्यांना म्हणावी तेवढी प्रसिद्धी मात्र मिळत नाही. आजच्या लेखात आपण खामगांवात गेल्या कित्येक वर्षांपासून विकल्या जात असलेल्या एका रुचकर चिवड्याची माहिती जाणून घेणार आहोत.

मागील भागापासून पुढे...

मागील दोन लेखात पेढा व रबडी अशा गोड पदार्थांबाबत भाष्य झाले. आता खामगांवात आणखी कोणत्या प्रसिद्ध पदार्थाबाबत लिहावे हे चिंतन करीत एका रम्य सायंकाळी शहरापासून दूर एका ठिकाणी गेलो होतो. एका छोट्या हॉटेलवर मस्त कॉफीचे घोट रिचवत होतो. अशा छोट्या हॉटेल्सवर रेडिओ हा अजूनही वाजवला जातो तसा तो इथेही वाजत होता. काहीतरी उद्घोषणा सुरु होत्या व नंतर एक गाणे वाजू लागले. हे गाणे मला खुप दिवसानंतर ऐकायला मिळाले. लहानपणी खुपदा ऐकू यायचे. हे गीत होते "ले लो भाई चिवडा ले लो गरम मसालेदार चिवडा ले लो , या हो या चिवडा घ्या गरम मसालेदार चिवडा घ्या." मुखडा हिंदी असलेले हे मराठी गीत आहे. या गाण्यामुळे चिवडा हा पदार्थ डोक्यात आला. मागील लेखात पेढा, रबडी हे गोडाचे पदार्थ झाले होते. आता लेख मालिकेच्या या भागासाठी चिवडा हाच तिखट पदार्थ माझ्या मेंदूला झोंंबू लागला. याच विषयावर लिहावेसे वाटू लागले. तसे आजचा लेख हा भारतातील सर्वात जास्त आवडत्या, सर्वात जास्त प्रसंगी केल्या जाणा-या व नानाविध प्रकारे बनवल्या जाणा-या पदार्थावर अर्थात चिवड्यावर असेल हे वाचकांनी शिर्षकावरून ओळखलेच असेल. आजही लग्नप्रसंगात चिवडा लाडूच्या पुड्या आप्तांसोबत देण्याची प्रथा मात्र टिकून आहे. हा सुद्धा चिवड्याच्या लोकप्रियतेचा एक नमुना आहे. चिवड्याबाबतच्या त्या गाण्यामुळे चिवडा याच विषयावर लिहावेसे वाटल्यानंतर माझ्या डोक्यात कितीतरी चिवड्यांचा चिवडा त्या क्षणी होऊन गेला. अनेक प्रकारचे, अनेक ठिकाणचे चिवडे आठवले. नंतर खामगांवातील एक जुने चिवडा विक्रेते आठवले. चिवडा, गेल्या कित्येक वर्षांपासून वेळेप्रसंगी भारतीय जनतेची भूक भागवणारा पदार्थ. कुठेही नेण्यास सोयीस्कर व टिकाऊ असा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. मागील लेखांत सांगितल्या प्रमाणे  पदार्थ बनवण्याचा विधी , त्यातील ingredients याबाबत मी काही भाष्य करणार नाही. "बोले तो भाई वो सब आजकल you tube पे मिलता है | और अपुनको उससे ज्यादा खानेमेइच interest है भाई |"  महाराष्ट्रात अनेक ठिकाणचे चिवडे प्रसिद्ध आहेत, हे अनेकांना ठाऊक आहे व त्यांनी त्या चिवड्यांची चव सुद्धा चाखली असेलच. त्यांच्याबाबत येथे विस्ताराने सांगण्याची गरज नाही. पण हे प्रसिद्ध पदार्थ बहुतांश मोठ्या शहरातीलच असतात. छोट्या शहरातून विक्री होणारे पदार्थ सुद्धा रुचकर, चविष्ट असतात पण त्यांना मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मात्र मिळत नाही. 

      आपल्या प्रिय खामगांवातील असे पदार्थ आपण या लेख मालिकेत पाहत आहोतच. आजच्या लेखात आपण खामगांवात गेल्या कित्येक वर्षांपासून विकल्या जात असलेल्या एका रुचकर चिवड्याची माहिती जाणून घेणार आहोत. बालपणी “च्चि व डां" अशी आरोळी ऐकू आल्यावर कोण आहे म्हणून पाहण्यास बाहेर गेलो होतो तर एका सायकलच्या भारवाहकावर (कॅरीयरवर) निळ्या रंगावर पांढ-या अक्षरात “सोलापुरी चिवडा” असे लिहिलेले टिनाचे दोन चौकोनी डब्बे लावलेला, हँडलवर एक पिशवी व एक छोटा तराजू लावलेला, माणूस चिवडा विकत असलेला दिसला. वडीलांनी चिवडा घेतला तेंव्हा त्या चिवडेवाले काकांच्या सायकलवर मागे लावलेल्या एका डब्यात चिवडा तर दुस-या डब्यात शेव , पिशवीत शंकरपाळे असे पदार्थ असल्याचे कळले. आम्ही फक्त चिवडा घेतला होता. काय चविष्ट होता तो चिवडा. हा चिवडा अजूनही माझा सोबती आहे, आजही मी हा चिवडा घेतोच. भाजके पोहे, डाळया, किसमिस, काजूयुक्त असा हा चिवडा आजही आपली चव कायम राखून आहे. हा चिवडा विकणा-या काकांचे नांव समाधान महाले असे होते. ते खामगांव जवळील शिरजगांव येथील रहिवाशी. काही दिवसांपूर्वी काकांच्या मुलाला या चिवड्याला "सोलापुरी चिवडा" असे नांव का दिले ?  असे मी विचारले तर त्यांनी संगितले की , खामगांवातील एका व्यापा-यासोबत त्यांचे वडील म्हणजे समाधान महाले हे उदरनिर्वाहासाठी म्हणून सोलापूरला गेले होते. काही कारणाने ते परत आले परंतू येतांना आले ते सोलापूरच्या चिवड्याची रेसिपी व तो व्यापार करण्याची कल्पना डोक्यात घेऊन. त्यांनी ती कल्पना साकारली व ज्या कारणासाठी ते सोलापूरला गेले होते त्याची सोय सोलापूरच्या सिद्धेश्वराने त्यांना खामगांवातच करून दिली. त्यांच्या चविष्ट , quality चिवड्याने त्यांचा लवकरच या व्यवसायात जम बसला. पुढे हा चिवडा विकणारे काका येणे कमी झाले, त्यांची जागा त्यांच्या मुलांनी म्हणजे रामदास, कृष्णा यांनी घेतली. चौकशी केल्यावर ते काका आता हयात नाही असे कळले. आजही त्या काकांचा चेहरा त्यांची राहणी माझ्या डोळ्यासमोर आहे सडपातळ, पायजामा-शर्ट असा पोशाख , वर्ण काळा . काहीशा कुरळ्या केसांना चांगले तेल लावलेले व डोळ्यावर चष्मा आणि त्यांची अनोखी अशी “च्चि व डां“ म्हणण्याची त-हा. त्यांचा चिवडा तिखट पण बोलणे मात्र गोड होते. पायाचे दुखणे सुरु झाले व नंतर त्यांना देवाज्ञा झाली. समाधान काकांचा व्यवसाय आता त्यांची मुले पुढे नेत आहेत. एक भाऊ खामगांव अर्बन बँकेच्या बाजूला असलेल्या दुकानात तर एक भाऊ काकांसारखा फिरस्ती करून चिवडा विकतो. चिवड्याची चव सुद्धा पुर्वीसारखीच राखण्याचा त्यांचा प्रयत्न वाखणण्याजोगा आहे. आज माहगाई वाढल्यामुळे चिवड्याची किंमत सुद्धा वाढली आहे. खामगांवात या सोलापुरी चिवडा विक्रेत्याप्रमाणे इतर चिवडे सुद्धा सुरू झाले त्यांची चव कधी घेतली नाही पण चवीच्या बाबतीत सोलापुरी चिवडाच अधिक सरस असल्याची खात्री वाटते. खामगांवातील या सोलापुरी चिवडेवाल्याचे अनेक जुने ग्राहक अद्यापही कायम आहेत.

      बाजारात आज कित्येक प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत , विविध ब्रँँडस स्थापित झाले आहेत. या स्पर्धेतही सोलापुरी चिवडा व इतर गृह उद्योग , किरकोळ विक्रेते कसेबसे तग धरून उभे आहेत. यांच्या पदार्थांची चव सुद्धा आपण चाखायला हवी. यांच्याकडून सुद्धा आपण खरेदी करणे आवश्यक नाही का ? पॅॅक मधील पदार्थ तर आपण नेहमीच घेत असतो. अनेक खामगांवकरांनी या सोलापुरी चिवड्याची चव हमखास चाखली असेल. ज्यांनी चाखली नसेल त्यांनी आवर्जून चाखावी. खामगांवच्या खाद्यसंस्कृती बाबत बोलतांना, लिहितांना येथील हॉटेलचे पदार्थ चकली, वडा ,पेढा, रबडी प्रमाणेच हा सोलापुरी चिवडा सुद्धा आहे. चिवडा या पदार्थाची उत्पत्ती कशी झाली कुणास ठाऊक परंतु भगवान श्रीकृष्ण बालपणी आपल्या संवगड्यांसह जो काला खात असत त्या काल्यापासूनच चिवडा हा पदार्थ निर्माण झाला असावा व त्यात पुढे अनेक बदल झाले असावेत असे कुठेतरी मला वाटले व म्हणून या  काल्याचीच आवृत्ती असलेल्या या चिवड्याचा व त्या अनुषंगाने या खामगांवात मिळणा-या सोलापुरी चिवड्याचा या लेखमालिकेत मला  अंतर्भाव करावासा वाटला.                  क्रमश: