लहान वन्यजीवांच्या संवर्धनाचे काय ? World Wildlife Day Special
वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रोही यांची
संख्या तेजीने वाढत असतांना मात्र रान ससे, तितर, बटेर (बाटी) / लावरी, टोयी (लहान पोपट) हे सर्व लुप्त होण्याच्या
मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा
होत आहे ?, कोण करत आहे ? वनखात्याचे
इकडे लक्ष आहे की नाही ? जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठी , जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे
लहान वन्यजीव नाहीत का ?
अनेक प्रकराच्या विविधतेने नटलेल्या भारतात विविध वन्यजीव सुद्धा आढळतात. रामायण –महाभारत काळात वन्यजीव सुखाने ऋषी मुनींच्या आश्रमा जवळ भयमुक्त असे राहात असत. पुढे आधुनिक काळात भारतातून इंग्रजांच्या गच्छंतीपुर्वी मुघल सम्राट व इंग्रज यांनी वारेमाप शिकारी भारताच्या समृद्ध जंगलातून केल्या होत्या. शिकार करणे म्हणजे तत्कालीन मनोरंजनाचे साधन होते , एक खेळ होता. अनेक भारतीय राजे-महाराजे शिकारीसाठी म्हणून दूर-दूर जात, जंगलातच मुक्काम ठोकत. शिकार झाली की वाजत गाजत गावात येत व मोठ्या हौशेने वन्यप्राण्यांचे मुंडके आपल्या दरबारात लावत. त्यांचे कातडे आसन म्हणून वापरत. अशाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारींमुळे पट्टेदार वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. यावर उपाय योजना म्हणून वाघांचे संवर्धन, टायगर प्रोजेक्ट निर्माण झाले. शिकारीवर बंदी आणली गेली, अभयारण्ये निर्माण केली गेली. जंगल कायदा मात्र तोच इंग्रजांनी तयार केलेला. अनेक मोठ्या जीवांचे संवर्धन झाल्यानंतर वाघ, बिबट, अस्वल, हरीण व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती संख्या एवढी वाढली की, शहरात बिबट व अस्वल घुसू लागली तर हरणे व रोही शेतक-यांची डोकेदुखी झाली. परंतू हे घडण्याचे कारण सुद्धा मानवच आहे कारण ज्या जमीनीवर पुर्वी वन्यजीवांचा हक्क होता त्या जमिनीवर आता मानवाने कब्जा केला आहे. त्यांच्याच जमिनीवर ते आले की आपल्याला ते आपल्या हद्दीत घुसले असे वाटते. कर्नाटकातील दोडामार्ग येथील हत्तींच्या मार्गात मानवी वस्त्या, शेती झाल्याने त्यांच्या पुर्वीच्या वाटा आता बंद झाल्या आहेत. वन्यजीवांच्या उपद्रवामुळे मग त्यांना निर्घुणपणे मारण्याच्या घटना सुद्धा घडतात. भारतात कितीतरी एकर जमीन जंगलांनी व्यापली आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त वन जमीन आपल्या विदर्भात आहे. परंतू निव्वळ जंगले असून चालणार नाही तर तेथील वन्यजीव संपदा सुद्धा टिकली पाहिजे ती टिकण्यासाठी सरकारसोबत जनतेला, वन्यजीव प्रेमींना सुद्धा अग्रेसर व्हावे लागेल. तसेच वनविभाग व सरकार यांचे लक्ष केवळ मोठ्या वन्यजीवांच्या संवर्धनाकडेच असल्याचे दिसते. एकीकडे वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रोही यांची संख्या तेजीने वाढत असतांना मात्र रान ससे, तितर, बटेर (बाटी) / लावरी, टोयी (लहान पोपट) हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा होत आहे ?, कोण करत आहे ? वनखात्याचे इकडे लक्ष
आहे की नाही ? जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठी , जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे लहान
वन्यजीव नाहीत का ? तर लहान वन्यजीव सुद्धा आवश्यकच आहे परंतू याकडे सरकारचे लक्ष नाही असे जाणवते. जंगल भ्रमंतीस गेल्यावर रानससा मुळी दिसतच नाही किंवा कुणाला दिसल्याचे ऐकीवात येत नाही. जंगल भ्रमंती करून आल्यावर समाज माध्यमांवर लोक जे फोटो पोस्ट करतात त्यात कधीही रानससा , साळीन्दर , टोयी (लहान पोपट ) तितर यांचे फोटो शेअर केल्याचे दिसत नाही. वन्यजीवांची जेंव्हा शिरगणती होते त्यात सुद्धा या प्राण्यांची संख्या दिलेली दिसत नाही. वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिकारी व दुर्लक्ष यामुळे आज चित्त्यासारखा चपळ , तेज , सुंदर प्राणी भारतातून केंव्हाच लुप्त झाला आहे. आता सरकारने काही चित्ते आफिकेतून आणले आहेत खरे परंतू त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. आज कित्येक फुलपाखरांच्या जाती लुप्त झाल्या आहेत.
आज जागतिक वन्यजीव दिवसाच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त लहान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सुद्धा पाऊले उचलली गेली पाहिजे, वन्यजीवप्रेमींनी सुद्धा यावर विचार करायला हवा.
सुरेख लिखाण. विषय विचार करण्यासारखा आहे
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवा🙏
हटवाVery nice vinayji
उत्तर द्याहटवाThank you
हटवाToo good Vinay
उत्तर द्याहटवा👍🙏
हटवा