...ये कश्मीर है
नुकताच कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. या निमित्ताने काश्मीर बद्दलचे वर्णन सत्तरच्या दशकात आलेल्या ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बेमिसाल या अमिताभ बच्चन, विनोद मेहरा व राखी अभिनीत व आर. डी. बर्मन या चतुरस्त्र संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाततील "कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है" या गीताचे स्मरण झाले. खरेच ही तस्वीर कायमची खुबसुरतच राहायला हवी.
नुकताच काश्मिर फाईल्स हा काश्मिरी पंडीतांवर कसा अन्याय झाला हे कथन करणारा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती आणि ती होणे स्वाभाविक सुद्धा आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांना काश्मिर मधून आतंकवादयांनी निष्कासित केले. आपली घरे, जमीन, सफरचंदाच्या बागा सगळे सोडून काश्मिरी पंडीत आपल्याच देशात निर्वासित झाले, देशात इतस्ततः विखुरले गेले परंतू देशातील जनता अनभिज्ञ होती, काश्मिरी पंडीतांवर होणारे अत्याचार इतर भागातील जनतेपर्यंत पोहचत नव्हते किंवा हेतुपुरस्सरपणे पोहचू दिले जात नव्हते, तत्कालीन माध्यमांनी या घटनेस प्रसिद्धी देण्याचे टाळले. तथाकथित सेक्युलर आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक, एरवी मानवतावादाच्या गप्पा हाणणारे तथाकथित बुद्धिजिवी काश्मिरी पंडीतांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वेळी मात्र मूग गिळून गप्प होते. तदनंतर अभाविप व इतर काही संघटनांनी श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे आंदोलन छेडले तेंव्हा या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात होती. परंतू या आंदोलनामुळे काश्मिरची हाताबाहेर जात असलेली परिस्थिती देशवासियांना कळण्यास मोठा हातभार लागला. तत्कालीन सरकारवर सुद्धा याचा काही प्रमाणात परीणाम झाला असावा.
काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचाराचे दाखले कश्मीर फाईल्स या चित्रपटातून दिले आहे. काश्मीर म्हणजे आपल्या भारताचे नंदनवन, भारताच्या या निसर्ग संपन्न ऊत्तर टोकाच्या भूमीस म्हणूनच स्वर्गाची उपमा दिली गेली आहे. ऋषीमुनींनी जिथे तपश्चर्या केली, काश्मिरवर आधारित राजतरंगिणी सारखा ग्रंथ, व्याकरण रचले गेले, 14 व्या शतकापर्यंत जिथे मुस्लिम पाऊलही पडले नव्हते, त्या काश्मीरच्या रम्य, पवित्र, स्वर्गीय भूमीवर पाकीस्तान पुरस्कृत कट्टर धर्मांध दहशतवादयांनी पाय पसरवले, फुटीरतावादी संघटना पोसल्या जाऊ लागल्या. भारत स्वतंत्र झाल्यावर ऐंशीच्या दशकापर्यंत काश्मीर शांत होते, लोक पर्यटनास येत होते, चित्रपटांचे चित्रीकरण येथे होत होते त्या चित्रपटांच्या कथांतून, गाण्यातून काश्मिरचे सुंदर असे वर्णन होत असे, काश्मिरची दृश्ये पडद्यावर बघून दर्शक सुखावत असे.
काश्मिर बद्दलचे असेच वर्णन सत्तरच्या दशकात आलेल्या ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बेमिसाल या अमिताभ बच्चन, विनोद मेहरा व राखी अभिनीत व आर. डी. बर्मन या चतुरस्त्र संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील "कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है" या गीतातून गीतकार आनंद बक्षी यांनी व्यक्त केले आहे. बेमिसाल हा खुप सुंदर कथानक असलेला चित्रपट आहे परंतू आज केवळ या चित्रपटातील गीताबाबतच. चित्रपटाबाबत पुन्हा कधी तरी. तर "कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है" या गीतात गीतकाराने काश्मीरचे यथार्थ वर्णन केले आहे. हे वर्णन करतांना गीतकार म्हणतो,
"परबतो के दरमिया है,
जन्नतो के दरमिया है,
आज के दिन हम यंहा है|
साथी ये हमारी तकदिर है ||"
खरेच स्वर्गीय पर्वत व रमणीय दृश्ये असणा-या काश्मिर सारख्या ठिकाणी जाणा-यास आपण भाग्यवान असल्याची प्रचिती येते. पण याच स्वर्गीय ठिकाणी नतद्रष्ट आतंकवादयांनी बंदुकांच्या गोळ्या, बॉम्बचे वर्षाव, जवानांना लक्ष्य करणे, निष्पाप लोकांना मारणे यांनी उच्छाद मांडला, लहान-लहान मुलांची माथी भडकवून त्यांच्या मनात व्देशाचे विष भरवून त्यांना अतिरेकी बनवले जाऊ लागले , दहशतवादाची जणू एक फॅॅक्टरीच काश्मिर मध्ये सुरु झाली व या नंदनवनास उध्वस्त करू लागली, या निसर्गानी ओतप्रोत भूमीस या कट्टरतावाद्यांनी भकास बनवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला , येथील शांती नष्ट केली.
इस जमीन से, आसमान से,
जाना मुश्किल है यंहा से |
तौबा ये हवा है या जंजीर है ||
गीताच्या वरील ओळीत येथे पर्यटनास आलेल्यास येथील हवा, येथील आकाश सोडून जाणे कसे जीवावर येते, येथील आल्हाददायी हवेने त्याला जणू एखाद्या साखळीने बांधून ठेवले आहे असे वाटते.
2019 मध्ये मोदी सरकारने 370 कलम रद्द केल्यावर आता काश्मिर घाटीत बदल होण्यास सुरुवात झाली आहे खरी. तरीही दहशतवादी अधून-मधून डोके वर काढतच असतात. 1980 च्या पुर्वीच्या स्थितीसारखी स्थिती असलेले काश्मिर हवे असल्यास आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे. दहशतवाद विरोधी कायदा आहे परंतू नव तरुणांना दहशतवादी बनण्यापासून कसे परावृत्त करता येईल ?, त्यासाठी नवीन काही योजना आखता येऊ शकते का?, जिथे या तरुणाची माथी बालवयातच भडकवली जातात त्या ठिकाणांबाबत काही उपाययोजना करता येईल का , त्या ठिकाणांवर काही निर्बंध लावता येऊ शकतील का ? या तरुणांना दहशतवादी बनण्यापेक्षा मुख्य प्रवाहात कसे आणता येईल ? त्यांच्या पालकांचे समुपदेशन कसे करता येईल ?, काश्मीरच्या विद्यार्थ्यांना भारतात इतरत्र फिरण्यास आणून त्यांना आपला देश दाखवण्याची एक चांगली योजना होती , ती अद्याप सुुरु आहे की नाही ज्ञात नाही परंतू सुरु असल्यास त्या योजनेत आणखी काही सुधारणा करता येतील का ? काश्मिर मध्ये व्यापार करण्यास ईच्छूकास संरक्षण कसे देता येईल ? या सर्व बाबींवर विचारपूर्वक चिंतन करून सर्वांना सोबत घेऊन विचार होणे, झटपट निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वेळेला सुद्धा महत्व द्यावे लागेल कारण उद्या कशी परिस्थिती येईल याची निश्चिती नाही. काश्मिर भागात पर्यटनास आणखी चालना कशी देता येईल? हे सुद्धा लक्षात घेणे जरुरी आहे. उपरोक्त बाबींवर त्वरेने कारवाई झाल्यास , निर्णय झाल्यास तसेच दहशतवादाचे समूळ उच्चाटन झाले तरच पुनश्च
कितनी खूबसूरत ये तस्वीर है
ये कश्मीर है |
या गीतासारखी परिस्थिती निर्माण होईल. व काश्मिर या नंदनवनात पुनश्च शांती , आनंद प्रस्थापित होईल. पुर्वी सिनेमासाठी हिंदीत तस्वीर हा शब्द वापरायाचे. त्यानुसार काश्मिर फाईल हा चित्रपट जसा एक सुंदर तस्वीर आहे तशीच प्रत्यक्षातील काश्मीरची सुद्धा खुबसुरत अशीच तस्वीर असावी हीच समस्त भारतवासियांची मनोकामना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा