एक स्वप्न शंभूराजांचे
शंभूराजांचा चेहरा क्रोधाने लाल झाला होता ते बोलत होते. तलवारीशी लगीन लागल्यावर तिची साथ नाही सोडली आम्ही. तुम्हापाशी सुद्धा तलवारीसारखे आजचे लोकशाहीतील लेखणीचे शस्त्र आहे असे म्हणत असता ना नेहमी ? मग ते असतांनाही का ते म्यान करून बसलात ?, कसला डर वाटतो तुम्हाला ?
काय रे ए खुप लिहतोस ना ? मग आम्हास व कवी कुलेशास बंदी बनवणा-या, आमचे हाल-हाल करून आम्हाला धर्म बदलवण्यास सांगणा-या आणि पुढे आमचे अंग-प्रत्यांगाचा विच्छेद करून आमची इहलोकीची यात्रा संपवणा-या त्या औरंग्याचे चित्र झळकवले आणि ज्या वर्षात आमच्या आबासाहेबांच्या राज्यभिषेकास 350 वर्षे साजरी होत आहे त्याच वर्षात त्याच्या कबरीवर पुष्पे वाहिल्या गेली तरी तुम्ही गप्पच राहिलात, मुसक्या बांधल्या गेल्या होत्या का तुमच्या? श्रींच्या इच्छेने आमच्या आबासाहेबांनी हिंदवी स्वराज्य स्थापिले त्याच स्वराज्यातील पुढील पिढया हा सारा प्रकार मूग गिळून वाहिन्यांवर पाहत बसला, चॅनल बदलत राहिला. तुझी लेखणी सुद्धा मोडली होती की काय? संभाजी महाराज अत्यंत क्रोधाने बोलत होते. मी खाली मान घालून बसलेलो होतो. अरे गर्दन निची करून काय बसलाय ? ऐकतोस आहे ना ? अरे आम्ही अगदी बालवयात असतांना आमचे आबासाहेब जेंव्हा याच औरंगजेबाच्या दरबारात आम्हाला घेऊन गेले होते. नऊ वर्षाचे बालक होतो आम्ही परंतू तेथील प्रसंग आजही आमच्या लक्षात आहे. पंचहजारी मनसबदारीच्या रांगेत आम्हाला उभे केले गेले. आमच्या आबासाहेबांना बादशहापासून लांब अंतरावर उभे केलेले पाहून आबासाहेबांना आश्चर्य वाटले, क्रोध आला आणि मग ज्या बादशहाच्या दरबारात मान वर करून बोलता येत नसे, जातांना बादशहास पाठ दाखवून जाता येत नसे त्याच बादशहाच्या दरबारात बादशाहीचा कोणताही मुलाहिजा न बाळगता "रामसिंहssss हमसे भी आगे ये कौन खडा है? असे म्हणत आमचे आबासाहेब सिंहासारखे गरजले होते? उभा दरबार हादरला होता. पण आमच्या आबासाहेबांनी पुढच्या परीणामांचा विचार न करता अपमान सहन करून घेतला नाही. काय कडाडले होते आमचे आबासाहेब. आबासाहेबांनी त्यांच्या वागणुकीतून आम्हाला खुप काही शिकवले होते. अपमान गिळायचा नाही त्यातही अन्यायी परकीयांनी केलेला तर मुळीच नाही हे आम्हाला तेंव्हा अगदी स्पष्ट समजले. समर्थ रामदास स्वामी आम्हाला उद्देशून म्हणाले होते "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप" आम्ही ते अनुसरले पण तुमचे काय? समर्थांचे ते वाक्य तुम्हाला लागू पडत नाही की काय?, की आबासाहेब व आमचे नांव केवळ मिरवणूकीतील जयघोषापुरते तेवढे घ्यायचे म्हणजे झाले, केले आपले कर्तव्य पुर्ण असे तुम्हास वाटते? अरे आम्ही तर थेट लढायचो, शत्रूवर तुटायचो. देव, देश अन धर्मासाठी प्राण हाती घ्यायचो नव्हे त्यासाठी प्राणही गमावले. शंभूराजांचा चेहरा क्रोधाने लाल झाला होता ते बोलत होते. तलवारीशी लगीन लागल्यावर तिची साथ नाही सोडली आम्ही. तुम्हापाशी सुद्धा तलवारीसारखे आजचे लोकशाहीतील लेखणीचे शस्त्र आहे असे म्हणत असता ना नेहमी ? मग ते असतांनाही का ते म्यान करून बसलात ?, कसला डर वाटतो तुम्हाला ? आम्हाला धर्मवीर म्हणू नये असे म्हटले गेले तेंव्हाही तुम्ही गप्पच होता. आम्ही आमच्या मावळ्यांनी "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती म्हणत" सर्व डर सोडून बायका, लेकरंबाळे यांचा विचार न करता लढलो अन तुम्ही चुकीच्या कृत्याबद्दल "ब्र" काढण्यासही डरता, धिक्कार असो ! माझ्या खिशातील पेन मोडत महाराज कडाडले. यांना जाण्यास सांगा असे भालदार चोपदारांना त्यांनी फर्मावले "महाराज माफी असावी , माफी असावी" मी उत्तरलो. "खामोश, चालता हो" शंभूराजे पुन्हा गरजले.
त्या गर्जनेने मी निद्रेतून बाहेर आलो. हा सारा स्वप्न दुष्टांत पाहून मी स्तब्ध झालो होतो. काय करावे काही सुचत नव्हते. नाना विचार, प्रश्न यांचा गदारोळ मनात सुरु झाला. काय झाली आहे ही राजकारणाची त-हा ? ही नेत्यांची वक्तव्ये, त्यांची कृती, वागणूक, गठ्ठा मतदानासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचणे व तद्नंतर अशी कृती आपण का केली याची न पटणारी स्पष्टीकरणे देणे ? जनता या नेत्यांच्या वागणुकीला पुरती वैतागून गेली आहे ? एकमेकांना शिव्या देणे, घाणेरडी भाषा, शब्दप्रयोग करणे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप अशा रणधुरंधर लोकांची नांवे घेणे आणि त्याच्या अगदी उलट कृती करणे हेच आपल्या देशातील राजकारणात चालू आहे. इतिहासातील खलनायकांचे, आक्रमकांचे, जनतेवर अनन्वित अत्याचार करणा-यांचे फोटो झळकवणे त्यांच्या कबरीचे दर्शन घेणे, फुले वाहणे या अशा कृती केल्याने औरंगजेबसारख्या स्वत:च्या वडीलांना कैदेत टाकणा-या, भावाला मारणा-या औरंगजेबाचे उदात्तीकरण कदापीही होऊ शकणार नाही. असे विचार मनात येत होते, स्वत:च्या बापाचा, बंधूचाही होऊ न शकलेल्या अशा औरंगजेबाचे फोटो झळकल्यापासून व कबरीवर फुले वाहिल्या गेलेल्या त्या काळ्या दिवसापासून स्वप्नात दिसलेला शंभूराजांचा तो क्रोधाने लालबुंद झालेला चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता. लेखणीचे शस्त्र का चालवत नाही? असे स्वप्नात विचारणा-या शंभूराजांच्या प्रश्नामुळे मी लिहिता झालो.