Click "Follow" Button below To Follow this Blog

११/०८/२०२०

Political leaders are blaming each other after Sushant Rajput Suicide

मुडदे उकरु नका , सत्य समोर आणा   
(टीप – शीर्षकातील मुडदे उकरणे या शब्दावरून कुणी काही गैरसमज वगैरे कृपया करून घेऊन नये , जुने वाद , जुन्या गोष्टी, विस्मरीत गोष्टींवर पुन्हा चर्चा करणे व नवीन वाद निर्माण करणे  यासाठी हिंदी भाषेत गढे मुर्दे उखाडना असा वाक्प्रचार वापरला जातो )
   सुशांत राजपूत या तरुण अभिनेत्याच्या आकस्मिक निधनांनंतर देशभरात शोक निर्माण झाला. या घटनेचे  साद-पडसाद , हत्या की आत्महत्या ? , बिहार पोलिस अधिका-याचे महाराष्ट्र पोलिसांनी विलगीकरण करणे नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे हे सर्व देशातील जनता पाहत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर हिन्दी चित्रपटसृष्टीतील गटबाजी सुद्धा दिसून आली. सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तपासाची चक्रे फिरू लागल्यानंतर तसेच एका पार्टीचा व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांची तीव्रता वाढली. जहाल पत्रकार , संपादकांनी आपली लेखणी जोरात चालवत कधी पोलिसांच्या तपासावर ताशेरे काय ओढले तर थोड्याच वेळात पोलिसांची पाठराखण सुद्धा केली. मयताच्या वडीलांबाबत विधान केल्यामुळे त्या विधानामुळे माफीची मागणी सुद्धा होत आहे. एका पक्षाच्या नेत्यावर आरोप झाला तर त्या पक्षाच्या नेत्यांनी दुस-या पक्षाच्या नेत्याच्या अपघाताची चौकशी करा, एका दिवंगत न्यायाधीशाच्या आकस्मिक निधनाची चौकशी करा असे सुतोवाच केले. आपल्यावर आरोप झाला की आपण जर काहीही केलेले नसले तर निधड्या छातीने पुढे जावे. तसे न करता आपल्या देशातील नेते मंडळी दुस-याच्या जुन्या चुका, पुर्वकृत्ये यांचे दाखले देत बसतात. ठीक आहे त्यांनी तसा काही गुन्हा केला असेल , चूक केली असेल तर त्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतू त्यांनी गुन्हे केले, गैरकृत्ये केली म्हणून मग तुम्ही करणे किंवा करावे ही भूमिका मुळीच योग्य नाही आणि जर तसेच असेल तर याच न्यायाने मग 90 च्या दशकात ठाण्यातील एक दिग्गज नेत्याच्या संशयास्पद मृत्यूची सुद्धा चौकशी व्हावी. याच काळात पुण्याच्या एका सिनेमागृहात एक मृतदेह आढळला होता. तो मृत्यू कसा झाला याचे गूढ सुद्धा अद्याप कायमच आहे. या देशात कित्येक हत्या झाल्या आहेत की ज्यांचे मारेकरी कोण ? याचा तपास आजतायागात लागलेला नाही. सुशांत राजपूत या अभिनेत्याची हत्या असो वा आत्महत्या याची नि:पक्ष चौकशी , तपास व्हावा. तसे होईल की नाही कुणास ठाऊक ? परंतू पोलिसांनीच पोलिसांना पकडणे , वृत्तपत्रात लिहिणे एक व बोलणे दुसरे तद्नंतर त्यावर सारवासारव करणेएकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, तरुण नेत्यानी सीबाआय चौकशीची मागणी केली असता त्यांच्या परिपक्वते बद्दल शंका व्यक्त करणे. या सगळ्यांमुळे देशातील जनतेच्या मनातील संशय अधिकच वाढतो आहे. नेते-अभिनेते यांच्या घनिष्ट संबंधातून अनेकवेळा बरेच काही मोठे व अनपेक्षित असे घडलेले देशाने पाहिले आहे मग ते शस्त्रास्त्रे बाळगणा-या अभिनेत्याच्या शिक्षेबाबत असो की , हेडली सोबत मित्रता ठेवणा-या एका चित्रपटसृष्टीतील दिग्गजपुत्राचे प्रकरण असो किंवा मग अनेक प्रकरणात आरोपी असलेल्या, खटले चाललेल्या अभिनेत्याच्या चित्रपट प्रदर्शनाला मोकळी वाट करून देणे असो. राजकीय नेत्यांच्या आश्रयामुळे अनेकवेळा अभिनेत्यांना पाठीशी घातल्या गेले आहे. नेते, अभिनेते यांच्या गुन्ह्यांची , प्रकरणांची चौकशी करतांना देशातील कायदा व सुव्यवस्था यंत्रणेची मात्र मोठी कसरत होत असेल, त्यांच्यावर मोठा दबाव व तणाव येत असेल. यातूनच अनेक अधिका-यांनी आत्महत्या सुद्धा केल्याची उदाहरणे आहेत. उच्चभ्रू समाजात जेंव्हा अशा घटना घडतात तेंव्हा त्यावर देशाचे लक्ष असते , जनतेला अशा घटनांची नि:पक्ष चौकशी झालेली तसेच गुन्हेगाराला कडक शासन झालेले पाहायचे असते. परंतू राजकीय नेते , बडी मंडळी मात्र अशा घटनांची चौकशी होत असतांना जुने वाद , जुनी प्रकरणे अर्थात मुडदे उकरण्याचे काम करून जनतेला उल्लू बनवण्याचे कार्य तर करीत असतातच शिवाय तपासाची चक्रे सुद्धा काही वेगळ्याच दिशेने फिरतील अशी वक्तव्ये करीत असतात. त्यांनी आप-आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडावी , जुने वाद, प्रकरणे यांचे मुडदे उकरण्याऐवजी संयम बाळगणे, तपास योग्य दिशेने होऊ देणे, संभ्रम न वाढवणे, आपण राजकीय नेते आहोत "यथा राजा तथा प्रजा" या न्यायाने प्रजा आपले अनुसरण करीत असते त्यामुळे आपली वागणूक योग्य व आदर्श अशी ठेवणे हे जनतेला अपेक्षित असते. जुने मुडदे निव्वळ एकमेकांवर आरोपांसाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी उकरू नये तर त्यांच्या नि:पक्ष चौकशीसाठी पुढाकार घ्यावा व पूर्वी झालेल्या व आता होत असलेल्या सर्वच गुढ मृत्यूंचे सत्य जनतेसमोर आणावे.     

०६/०८/२०२०

Article about Lal Krishna Advani openion after 5 Aug 2020 Ram Mandir "ShilaNyas" in Ayodhya

कृष्णाला रामाचा आशीर्वाद , भाग- 2 
9 नोव्हेंबर 2019 भारतीय सर्वोच्च  न्यायालयाने 
लोकशाही मजबूत असल्याचे  सिद्ध  करणारा रामजन्मभूमी खटल्याचा ऐतिहासिक असा निकाल दिला होता. अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी रामजन्मभूमीसाठी दिलेल्या लढ्यामुळे हे शक्य झाले म्हणून कृष्णाला रामाचा आशीर्वाद  हा लेख लिहिला होतात्यात लालकृष्ण अडवाणी यांची सर्वात  महत्वाची प्रतिक्रिया आली होती त्यावर भाष्य केले होते. ती म्हणजे आज मी निश्चिंत झालो अयोध्या निकाल हा माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणे आहे. स्वातंत्र्य चळवळी नंतरच्या सर्वात मोठ्या जनआंदोलनात माझे नम्र योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. सर्वानी मतभेद , जातीयवाद विसरून शांतता स्वीकारावीअसे म्हटले होते. काल भूमिपूजनानंतर अडवाणी यांची पुनश्च प्रतिक्रिया आली आणि त्याबाबत लिहावेसे वाटले म्हणून पूर्वी लिहिलेल्या लेखाचा हा दुसरा भाग लिहिला. भारतातील अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या. मोदी यांनी त्यांच्या भाषणात सर्व मुद्दे साधू संत इत्यादींचे दाखले देऊन अतिशय प्रभावीपणे व संयमाने कथन केले. सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या उद्बोधानात 30 वर्षाचा संघर्ष कामास आला असे म्हटले तर रामजन्मभूमिसाठी लढा देणा-या सर्वांचे स्मरण केले. तसेच अपेक्षित असे काही वेगळे सूर सुद्धा उमटले कुमार केतकर यांनी रामाला काव्यपुरुष म्हटले, ओवैसी यांनी प्रियंका वढेरा यांच्या मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकता , बंधुता , समरसता यांचे प्रतिक आहे असे म्हटल्यावर हे तर काँग्रेसचे मूक हिंदुत्वाचे राजकारण आहे असे म्हटले. पाकिस्तानातील मंत्री शेख रशीद अहमद यांनी अकलेचे तारे तोडले, भारत रामनगर झाला असे ते म्हणाले. त्यांनी प्रथम पाकीस्तानात किती मंदिरे आहेत आणि भारतात किती मस्जिदी आहेत हे पहावे व नंतर बोलावे. इतरही अनेक प्रतिक्रिया आल्या. अडवाणी यांची प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचे लक्ष होते. बहुप्रतीक्षित , अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रभू रामचंद्र यांचे मंदिराचे भूमिपूजनास अडवाणी आणि तत्कालीन अनेक नेते कोरोना परिस्थितीमुळे उपस्थित राहू शकले

नाही. अडवाणी उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे अडवाणी यांचे सर्वांना स्मरण होत होते व ते काय म्हणतात याकडे  सर्वांचे लक्ष होते आणि काल , “माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले हा दिवस भारतीयांसाठी  अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे. 1990 मध्ये मी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती, या लढ्यात योगदान देणा-या नागरिकांचे , साधू संतांचे मी आभार मानतो. हे मंदिर भारतीयांना त्यांचे गुण , संयम , न्याय इ बाबी सांगेल.” अशी अडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रसंगी अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे  यांचे  सुद्धा स्मरण जनतेस झाल्याशिवाय राहणार नाही. अयोध्या प्रकरणात पुरातत्व विभागाने केलेले संशोधन सुद्धा कामी  आले आहे. के के मोहम्मद यांनी केलेले संशोधन या  प्रकरणी फायद्याचे ठरले आहे. सुप्रीम कोर्टाच्या 9 नोव्हेंबर 2019 च्या निकालानंतर व काल अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिलान्यासा नंतर आलेली लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया ही सर्वात बोलकी अशी प्रतिक्रिया आहे व या निकालाचा सर्वाधिक समाधान ज्या व्यक्तीस होईल अशा कर्मयोग्याची ती प्रतिक्रिया आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर या ऐतिहासिक वादग्रस्त जागी राम मंदिर साकार होणे हे त्यांच्यासाठी अयोध्याधीशाच्या आशीर्वादाप्रमाणेच आहे. त्यामुळे या लालकृष्णासप्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळाला असेच वाटते आहे. 

०५/०८/२०२०

Article on the occasion of "Shilanyas" of Lord Ram Temple in Ayodhya

हे रोम, रोम मे बसनेवाले राम...

राम मंदिराचे भुमी पुजन 5 ऑगस्ट रोजी  होणार हे वृत्त झळकले आणि आज भुमी पुजन संपन्न सुद्धा झाले. शेकडो वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रामभक्तांचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे. आजपावेतो अनेक वृत्तपत्रे व माध्यमांनी राम, अयोध्या , मंदीर मस्जिद वाद , अयोध्येचा इतिहास याबात अनेक लेख, चर्चा प्रसारीत केल्या. मर्यादा पुरुषोत्तम , आदर्श पुत्र, आदर्श पती , आदर्श भ्राता , आदर्श पिता प्रभू रामचंद्र म्हणजे करोडो भारतीयांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य करणारे भगवंत.

राम नाम की लूट है, लूट सके सो लूट
अंत काल पछतायेगा, जब प्रान जायेगा छूट। 

आणि

राम रहीमा ऐक है, नाम धराया दोई कहे कबीर दो नाम सूनि, भरम करो मत कोई। 

असे दोहे लिहिणारे संत कबीर , उर्दू मध्ये रामायण लिहिणारे चकबश्त यांच्यासह अनेक संतानी त्यांच्या अभंग, भारुडे यातून रामाला आळवले आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर इतरही अनेक देशांत रामाला आपला पूर्वज समजले जाते, रामलीलेसारखी नाट्ये होतात. मग हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा याला अपवाद कशी असेल. महात्मा गांधींनी पाहिलेला एकमेव चित्रपट सुद्धा कौसल्यापुत्र रामाच्या जीवनावर आधारीत “रामराज्य” हाच होता. तद्नंतर रामावर आधारीत अनेक चित्रपट त्याकाळात प्रदर्शित झाले. पुढे अनेक चित्रपटातून दशरथनंदन रामावर आधारीत अनेक गीते दाखवण्यात आली. बहुतांश गीते ही मुस्लिम कलाकारांवर चित्रित किंवा त्यांनी गायलेली , लिहिलेली व संगीतबद्ध केली आहेत. 

    मोहम्मद रफी यांनी गायलेली “सुखके सब साथी दु:ख मे ना कोई मेरे राम” हे सर्वांग सुंदर गीत आजही तितकेच श्रवणीय आहे. जुन्या घराना चित्रपटात रामाला आळवणारे  रफीजींचे “आशा भोसले यांच्या समवेत गायलेले सुमधुर असे “जय रघुनंदन जय सियाराम , हे दुख भंजन तुम्हे प्रणाम” गीत आहे या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे गीताच्या आरंभी असलेला

श्रीरामचंद्र आश्रित पारीजातह, समस्त कल्याण गुण विरामह

सिता मुखं गुरु चंचरीकाह, निरंतरम मंगल मातलत


हा संस्कृत श्लोक रफीजींनी एखाद्या संस्कृत निष्णाताप्रमाणे गायला आहे. राफीजींनीच गायलेले "मुझे अपनी शरण मे ले लो राम" हे सुद्धा एक सुंदर भजन आहे. 80 च्या दशकातील सरगम चित्रपटातील “रामजी की निकली सवारी” रफीजींनी गायलेले हे गीत तर आजही रामाच्या शोभायात्रेत हमखास वाजवले जाते. अशी आणखी किती तरी गीते आहेत. जगातील कणा-कणात ईश्वर आहे असे ईश्वराप्रती भावना व्यक्त करणारे , जगताचे स्वामी असलेल्या प्रभू श्रीरामाला नील-कमल चित्रपटात  वहिदा रहमान  “हे रोम रोम मे बसनेवाले राम मै तुझसे क्या मांगू ?" असे म्हणते. तुझ्या चरणाची धूळ ज्याला मिळते तो दगड सुद्धा हिरा बनून जातो ,  तू आम्हाला जे काही देतो त्याला आम्ही चांगले किंवा वाईट कसे म्हणणार ? , मी सर्व आशांचे बंधन तोडून सर्व काही तुझ्यावरच सोपवले आहे , असा आशय असलेले भक्तीरसाने ओतप्रोत असे हे गीत अतिशय श्रवणीय आहे.  

    अमेरिकेच्या टाईम स्क्वेअर येथे मोठ्या स्क्रिनवर प्रभू श्रीरामाचे भले मोठे चित्र आज झळकणार होते परंतू तेथील मुस्लिम संघटनांनी यावर आक्षेप घेतला असे वृत्त माध्यमांवर दाखवले. यावरून महाशक्तीशाली अमेरिका सुद्धा दबावाखाली येऊ शकतो हे समजले. परंतू जरी अमेरिकेच्या टाईम स्क्वेअर वर प्रभू रामचंद्र यांचे चित्र झळकले नसले तरी वहिदा रहमान यांनी नील कमल या गाजलेल्या चित्रपटात मात्र पडद्यावर रामाला आळवतांना म्हटलेल्या “हे रोम रोम मी बसनेवाले राम , जगत के स्वामी हे अंतर्यामी मै तुझसे क्या मांगू ?“ या गीतात व्यक्त केल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र हे या विश्वाच्या कण-कणात वसलेले आहे टाईम स्क्वेअर येथील स्क्रीन वर नाही झळकले तर काही बिघडत नाही.   

(संस्कृत श्लोक व दोह्यांमध्ये काही चूक असल्यास क्षमस्व)

२९/०७/२०२०

Article about the interviews of political leaders- Part 2

पुनश्च मुलाखत
आज ज्यांचे सरकार असते त्यांचीच वृत्तपत्रे ,  त्यांचाच मिडीया असतो मग काय सर्व काही लहान मुलांच्या खेळासारखे सुरु होते. मी हे प्रश्न विचारेल , किंवा हेच प्रश्न विचारा असे आधीच ठरवून मग मुलाखत-मुलाखत हा खेळ सुरु होतो. या विषयावर मागील लेख होता. पहिली मुलाखत शिळी होत नाही तो परवा दुसरी अशीच एक मुलाखत संपन्न झाली झाली. महाराष्ट्रात कोरोना धुमाकूळ घालत आहे , मुंबई मध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. देशात तर सरकारी कोविड रुग्णालयांची हालत खराब आहे परंतू मुलाखतींचा निव्वळ खेळ सुरू असलेल्या महाराष्ट्रात कोविडग्रस्तांना जिथे विलग करून ठेवले जाते त्या ठिकाणच्या कोविड बाधितांची मुलाखत घ्या म्हणा जाऊन, त्यांना विचारा त्यांची काय स्थिती आहे ती. आपलेच प्रमुख, आपलेच सहकारी यांना काय गुलगुळीत प्रश्न विचारता ! कोविड बाधितांना जिथे ठेवले आहे तिथे निर्जंतुकीकरण होत नाही, जेवण धड नसते , प्रसाधन गृहांची परिस्थिती तर अतिशय खराब आहे. हे रुग्ण बहुतांश गरीब आहेत त्यांना कुणी वाली नाही. आधीच गरीबी , लॉकडाऊनमुळे, जनता कर्फ्यू आदींमुळे त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. त्यांना कुणी विचारत नाही तर दुसरीकडे हायजेनिक वातावरणात राहणा-याकोरोनात घराच्या  बाहेरही न पडणा-यांच्या मुलाखती काय घेतल्या जातात, त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त ज्ञान असल्याच्या वल्गना काय केल्या जातात. साखरे बाबतच्या प्रश्नाचे  हास्यास्पद उत्तर.काय चाललय तरी काय या राज्यात? स्वत: शासकीय पूजेस जाणे दुसा-याला आभासी भूमीपूजन करण्याचा सल्ला देणे( हिंदूहृदयसम्राटांना स्वर्गात काय वाटत असेल), कुणी गाडीचे सुकाणू आपल्या हातात असल्याचे चित्र माध्यमांवर प्रसारीत करणे. यांच्या या खेळ खंडोब्याला पाहून कुणी म्हणणार नाही की महाराष्ट्रावर सध्या चीनी कोरोना विषाणूचे संकट आहे म्हणून. मागील लेखात पूर्वीची पत्रकारीता आणि सद्यस्थितीतील पत्रकारीता यांची तुलना केली होती. आज ज्यांचा मिडीया त्यांचेच सरकार असते मग काय मिडीया हाताशी घेऊन लहान मुलांच्या खेळासारखे सुरु होते. प्रश्न उत्तरे आधीच माहीत असतात मग मुलाखत-मुलाखत हा खेळ सुरु होतो. राज्यात कोरोनाच्या काळात आर्थिक संकटाच्या काळात सरकारच्या चुका, अकार्यक्षमता यांवरुन जनतेचे लक्ष उडवण्यासाठी म्हणून हे असे मुलाखतींचे खेळ खेळले जातात. राज्यात सध्या कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही , एकाचा निर्णय दूसरा रद्द करतो तर काही धार्मिक निर्णयांसाठी मुरलेले राजकारणी बरोबर मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवतात. सरकारने हे ध्यानात घ्यावे की आपल्याच लोकांना मुलाखती देण्यापेक्षा प्रथम राज्याच्या प्राथमिक बाबींकडे लक्ष द्यावे. कोरोंना विषाणूचे संकट तर आहेच परंतू लोकांना त्यांच्या गरजा सुद्धा भागवायच्या आहेत , शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. ग्रामीण भागात तुमच्या ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे अनेक मुलांकडे स्मार्ट फोन नाही, महाविद्यालयीन परीक्षांचा घोळ आहेच , व्यापा-यांचे उत्पन्न घटले आहे , तुमच्या सरकारचा तीनचाकी अ‍ॅटो चांगला चालला आहे असे तुम्ही म्हणता. परंतू खरोखर जे गरीब अ‍ॅटोवाले आहेत त्यांचा रोजगार ठप्प आहे , राज्य परीवहन मंडळ ठप्प आहे , तुम्ही गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकणात जाऊ देऊ म्हणता परंतू तिथले गावकरी वेगळीच मागणी करीत आहेत , कोणातील वादळग्रस्त अद्याप त्रस्तच आहेत आणखी कितीतरी प्रश्न आहे जे तुमच्या या "तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ" सारख्या मुलाखतींनी सुटणार नाहीत त्यासाठी तुम्हाला गांभीर्याने विचार करून एक-एक प्रश्न हाताळावा लागेल जेणेकरून तुमचे व या सरकारचे अधिक हसे होणार नाही. जय महाराष्ट्र !

२१/०७/२०२०

Article About New Consumer Rights Protection Act in India


ग्राहक संरक्षण कायद्याच्या निमित्ताने 
काल देशभरात नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला. या निमित्ताने ग्राहकांनी व सरकारनी बिंदुमाधव जोशी या द्रष्ट्या नेत्याचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकार “जागो ग्राहक जागो “असे वारंवार म्हणत असूनही निद्रिस्त असलेल्या ग्राहकांना हे सांगावे लागेल की भारतातील ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांच्या लढ्यातून लोकाग्रहातून 24 डिसेंबर 1986 रोजी भारतीय संसदेने ग्राहक हक्क कायदा पारीत केला होता. 1974 पासून बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक संघटन करण्यास सुरुवात केली होती. अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापन करण्यात आली आणि या आद्य ग्राहक संघटनेच्या बिंदुमाधव जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या मोठ्या लढ्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना सुरक्षा , उत्पादन माहिती , निवड तक्रार निवारण आणि ग्राहक शिक्षण असे अधिकार प्राप्त झाले. पुढे ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच स्थापन झाले. 2004 मध्ये जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यात आल्या. 15 सप्टे 2011 पासून ग्राहकांसाठी स्वतंत्र हेल्प लाईन कार्यरत आहे. हे सर्व असल्यावर नवीन ग्राहक संरक्षण कायदा का बनवावा लागला ? याचा विचार होणे , या कायद्यात नवीन बाबी कोणत्या आहेत यावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. आज बाजारपेठांचे स्वरूप बदलले आहे, डिजिटल व्यवहार होत आहेत. विक्रेता व ग्राहक यांचा थेट संबध येत नाही. या अशा आधुनिक बाजारपेठेत ग्राहकांची फसवणूक होण्याच्या शक्यता विचारात घेऊन हा नवीन कायदा बनवला आहे. हे नक्कीच स्तुत्य आहे. परंतू ज्यासाठी हे होत आहे तो ग्राहक मात्र या बाबतीत अत्यंत उदासीन आहे. या जुन्याच कायद्यात काही नवीन बाबींचा अंतर्भाव केला आहे. जानेवारी 2020 मध्येच लागू होणा-या या कायद्यात आभासी व्यवहारांमध्ये कंपन्यांना ग्राहक हित जोपासावे लागणार आहे , दिशाभूल करणा-या जाहिराती (उदा सध्या सुरु असलेल्या Anty Bacteria पंखा किंवा कोरोना साठी असलेल्या प्रतिकार शक्ती वाढवणा-या वस्तूंच्या जाहिराती ) देणा-या कंपन्यांवर कारवाई होणार आहे. नवीन ग्राहक न्यायालये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहक संरक्षण प्राधिकरण सुद्धा निर्माण केले आहेत या प्राधिकरणात ग्राहक माल खरेदी करण्यापूर्वी वस्तूच्या गुणवत्ते बद्दल तक्रार करू शकणार आहे. अशा या नवीन कायद्यातील ठळक असणार आहे. आता गरज आहे ती ग्राहकांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याचे भान ठेवण्याची व प्रसंगी त्याचा आधार घेण्याची.
जाता- जाता – कोरोना काळात मास्क , सॅनिटायझर, प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे व तत्सम इतर वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहकांच्या निकडीच्या काळातही अव्वाच्या सव्वा दराने ही विक्री होत आहे. तरी ग्राहकांनी या वस्तूंच्या दराची पडताळणी करून त्या घ्याव्या , पावती घ्यावी.