ग्राहक संरक्षण कायद्याच्या निमित्ताने
काल देशभरात नवीन ग्राहक
संरक्षण कायदा लागू करण्यात आला. या निमित्ताने ग्राहकांनी व सरकारनी बिंदुमाधव जोशी
या द्रष्ट्या नेत्याचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकार “जागो ग्राहक जागो “असे
वारंवार म्हणत असूनही निद्रिस्त असलेल्या ग्राहकांना हे सांगावे लागेल की भारतातील
ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांच्या लढ्यातून लोकाग्रहातून 24 डिसेंबर 1986
रोजी भारतीय संसदेने ग्राहक हक्क कायदा पारीत केला होता. 1974 पासून बिंदुमाधव जोशी
यांनी ग्राहक संघटन करण्यास सुरुवात केली होती. अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापन करण्यात
आली आणि या आद्य ग्राहक संघटनेच्या बिंदुमाधव जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या मोठ्या
लढ्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना
सुरक्षा , उत्पादन माहिती , निवड तक्रार निवारण आणि ग्राहक शिक्षण असे अधिकार प्राप्त
झाले. पुढे ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच स्थापन झाले. 2004
मध्ये जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यात आल्या. 15 सप्टे 2011
पासून ग्राहकांसाठी स्वतंत्र हेल्प लाईन कार्यरत आहे. हे सर्व असल्यावर नवीन ग्राहक
संरक्षण कायदा का बनवावा लागला ? याचा विचार होणे , या कायद्यात नवीन बाबी कोणत्या
आहेत यावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. आज बाजारपेठांचे स्वरूप बदलले आहे, डिजिटल व्यवहार
होत आहेत. विक्रेता व ग्राहक यांचा थेट संबध येत नाही. या अशा आधुनिक बाजारपेठेत ग्राहकांची
फसवणूक होण्याच्या शक्यता विचारात घेऊन हा नवीन कायदा बनवला आहे. हे नक्कीच स्तुत्य
आहे. परंतू ज्यासाठी हे होत आहे तो ग्राहक मात्र या बाबतीत अत्यंत उदासीन आहे. या जुन्याच
कायद्यात काही नवीन बाबींचा अंतर्भाव केला आहे. जानेवारी 2020 मध्येच लागू होणा-या
या कायद्यात आभासी व्यवहारांमध्ये कंपन्यांना ग्राहक हित जोपासावे लागणार आहे ,
दिशाभूल करणा-या जाहिराती (उदा सध्या सुरु असलेल्या Anty Bacteria पंखा किंवा कोरोना
साठी असलेल्या प्रतिकार शक्ती वाढवणा-या वस्तूंच्या जाहिराती ) देणा-या कंपन्यांवर
कारवाई होणार आहे. नवीन ग्राहक न्यायालये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहक संरक्षण
प्राधिकरण सुद्धा निर्माण केले आहेत या प्राधिकरणात ग्राहक माल खरेदी करण्यापूर्वी
वस्तूच्या गुणवत्ते बद्दल तक्रार करू शकणार आहे. अशा या नवीन कायद्यातील ठळक असणार
आहे. आता गरज आहे ती ग्राहकांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याचे भान ठेवण्याची व
प्रसंगी त्याचा आधार घेण्याची.
जाता-
जाता – कोरोना काळात मास्क , सॅनिटायझर, प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे व तत्सम इतर
वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहकांच्या निकडीच्या काळातही अव्वाच्या
सव्वा दराने ही विक्री होत आहे. तरी ग्राहकांनी या वस्तूंच्या दराची पडताळणी करून त्या
घ्याव्या , पावती घ्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा