Click "Follow" Button below To Follow this Blog

०९/१२/२०२०

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 1

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने, भाग-1  

मुन्सिपल शाळा

बदलत्या काळात मुन्सिपल शाळा काही बदलली नाही. हळू-हळू विद्यार्थी संख्या घटत जाऊन ती बंद पडली. परवा या शाळेच्या मैदानात सायंकाळी फिरायला गेलो असता खिन्न झालो. मला खिन्नता का वाटावी ? मी तर या शाळेत शिकलो सुद्धा नव्हतो. हो आम्ही दररोज सकाळ-संध्याकाळी येथे हँडबॉल खेळायला मात्र जात असू. येथील बोरसल्ले सर या क्रिडाप्रेमी शिक्षकांनी आम्हाला तेंव्हा चांगले सहकार्य केले होते. माझे मोठे काका येथे काही काळ शिक्षक होते आणि माझे वडील या शाळेचे विद्यार्थी होते कदाचित या आठवणींमुळे आज ती बंद पडलेली शाळा पाहून मला खिन्नता आली असावी. 

    
    खामगांव शहर, बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर. एकेकाळची कापसाची मोठी बाजारपेठ. यामुळेच या शहरात त्याकाळात अनेक शैक्षणिक केंद्रे , सरकारी कार्यालये सुरु झाली. टुमदार शहर असलेल्या खामगांवाची या कार्यालयांच्या व सरकारी शैक्षणिक केंद्रांच्या जुन्या पद्धतीच्या इमारतींनी शान वाढवली होती. काळाच्या ओघात येथील 100 हून अधिक असलेल्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी या कापुस एकाधिकार योजनेमुळे नामशेष झाल्या काही जिनिंग आजही आपल्या अस्तित्वाच्या खुणा कशाबशा दाखवीत आहेत. 1990 च्या दशकानंतर खामगांव शहर कात टाकू लागले , आधुनिकतेकडे वाटचाल करू लागले परंतू ही वाटचाल करतांना येथील पुर्वीच्या , इंग्रजकालीन इमारती दुर्लक्षित होऊ लागल्या , भकास होऊ लागल्या.

आजपासून आगामी 10 लेखात आपल्या लाडक्या खामगांव शहरातील 10 भकास होत चाललेल्या स्थळांची माहिती करून घेऊ या. आपले गतवैभवाचा आठवणीत असलेली, आता मोडकळीस आलेली ही स्थळे आपण आता नामशेष होऊ की आपल्याला नुतनीकरण करून पुनश्च गतवैभव बहाल करून दिले जाईल का अशी प्रतीक्षा करीत असतील. आजच्या पहिल्या भागात मुन्सिपल शाळा.  

इंग्रजकालीन खामगांव कसे दिसत असेल याची आता कुणाला कल्पना करता येणार नाही. परंतू कल्पना करा एक रेल्वे स्टेशन. तिथून कापसाच्या गठाणी घेऊन जाणा-या मालगाड्या, वाफेचे इंजिन. स्टेशन वरून स्पष्ट दिसत असेल एक शाळा व शाळेच्या पटांगणावर बागडणारी मुले, शाळा व स्टेशन यांमध्ये तेंव्हा एकही अतिक्रमण नसेल. शाळेच्या मागे टेकड्या शाळेकडे जातांना डाव्या बाजूच्या छोट्या टेकडीवर डाक बंगला (सर्किट हाऊस ) व जयपूर लांडे कडे जाणारा जुना रस्ता. पावसाळ्यात किती सुंदर दृश्य दिसत असेल. रेल्वेने काही मुले जलंब या गावातून सुद्धा येत असतील. ही शाळा म्हणजे तत्कालीन मुन्सिपल हायस्कूल अर्थात नगर परीषदेची शाळा. आम्ही शालेय जीवनात असतांना या शाळेचे नांव इंदिरा गांधी मुन्सिपल हायस्कूल असे बदलण्यात आले होते. खामगांव नगर परीषदेची स्थापना ही 1869 या वर्षातील म्हणजेच काही वर्षानंतर या शाळेची स्थापना झाली असेल. आता एक-दोन वर्षापुर्वी पर्यंत ही शाळा सुरु होती. आता ती पटसंख्ये अभावी बंद पडली. शाळा , शाळेचे स्वरूप , शिक्षण यात बदल करायचा असतो नांव बदलून काय होणार ? परंतू ज्यात बदल करायचा ते सोडून आपल्या देशात भलतेच बदल केले जातात. बदलत्या काळात मुन्सिपल शाळा काही बदलली नाही. हळू-हळू विद्यार्थी संख्या घटत जाऊन ती बंद पडली. परवा या शाळेच्या मैदानात सायंकाळी फिरायला गेलो असता खिन्न झालो. मला खिन्नता का वाटावी ? मी तर या शाळेत शिकलो सुद्धा नव्हतो. हो आम्ही दररोज सकाळ-संध्याकाळी येथे हँडबॉल खेळायला मात्र जात असू. येथील बोरसल्ले सर या क्रिडाप्रेमी शिक्षकांनी आम्हाला तेंव्हा चांगले सहकार्य केले होते. माझे मोठे काका येथे काही काळ शिक्षक होते आणि माझे वडील या शाळेचे विद्यार्थी होते कदाचित या आठवणींमुळे आज ती बंद पडलेली शाळा पाहून मला खिन्नता आली असावी. इंग्रजकालीन ती कौलारू इमारत सुद्धा खिन्न उभी असल्यासारखी वाटत होती. मोडलेले दरवाजे,खिडक्या असलेले वर्ग ब-याच दिवसांपासून विद्यार्थ्यांचा कोलाहल न ऐकल्याने आपल्या भकास स्वरूपाने त्रस्त भासत होते. सर्वत्र धुळ, पक्षांची विष्ठा व पिसे, असे घाणीचे साम्राज्य असलेल्या ज्या वर्ग खोल्यात येथील विद्यार्थी कधी-काळी नमस्कार करून प्रवेश करीत असतील त्या विद्येच्या मंदिराचे हे असे स्वरूप मी पाहत होतो.

एकेकाळच्या खामगांव शहरातील या दिमाखदार ईमारतीची आज ही अशी अवस्था झालेली आहे. प्रशासनाने येथे सेमी इंग्रजी शाळा का काढू नये ? येथे इस्पीतळ किंवा सरकारी रुग्णालयाचा एखादा विभाग सुद्धा बनवता येईल, सरकारी रुग्णालय येथून जवळच आहे. सरकारी मालमत्ता या सुरक्षित का राखल्या जात नाही ? प्रशासनाच्या असे काही विचाराधीन आहे की नाही ? कदाचित असेलही , नसल्यास कुणीतरी चांगला अधिकारी असा विचार करेल का? त्याला राजकारणी साथ देतील का ? की पुर्वाश्रमीची ग्रामीण भागातील , आर्थिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना समावून घेणारी व त्या विद्यार्थ्यांना घडवणारी ही मुन्सिपल हायस्कूल आता अशीच राहील का ? ती अजून खचत जाऊन केवळ भग्नावशेष शिल्लक राहतील का , स्टेडीयम स्वरूपासारखी बनवलेली भिंत तर आताच खचली आहे. मैदानातून बाहेर पडलो तेंव्हा अंधार पडू लागला मागे वळून पुन्हा शाळेकडे पाहिले तर त्या अंधारात ती मला अधिकच भकास दिसू लागली आणि विचारांच्या वेगासह माझ्या पावलांचा वेगही वाढला.

क्रमश:

०१/१२/२०२०

Article about competition organised by Shivsena.

मतांच्या भिक्षेसाठी

आपल्या मतदारांनी आगामी काळात पाठ फिरवली तर मते कशी मिळणार ? मग त्याची सोय व्हायला पाहिजे ना ! मुंबई महापालिका क्षेत्रात झपाट्याने संख्या वाढणा-या , झोपडपट्ट्यांत राहणा-या कॉंग्रेसची “व्होट बँक” असलेल्या मतदारांपैकी काही वाटा आपल्याला मिळाला पाहीजे या उद्देशाने आता शिवसेनेची वाटचाल सुरु झालेली आहे. शिवसेनेची वक्तव्ये , काही पोस्टरवरचा मजकूर , अनेक ठिकाणी वगळलेली “हिंदुहृदयसम्राट” ही बाळासाहेबांची जनतेने दिलेली उपाधी. अशा अनेक गोष्टी घडू लागल्या. परवा असेच एक वृत्त आले. शिवसेना असेही कधी करेल असे कुणाच्या स्वप्नात सुद्धा आले नसेल. पांडुरंग सकपाळ या शिवसेना नेत्याने आयोजित केलेल्या स्पर्धेबाबतचे ते वृत्त होते. ही स्पर्धा आहे “अजान स्पर्धा”.

शिवसेना , बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष. प्रखर राष्ट्रवाद , हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कर्ता , राज्य , भाषा यांचा तीव्र  अभिमान बाळगणारा. बाळासाहेबांच्या निर्भिड , थेट आणि जनतेच्या हृदयाला भिडणा-या वक्तृत्वाने मराठी भाषिक माणूस शिवसेनेकडे आकृष्ट होण्यास वेळ लागला नाही आणि स्थापनेच्या 30-35 वर्षानेच मनोहर जोशी हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. तत्पूर्वी मुंबई महापालिकेत सत्ताप्राप्ती झाली होतीच. भाजपा हा तेंव्हा राज्यात लहान भाऊ होता. गतवर्षी याच लहान भावासोबतच्या “युतीत सडत” जाणारा हा पक्ष व त्याची कोलांटी उडी हा सर्व घटनाक्रम सर्वांना ठाऊक आहे. या कोलांटी उडीमुळे शिवसेनेवर प्रेम करणा-या तमाम महाराष्ट्रवासियांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. कुणी कोणाचा शब्द पाळला नाही हे काही जनतेला कळले नाही परंतू या कोलांटी उडीचे खापर हे पूर्वाश्रमीचे लहान-मोठे भाऊ एकमेकांवर फोडत आहेत. एकमेकांवर कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप सतत होतच आहेत. सामनातून भाजपा , मोदी यांच्यावर त्यांचेच सोबत सत्ता भोगत असतांना खालच्या स्तरात टीका सुरूच होती. सध्याही संजय राऊत हे सतत माध्यमांपुढे काही ना काही भाष्ये त्यांच्या अनोख्या अशा आविर्भावात करीत असतात. भाजपाची साथ सोडल्यानंतर शिवसेनेची वाटचाल कशी होईल ते आता दिसेलच. राज्यात महाविकास आघाडीने नुकतीच वर्षपूर्ती केली. परंतू सरकारने ठोस असे काही निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले नाही. स्थगिती देण्याचे कार्य मात्र मोठ्या जोशात केले. सत्तेत आल्यावरच अवघ्या जगाला कोरोनाने ग्रासल्यामुळे हे वर्ष कसे सरले काही कळले नाही. कोरोना काळात आघाडीचे नेते शरद पवार वयोवृद्ध असूनही बरेच फिरले, शेतक-यांच्या भेटी घेतल्या परंतू मुख्यमंत्री या 12 महीन्यात 12 वेळ तरी घराबाहेर पडले असतील की नाही शंका आहे. माध्यमांवरून त्यांनी जनतेशी संवाद साधला , त्यातही जनतेचे मनोरंजनच झाले. आपल्याच संपादकांना दिलेल्या, स्वत:लाच अडचणीत टाकणा-या मुलाखती जनतेने पाहिल्या. अशाच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत हिंदुत्व काय धोतर आहे का सोडायला असे वक्तव्य केले. शिवसेनेने आता “आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही” अशी किती का ओरड केली तरी आता जनता साशंकच राहील. शिवाय शिवसेनेला आता त्यांचा पुर्वीचा मतदार साथ देईल की नाही हा सुद्धा प्रश्न आहेच. आपल्या मतदारांनी आगामी काळात पाठ फिरवली तर मते कशी मिळणार ? मग त्याची सोय व्हायला पाहिजे ना ! मुंबई महापालिका क्षेत्रात झपाट्याने संख्या वाढणा-या , झोपडपट्ट्यांत राहणा-या कॉंग्रेसची “व्होट बँक” असलेल्या मतदारांपैकी काही वाटा आपल्याला मिळाला पाहीजे या उद्देशाने आता शिवसेनेची वाटचाल सुरु झालेली आहे. शिवसेनेची वक्तव्ये , काही पोस्टरवरचा मजकूर , अनेक ठिकाणी वगळलेली “हिंदुहृदयसम्राट” ही बाळासाहेबांची जनतेने दिलेली उपाधी. अशा अनेक गोष्टी घडू लागल्या. परवा असेच एक वृत्त आले. शिवसेना असेही कधी करेल असे कुणाच्या स्वप्नात सुद्धा आले नसेल. पांडुरंग सकपाळ या शिवसेना नेत्याने आयोजित केलेल्या स्पर्धेबाबतचे ते वृत्त होते. ही स्पर्धा आहे “अजान स्पर्धा”. अजान मुळे मन:शांती मिळते , अजानची गोडी लहान मुलांना लागावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. मुस्लिम समाजातील कलागुणांना वाव मिळाला हा सुद्धा या स्पर्धेचा हेतू आहे. प्रार्थनेमुळे मन:शांती मिळते हे बरोबरच आहे मग ती कोणत्याही धर्माची का असोना. परंतू शिवसेनेला मुस्लिम समाजातील मुलांच्या , जनतेच्या कलागुणांना वाव मिळावा हे आताच का वाटावे ? इतके वर्ष का नाही वाटले ? शिवसेनेला आता या अशा स्पर्धा आयोजित करून नवीन आघाड्या करून यातून नवीन मतदार शोधायचा आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल की नाही हे सांगता येत नाही. ते कार्यकाळ पुर्ण करो वा ना करो पुढील निवडणुकांत मात्र शिवसेनेचा जो पुर्वीचा मतदार आहे तो मतदान करेलच की नाही याची शाश्वती नाही आणि हीच भीती शिवसेनेला सुद्धा कुठेतरी असावीच. राजकारणात सत्ताप्राप्ती हाच सर्वात मोठा उद्देश असतो त्यामुळेच ही आघाडी निर्माण झाली आहे. आगामी काळात सुद्धा सत्ता मिळायला पाहीजेपरंतू पुर्वीचा मतदार आगामी काळात अव्हेरण्याचीच शक्यता अधिक, नवीन हिंदु इतर मतदार मिळणे कठीण कारण त्यांनाही पुर्वीच्या आठवणी, केलेले शब्दप्रयोग, व्देषभावना हे सर्व स्मरणात आहेच मग त्यांना आकृष्ट करण्यासाठी आणि मतांची भिक्षा झोळीत पडण्यासाठीच अशा स्पर्धा आयोजनाचा हा लांगूलचालनाचा मार्ग.             

२५/११/२०२०

Article about the fort Ashwathhamagiri (Asirgarh) near Burhanpur known as "Gateway to Deccan" in history

 भेट “दक्षिण भारताच्या दरवाजा”ची 

"पुर्वी “दख्खन का दरवाजा” म्हणून प्रसिध्द असलेला आसिरगढ व इतर पुरातन वास्तू सुद्धा कुणास ठाऊक कुणाच्या शापाने आपले गतवैभव हरवून केवळ भग्नावशेशरूपाने उभ्या आहेत. अश्वत्थामाच्या जखमेला तरी कुणी तेल देत असेल परंतू या प्राचीन वास्तूंना त्यांच्या तोडफोडीमुळे झालेल्या जखमांना डागडुजीरुपी तेल देण्यास शासनाला वेळ नाही त्याउपर त्यांना आणखी भग्न करून , क्षती पोहचवून त्या जखमा पूर्वीपेक्षा अधिक चिघळवणारी बेशिस्त तरुणाई या देशात आहे. इतिहासाची साक्ष देणा-या या पुरातन वास्तूंना असेच अश्वत्थामाप्रमाणे चिरकाल आपली जखम बरी होण्याच्या प्रतिक्षेत राहावे लागेल काय ?" 


    भारतात पाहण्यासारखे खुप काही आहे. परंतू कुठे पर्यटनास जायचे असल्यास जाण्यासाठी म्हणुन नेमके ठिकाण आठवतच नाही. बरेचदा आपल्या जवळच्या एखाद्या प्राचीन , ऐतिहासिक स्थळाचा आपणास विसर पडून आपण इतर ठिकाणी पर्यटनास जातो आणि जवळचे ठिकाण राहून जाते. यंदाच्या दिवाळीत सहकुटुंब कुठे जावे हा प्रश्न पडला असता महाभारतात ज्याचा अश्वत्थामागिरी म्हणून उल्लेख आहे त्या आसिरगढ किल्ल्याचे एकदम स्मरण झाले. 

'अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'

या सप्त चिरंजीवांपैकी एक असा द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा याच ठिकाणी नित्यनेमाने शंकराच्या पुजेसाठी येत असलेल्याचे बोलले जात असलेल्या किल्ल्याबाबत कुटुंबियांना सांगितले सर्वानी “शिक्का मोहरतब” केले आणि 23 नोव्हें 2020 रोजी सकाळीच आसिरगढ किल्ल्याकडे निघालो. हा किल्ला खामगांव-इंदोर या मार्गावर ब-हाणपूरच्या पुढे 15-20 किमी अंतरावर आहे. खामगांवहून हा किल्ला पहायला जायचे असल्यास मलकापूर व जळगांव-जामोद मार्गे जाता येते. जळगांव जामोद मार्गे गेल्यास घाटातील निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. आम्ही याच दुस-या मार्गास पसंती दिली व मार्गक्रमण सुरु केले. सातपुडा पर्वताच्या रांगांतून मोटारीतून सुखाने जात असतांना याच पर्वतरांगा ओलांडून अहमदशहा अब्दाली या परकीय आक्रमकास रोखण्यासाठी म्हणून पानिपतच्या लढाईसाठी आपल्या बाजार बुणग्यांसह निघालेल्या सदाशिवरावभाऊ पेशवे व त्यांच्या सैन्यास किती त्रास सहन करावा लागला असेल हा विचार मनात येत होता. भल्यामोठ्या त्या सातपुड्याच्या चढावरून हत्ती , तोफा नेण्यास भाऊंच्या सैन्याची मोठी दमछाक झाली होती. याच विचारात मग्न असतांना मोटारीने घाट पार केला. आम्ही मध्यप्रदेश या भारताच्या मध्यभागातील निसर्गाने समृद्ध असलेल्या राज्यात दाखल झालो. एका ठिकाणी चहापान केल्यावर थोड्याच वेळात ऐतिहासिक काळातील मोठी व्यापारपेठ असलेल्या व संभाजी राजांनी दोनवेळा लुटलेल्या ब-हाणपूरच्या वेशीवर दाखल झालो. हातमाग, सोने इ अनेक वस्तूंचा व्यापार करण्यास देश विदेशातील व्यापारी ज्या गावात येत असत त्या गावातून आमची मोटार जात होती. रस्त्याच्या शेजारी असलेली परकोटाची भली मोठी भिंत ब-हाणपूरच्या गतवैभवाची साक्ष देत होती.    ब-हाणपूर येथेही प्रेक्षणीय अशी अनेक ठिकाणे आहेत परंतू आमचे प्रथम प्राधान्य हे आसिरगढ किल्ल्यास होते. ब-हाणपूर सोडल्यावर थोड्याच वेळात भव्य असा आसिरगढ आमच्या दृष्टीस पडला. या किल्ल्याच्या जवळच नेपानगर हे कागदाच्या कारखान्यासाठी वसलेले निसर्गसमृद्ध गांव आहे. त्या वळणावर नेेेपानगर येथील काही मित्रांचे स्मरण झाले. एव्हाना आमची मोटार किल्ल्याचा रस्ता चढू लागली होती. बिकट वाट पार करून आमची मोटार किल्ल्यावर पोहोचली. किल्ल्याची माहिती देणारा फलक दिसला व समोर पायरस्त्याने येेण्याचे किल्ल्याचे प्रवेशव्दार दिसते. थोड्या पाय-या चढल्यावर अरुंद वाट असलेला मुख्य दरवाजा आहे व पाय-या चढतांना उजव्या बाजूने प्राचीन शिलालेख तसेच नवीन फलक आहेत. मुख्य दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा नकाशा आपल्याला दिसतो. डाव्या बाजूने किल्ल्यात गेल्यास एका महालाचे भग्नावशेष दिसतात. पुढे एक मस्जिद आहे. तेथून पुढे भला मोठा तलाव , व त्यापुढे गेल्यावर एक शिव मंदिर आहे , मंदिरात जाताच नंदीची सुबक मुर्ती लक्ष वेधून घेते, सूर्याची किरणे पिंडीवर पडतील अशी रचना असलेले हेच ते चिरंजीव अश्वत्थामा पुजेसाठी येत असलेले मंदिर आहे. याच मंदिरात दररोज भल्या पहाटे अश्वत्थामा शंकराच्या पिंडीवर  पुष्प अर्पण करून जात असल्याचे मानले जाते. कितीही लवकर किल्ल्यावर गेलो तरी पुजा झालेली असते. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने सुद्धा याबाबत “स्टोरी” दिली आहे. येेथे महाकाय अशा पुरुषाच्या दर्शनाने बेशुद्ध झालेल्या लोकांच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात. या मंदिरात नतमस्तक होऊन आम्ही पुढे गेलो. थोड्या अंतरावर इंग्रजांनी बांधलेल्या तुरुंगाचे अवशेष आहेत. या तुरुंगात अनेक क्रांतिकारकांना कैद केले होते ज्यांचे नांव सुद्धा आता आपल्याला ज्ञात नाही. तीन स्तरात असलेल्या या किल्ल्याकडे पर्यटन विभाग व पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष आहे. अनेक शिलालेख विद्रुप केले आहेत, स्वत:ची नांवे कोरलेली आहेत, पडझड झालेली आहे ती पाहून वाईट वाटले. चर्च व इंग्रजांच्या कबरी सुद्धा येथे आहेत.  परकोट आसिरगढ, कमरगढ व मलयगढ असे या किल्ल्याचे तीन स्तर आहेत. तीन तासांनी किल्ल्या बाहेर आलो, मोटारीत बसलो. परतीचा प्रवास सुरु झाला. नित्यनेमाने पुजा , सकाळ संध्याकाळ संध्या करणारे , नामस्मरण करणारे माझे आजोबा एकदा भल्या पहाटेच या किल्ल्यावर अश्वत्थामाचे दर्शन व्हावे या आशेने गेल्याचे त्यांनीच मला सांगितल्याचे स्मरण झाले. ते पोहोचल्यावर पुजा झालेली होती. आज तो किल्ला पाहिल्यावर समाधान वाटत होते. पांडव कुळाचा नाश व्हावा म्हणून अभिमन्यू पत्नी उत्तरा हीच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडणा-या अश्वत्थामाच्या कपाळावर जन्मता:च असलेला मणी भगवान श्रीकृष्णाने त्यास दंड म्हणून काढून घेतला आणि "तू आपली जखम घेऊन मरणाची प्रतीक्षा करीत फिरत राहशील" असा शाप दिला होता. अश्वत्थामा जसा त्याच्या कपाळावरील जखम घेऊन मण्याच्या वैभवाच्या आठवणीत जखमेसाठी तेल मागत फिरत आहे त्याचप्रमाणे भारतातील पूर्वी “दख्खन का दरवाजा” म्हणून प्रसिध्द असलेला आसिरगढ व इतर पुरातन वास्तू सुद्धा कुणास ठाऊक कुणाच्या शापाने आपले गतवैभव हरवून केवळ भग्नावशेशरूपाने उभ्या आहेत. अश्वत्थामाच्या जखमेला तरी कुणी तेल देत असेल परंतू या प्राचीन वास्तूंना त्यांच्या तोडफोडीमुळे झालेल्या जखमांना डागडुजीरुपी तेल देण्यास शासनाला वेळ नाही  त्याउपर त्यांना आणखी भग्न करून , क्षती पोहचवून त्या जखमा पूर्वीपेक्षा अधिक चिघळवणारी बेशिस्त तरुणाई या देशात आहे. इतिहासाची साक्ष देणा-या या पुरातन वास्तूंना असेच अश्वत्थामाप्रमाणे चिरकाल आपली जखम बरी होण्याच्या प्रतिक्षेत राहावे लागेल काय? असा प्रश्न परतीच्या प्रवासात मनात घोळत होता. 

१२/११/२०२०

Citizen should take precaution while celebrating Diwali 2020 in Corona Pandemic

दिवाळीत ढिलाई नकोच

"दिवाळी हा आपला मोठा सण आहेच , तो साजरा व्हायलाच पाहिजे. आपल्या खरेदीमुळे फेरीवाले , रस्त्यावर लहान-सहान व्यवसाय करणारे यांच्या घरी सुद्धा दिवे लागणार  आहेत. परंतू हे सर्व करतांना कोरोनाचे  सावट अजून आहे याचे भान सर्वानी ठेवावे , काही देशात कोरोनाच्या लाटा पुन्हा आल्या आहेत हे जाणून घ्यावे व पक्षभेद , मतभेद वैचारिक भिन्नता , हे सर्व विसरून आपल्या देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तमाम जनतेला कळकळीने केलेले “जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही “ हे आवाहन ध्यानात ठेऊन आपला सामाजिक वावर करावा हीच या लेखाव्दारे कळकळीची विनंती.सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची , आनंदाची , आरोग्य व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना."         

ध्या दिवाळी या हिंदूंच्या सर्वात महत्वाच्या सणाची धूम सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे बाजारपेठा सजल्या आहेत . पणत्या , लक्ष्मीच्या मुर्त्या , विद्युत दिव्यांच्या माळा , दिवाळी निमित्ताच्या फराळाची दुकाने थाटली आहेत. यंदाची दिवाळी हि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धुमाकूळ थोडा कमी झालेला दिसून येत आहे. परंतू जशी लॉकडाऊन मध्ये सुट देण्यास सुरुवात झाली तसा लोकांचा कोरोनाचे, सार्वजनिक स्वच्छतेचे , भौतिक दुरतेचे काहीही नियम न पाळता मुक्त वावर सुरु झाला. अनेक शहरातील दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत असलेली चित्रे प्रसिद्ध झाली. त्यावरून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शारीरिक दूरता पाळावी हे लोक साफ विसरून गेले आहेत हे स्पष्ट झाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जागतिक स्तरावर जे निकष सांगण्यात आले आहेत त्यांचा तसेच भारत सरकार व राज्य सरकारनी याच विषयाशी संबंधीत ज्या काही सूचना वेळोवेळी केल्या , दूरदर्शनवर जाहिराती केल्या , भले मोठे फलक लावले , पत्रके छापली या सर्वांकडे नागरिक साफ कानाडोळा करीत आहेत. लोक गेल्या काही महिन्यांपासून बंदिस्तासारखे जीवन व्यतीत करीत होते. अनलॉक सुरु झाल्यापासून लोक सैराट झाल्यासारखे वावरू लागले. “कुछ नही होता” , “काय का कोरोना” असे संवाद ऐकू येऊ लागले. परंतू कोविड 19 ज्यांनी भोगला आहे त्यांना त्याचे गांभिर्य माहित आहे. मृत्यूच्या दोन दिवस आधी स्वत:ची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगून त्याचा व्हिडीओ प्रसारित करणा-या प्रख्यात गायक एस.पी.बालसुब्र्ह्मण्यमचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची भीषणता अनेकांनी अनुभवली आहे. कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात माझी स्वत:ची कोरोना प्रादुर्भाव झालेल्या भागात ड्युटी लागली होती त्यावेळी कोरोना बाधिताशी संपर्क आल्याने एका कुटुंबास होम क्वारंटाइन करण्यात आले होते. तेंव्हा त्या कुटुंबाची मनस्थिती , त्यांचे ते मजुरी सोडून घरात बंदिस्त होणे , त्यामुळे निर्माण होणारा ताण-तणाव , शेजा-या-पाजा-यांनी त्यांना केलेली मदत , त्यामुळे रोग तर भयंकर आहेच परंतू त्यामुळे होणारे इतर परीणाम सुद्धा भयावह असतात हे जवळून पाहिले. त्यानंतर माझ्या जवळच्या मित्राला कोविड-19 झाला होता . त्याचे अनुभव कथन मी ऐकले आहे, विलगीकरणात झालेली त्याची मनस्थिती , जीवनाबाबतच्या त्याच्या पूर्वीच्या व कोरोनामुळे विलगीत झाल्यानंतरच्या दुष्टीकोनात झालेला बदल, आपत्तीत त्याच्या कुटुंबाची , त्याच्या लहानग्यांची , वयोवृद्ध वडीलांची त्याला कशी व्यवस्था करावी लागली, हे सर्व त्याचे अनुभव अंगावर शहारे आणणारे  होते व ते ऐकल्यावर कोरोनाची भीषणता अधिक चांगल्याप्रकारे कळली. दिवाळी हा आपला मोठा सण आहेच , तो साजरा व्हायलाच पाहिजे. आपल्या खरेदीमुळे फेरीवाले , रस्त्यावर लहान-सहान व्यवसाय करणारे यांच्या घरी सुद्धा दिवे लागणार आहेत. परंतू हे सर्व करतांना कोरोनाचे सावट अजून आहे याचे भान सर्वानी ठेवावे , काही देशात कोरोनाच्या लाटा पुन्हा आल्या आहेत हे जाणून घ्यावे व पक्षभेद , मतभेद वैचारिक भिन्नता , हे सर्व विसरून आपल्या देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तमाम जनतेला कळकळीने केलेले “जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही “ हे आवाहन ध्यानात ठेऊन आपला सामाजिक वावर करावा हीच या लेखाव्दारे कळकळीची विनंती.

         सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची , आनंदाची , आरोग्य व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

०७/११/२०२०

Home cleaning on the occasion of Hindu Festival Diwali and nostalgic memories

दिवाळी सफाई आणि ऑडीओ कॅसेट्स 

 “आली माझ्या घरी हे दिवाळी, सप्त रंगात न्हाउनी आली“ सर्व संगीत स्वरात न्हाऊन गेले. संगीताची आवड असलेले तिर्थरूप उद्गारले “ खूप छान वाजतो रे हा टेप रेकॉर्ड अजून, हप्त्यांवर घेतला होता. खरेच जुने ते सोने“ घर आवरण्याचा प्रचंड कंटाळा आलेला मी त्या घर साफ-सफाई मुळे मिळालेल्या आनंदाने व संगीताच्या जादूने प्रसन्न झालो होतो. थकवा फटाक्याच्या धुराप्रमाणे क्षणात लांब गेला होता.

दरवर्षी दिवाळी आली की घरोघरी सुरु होते ती रंगरंगोटी , आवर-सावर. प्रत्येक घरी गृहिणी  या  कामाच्या लगबगीत असतात व त्यांचे पतीदेव त्या कामातून कसे निसटता येईल याच्या विचारात असतात.  परवा सकाळीच सौ ने “अहो” अशी हाक दिली. दिवाळी येते आहे हे लक्षात आल्याने तिच्या “अहो” या आरोळीला ओळखून मी “हो उद्या पासून आवरू” असे म्हणून त्वरीत उत्तर दिले. व तो दिवस मी धकवला.  तिला मात्र सुखद आश्चर्य वाटले. दुस-या दिवशी सकाळीच “मग केंव्हा लागायचे घर आवरायला  हातात झाडू?”  घेऊन तिचा प्रश्न असल्याने आता वेळ मारून नेणे जमणार नाही हे लक्षात आले आणि “मला न आता  जरा बाहेर महत्वाच्या कामाला जायचे आहे “ दुपारी करू म्हणून मी बाहेर पडलो. ”दुपारी नक्की ना ?”  आता हातातली झाडणी हनुमानाच्या गदे प्रमाणे खांद्यावर आली होती. आता  घर आवरावे लागेलच दुपारी  या विचाराच्या तंद्रीत मी माझ्या गंतव्य स्थानाकडे निघालो. दस-याला गाड्या धुण्याच्या मागे काय लॉजिक असते ?  या माध्यमांवर फिरलेल्या संदेशाची आठवण झाली. तसेच दिवाळीला घर का आवरतात ?  याचा विचार करू लागलो. लक्ष्मीपूजन असल्याने व लक्ष्मीला स्वच्छता आवडत असल्याने ही प्रथा पडली असावी.  पुर्वी घरे ही कुडाची असत म्हणून ती चांगली शाकारून घेण्यासाठी व त्या कच्च्या घराची देखभाल व्हावी असा या आवरा-सावरीचा हेतू असावा. आमच्या लहानपणी सर्व सामान घराच्या बाहेर काढून घर साफ होत असे व सामान सुमान सुद्धा. आजही बरेच ठिकाणी असे होते परंतू आता ही प्रथा कमी-कमी होत आहे.  एव्हाना माझे गंतव्य स्थान आले होते , कार्य उरकून मी परत घराकडे  येऊ लागलो. आता मात्र घरी गेल्यावर काही टाळा-टाळ करता येणार नाही हे जाणून होतो शिवाय सौ. च्या त्या खांद्यावर  झाडणी घेत बोलण्याचा आविर्भावाचे स्मरण झाले. घरी पोहोचल्यावर भोजनांती आवर-सावर सुरु केली. “हे काढा, हे असे ठेवा, ते तसे नाही असे ठेवा , तिथले जाळे-जळमटे काढा” या सूचनांचे पालन करीत  साफ-सफाई सुरु झाली. दरवर्षी वस्तू काढा व परत ठेवा हेच असते. या वर्षी


काही  फेकून द्यावे म्हणून ठरवले  परंतू फेकावे असे काही सामान सुद्धा नव्हते. एक पेटी उघडली “फेका बर त्या सर्व कॅसेट्स” पेटीतील 100-125 ऑडीओ कॅसेट्स पाहून सौ उद्गारली.  गाण्यांची आवड असल्याने तीचे ते वाक्य कानावर पडले असूनही माझ्या मनाला 30 वर्षापूर्वीच्या काळात जाण्यास  वेळ लागला नाही. "रिव्हर्स", "फॉरवर्ड" , कॅसेट मधील टेप बाहेर आली की पेन/पेन्सिल ने गुंडाळणे सर्व आठवू लागले.संगीताची आवड तीलाही आहे परंतू त्या कॅसेट्स काहीही उपयोगात नसल्याने तीचे तसे म्हणणे होते.  त्या पेटीत फिलिप्सचा कॅसेट्स प्लेयर सुद्धा निघाला. सौ दुस-या कामात मग्न होती , मी एक-एक कॅसेट न्याहाळू लागलो. पेन ड्राइव्ह ,मोबाईल,ब्ल्यू टूथ स्पीकर ई. अनेक अशी अत्याधुनिक साधने आता उपलब्ध आहेत. या काळात त्या ऑडीओ कॅसेट्स म्हणजे बाबा आदमच्या जमान्यातील म्हणता येतील अशा. कदाचित त्या वाजतही असाव्यात. सौ चे “फेका बर त्या सर्व कॅसेट्स” हे बरोबरही वाटत होते परंतू रफी, किशोर, मुकेश , लता , आशा  यांची तसेच जुन्या नट नट्यांची आकर्षक चित्रे असलेल्या त्या कॅसेट्स फेकण्याचे मन होत नव्हते . मोह म्हणतात तो हाच. कॅसेट्स पहाता पहाता “व.पु” , “पु.ल.” यांच्या कथाकथन असलेल्या कॅसेट्स सुद्धा दिसल्या “सु” , “प्रिमियर पासेस” या कथा कानात घुमू लागल्या , मुलांना दाखवल्या म्हटले ऐकाल रे या कथा. आपण “यु ट्युब“ वर शोधू. सौ इतर आवर-सावर करण्यात मग्न झाली. खरेच आता त्या कॅसेट्स मुक्या झाल्या होत्या , टाकाऊ होत्या , त्यांना काही मुल्य नव्हते परंतू जुन्या गीतांचा तो खजिना, बिस्मिल्ला खानची सनई , शास्त्रीय संगीत , कथा कथन , नरवीर बाजीप्रभूच्या पराक्रमाचा पोवाडा , योगासने सराव असा तो अमुल्य संग्रह पहाण्यात मी दंग असल्याचे पाहून अर्धे अधिक काम पूर्ण करून सौ चे लक्ष माझ्याकडे गेले , मी मोबाईल वर कॅसेट्स चे फोटो काढत होतो . तीला दाखवले “ ठेवा त्या कॅसेट्स , अन ठेवा बर ती पेटी लवकर “  सौ म्हणाली. मला त्या कॅसेट्स फेकाव्या असे वाटत नाही हे जाणून तीने तसे म्हटले होते. मी काही कॅसेट्स वरच ठेवल्या व उर्वरीत पेटीत व्यवस्थित रचून ठेवल्या, टेपरेकॉर्डर दुरुस्तीला घेऊन गेलो, कारागीर हसला म्हणाला “काय साहेब, कोणत्या जमान्यात आहे ? फेका आता हे“ माझी टेपरेकॉर्डर दुरुस्त करण्याची कितपत इच्छा आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने असे म्हटले. “खर्च किती येईल” मी . कारागिराला वाटले जाऊ द्या कुठे डोके लावता “दोन दिवसांनी या” तो म्हणाला. आयताच गि-हाईक आला आहे पैसे चांगले मिळतील असे त्याला वाटले असावे असे मला वाटले. टेप दुरुस्त झाला. “साहेब पैसे नको” तो म्हणाला , मला आश्चर्य वाटले. मी म्हटले “का रे बाबा “ आपल्या दुकानातला “रेकॉर्ड प्लेयर दाखवत तो म्हणाला “मी सुद्धा हा अजून फेकला नाही, वाजतो हा” आवर–सावर संपली होती,  मी उजळलेले घर पाहून सुखावलो नहोतो. सौ ने चहाचा कप हाती दिला मी मुलांना हाक मारली एका कॅसेट्स वरचे लेबल न पाहता टेपरेकॉर्डर वर कॅसेट् लावली व उद्गारलो “ऐका” मुळे उत्कंठतेने पाहू लागली आणि गाणे लागले , गाणे होते , “आली माझ्या घरी हे दिवाळी, सप्त रंगात न्हाउनी आली“ सर्व संगीत स्वरात न्हाऊन गेले. संगीताची आवड असलेले तिर्थरूप उद्गारले “ खूप छान वाजतो रे अजून, हप्त्यांवर घेतला होता. खरेच जुने ते सोने“ घर आवरण्याचा प्रचंड कंटाळा आलेला मी त्या घर साफ-सफाई मुळे मिळालेल्या आनंदाने व संगीताच्या जादूने प्रसन्न झालो होतो. थकवा फटाक्याच्या धुराप्रमाणे क्षणात लांब गेला होता.