Click "Follow" Button below To Follow this Blog

२५/०७/२०२४

Article about Marathi poem by poorvi bhave for first standard

"वन्स मोअर" चा "शोर" 

पहिलीच्या मराठी कवितेबाबत प्रतिक्रिया देतांना मंत्री महोदय म्हणतात की, " प्रॅक्टिकल राहायला पाहिजे" ही प्रतिक्रिया देतांना सुद्धा त्यांना प्रॅक्टिकल या शब्दाला मराठीतील व्यवहारीक हा पर्यायी शब्द आठवला नाही. 

महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात "जंगलात ठरली मैफल" कवितेत माऊस, वन्स मोअर हे इंग्रजी भाषेतील तसेच शोर हा हिंदी भाषेतील शब्द आल्याचे वृत्त परवा विविध वाहिन्यांवर सुरु होते. आपली मराठी भाषा, माय मराठी, माझी मराठी, आम्ही मराठी, मराठी माणूस, मराठी शाळा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, सरकारी कार्यालयांचे कामकाज मराठीतून करा, दुकानांवर मराठीत पाट्या लावा. अशा मागण्या, मुद्दे व मराठी भाषेबाबतचा ऊहापोह हा अनेकदा होत असतो. प्रत्यक्षात शुद्ध मराठी बोलतांना किंवा बोलायचे झाले तर आपली त..त.. , प..प होते, विशेषतः हल्लीच्या इंग्रजाळलेल्या पिढीची तर होतेच होते. बालभारतीच्या इयत्ता पहीलीच्या मराठीच्या पुस्तकातील नृत्यांगना व निवेदक असलेल्या पूर्वी भावे यांच्या कवितेबाबत व त्या कवितेत वापरलेल्या इंग्रजी व हिंदी भाषेतील शब्दांबाबत बोलतांना शिक्षण मंत्री केसरकर साहेब काय म्हणाले ते प्रथम वाचा, केसरकर साहेब म्हणतात  "वन्स मोअर ला पर्यायी शब्द आहे का ? शेवटी यमक जुळवण्यासाठी एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याचा फार बाऊ केला पाहिजे असे नाही. आपण टेबल हा शब्द वापरतो हा शब्द मराठी आहे का. मराठीत रूळलेले इंग्रजी शब्द आहेत त्याला पर्यायी शब्द आलेले नाहीत. त्यामुळे आपण थोडं प्रॅक्टिकल राहायला पाहिजे" दीपक केसरकर साहेबांनी अशी प्रतिक्रिया काल दिली. आपल्या मातृभाषेबाबत मंत्री महोदय म्हणतात की प्रॅक्टिकल राहायला पाहिजे ही प्रतिक्रिया देताना सुद्धा त्यांना प्रॅक्टिकल या शब्दाला मराठीतील व्यवहारीक हा पर्यायी शब्द आठवला नाही. असे त्यांचेच नव्हे तर अनेकदा आम्हा सर्व मराठी जनांचेही हल्ली होत असते. हा दोष आपलाच आहे. देशातील इतर भाषिकांपेक्षा मराठी माणसाचे भाषा प्रेम हे थोडे कमीच आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. केसरकर म्हणतात की टेबलसारख्या मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाही. यावर असे सांगावेसे वाटते की, कोण म्हणते पर्यायी शब्द नाही ? ते तर फार पूर्वीपासून आहेत. परंतु इंग्रजाळलेल्या नवीन पिढीला टेबलला मेज म्हणतात असे कोणी शिकवलेच नाही. घरी सुद्धा कोणी मेज म्हणत नाही आणि शाळेत सुद्धा त्याला कोणी टेबल म्हणजे मेज असे शिकवत नाही. वन्स मोअरला आपण "पुन्हा एकदा" असे म्हणू शकतो. शिवाजी महाराजांनी त्या काळात मराठी शब्दकोश केला होता. सावरकरांसारख्या अनेक  भाषाप्रभू व्यक्तींनी कितीतरी इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिलेले आहेत परंतु त्याचा वापर करण्यात आपण कमी पडतो. केवळ मराठी दिनापुरतेच  मराठीचे गोडवे गायचे आणि इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठीत पर्याय नाही असे म्हणायचे हे चुकीचेच आहे. मराठी शब्दांचा वापर करण्यात आपण कमी पडतो असे म्हणण्याचे कारण की, बरेचदा आपण बाजारपेठेत, प्रवासात असतांना कुणी व्यक्ती भेटल्यास किंवा दुकानदाराशी संवाद साधताना मराठी असूनही आपण हिंदीत/इंग्रजीत  बोलण्यास सुरुवात करतो. काही वेळा तर आपण हिंदीत बोलतो व त्यास समोरच्याकडून मराठीत प्रतिसाद येतो. मग आपल्याला तो व्यक्ती मराठी असल्याचे कळते. कधी-कधी तर हिंदी भाषिक आपल्यासोबत मराठीत बोलतो पण आपणच हिंदी बोलू लागतो. याचा अर्थ हिंदी ही आपली राष्ट्रभाषा बोलूच नाही किंवा तिचा द्वेष करावा असा नाही परंतु बोलतांना प्रथम आपल्या मातृभाषेचा प्रयोग करायला हवा. मराठी बोली भाषेत हल्ली इंग्रजी भाषेतील व हिंदी भाषेतील शब्दांची इतकी सरमिसळ झाली आहे की आपल्याला त्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुद्धा आठवत नाही. म्हणूनच केसरकर साहेबांनी टेबल या मराठीत मिसळलेल्या शब्दाचे उदाहरण दिले. टेबल व टेबल सारखे पेन, बाईक, माईक, ऑफिस, कॉलेज, फोटो इत्यादी अनेक शब्द मराठी भाषेत इतके मिसळले आहेत की आपण टेबलला असलेला मेज हा पर्यायी शब्द कधीच वापरत नाही. तसेच बाईकला दुचाकी, माईकला ध्वनिक्षेपक, ऑफिसला कार्यालय आणि कॉलेजला महाविद्यालय सुद्धा अभावानेच म्हणतो. फोटोला कुणी छायाचित्र व true copy ला कोणी सत्यप्रत म्हटले तर त्याच्याकडे असे पाहिले जाते जणू काही तो कोणती दुसरी भाषा बोलतो आहे की काय ! मुद्दा हा आहे की मराठी भाषेमध्ये अनेक नामवंत कवी होऊन गेले असतांना व त्यांच्या शुद्ध मराठीत असलेल्या अनेक कविता असतांना भाषा विषयाची समिती असे इंग्रजी व हिंदी शब्द असलेली मराठी कविता अभ्यासक्रमात निवडतेच कशी ? अगदी लहानपणी हिंदी व इंग्रजी शब्द असलेली मराठी कविता विद्यार्थी शिकतील मुखोद्गत करतील तर त्यांना शोर, माऊस, वन्स मोर हे शब्द मराठीच शब्द असल्याचे वाटणार नाही का? असा प्रश्न पडतो. पुर्वी बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांच्या मध्ये खूप सुंदर अशा कविता असायच्या की ज्या आजही अनेकांच्या मुखोद्गत आहे. 

तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड झाडावर धिवराची हाले चोच लाल जाड 

तसेच रोपट्या विषयीची ही पुढील कविता 

आज ये अंगणा पाहुणा गोजिरा, ये घरा आमुच्या सोयरा साजरा 

व ही पुढील बालकविता

वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टणाटणा वाटेत भेटला तिळाचा कण 

अशा कितीतरी सुंदर कवितांचा अभ्यासक्रमात  समावेश असे. परंतु हल्लीच्या अभ्यासक्रमात विषय समित्या कविता, पाठांची निवड कशी करते ? त्यासाठी कोणते निकष असतात ? ते जाहीर होणे गरजेचे झाले आहे. ज्ञानेश्वर माऊली, केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे, टिळक, आगरकर, सावरकर, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मराठी शाळा मरणासन्न स्थितीत आहे. इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झाला आहे. मराठी शाळांमधल्या शिक्षकांवर गंडांतर आलेले आहे. इंग्रजी शाळेतल्या मराठी बाबूला एकोण ऐंशी म्हटले की समजत नाही त्याला सेव्हंटी नाईन असे सांगावे लागते अशी स्थिती आहे. भाषा टिकवण्याची आपणा सर्वांचीच तसेच शासनाची सुद्धा जबाबदारी आहे. मंत्री महोदयच जेंव्हा मराठी भाषेत इंग्रजी व हिंदी शब्द आले असता त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाही म्हणून थोडे प्रॅक्टिकल (त्यांच्या भाषेत) अर्थात व्यवहारीक व्हावे लागेल असे म्हणतात तेव्हा आगामी काळात "माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके" असे ज्या मराठी भाषेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केले होते त्या मराठी भाषेची काय दशा असेल असा प्रश्न मराठी भाषिक मराठी प्रेमी असलेल्या जनतेच्या मनात निश्चितच उपस्थित होत असेल.

११/०७/२०२४

Article about cleanliness

मुसळधार वृष्टी आणि गाडी नंबर 716


कर्तव्यदक्षता हा शब्द अधिका-यांच्याच बाबतीत वापरला जातो परंतू इतरही अनेक कर्मचारी जे उच्च पदावर नसतात पण कर्तव्यतत्पर असतात. त्यांचा गौरव, सन्मान क्वचितच होतांना दिसतो, समाजा कडून अशा छोट्या पदांवर असलेल्या व कर्तव्यदक्ष कर्मचा-यांचा सुद्धा गौरव होणे अपेक्षित असते.

यंदाच्या सहा जुलैच्या दुपारी आकाश काळ्या मेघांनी आक्रमून आले होते. त्रस्त होत असलेल्या उकाड्यामुळे समस्त जनांना हे घन केंव्हा बरसतात याची प्रतिक्षा होती, अन ते जे बरसू लागले ते थांबले आठ जुलै 24 रोजी. वातावरण गारठले, विशेष म्हणजे विद्युत पुरवठा सुरळीत होता. मी 8 जुलै रोजी सकाळी पावसाचा मस्त आनंद घेत भिजत होतो तेवढ्यात दूरवरून परिचित असा घंटीचा आवाज कानी पडू लागला. सोबतच "स्वच्छ भारत है हमारा" हे गीत सुद्धा ऐकू येत होते आणि थोड्याच वेळात आमच्या घरासमोर नगर परिषदची कचरा गोळा करणारी गाडी येऊन उभी राहिली. मला आश्चर्य वाटले, एवढ्या जोरात सुरू असलेल्या पावसात सुद्धा घंटागाडी घेऊन फिरणारे ते कर्मचारी आमच्या घरासमोर कचरा गोळा करण्यासाठी म्हणून हजर झाले होते. मला त्यांची ती कर्तव्य तत्परता खूप भावली आणि प्रेरित सुद्धा करून गेली. एरवी कर्तव्यदक्षता हा शब्द अधिका-यांच्याच बाबतीत वापरला जातो परंतू इतरही अनेक कर्मचारी जे उच्च पदावर नसतात परंतू कर्तव्य तत्पर असतात पण त्यांचा गौरव, सन्मान क्वचितच होतांना दिसतो, त्यांची दखल त्या मानाने कमी घेतली जातो. समाजाकडून अशा छोट्या पदांवर असलेल्या व कर्तव्यदक्ष असलेल्या कर्मचा-यांचा सुद्धा गौरव होणे अपेक्षित असते. असेच आणखी एक उदाहरण मला त्याच दिवशी मिळाले. त्या दिवशी माझी बहीण अगदी सकाळी खामगांवला आली होती पावसात त्यांची बस पुरामुळे थांबली असता चालकाने त्याला दररोज भर पहाटे त्याच्या खेड्यातून बस स्टँडवर कर्तव्य बजावण्या करता हजर राहावे लागते ते प्रवाशांशी झालेल्या चर्चेत सांगितले. भर पावसात भल्या पाहटे खेड्यातून शहरात ड्युटीवर हजर होणारा तो व त्याच्यासारखे इतरही अनेक चालक/वाहक यांना कधी आपण कुणी "आभारी आहे" असे सुद्धा म्हणत नाही. ते दोघे कचरा गोळा कर्मचारी सुद्धा भर पावसात सकाळी घरून निघून त्यांचे कर्तव्य बजावत होते म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. मी त्यांना दोन मिनिटे थांबण्याची विनंती केली, त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेतलेली पाहून आनंद झाला, तो त्यांच्या मुखावर दिसू लागला.  आमच्या भागात बरीच वाहने असतात तरी या घंटा गाडीचे चालक गाडी रिव्हर्स फॉरवर्ड करून प्रत्येकाच्या घरासमोर आणतात हे माझे निरीक्षण मी त्यांना सांगितले असता ते आणखीनच खुलले. त्यांचा फोटो काढला व थोडीफार चौकशी केली असता त्यांनी विचारले की,  "सर तुम्ही आमची माहिती का विचारत आहात ?" "सकाळपासून जोरात सुरू असलेल्या पावसात तुम्ही तुमचे कर्तव्य बजावत आहात म्हणून." अनेकदा आपण पाहतो की थोडासा जरी पाऊस असला तर त्याही पावसाचा बहाणा बनवून काम पुढे ढकलले जाते, कर्तव्यात कसूर केल्या जाते. पण ती दोघे मात्र त्यांचे काम चोखपणे करत होते. आणखी थोडा वेळ आमचा संवाद पावसातही चाललाच होता. त्यांना मी लेखक असल्याचे सांगितल्यावर ते मला म्हणाले सर तुम्ही जर आमच्या बाबत लिहिले तर आमचा गाडी नंबर व प्रभाग नंबर पण टाकालं का? "का नाही मी तर तुमचे नांव सुद्धा टाकेल" मी उत्तरलो व त्यांचे नांव सुद्धा विचारून घेतले. ते निघून गेल्यावर कर्म, कर्मफल, सहेतूक कर्म, कर्तव्य इ . बाबतचे विचार माझ्या मनात बराच वेळ घोळत राहिले. माझी पण शाळेची वेळ जवळ येत होती, मला सुद्धा वेळेवर पोहचायचे होते म्हणून मी पुढील कार्यात मग्न झालो. शाळेत जातांना

"विमोह त्यागून कर्मफलाचा, सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था" 

हे सुधीर फडके यांनी गायलेले जुने मराठी गीत आठवू लागले. पुढे मी माझ्या कामात व्यस्त झालो. शाळेतून घरी आल्यावर त्यांनी सांगितलेला प्रभाग क्रमांक चार आठवला, माझ्या मुलाने त्यांची नांवे वहीत लिहून ठेवली होती. त्या गाडीचे चालक संतोष मुळीक व मदतनीस दिनेश गोहर होते. पण त्यांनी सांगितलेला गाडी नंबर काही आठवेना. सायंकाळी पुन्हा बाहेर पडलो असता थोडा पाऊस सुरू झाला एक गाडी माझ्या समोर होती त्या गाडीचा क्रमांक 716 होता.  "अरे ! हाच तर तो त्या सकाळच्या घंटा गाडीचा नंबर." मनातल्या मनात मी उद्गारलो. सकाळच्या पावसाच्या वेळी त्यांनी सांगितलेला नंबर मला सायंकाळच्या पावसाच्या वेळी आठवला. घंटागाडीवाले ते दोघे संतोष मलिक व दिनेश गोहर यांची कर्तव्यदक्षता, प्रभाग क्रमांक चार, मुसळधार पाऊस आणि गाडी क्रमांक 716 हे आता दीर्घकाळ पर्यंत माझ्या स्मरणात राहतील असे मला वाटू लागले.

०४/०७/२०२४

Article about amitabh bachchan song, and Miller of the Dee poem

हर हसीं चीज का मैं तलबगार हूं |


सुलभ कर्ज सुविधेमुळे प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. त्यामुळे वरून जरी आनंद दिसत असला तरी आत प्रचंड तणाव असतो. आज आपल्या देशात भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत पण आनंदी लोकांच्या जागतिक यादीत मात्र आपण खूप पिछाडीवर आहोत. 

खरे तर तो एक अल्पउत्पन्न गटात मोडणारा खेडूत, खजूरच्या झाडांपासून निघणा-या रसापासून गुळ बनवून तो विकण्याचा व्यवसाय करणारा. अगदीच सर्वसामान्य असा. अमिताभच्या वाट्याला अशा भूमिका क्वचितच आल्या आहेत. सौदागर या राजश्रीच्या चित्रपटात अमिताभने गुळ विक्रेत्याची भूमिका साकारली होती, त्याच चित्रपटातील “हर हसीं चिज का मै तलबगार हूं” हे गीत मला गत रविवारी मलकापूर जवळच्या वडनेर भोलजी या गावापासून जवळच असलेल्या निंबोडा देवीच्या निसर्गरम्य परिसरात गेल्यावर आठवले. सौदागर एक क्लासिक सिनेमा. त्यातील हे गीत संगीतप्रेमी, दर्दी लोकांना आता आठवले असेलच. या गीतात गुळ विकणारा अमिताभ किशोरकुमारच्या आवाजात व रविंद्र जैन यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतात स्वत:चे वर्णन करतांना तो कसा रसिक आहे, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद मानून जगणारा आहे,  ज्याने गुळ बनतो त्या रसाचा, जीवनातील विविध रसांचा, फुलांचा, गीतांचा तो कसा “बिमार” आहे हे व्यक्त करतो. त्याच्या आनंदी वृत्तीने जगण्याच्या, तो करीत असलेल्या कामावर प्रेम व त्यात आनंद मानण्याच्या जगण्याच्या त-हेमुळे गावातील लोक त्याला “रसिया” म्हणतात असेही तो सांगतो. याच गीताच्या ओळी मग मी एक फोटो पोस्ट करतांना कॅप्शन म्हणून वापरल्या. त्या ओळी अनेकांना भावल्या हे त्या गीतकाराचे महात्म्य. तो फोटो व त्याला दिलेले ते "हटके" असलेल्या जुन्या श्रवणीय गीताच्या मुखड्याचे कॅप्शन पाहून धनंजय टाले या माझ्या मित्राने परगावाहून संवाद साधला. सौदागर हा त्याचा व माझाही अतिशय आवडता सिनेमा. मग आम्ही साधी जीवनशैली, समाधानी वृत्ती आदींवर खुप बोललो त्यावरूनच मग त्याला “मिलर ऑफ द डी” ही आनंदी वृत्तीने जीवन व्यतीत करणा-या त्याच्या वडिलांनी फार पुर्वी सांगितलेल्या एका चक्कीवाल्याच्या  जीवन जगण्याच्या पद्धतीवर आधारीत कवितेची आठवण सांगितली. त्याच्या स्मृती जागृत झाल्यावर मग माझ्याही विस्मृतीत गेलेली ती कविता मला पण आठवली. माझ्या डोळ्यासमोर एक नदी व त्या नदीच्या प्रवाहावर चालणारी चक्की आणि चक्कीवाला येऊ लागला.


 हा चक्कीवाला सुद्धा त्या सौदागर मधील अमिताभप्रमाणेच आनंदी वृत्तीने जगणारा, समाधानी, ग्रामीण माणूस. सी. मॅके नामक कवीच्या कवितेतील या मिलरची अर्थात चक्कीवाल्याची डी नदीच्या प्रवाहावर चालणारी  पाणचक्की असते. तिच्यावरच त्याची उपजीविका असते. हा खुश-मिजास मिलर त्याची चक्की  अतिशय इमाने-इतबारे व जे काम त्याला मिळाले आहे त्यात आनंद घेऊन चालवत असतो. हा मिलर त्याचे काम करतांना गीत गात असतो की, "मी कुणाचा द्वेष करीत नाही व कुणी माझा द्वेष करीत नाही" कवीने त्याच्या गाण्याला लार्क पक्षाच्या मधूर आवाजाची उपमा दिली आहे. या मिलरला गीत गाता-गाता कार्यमग्न असतांना एक दिवस राजा पाहतो. "तू इतका आनंदी कसा आहेस? मलाही तुझ्यासारखे आनंदी व्हायचे आहे मला तर वाटते आहे की तू माझे हृदय घे आणि मला तुझे आनंदी हृदय दे" असे राजा त्याला म्हणतो. मिलर हसतो आणि म्हणतो की, "मी माझ्या कुटुंबासाठी पुरेल एवढे कमावतो, माझी बायको, मुले आणि मित्रांवर प्रेम करतो, आणि माझ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्जही नाही. या नदीचा सुद्धा मी आभारी आहे की जिच्यामुळे माझी गुजराण होते. हे माझ्या आनंदाचे कारण आहे." ज्याप्रमाणे संत कबीराने म्हटले आहे की 

"साई इतना दिजीये जा मे कुटुंब समाय

मै भी भुका ना रहू साधू न भुका जाये"

कबीराच्या या दोह्याशी जुळेल असेच काहीसे त्या मिलरचे म्हणणे असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवते. पण राजा त्याला पुढे म्हणतो की, "तुझा द्वेष कोणी करत नाही असे तू म्हणू नको. कारण की आता मीच तुझा द्वेष करू लागलो आहे. कारण की तू जितका आनंदी आहे तसा तर सर्व ऐश्वर्य सुखोपभोग असूनही मी सुद्धा नाही. मला तर तुझी ही पिठाळलेली टोपी माझ्या मुकुटा पेक्षाही मूल्यवान वाटत आहे व तुझी ही चक्की माझ्या राजवाड्यापेक्षाही मला श्रेष्ठ वाटत आहे तुझ्यासारखे आनंदी प्रामाणिक कष्टाळू लोक हे हेच इंग्लंडचे भूषण आहे." 

  वरील गीत व कविता आठवल्यावर आजची जीवनशैली कशी झाली आहे हे पण मला आठवले. आज आपण बघतो आनंद मिळवण्याच्या नादात नाना प्रकारच्या वस्तू आपण खरेदी करतो. कुटुंबीयांना खुश करण्यासाठी भेटवस्तू देण्याचे प्रमाण किती वाढले आहे. जणू काही वस्तू प्राप्त झाली किंवा खरेदी केली तरच आनंद मिळतो. आनंदासाठी वस्तूची गरज असते का ? , खरा आनंद कुठून मिळेल याचा विचार होतांना दिसत नाही. सुलभ कर्ज सुविधेमुळे प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. त्यामुळे वरून जरी आनंद दिसत असला तरी आत प्रचंड तणाव असतो. आज आपल्या देशात भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत पण आनंदी लोकांच्या जागतिक यादीत मात्र आपण खूप पिछाडीवर आहोत. 

     आपल्या उपजीविकेचे साधन आपले मित्र आपले कुटुंब कोणाचाही द्वेष न करणे, उगाच कर्ज न घेणे, साधी समाधानी वृत्ती असणे, "हर हसीं चीज का मैं तलबगार हूँ" याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहणे असा संदेश देणारे हे सौदागर सिनेमातील अमिताभचे गीत आणि "मिलर ऑफ द डी" या कवितेतील चक्कीवाला आपल्याला हाच संदेश देतात.

तलब = आवडणे /छंद

तलबगार = आवड असणारा (चाहनेवाला) / छंदी

Song Link 👇

https://youtu.be/rsuzrIVoFYY?si=a1NJ3268vQsSFdK5

३०/०६/२०२४

Article on Raju.

... अरे राजू रिटायर्ड पण झाला !

समय का पहिया चलता है, दिन ढलता है रात आती है |

यानुसार काळ झपाट्याने पुढे सरकत असतो इतका वेगाने की बऱ्याच वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना सुद्धा अगदी काल-परवा घडून गेल्यासारख्या वाटतात. मी शाळकरी विद्यार्थी असतांना राजू महाविद्यालयीन जीवनात होता. वयाने माझ्यापेक्षा आठ वर्षांनी जेष्ठ. आम्ही सर्वच बहिण भावंडे एकमेकांशी मित्रत्वाने वागत असू, खेळीमेळीने राहत असू.

कई साल हमने गुजारे यंहां 

यंही साथ खेले हुये हम जवान

था बचपन बडा आशिकाना हमारा

आमचे बालपण पण असेच रम्य म्हणून या ओळी आम्हाला पण लागू पडतात.  हायस्कूलमध्ये गेल्यावर राजूने एकदा विज्ञान प्रदर्शनासाठी पाणचक्कीचे युनिट बनवल्याचे मला आठवते. तेव्हाच मला राजू म्हणजे खूप हुशार मुलगा असे वाटू लागले आणि तसा तो आहे सुद्धा. गणितामध्ये एकदम हुशार म्हणून त्याने विज्ञान शाखा निवडली होती. त्याचे हस्ताक्षर एकदम वळणदार. त्याची पेन पकडण्याची लकब सुद्धा एकदम निराळीच. तो चार बोटांनी पेन पकडतो, करंगळीचा सुद्धा आधार असतोच. अशा पद्धतीने पेन पकडून लिहिणारे लोक अगदी विरळच आहेत. राजू एन.सी.सी. मध्ये अंडर ऑफिसर होता. बऱ्याच वेळा मी त्याला बुटाला पॉलिश करतांना, बेल्ट आणि बॅजला ब्रासो लावतांना न्याहाळात बसत असे. एकदा काँग्रेस भवन वरील झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला तो पायलट (प्रमुख पाहुण्यांना ध्वजारोहण करण्यासाठी घेऊन जाणारे राष्ट्रीय छात्र सेनेचे जवान)  झाला होता आणि मी जूनियर डिव्हिजन मध्ये परेडला होतो. तेव्हा मी माझ्या मित्रांना अभिमानाने सांगितले होते की, "तो बघा तो पायलट झालेला मुलगा आहे ना तो माझा मोठा भाऊ आहे." पुढे पोलीस खात्याचे अधिकारी त्याला ध्वजारोहणासाठी घेऊन जाऊ लागले. आमच्या भावंडांमध्ये ऑफिसर बनवण्याची त्याची एकट्याचीच प्रबळ इच्छा/जिद्द होती आणि तो झाला सुद्धा. Not failure but lower aim is crime ही म्हण मला राजूनेच सांगितल्याचे स्पष्ट स्मरण आहे. तो नेहमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मग्न असे. त्या काळात त्याला इतर नोकऱ्या आवडत नसत. त्याचे इंग्रजीवर पण प्रभुत्व आहे. वृत्तपत्र बातम्या यातील मर्म तो व्यवस्थित समजून घेतो. त्या काळी तो दस्तुर रतनजी ग्रंथालयाचा वाचक सभासद होता. बऱ्याच वेळा तो त्याच्या मित्रांकडे मला त्याच्या लॅम्ब्रेटा स्कूटरवर घेऊन जात असे. त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यामुळे मला सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली होती. पण कदाचित मी ते कार्य म्हणावे तितके समर्पित होऊन केले नसेल म्हणून दुसरीकडे वळावे लागले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आम्ही दोघे रोज सायंकाळी गो.से.महाविद्यालयात धावणे, गोळा फेक यासाठी जात असू. अनेक विषयांवर चर्चा व अनेक बाबी आम्ही एकमेकांशी 'शेअर' करीत असू. तो नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जेव्हा जायचा तेव्हा मला मोठे कौतुक वाटायचे तिथे सुद्धा त्याने नाटक वक्तृत्व यांमध्ये भाग घेऊन त्याचा ठसा उमटवला होता. वक्तृत्व गुण तर त्याच्यामध्ये बालपणापासूनच आहे. बालपणी त्याने अनेक भाषण स्पर्धात बक्षिसे प्राप्त केली आहे. राजू सुरुवातीपासूनच टापटीप राहण्याकडे आणि शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देत आलेला आहे. हस्त प्रक्षालन आणि मुख प्रक्षालन याचे महत्त्व त्याने बालपणापासूनच जाणले आहे. त्याचे हे गुण व एकूणच व्यक्तिमत्त्व हेरून आमच्या मोठ्या वहिनींचे वडील स्वर्गवासी बाबुराव डांगे हे त्याला तो नोकरीला लागायच्या आधीपासूनच तहसीलदार साहेब म्हणत असत. त्यांचे वचन खरे ठरले, पुढे तो तहसीलदार झालाच. तहसीलदार होण्यापूर्वी तो खामगावला अल्पबचत अधिकारी होता. अल्पबचत अधिकारी असतांना त्याने अनेक लोकांना बचत खात्यांचे एजंट होण्यास प्रेरणा दिली होती. ते लोक आजही मला भेटले की वरणगांवकर साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे असे सांगतात. उदा सौ. चितलांगे आणि श्री झोपे. तो खामगांवला अल्पबचत अधिकारी असतांना बरेचदा अनेक लोक मलाच अल्पबचत अधिकारी समजून माझ्याशी बचत खाते वगैरेची चर्चा करायला सुरुवात करत मग मी त्यांना तो मी नसून माझा भाऊ आहे असे सांगत असे. मग त्या अनोळखी लोकांशी माझा परिचय होऊन गेला व आजही आहे. त्याला खाद्यपदार्थ तेही उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ खाण्यात, फळे खाण्यात मोठा रस आहे. त्याच्या आणि माझ्या बऱ्याच आवडीनिवडी मध्ये साम्य आहे. पोहणे आम्हाला दोघांना प्रचंड आवडते. तो नोकरीला लागल्यापासून ज्या-ज्या ठिकाणी त्याने नोकरी केली आहे त्या-त्या सर्व ठिकाणी देवीची प्रख्यात मंदिरे आहेत असे माझे निरीक्षण आहे. मुंबई ते महागाव पर्यंत प्रत्येक ठिकाणी सुप्रसिद्ध अशी देवीची मंदिरे आहेत. यांमुळे त्याच्यावर देवीची कृपा असल्याचे वाटते. तहसीलदार म्हणून त्याची कारकीर्द ज्या ठिकाणी तो होता त्या प्रत्येक गावी गाजली आहे. अनेक ठिकाणी त्याने अवैध रेतीवाल्यांवर कारवाई केल्यामुळे, त्यांचे ट्रॅक्टर स्वतः चालवत आणून जप्त केल्याने, त्यांचा पिच्छा करून त्यांना पकडल्याने त्याला "दबंग तहसीलदार" असे संबोधन प्राप्त झाले. कार्यालयीन शिस्त, कामकाजात शिस्त ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असे. वेळे प्रसंगी शेरोशायरी करून हास्यविनोद करून तो त्याच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असे. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा त्याने व्यवस्थित संबंध ठेवले. वरिष्ठ त्याच्या कामगिरीवर खुश असत. त्याच्या कामकाजाच्या शैलीने जनतेला प्रभावित करून सोडले होते. राजू जेंव्हा अल्पबचत अधिकारी म्हणून नियुक्त झाला होता त्यात सुमारास राजू बन गया जेंटलमॅन  हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि त्या चित्रपटात 

"अपना राजू हिरो है 

और हम सब उसके फॅन 

की राजू बन गया जेंटलमेन" 

असे गाणे होते या योगायोगामुळे जणू सर्व वरणगांवकरांच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त झाली होती. आजकाल सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा मोठा समारंभ केला जातो. खानदेशात ही प्रथा फार पूर्वीपासून आहे तिथे तर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची मिरवणूक सुद्धा काढतात. म्हणूनच राजूच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचे कुठेतरी मनात वाटत होते परंतु पारिवारिक अडचण व उन्हाळ्यानंतर शाळेचा पहिलाच दिवस असल्याने ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. वडील नायब तहसीलदार आणि भाऊ तहसीलदार असल्याने मी महसूल विभागाला जवळून अनुभवले आहे. हल्ली गढूळ झालेल्या या विभागात जनतेची कामे करणारे,  वाम मार्गाने न जाणारे असे अधिकारी क्वचितच आढळतात. तशा कर्तव्यदक्ष अधिका-यांतील एक अधिकारी राजू , आज तो सेवानिवृत्त होत आहे ही शासनाची सुद्धा हानीच म्हणावी लागेल. परंतु सेवानिवृत्तीनंतर तो निश्चितच काही तरी वेगळे व चांगले करेल अशी खात्री आहे. ज्यांना-ज्यांना मी राजू रिटायर्ड होतो हे सांगितल्यावर त्यांनी "अरे राजू रिटायर्ड पण झाला !" असे आश्चर्य कारक उद्गार काढले , समय का पहिया इतक्या वेगात पुढे सरकला हे त्यांच्या पण लक्षात आले नाही.  

    आगामी वाटचालीसाठी, निरोगी व उदंड आयुष्यासाठी राजूला शुभेच्छा ! आणि ही लेखरुपी छोटीसी भेट.

लिहावेसे असे खुप आहे परंतु लेख प्रदीर्घ होईल नव्हे झालाच आहे. करीता विराम देतो. राजूला कविता/शायरी हे आवडतात म्हणून या स्वरचित ओळी 

ये सफर मैने तय किया

मेरी अपनी अदा से|

आगे भी और कुछ करूँगा 

आपके प्यार और साथ से |

✍️ विनय वि.वरणगांवकर©

30/06/24

२७/०६/२०२४

Article about tolerance of Khamgaon citizens

खामगांव, एक सहिष्णू शहर 

खामगांवकर नागरिक हे मोठे सहिष्णू आहेत आणि त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की सिल्वर सिटी, कॉटन सिटी याप्रमाणेच आता Most Tolerate City अर्थात सहिष्णू शहर म्हणून सुद्धा खामगांवची ओळख करून दिली तर काही वावगे होणार नाही.

काही वर्षांपूर्वी भारतातील सहिष्णूतेबाबतच्या चर्चा देशभर झाल्या होत्या. मोठा उहापोह तेंव्हा झाला होता. सहिष्णू देश म्हणून भारताची ओळख जुनी आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा भारताने जगाला सहिष्णूतेचा संदेश दिला आहे असे म्हटले आहे. याच अनुषंगाने आपले खामगाव शहर सुद्धा सहिष्णू शहर आहे असे म्हणावेसे वाटते. केवळ  सहिष्णू नव्हे तर जगातील सर्वात सहिष्णू शहर आहे असे आता वाटायला लागले आहे. याची कारणे अनेक आहेत आणि ती सर्वपरिचित सुद्धा आहेत. तरीही इथे त्या कारणांची पुनरोक्ती करणे क्रमप्राप्त आहे.

खामगाव शहरातील सर्वात जुनी समस्या व नागरीक ज्या समस्येबाबत पुर्णपणे सहिष्णू झालेले दिसतात ती म्हणजे पाण्याची समस्या. खामगाव शहराला पूर्वी जनुना तलावावरून पाणीपुरवठा होत असे. ती पाईपलाईन अद्यापही आहे, ती कार्यान्वित सुद्धा होऊ शकते व शहराच्या अगदी लगतचा मोठ्या जलसाठ्याचा लाभ खामगांवकरांना होऊ शकतो. पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सध्या  ज्ञानगंगा धरणातून खामगावला पाणीपुरवठा सुरू आहे. आता खामगावची लोकसंख्या वाढली, पाण्याची मागणी अधिक होऊ लागली आहे.  पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी खामगावला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती म्हणून तेंव्हा  आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होऊ लागला तो आजतायागात कायमच आहे. त्यातच कधी बूस्टर पंप खराब होणे तर कधी पाईपलाईन फुटणे, विद्युततारांवर झाडे कोसळल्याने किंवा फांद्या कोसळल्याने धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणे व त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे, तर कधी बिबट्याच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे पाणीपुरवठा कार्यासाठी न जाणे अशा अनेक समस्या खामगावचा पाणीपुरवठा करताना येत असतात. त्या जाहीर झाल्यावर खामगावचे सहिष्णू नागरिक मूकपणे आपली-आपली पाण्याची व्यवस्था करतात. कुणी टँकर, कोणी कॅन तर कुणी लीक झालेल्या व्हॉल्व वरून आपली पाण्याची गरज भागवतात. पूर्वी पाणी नसले की घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा असे किमान ऐकू तरी यायचे,  वृत्तपत्रातून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांच्या बातम्या वाचनात यायच्या, सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे गा-हाणे मांडले जायचे पण आता खामगांवकरांना विस्कळीत पाणी पुरवठा इतका अंगवळणी पडला आहे की उपरोक्त मागण्या सुद्धा आताशा होणे बंद झाले आहे. 

     खामगांवकर नागरिकांच्या सहिष्णूतेच दुसरे उदाहरण म्हणजे महावितरणचे. दरवर्षी पावसाळा येण्यापूर्वी महावितरण विद्युत तारांच्या आजूबाजूच्या वृक्षांची छाटणी करतात जेणेकरून पावसाळ्यात काही समस्या निर्माण होवू नये.  हे त्यांचे कार्य चांगलेही आहे व ते नियमितपणे होत सुद्धा असते. परंतु पावसाळा सुरू झाला की, अत्यल्प पाऊस पडणाऱ्या खामगांवात वारं-उधाण , पाऊस नसतांना थोडी जरी हवा सुटली की लगेच विद्युत पुरवठा खंडित होण्याचा चांगलाच अनुभव आहे. खामगांव शहरात कमी पाऊस पडतो त्यामुळे इथे जून महिन्यात सुद्धा प्रचंड गर्मी असते. नागरिकांना मोठ्या उकाड्याला सामोरे जावे लागते पण तरीही पाऊस, वारा, वादळ नसतांना  आणि विजा सुद्धा चमकत नसतांना खामगावला विद्युत पुरवठा खंडित होतो. कालचेच उदाहरण काल संध्याकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी एक तास विद्युत पुरवठा खंडित होता. तो का खंडित होता याचे कारण सुद्धा सांगितले जात नाही. मागे  विद्युत पुरवठा खंडीत होणार असला की एसएमएस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, ती सुद्धा आता कार्यान्वित नसल्याचे दिसते. तक्रारीच्या दूरध्वनीवर तक्रार करण्यासाठी नागरीक गेले असता तो दूरध्वनी कोणीच उचलत नाही असा अनुभव कित्येक नागरिकांना आलेला आहे व येत असतो. नागरीक तक्रार करण्यासाठी प्रत्यक्ष गेले असता तिथे तक्रारीची नोंद रजिस्टर मध्ये केली जाते आणि त्यांची बोळवण केली जाते. याही उदाहरणात खामगावचे सहिष्णू नागरिक विद्युत पुरवठा पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत निमूटपणे घरी बसलेले असतात. पण एक जरी विद्युत बील भरण्यास विलंब झाला तर महावितरणचे कर्मचारी लगेच घरी येतात.

    आता खामगांवकरांच्या वाहतूक सहिष्णूते बाबत बघू. खामगांव  शहर आता खूप विस्तारित झाले आह गृह कर्ज सोपे झाल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात बांधकाम करून राहिले आहेत. तसेच सुलभ कर्ज सुविधामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी वाहने खरेदी होत आहेत. या वाहनांमुळे जुन्या अरुंद रस्त्यांच्या भागात, जिथे बाजारपेठ आहे तिथे खूप गर्दी असते. परवाचेच उदाहरण द्यायचे झाले तर भगतसिंग पुतळ्याजवळ कुण्या एका नागरिकाने गाडी रस्त्यातच उभी केली होती. व तो दुकानात गर्दी असल्याने प्रतीक्षेत उभा होता. लोक हॉर्न वाजवत जात होते. थोड्या वेळाने एक चार चाकी वाहन आल्यावर मात्र त्या वाहनाला जाण्यास अपुरा रस्ता होता त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. अनेकांनी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण पण सुरू केले परंतु तरीही तो गाडीवाला बहादुर काही गाडी हटवण्यास तयार नव्हता. शेवटी लोक ओरडायला लागले "अरे किसकी गाडी है, किसकी गाडी है?" तेव्हा तो महाभाग गाडी सरकवण्यास बाहेर आला व वाहतूक पुन्हा सुरू झाली. परंतु खामगांवच्या आम्हा सहिष्णू नागरिकांनी किंवा रहदारीतील सहिष्णू जनांनी त्या माणसाला एकाही शब्दांनी गाडी रस्त्यात का उभी केली किंवा बाजूला का उभी केली नाही असे काही म्हटले नाही. तसेच  वाहतूक, अतिक्रमण यांबाबत कुणी काही वाच्यताही करीत नाही, मग ते अधिका-यांच्या सरकारी निवासस्थाना समोर का असेना.

     तीच गत सरकारी कार्यालयांची सरकारी कार्यालयामध्ये खामगांवकर नागरिक गेले असता अनेक वेळा त्यांना कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसते. ते कर्मचारी इतरत्र कुठे गेलेले असतात त्याही प्रसंगी सहिष्णू खामगावकर नागरिक एक तर त्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसतात किंवा थकून घरी जातात व पुन्हा दुसऱ्या दिवशी आपले कामकाज करण्यासाठी कार्यालयाची चक्कर मारतात. 

     अशी इतरही काही उदाहरणे आहेत, निवडणूकांत सुद्धा मोठी उदारता, सहिष्णूता खामगांवकर पूर्वी पासूनच दाखवत आले आहे असे नागरिकच बोलत असतात. वरील काही उदाहरणांवरून असे लक्षात येते की खामगांवकर नागरिक हे मोठे सहिष्णू आहेत आणि त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की सिल्वर सिटी, कॉटन सिटी याप्रमाणेच आता Most Tolerate City अर्थात सहिष्णू शहर म्हणून सुद्धा खामगांवची ओळख करून दिली तर काही वावगे होणार नाही.