देखो,देखो,देखो बायोस्कोप देखो
यंदाच्या निवडणूकीत
राज ठाकरे यांनी त्यांच्या सभांमध्ये व्हीडीओ व्दारे पुरावे दाखवणे सुरू केले. यात
त्यांनी मुख्यात: भाजपा ला त्यातही पंतप्रधान मोदी व अमित शहा यांना लक्ष्य केले.
भाजपा ने दिलेली जुनी आश्वासने, डिजीटल गांव ,
भाजपाने केलेल्या व्हीडीओ जाहीरातीत काम करणारे व्यक्ती यांचा या पुराव्यांत
त्यांनी समावेश केला. कुणाला निवडून द्या हे सांगण्यापेक्षा त्यांनी कुणाला निवडून
नका देऊ हे ते सांगत होते. या राजकीय युद्धात राज ठाकरे सारखी “मुलुख मैदानी तोफ”
चा वापर चांगला करता येईल हे जाणत्या राजाने बरोबर हेरून त्यांना सोबत घेऊन
गनिमीकावा सुरू केल्या गेला. राज यांनी “लाव रे व्हीडीओ” असा नारा देऊन या व्हीडीओ
हल्लाने भाजपा व शिवसेना यांच्यावर सुलतान ढवाच केला. आता या हल्ल्याला
प्रत्युत्तर ते कसे द्यायचे या विचाराअंती मग “लोहा लोहे को काटता है” याप्रमाणे भाजपा व शिवसेना यांनी या व्हीडीओ
हल्ल्यास प्रती व्हीडीओ हल्ला हाच मार्ग निवडला. या दोन्ही पक्षांनी सुद्धा प्रचार
सभांत व्हीडीओ दाखवणे सुरू केले उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे राहुल गांधी यांचा
जुना व्हीडीओ दाखवला आशीष शेलार यांनी सुद्धा व्हीडीओ दाखवला. निवडणूक प्रचार
धुमाळीत राजकीय पक्षांचे हे असे व्हीडीओ दाखवणे जोरात सुरू आहे. पूर्वी दूरदर्शन
वगैरे नसताना एक माणूस एक भला मोठा त्याला उभे करण्यासाठी तिपाई असलेला एक मोठा
डब्बा घेऊन यायचा. त्याला “बायोस्कोप”वाला असे म्हणत. या “बायोस्कोप”वाल्या जवळील
त्या मोठ्या डब्ब्याला आजूबाजूने तीन-चार असे अल्युमिनीयमचे छोटे साखळी असलेल्या
झाकणाचे डब्बे लावलेले असायचे व त्यातून लहान
मुलांनी पहायचे व तो बायोस्कोपवाला वरुन एक कळ फिरवत रहायचा व डब्ब्यातून मुलांना
वेगवेगळी चित्रे दिसायची. सोबत एखादे गाणे वाजायचे. 10- 20 पैस्यात हा “शो”
असायचा. शो झाला की बायोस्कोपवाला डब्बा उचलून दुसा-या भागात निघून जायचा.महाराष्ट्रातील
राजकारणात सुरू असलेलेले हे व्हीडीओ हल्ले पाहून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या या
बायोस्कोपवाल्याची आठवण झाली. त्याच्या या व्यवसायातून त्याला पैसे मिळायचे व
मुलांची करमणूक व्हायची. महाराष्ट्रातील या व्हीडीओ हल्ल्यातून जनतेचे मनोरंजन ही
होते व बिदागी सुद्धा मिळतच असावी कारण तशी चित्रफीत सुद्धा नुकतीच झळकून गेली.
राजकीय नेत्यांचे हे त्या बायोस्कोपवाल्या प्रमाणे व्हीडीओ दाखवत फिरणे कितपत
यशस्वी ठरते हे आता 23 मे रोजीच कळेल. बायोस्कोपवाला निदान कुटुंबाचा चरीतार्थ
चालवण्यासाठी हा व्याप करीत असे तर राजकीय पक्ष मात्र देशहीताच्या नांवाखाली स्वत:ची
पोळी शेकण्यासाठी हे व्हीडीओ तंत्रज्ञान वापरत आहे. दुस-याचे उणे देणे असलेलेले
व्हीडीओ दाखवण्यापेक्षा स्वत: काय केले याचे व्हीडीओ दाखवा ना ! जनता हुशार आहे त्या बायोस्कोपवाल्या जवळ मुले जशी मनोरंजनासाठी येत व निघून जात तसेच जनता तुमचे व्हीडीओ निव्वळ एक करमणूक म्हणून बघेल का ? आपली करमणूक करून घेऊन बटन मात्र विचारपूर्वक दाबेल का
किंवा त्यांनी बटन विचारपूर्वक दाबले असेल का ? याचा निकाल आता लवकरच कळेल. जर जनतेने तुमच्या
व्हीडीओ ला नाकारले तर त्या बायोस्कोपवाल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमचा व्हीडिओचा डब्बा उचलून जावे
लागेल.