Click "Follow" Button below To Follow this Blog

०१/०८/२०१९

Article about cow on roads


दुध मालकाला , त्रास जनतेला
खामगांव शहर विकासाच्या ए टप्प्यातून जात आहे. नांदुरा रस्त्याचे काम वेगात सुरु आहे. रस्त्यासाठी अडथळा होतो म्हणून भली मोठी वृक्षे सुद्धा तोडली गेली. या विकास कामामुळे रहदारीत अडथळा होतो आहे, पाणी पुरवठा कित्येक दिवसांपासून खंडीत झाला आहे. परंतू हे सर्व नागरिक सहन करीत आहे कारण हे सर्व चांगल्यासाठी होत आहे आणि सुरळीत सुद्धा होणार आहे. विकास कामाचा कुणालाही अडसर होत नाही परंतू या मार्गावरील नेहमीच असणारा अडथळा म्हणजे गायींचा. मान्य आहे भारतात गायीला गोमातेचा दर्जा आहे. मातेचा दर्जा देऊन तीला रस्त्यावर सोडणे योग्य आहे का ? शहरातील हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावर सरकारी कार्यालये,विद्यालये खाजगी शैक्षणिक संस्था, दवाखाने इ. अनेक प्रतिष्ठाने आहेत. हे सर्व असल्या कारणाने या हमरस्त्यावर मोठी रहदारी असते. विद्यार्थी वर्ग असतो. त्यातच या मोकाट गायी भर रस्त्यात उभ्या असतात. या गायींमुळे अधिकच कुचंबणा होते. शिवाय या गायी रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करतात व त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अधिकच घाण होते, दुर्गंधी पसरते शिवाय रोगराई निर्माण होते ते वेगळेच. शहरातीलच नागरिकांच्या या गायी पद्धतशीरपणे दुस-याच्या भरवश्यावर पोसल्या जातात. नागरीकांनी दिलेले अन्न , उकिरड्यावरचे प्लास्टीक मिश्रीत अन्न खाऊन मग या हमरस्त्यावर या गायी
आरामशीर पणे रवंथ करीत बसतात. या गायींचे मालक त्यांच्या कार्यात निश्चिंत असतात. त्यांना ठाऊक असते की गाय संध्याकाळी घरी येतेच. फुकटचे खाऊन गाय घरी गेली मालकाला दुध देते. याच मुद्द्यावर 2013 मध्ये सुद्धा एक लेख लिहिला होता. सहा वर्षांपासून ही समस्या आजही कायम आहे. संबंधीत अधिका-यांनी यात लक्ष घालणे जरुरी नाही का ? एखाद्या वेळेस भर रस्त्यात एखादा मस्तावलेला वळू किंवा गाय उधळली तर मोठा अपघात होऊ शकतो. परंतू रस्त्यावर येऊन उभ्या राहणा-या या गायींचा बंदोबस्त करण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. मागील महिन्यात मुंबई आयआयटी मध्ये एक वळू उधळला होता व त्याने एका विद्यार्थ्यास गंभीर जख्मी केले होते.त्याची चित्रफीत माध्यमात झळकली होती. अशाच प्रकारच्या मोकाट जनावरांमुळे जख्मी झालेल्या नागरिकांच्या इतरही अनेक चित्रफिती कमे-यात कैद झालेल्या आहेत. परंतू तरीही या गायींचे मालक , स्थानिक प्रशासन शहरातील या समस्येकडे लक्ष घालत नाही. “चल रहा है चलने दो” ही वृत्ती आहे. नांदुरा रस्त्याप्रमाणे गावात इतरही रस्त्यावर या गायी गस्त घालीत असतात. गावातील रस्ते अरुंद त्यात अनेक प्रकारची विकास कामे सुरु त्यामुळे गावात गाडी घेऊन जाण्याची भीती वाटते. खामगांव शहरात कोंडवाडा आहे की नाही ठाऊक नाही परंतू असेल तर त्याचा उपयोग मात्र नक्कीच शून्य असेल. कुणावर न येवो परंतू या गायींमुळे एखादा बिकट प्रसंग ओढावला तर त्याला कोण जबाबदार ठरेल ? या गायींचा सर्व नागरिकांना रस्त्यावरून येता-जाता त्रास होत असतो. गायींचे दुध मालकाला आणि त्रास मात्र जनतेला अशी “कुणाची म्हैस अन कुणाला उठ बैस” अशी स्थिती खामगावात झाली आहे. गायी मस्त , त्यांचे मालक आणि प्रशासन सुस्त आणि जनता मात्र त्रस्त आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा