Click "Follow" Button below To Follow this Blog

२४/०८/२०१९

Article on public demand of making Khamgaon as new district


“जेंटल रिमाइंडर”
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस आज पूर्वाश्रमी कॉटन सिटी व आता सिल्व्हरसिटी म्हणून ओळखल्या जाणा-या खामगांव नगरीत येत आहे. जिल्ह्यातील जुने, मोठे, व्यापारपेठ, सांस्कृतिक केंद्र , स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील अग्रगण्य, अनेक राष्ट्रपुरुषांनी भेट दिलेल्या अशा खामगांव शहरास जिल्हा करावा अशी फार जुनी मागणी आहे. भौगोलिक दृष्ट्या घाटाखालील तालुक्यांना बुलडाणा शहरापेक्षा खामगांव शहर अधिक निकट आहे. तसेच खामगांव शहरात अनेक जिल्हा कार्यालये आहेत. विकासाचा समतोल साधायचा असेल तर छोटी राज्ये , छोटे जिल्हे असतील तर विकास लवकर साध्य होतो. खामगांव जिल्ह्याची मागणी जुनी असूनही वाशिम जिल्हा आणि इतर काही जिल्हे निर्माण सुद्धा झाले. खामगांव शहर मोठे आहे साहजिकच येथील जनतेला आपले शहर जिल्हा व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर घाटाखालच्या संग्रामपूर,जळगाव जामोद, शेगांव, मलकापूर, नांदूरा,
खामगांव तालुक्यातील गामिण भागातील जनतेला सुद्धा तसे वाटते. परंतू तरीही खामगांव जिल्हा मात्र अद्याप प्रलंबीत आहे. मा. नरेंद्र मोदी 2014 मध्ये खामगांवात आले असता त्यांनी त्यांच्या व्याख्यानात या मागणीचा व खामगांव-जालना रेल्वे मार्गाचा उल्लेख केला. रेल्वे मार्ग हा केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे म्हणून येथे खामगांव जिल्ह्याच्या मागणीबाबत भाष्य करणे यथोचित आहे. परंतू जालना व खामगांव ही शहरे रेल्वेच्या नकाशावर आली तर व्यापाराला, दळणवळणाला ते हमखास सोयीस्कर होईल. मा. देवेन्द्रजींनी अनेक विषय कुशलतेने हाताळले, ते मंदिरात जाऊ शकले नाही  तरीही विठ्ठल त्यांच्या पाठीशी उभे राहिले. कित्येक घडामोडी घडल्या परंतू देवेन्द्र्जींनी त्या राजकीय चाणाक्षतेने हाताळल्या. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी “अमृत”रूपी संजीवनी आणली. त्यांच्या तरुण वयातील राजकीय प्रगल्भतेचे आणखी अनेक दाखले देता येतील. फडणवीस यांचे अभ्यासू, प्रामाणिक व्यक्तिमत्व असल्याने ज्याप्रमाणे त्यांनी अनेक प्रश्न निकाली लावले त्याप्रमाणे खामगांव जिल्ह्याची जुनी मागणी सुद्धा पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावी. या मागणी बाबत अनेकांनी ऊहापोह केला आहे, पत्रव्यवहार केला आहे , समाज माध्यमांतून लिखाण केले आहे तरीही मायबाप सरकारचे मात्र लक्ष नाही किंवा खामगांव जिल्हा निर्मिती बाबत काहीही वाच्यता किंवा हालचाल नाही. अनेकदा पाठपुरावा होऊन खामगांव जिल्ह्याचे घोडे कुठे अडले आहे कुणास ठाऊक ? त्यासाठीच मेहरबान राज्य सरकारला हे आणखी एक “जेंटल रिमाइंडर”.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा