साडीतील नायिका
70 च्या दशकात देमार
चित्रपटांचे युग सुरू झाले होते. याच काळात बासु चॅटर्जी, ऋषीकेश मुखर्जी यांच्या सारख्या दिग्दर्शकांचे
हलके-फुलके चित्रपट सुद्धा याच काळात निर्मात्याला
चांगला गल्ला भरून देत होते. सलील चौधरी , जयदेव यांचे शांत, सुमधुर, कर्णमधुर असे संगीत, प्रतिभासंपन्न गीतकारांची गीते रसिकांना मंत्रमुग्ध करीत असत. याच काळात तीचे अभिनेत्री म्हणून पदार्पण झाले
होते. तशी ती काही आजच्या काळात असणा-या नटयांप्रमाणे
एकदम ग्लॅमरस, हॉट वगैरे नव्हती. परंतू तीचे लांब केस , एक वेणी , साडीमध्ये एखाद्या सर्वसामान्य, अगदी आपल्या आजूबाजूला दिसणा-या साध्या-सुध्या
स्त्रीयांप्रमाणे तीचे ते पडद्यावर दिसणे दर्शकांना
सुखावून जात असे. आपण अगदीच काही तरी “लार्जर दॅन लाईफ” वगैरे न पाहता अगदी आपल्यातीलच एखादी गोष्ट सिनेमात पाहतो आहे अशा
आशयाचे , कथानकाचे तीचे चित्रपट होते. छोटीसी बात, रजनीगंधा सारखे हलके-फुलके लो बजेट असे ते चित्रपट होते. अशा प्रकारच्या चित्रपटातून दिसणारी ती अभिनेत्री होती विद्या सिन्हा. विद्या सिन्हाचे परवा वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले. तीच्या जाण्याने तीच्या स्मृतींना, तीने वठवलेल्या भूमिकांना उजाळा मिळाला. तशी विद्या काही खूप लोकप्रिय नव्हती किंवा
समीक्षकांनी सुद्धा तीची विशेष दखल घेतली नव्हती. छोटीसी
बात मधील "जानेमन जानेमन" गाण्यात अमोल पालेकर ला सिनेमा पहातांना पडद्यावरच्या धर्मेंद्र व हेमा मध्ये तो व विद्या सिन्हा दिसतात
.अगदी सर्वसामान्य प्रेक्षकाला जसे वाटते तसे ते दृश्य होते. याच चित्रपटात अमोल पालेकर, असरानी आणि "लव्ह गुरू" अशोककुमार यांचे धमाल विनोद आहे. रजनीगंधा, पती,पत्नी और वो
अशा चित्रपटातून तीच्या अभिनयाची झलक दिसली.नायिका
म्हणून तीची कारकीर्द संपुष्टात आल्यावर विद्याने जाहिराती आणि काही मालिकां मधून दर्शन दिले. परवा तीच्या निधनाचे
वृत्त आले. एखादा व्यक्ती त्याची-त्याची भूमिका, कार्य
योग्यरीत्या पार पाडत असूनही त्याला म्हणावी तशी
प्रसिद्धी, म्हणावा तसा नावलौकिक मिळत नसतो. तसेच विद्याचे
झाले. सर्व चित्रपट गाजले, कुठेही
कोणती मारधाड, अश्लील दृश्ये नसलेले ते चित्रपट होते. तसे
तीचे चित्रपट अगदी बोटावर मोजता येतील इतके. पन्नास
पेक्षाही कमी असतील. परंतू तरीही विद्या सिन्हा मात्र चिरकाल
स्मरणात राहील. विद्या सिन्हा साडी व्यतिरिक्त इतर कपडे ल्यालेली क्वचितच दिसली. भारतीय स्त्री साडीत जितकी सुंदर दिसते तितकी इतर कपड्यांत नाही हे कदाचित
तिला चांगले कळले असावे. विद्याचे अवखळ हसू आणि साडी हे वैशिष्ट्य होते. काही फ्रेम मधून तीच्यात वैजयंतीमालाची
झलक दिसे. रजनीगंधातील "कई बार युंही देखा है" या गाण्यातील भाव तीने
सुंदर वठवले आहेत. छोटीसी बात मधील अमोल पालेकर तीला वश करण्यासाठी म्हणून
"लव्ह गुरु" च्या सहाय्याने नाना त-हेचे प्रयत्न करतो ते कळल्यावर तीला
धक्का बसतो तेंव्हा सुद्धा विद्याने सुंदर अभिनय केला आहे. "अधिकार जबसे
साजनका हर धडकन पर माना मैने" असे रजनीगंधा चित्रपटातील गीतात म्हणणा-या
विद्याला मात्र वैवाहिक जीवनात फार सुख मिळाले नाही. पहिल्या पतीचे निधन झाल्यावर
तीने दुसरा विवाह केला होता. दुस-या पतीने सुद्धा तीची फसवणूक केली अशी तक्रार
तीने केली होती. सलमान खान चा बॉडीगार्ड हा तीचा अखेरचा चित्रपट. विद्या गेली आणि
संपूर्ण चित्रपटभर साडी नेसणा-या नायिकांच्या युगाचा अस्त झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा