हाथी मेरे साथी ?
1971 या वर्षी हाथी
मेरे साथी हा चित्रपट झळकला होता. हत्तींच्या सहवासात वाढलेल्या नायकाच्या हत्तीचे
प्राण खलनायक घेतो. आपल्या प्रिय हत्तीचा जीव
घेतलेला पाहून प्रसंगाला अनुसरून करूण
रसाने ओतप्रोत भरलेले “नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनियामे खुश रहना मेरे
यार” हे गीत नायक गातो. जरी चित्रपट असला , काल्पनिक कथा असली तरी प्राण्यांचे व मानवाचे
नाते , सहजीवन या चित्रपटात फार छान दाखवले आहे. तसेच प्राणीमात्रांवर प्रेम करावे , प्राणी इमानदार असतात असा संदेश देणारा हा सिनेमा होता. हा चित्रपट , हे गीत आज प्रकर्षाने
आठवत आहे याचे कारण म्हणजे केरळ मध्ये झालेली एका हत्तीणीची निर्घुण हत्या. कुण्यातरी कृरकर्म्या नराधमाने अननसात फटाके
टाकून या जंगली हत्तीणीची हत्या केली. अननसातील फटाके फुटल्याने तिचा जबडा गंभीर क्षतीग्रस्त
झाला. तिला खाणे कठीण झाले. 27 मे रोजी या हत्तीणीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात
ती गर्भार असल्याचा निष्कर्ष निघाला आणि तिच्या मृत्यू बाबत आणखी हळहळ वाटली. तेथील
वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी समाज माध्यमांवर जेंव्हा “माफ कर बहिणी” म्हणून पोष्ट
शेअर केली तेंव्हा ही घटना प्रकाशझोतात आली. का करतो मानव असे? काय बिघडवले असेल त्या
हत्तीणीने त्या मारेक-
याचे , कदाचित काही नुकसान
केले असेलही. परंतू त्याची ही शिक्षा ? एकाचवेळी त्या पाप्याने दोन जीव मारले. या हत्तीणीबाबतची
माहिती मिळाल्यावर मोहन कृष्णन तिच्या शोधार्थ निघाले. तेंव्हा पलक्कड जिल्ह्यातील
वेल्लीयार नदीत ती निश्चल उभी होती. आपल्या जबड्यातील फटाक्यांच्या विस्फोटाने झालेली लाहीलाही शमवण्यासाठी ती बिचारी नदीत उतरली
होती. आपल्या पोटातील 18 ते 20 महिन्याच्या पिल्लाला वाचवण्याचा सुद्धा तिचा विचार
असावा. त्यांनी तिला पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न केले परंतू ती आली नाही. कदाचित त्या बिचारीला
आपण आता मरणार हे ठाऊक झाले असावे. मोहन कृष्णन म्हणाले की, “फटाक्यांनी भरलेला अननस
देणा-या मानवावर तिचा आता विश्वास नव्हता.” बाहेर न येऊन तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा
जणू निषेधच केला. जणू ती आता जलसमाधी घेणार होती. हे असे मुक्या प्राण्यांना मारून
काय मिळवले असेल त्या मारेक-याने. त्या नराधमाचा शोध आता घेतल्या जात आहे. त्याच्यावर
वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जंगली जनावरे ,
पाळीव जनावरे , पर्यावरण हे सगळे आपले सोबती आहेत हे अजूनही मानवाला कळत कसे नाही ?
एखादे हरीण , एखादा बिबट्या शेतात/ गावात शिरल्यावर मानव किती ओरड करतो. परंतू जेंव्हा
मानव अशाप्रकारे मुक्या जीवांचे हत्या करतो तेंव्हा सर्व चूप का असतात ?
“
जब जानवर कोई इन्सान को मारे , कहते है दुनियामे वैहशी उसे सारे
एक
जानवर की जान आज इन्सानोने ले ली है चूप क्युं है संसार “
या हाथी मेरे साथी
चित्रपटातील गीताच्या उपरोक्त ओळी मानवी वृत्तीला चपखल बसतात. एका प्राण्याच्या मृत्यूवर
काही तुरळक लोक बोलतीलही , तो नराधमही पकडला जाईल परंतू त्याला काय शिक्षा होईल ? साक्षी
, पुरावे , यात कितीतरी वर्षे निघून जातील. काळवीट मारणारा सलमान नाही का मजेत ! परंतू हे असे थांबवावे लागेल मानवी हत्येच्या शिक्षेप्रमाणे या हत्तीणीच्या मारेक-याला
कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण त्याने हत्तीणच नव्हे तिच्या पिल्लाचा सुद्धा
जीव घेतला आहे. ज्या केरळ मध्ये हत्तींचा सन्मान केला जातो , अनेक मंदिरात तिथे हत्ती
आहेत , या देशात हत्तीला गणपती म्हणून पाहिले जाते त्या देशात हत्तीणीची अशी हत्या
झालेली पाहून सर्व सुन्न झाले आहेत आणि खरच आपण हत्तींना “हाथी मेरे साथी” मानतो का
? असा प्रश्न पडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा