Click "Follow" Button below To Follow this Blog

२५/०६/२०२०

Article about India′s ′Made in China′ boycott campaign after Sonam Wangchuk appeal- Part 2

ज्योत तेवतच ठेवावी लागेल (ड्रॅॅगनचा बॉयकॉट आवश्यकच भाग 2)
पारतंत्र्यातही आपण विदेशी मालाच्या होळ्या , बहिष्कार करीत होतो व आजही आपल्याला तेच करावे लागत आहे. स्वदेशी वस्तूंची निर्मिती, आत्मनिर्भर होणे, आपल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्टीकोन देणे हे आपल्यासाठी आवश्यकच आहे तेंव्हाच आपल्याला संपूर्णपणे चीनी वस्तूंचा बहिष्कार करणे शक्य होईल. हे मागील लेखात आपण पाहिले. चीन स्वत: सीमेवर रस्ते आदी बांधकाम करीत आहे परंतू तेच भारताने केले तर ते मात्र चीनला खपत नाही आणि म्हणूनच गलवान खो-यात चीनच्या सैनिकांनी खिळ्यांनी युक्त असलेल्या काठ्यांनी हल्ला केल्यामुळे आपले 20 जवान हुतात्मा झाले. अनेक जवान जायबंदी झाले. चीनच्या सैनिकांचे सुद्धा नुकसान झाले आहेच परंतू चीनने आकडा जाहीर केला नाही व तो करणार नाहीच. तरीही चीनचे सुद्धा 43 जवान मारले गेल्याचे सांगितले जाते. सैनिक झटापट व आपले जवान हुतात्मा झाल्यावर पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या आधीच डोकलामच्या वेळी चीनच्या दुतावासात गुपचूप जाऊन भेटणा-यांनी लगेचच अकलेचे तारे तोडणे सुरु केले. तसेच गत शनिवारी सर्व पक्षीय बैठक झाल्यावर त्यावर उहापोह सुरु झाला आहे. असो ! शिक्षणतज्ञ , अभ्यासक , विचारवंत सोनम वांगचुक यांच्या boycott made in China”  या अभियानाच्या आवाहनाचा दाखला घेऊन चीनच्या आपल्या जवानांवरील हल्ल्यामुळे चीनी वस्तूंच्या बहिष्काराचे व्यापक व दीर्घ अभियान राबवावे या आशयाचा मागील लेख होता. परंतू आपण पाहतो आपल्या देशात अनेकदा काही आंदोलने, मोहिमा राबविण्याचे आवाहन केले जाते. परंतू अल्पावधीतच ते आंदोलन किंवा ती मोहीम राबवण्याच्या, त्या आंदोलनाला किंवा मोहिमेला पूर्णत्वास नेण्यापुर्वीच जनतेचा जोम ओसरतो आणि ते आंदोलन किंवा ती मोहीम पुन्हा “जैसे थे” स्थितीत येऊन जाते. सद्यस्थितीत चीनमुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे होत असलेल्या चीनी वस्तूंच्या बहिष्काराचे सुद्धा असे न होवो. राष्ट्रप्रेम हे क्षणीक नसावे, ते हृदयात सतत जागृत असावे त्यानुसार चीनी मालाच्या बहिष्काराचे हे आंदोलन एक दीर्घकालीन आंदोलन झाले पाहिजे. मुकेश अंबानी यांनी सुद्धा जियो या त्यांच्या कंपनी मध्ये चीनी साहित्य न वापरत असल्याचे ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जगजाहीर केले आहे. जेंव्हा सोनम वांगचुक , मुकेश अंबानी यांसारखे जगमान्यता असलेले लोक भारतीयांना आवाहन करतात तेंव्हा आपण त्यांचे आपआपल्यापरिने अनुसरण करायलाच हवे. तसेच चीनमध्ये नेहमीच व्हायरस निर्माण होत आले आहेत. कोरोना या व्हायरसचे सुद्धा काही “व्हर्जन्स” आहेत शिवाय चीन भविष्यात सुद्धा इतर व्हायरस निर्माण करेलच. चीनी वस्तू आपण किंवा इतर कुण्या देशाने आयात केल्या व दुर्दैवाने चीन निर्मित एखाद्या “Grounded Virus” ने त्या वस्तूसह शिरकाव केला तर ते आपल्याला किंवा आयतकर्त्या देशाच्या चांगलेच अंगलट येऊ शकते. पुन्हा कोरोना सारख्या संकटात नेऊ शकते याचा सर्वानी विचार करणे आवश्यक आहे. चीनी वस्तूंच्या बहिष्काराच्या आंदोलनात जगातील इतर काही देश सुद्धा सहभागी झाले आहेत ही भारताच्या जमेची बाजू म्हणावी लागेल. जर ही बहिष्कार मोहीम काही वर्षापर्यंत सुरु राहिली तर यथावकाश चीनी साहित्य आपल्या बाजारपेठेतून हद्दपार होऊन आपले स्वनिर्मित, स्वदेशी साहित्य विक्रीस वेग मिळेल किंवा तो मिळावा. चीनी वस्तूंच्या बहिष्कारानंतर त्याला पर्याय हा आपल्या जवळ असायलाच पाहिजे. आपल्या लोकांनी रोजगार उभे केले , स्वदेशी उत्पादन वाढवले तर कामगारांना , छोट्या कारागिरांना नवीन कार्य करण्यास उत्साह निर्माण होईल. नवीन रोजगार निर्मिती सुद्धा होईल व भारत ख-या अर्थाने “आत्मनिर्भर” होईल. जरी चीनी हे आपल्या तुलनेत अधिक कामसू आहेत किंवा त्यांचे सरकार त्यांच्या कडून काम करवून घेते , तेथे कामगारांना अधिकार नाही , मानवाधिकाराची वानवा आहे. यांसारख्या काही बाबींमुळे त्यांची उत्पादन क्षमता जास्त आहे. आपल्या देशात तसे नाही परंतू आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व चीनला निष्प्रभ करण्यासाठी आपल्या जवळ त्यांच्या वस्तूंचा बहिष्कार हाच सर्वात सोयीस्कर उपाय आहे व तसे अनेक तज्ञांचे सुद्धा मत आहे. त्यामुळे चीनी वस्तूंच्या बहिष्काराची जी आता ज्योत पेटली आहे ती आपल्याला तेवतच ठेवावी लागणार आहे. त्या ज्योतीला तेवत ठेवण्यासाठी तिला प्रखर राष्ट्रप्रेमाचे तेल घालावे लागेल.
क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा