Click "Follow" Button below To Follow this Blog

१२/०६/२०२०

Article about India′s ′Made in China′ boycott campaign after Sonam Wangchuk appeal. Part 1

ड्रॅॅगनचा बॉयकॉट आवश्यकच 
     शेवटी चीनने आगळीक केलीच. आपल्या सैनिकांवर हल्ला केल्यामुळे आपले 20 जवान हुतात्मा झाले. तत्पूर्वी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणा-या , पर्यावरण बचावासाठी झटणा-या  , तसेच पर्यावरणातील बदल आटोक्यात येण्यासाठी  सर्वांनी साध्या पद्धतीने जीवन जगले पाहिजे यासाठी “ilivessimply” या चळवळीत पुढाकार घेणा-या सोनम वांगचुक यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. चीनची अरेरावी, भारत-चीन सीमेवर सतत कुरापती काढणा-या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन या व्हिडीओच्या माध्यमातून वांगचुक यांनी केले आहे. चीन येन केन प्रकारेण आपले सम्राज्यवादी धोरण राबवत आहे, विविध देशांना कर्ज देऊन त्यांना आपल्या कानाखाली आणणे , नेपाळला चीनी भाषा शिकवण्याचे आवाहन करणे असले प्रताप चीन करीत आहे. भारतासह तैवान,जपान,व्हिएतनाम या देशांशी सुद्धा कुरापती काढतो आहे. हे करण्याचे कारण चीनची अंतर्गत परिस्थिती चांगली नाही. तिथे कामगारांना, जनतेला वेठबिगारी मजुराप्रमाणे वागवले जाते. मानवाधिकार वगैरे काही नाही. कोरोनामुळे चीनमध्ये अंतर्गत तणाव आहे त्यामुळे चीन सरकार बावचळलेले आहे. चीनला क्रांती होण्याची भिती आहे त्यामुळे युद्धस्थितीचा देखावा करून तेथील जनतेचे लक्ष वळवायचे हा सुद्धा चीनचा हेतू असावा. वांगचुक यांच्यामते चीनला शह देण्यासाठी भारतीय जनतेने “बुलेट पॉवर” पेक्षा “वॉलेट पॉवर” चा वापर करून चीनला वेसण घातली पाहिजे. “वॉलेट पॉवर” अर्थात भारतीयांनी चीनी वस्तूंवर आपले पैसे खर्च करणे टाळलेच पाहिजे. भारत चीन कडून 5.2 लाख करोड रुपयांची आयात करतो तर निर्यात मात्र 1.2 लाख करोड रुपयांची करतो.
चीन निर्मित अगदी क्षुल्लक वस्तू सुद्धा आपण खरेदी करतो. लायटिंग आदी शोभेच्या वस्तू आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. गणपती उत्सवात चिनी लायटिंग वापरली जाते. गणेश मंडळे खूप आहेत त्यांचे संघटन सुद्धा चांगले आहे. त्यांनी डेकोरेशनसाठी लागणा-या साहित्यासाठी चीनी वस्तूंचा वापर टाळावा. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे परंतु भविष्यात गणेश मंडळांनी हि भूमिका जरूर घ्यावी. चीनी वस्तूंवरच्या बहिष्काराबाबत बोलतांना "चीनी वस्तू विकणारे आपलेच भारतीय असतात , सरकारने आयात बंद करावी, चीनी वस्तू आपल्या वस्तूंपेक्षा खिशाला परवडणा-या असतात " अशी निरनिराळी मते व्यक्त होतील. परंतू प्रचंड पैसा आपण चीनी वस्तू खरेदी करून चीनला देतो आणि पुढे याच पैस्यांचा उपयोग चीन त्याच्या सैन्यासाठी करतो. याचा अर्थ यत्कदाचीत युद्ध झालेच तर चीनी वस्तू घेऊन चीनला गेलेले आपलेच पैसे आपल्याच सैनिकांना मारण्यासाठी वापरले जाऊ शकतात. सीमावाद किंवा युद्धजन्य अशी स्थिती निर्माण झाली की आपण निश्चिंतपणे झोप घेत असतो कारण सीमेवर सैनिक आहे हे आपणास ज्ञात असते. या आपल्या सैनिकांसाठीच आपल्याला “वॉलेट पॉवर”चा वापर आता करायचा आहे. म्हणूनच भारतीयांनी व अनिवासी भारतीयांनी boycott made in China” हे अभियान सुरु केले पाहिजे. हे अभियान जर व्यापक झाले म्हणजेच इतर देशांनी सुद्धा असे अभियान राबवले तर चीनवर दबाव निर्माण होईल आणि या अभियानाचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होईल. पारतंत्र्यात सर्वप्रथम सावरकरांनी परदेशी कापडाची होळी केली, महात्मा गांधीनी विदेशी वस्तूंच्या बहिष्काराची चळवळ व्यापक केली. महाराष्ट्रात बाबू गेनू सारख्या कोवळ्या मुलाने परदेशी कापड घेऊन जाणा-या ट्रक समोर आत्मबलिदान केले. आज चीनी वस्तूंचा बहिष्कार करणे जरुरी आहे आणि यासाठी पक्षभेद , मतभेद दूर सारून राष्ट्रहितासाठी सर्वानी एकत्र येऊन बहिष्काराचे हे अभियान अमलात आणणे या करिता महत्वाचे आहे कारण या अभियानाचे आवाहन सोनम वांगचुक यांच्या सारखा शिक्षण तज्ञ, पर्यावरण प्रेमी, ज्ञानी व्यक्ती करीत आहे की ज्याच्या कर्तृत्वावर 3 idiots सारखा चित्रपट निघाला होता व तरुणांनी तो पाहिला आहे.
     आज आपल्या देशातील युवक “टिक टॉक” या चीनी मोबाईल अॅपचा वापर जगात सर्वाधिक प्रमाणात करीत आहे. असे इतरही अनेक अॅप आहेत. चीनी हार्डवेअर आपण वापरतो. या सर्वाचा फायदा चीनला मोठ्या प्रमाणात होतो आहे. आपल्या देशातून मोठा फायदा करून घेणारा हा देश आपल्याशीच कुरापती काढत असतो त्यामुळे आम्हा भारतीयांना boycott made in China” हे अभियान राबवावेच लागेल. काल माध्यमांवर एक फार सुंदर संदेश फिरला की , एक व्यक्ती आपल्या बाहुलीसाठी रडणा-या मुलीसह दुकानात जातो, परंतू Made In China असे लिहिलेले पाहून तो घेतलेली बाहुली ठेऊन देतो. दुकानदाराने विचारल्यावर तो व्यक्ती म्हणतो ,"माझ्या मुलीचे तीन मिनिटांचे रडणे थांबवण्यासाठी मी आपल्या सैनिकांच्या मुलांना कायमचे रडवू शकत नाही" . हा संदेश काल्पनिक असेलही परंतू बरेच काही सांगून जाणारा आहे. आज आपल्या सर्वांकडे एक ना एक वस्तू Made In China आहेच. या वस्तूंचा हळू-हळू त्याग आपण सर्वानी करण्याचे ठरवूया व नवीन वस्तू घेतांना सुद्धा चीनी वस्तू वागळूया. हे आपल्याला शक्य आहे व आता करावेच लागेल.  
     वांगचुक यांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद देऊन अनेकांनी चीनी अॅप , इतर सॉफ्टवेअर हे आपल्या मोबाईल व संगणकातून काढून टाकले आहेत. एका मोबाईल विक्रेत्याने चीनी मोबाईल विक्री बंद केली आहे. कदाचित या अशा अभियानाची चुणूक चीनला लागली असावी म्हणून चीनचे सैनिक पिछाडीस गेले होते खरे परंतू गलवान खोरे, सियाचीन कडे जाण्यास तयार झालेला रस्ता, विमानतळ याने चीनला धडकी भरली शिवाय चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोर या भागात भारत त्वरीत पोहचू शकतो , लक्ष देऊ शकतो व त्यामुळे परवा दोन्ही देशातील सैनिकांची झटापट होऊन आपले 20 जवान शहीद झाले. चीन मात्र भारतानेच त्यांच्या भूमीवर अतिक्रमण केल्याच्या उलट्या बोंबा मारत आहे. ड्रॅॅगनच्या दादागिरीला रोखण्यासाठी आपल्याला चीनी अॅप, चीनी हार्डवेअरचा सुद्धा क्रमाक्रमाने त्याग करावा लागणार आहे. परंतू हे करतांना आपणास आपल्या देशात अशाप्रकारचे अॅप, इतर सॉफ्टवेअर, हार्डवेअर कसे निर्माण करता येईल ,चीनी वस्तूंना पर्यायी इतर स्वदेशी वस्तूंचे उत्पादन कसे करता येईल याकडे लक्ष देणे जरुरी आहे. परवाच्या चकमकीमुळे दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. हीच वेळ आहे की आपल्या देशवासीयांनी आपल्या सैनिकांना पाठबळ देण्यासाठी आपआपल्या परिने चीनी वस्तूंचा त्वरीत त्याग करणे सुरु करावे.   
बॉयकॉटसाठी विकसित करावा लागेल औद्योगिक दृष्टीकोन       
     आज आपल्या देशात कित्येक अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत,शेकडो अभियंते दरवर्षी पदवीधर होतात. परंतू हे अभियांत्रिकी पदवीधर निर्मिती बाबत मात्र उदासीन असतात. किंबहुना त्यांना उद्योगपती, व्यवसायिक बनण्याचे कुणी बाळकडू पाजलेलेच नसते. गलेलट्ठ पगाराची नोकरी मिळाली, त्यातही विदेशात गेले की यांचे गंगेत घोडे न्हाले. अशी आपल्या देशातील तरुणांची मानसिकता असते. हे तरुण उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या ऐवजी नोकरीच्याच मागे लागतात आणि ज्या महाविद्यालयात हे शिकलेले असतात ती महाविद्यालये दरवर्षी वारेमाप शुल्क आकारून गब्बर होत असतात. हे चित्र कधी बदलणार ? आपणास स्वतंत्रता मिळून 70 हून अधिक वर्षे झाली आपण स्वतंत्र झालो परंतू अजूनही आपण निर्मिती क्षेत्रात विकसित देशांच्या तुलनेत बरेच मागे आहोत. आपण जिथे होतो तिथेच आहोत, पारतंत्र्यातही जनतेला विदेशी वस्तूंची होळी करण्यास सांगावे लागत होते आणि आजही आपल्या देशातील नागरिकांना boycott made in China” असे चीनी वस्तूंचा त्याग करण्याच्या अभियानाबाबत सांगावे लागते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा