जीवनसे
ना हार जीनेवाले

काही चित्रपट कलाकार प्रसिद्धी पचवतात, तर प्रसिद्धी काहींच्या डोक्यात घुसते. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले काही कलावंत प्रसिद्धी ओसरल्यावर आलेले एकाकीपण सुद्धा पचवतात. परंतू हे सर्वांनाच शक्य नसते. म्हणून मग कुणी मद्याचा आश्रय घेते,कुणी संजय दत्त सारखे अंमली पदार्थांच्या आहारी जाते, कुणी परवीन बाबी,राजकिरण सारखे मानसिक रुग्ण बनते. सुशांतला सुद्धा डिप्रेशनच्या गोळ्या सुरु असल्याचे बोलले जाते.अपयश,नैराश्य हे किंवा शेखर कपूर व कंगना राणावत यांच्या म्हणण्यानुसार सहकलाकारांनी दिलेली वागणूक हे सुद्धा सुशांतच्या आत्महत्येचे कारण असल्याची चर्चा आहे. दबंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तर थेट खानावळीं पैकी काहींवर फेसबुक पोस्ट करून टीका केली आहे. सुशांत चांगला वाचक होता, खगोलशास्त्रात त्याला रुची होती त्यामुळे त्याच्या घरी मोठा टेलिस्कोप सुद्धा होता, चंद्रावर भूखंड घेतल्याची सुद्धा पोस्ट त्याने केली होती,नासाच्या अवकाश मोहिमेत सुद्धा सहभागी होण्याची त्याची मनिषा होता. अशी पार्श्वभूमी असल्यावर आत्महत्या करून त्याने जीवन का संपवले ? हा प्रश्न पडतो. आत्महत्या करणे पाप असते हे आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितले जाते. आत्महत्या करणा-याची मानसिक स्थिती काय असते यावर संशोधन सुरुच आहे. सुशांत राजपूत याला युवक, युवती “हिरो” मानत होते परंतू त्याच्या ही कृती मात्र “हिरो” या त्याच्या प्रतिमेस छेद देणारी ठरली. समाजातील यशाच्या शिखरावर असणा-या , आदर्श समजल्या जाणा-या , समाजाला आध्यात्मिक दिशा देणा-या व्यक्तींनी मात्र आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये हेच योग्य आहे. मागे भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येने सुद्धा जनमानसाला मोठा धक्का बसला होता.
या समाजात अनेक उपेक्षित , त्रस्त , अगदी ह्लाकीचे जीवन जगणारे लोक आहेत परंतू तरीही ते जगत आहेत. या जीवनात संकटे येतात त्याचा सामना करणे शिकले पाहिजे, सकारात्मक भावना विकसित करणे जरुरी आहे. जी चित्रपटसृष्टी सुशांतचे कार्यक्षेत्र होती त्या चित्रपटसृष्टीनेच नैराश्य कसे टाळावे , जीवन कसे जगावे यांसारख्या बाबी अनेक गीतातून , कथानकातून दिलेल्या आहेत मग ती जुनी “आदमी वो है जो खेला करे तुफानोसे“ , “गर्दिश मे हो तारे ना घबराना प्यारे” , “जीवनसे ना हार जीनेवाले” अशी गीते असोत, मृत्यू कर्करोगाच्या रूपाने घोंघावत असून आनंदी राहणारा “आनंद” किंवा अगदी काल-परवाचा संकटे आल्यावर “ऑल इज वेल” असा हृदयाला संदेश द्या सांगणारा 3 इडीयट हा चित्रपट असो. कितीतरी जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे आपली संस्कृती सांगते. या त्यामुळे या जन्माचा सदुपयोग करावा, जीवनातील संकटांना घाबरून, आपली हार झाली असे मानून, दु:खांमुळे आपल्या आप्तस्वकीयांना दु:खाच्या गर्तेत लोटून जीवनाचा अंत करू नये हे सर्वांनीच ध्यानात घ्यावे.
जीवनसे ना हार जीनेवाले
हर गम को तू अपनाकर
दिल का दर्द छुपा कर
तू बढता चल, लहराकर
जीवन के सुख दुख बिसराकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा