मायबापहो
तुम्हाले किती खेप सांगा लागन ?
संत गाडगे बाबा यांची आज आठवण होत आहे. किती तळमळीने ते व-हाडी
भाषेत लोकांना स्वच्छतेचे महत्व सांगत. कीर्तनासाठी गाडगे बाबांना काही तामझाम लागत
नसे टाळ म्हणून हाती दोन दगड घेऊन गाडगे बाबा कुठेही एखाद्या चौकात किंवा मंदीरात उभे
राहून कीर्तन सुरू करून देत. हळू-हळू लोक जमा होत व कीर्तन रंगत असे. स्वच्छतेचे महत्व
सांगून हाती खराटा घेऊन गाडगेबाबा गावाची स्वच्छता स्वत: करीत. मायबाप हो, भुकेल्याले अन्न द्या, पोराईले शिकवा असे ते सांगत.
आजच्या कोरोंना
संकटात गाडगेबाबा असते तर त्यांनी गर्दी करणा-या , शारीरीक दूरी न पाळणा-या लोकांची अस्सल व-हाडी
भाषेत चांगलीच खरडपट्टी काढली असती. कायले बाहीर निंघतो , कोरोनाले
भेत नायी का बे ? तीन महिन्यापासून तुले सारे जग सांगून रायले
की बाबा हात धुयी , बाहीर काम अशीन तरच निंगजो पन तू कायी ऐकत
नायी लेका. बाया , पोट्टे-सोट्टे नीरा गर्दी करून रायले. लोकाइले
कोरोंना बाधा होऊ रायली तरी तुम्हाले समजत कस नाही राजेहो, तुम्हाले
तोंडाले पट्टी बांधायला सांगले , तुमी काही बांधत ना. कालेजातले
शिकेल-सवरेल पोट्टे रस्त्याईवर पच-पच पिचका-या मारते, काय लावले तुमीनं बे ? कधी सरकार लॉकडाउन करते , तर कधी राजकारनी लोक जनता कर्फ्यू का काय होय ते करते अन मंग ते झालं की तुमी
सारे राजेहो लागे निंगता बाहेर . खेटू-खेटू फिरता , गर्दीत घुसता
, हाफिसात जाता , यकान मले सांगल की ते
म्हतारे-कोतारे बी लय बाहीर निंघतात म्हने, 100 रु भरायले , व्याजाच नुकसान होईन म्हणून पोस्टात जात्यात , बँकेत
जात्यात लायनीत खेटू-खेटू उभे रायतात. या म्हाता-या-कोता-याइलेच तर लय धोका असते राजेहो
या चीनी रोगाचा बापा. पन काय करावं आता ? तुमी काय ऐकता बापा
कुनाच्या बापाचं ? या रोगाले तो कर्फ्यू होय का ते लॉकडाऊन होय
ते तर जरूरी हायेच पन तुमी बी सुधरा नं ! लय झुबंड करु नका ,
यकमेकाइले खेटू-खेटू उभे नका रावू , रस्त्यावर तुमच्या थोबाडातून
पिचका-या मारत नका जावू बापहो. हा कोरोंना चीनी होय बापा याचा काय भरवसा कोनाले कसा
लागन त. तो काय सांगून येते बापा , तुमी सोताले लयच शायने समजू
नका तुम्हाले हात जोडतो बापा. पुना हा चीनी रोग असा होय बापा की सोताले तर होतेच अन
लगे आपल्या संग बाकीचायले बी होते. मंग व्हावं लागते न बापा ते कारंटाईन का काय होय
म्हनतात ते , खाव लागते कायी बी , तठी काय
घरच्या सारख मिळत का तुमाले,घरी त लय नखरे करता तुमच्या कारभारणीच्या
म्होरं. चीनी कोरोंना विषाणूमुळे सारा घोर झाला राजेहो, माह म्हटलं
तुमी ऐकाता का नायी मायबापहो काय मालूम पन आपल्या घरच्याईसाठी , लेकराईसाठी तरी ऐका. तो अमिताभ अन लागे आणखी काई नट- नट्या , नेते मंडळी बी सुटली नायी बापा या रोगाच्या तावडीतून मंग आपन कोन आहोत बापा
? आजलोक तुमाले लय मोठ-मोठ्या लोकाईन ,
त्या आरोग्य संघटनेवाल्याईच बी सांगून झालं. आता तुम्हाले आणखी किती खेप सांगा लागन
मायबापहो ? संत गाडगे बाबा असते तर असेच म्हणाले नसते का ?
U r great vinu
उत्तर द्याहटवाThanks ...but Your Name please
उत्तर द्याहटवा