भ्रष्ट यंत्रणेतून झालेला “विकास”
विकास कार्य म्हटले की त्यात भ्रष्टाचार
हा आलाच. परंतू
कानपूर , उत्तरप्रदेशात सुद्धा भ्रष्ट यंत्रणेतून मोठा ‘विकास’ झाला होता. हा विकास म्हणजे विकास दुबे हा कुख्यात गुंड.
कालच याल उज्जैन येथील महाकाल मंदिरात एका सुरक्षा रक्षकाने व स्थानिक नागरिकाने
पोलिसांना खबर देऊन पकडून दिले.तदनंतर त्याला उत्तरप्रदेशात नेत असतांना गाडीला अपघात झाला. पोलिसाची ‘रिव्हॉल्व्हर’ घेऊन
विकास दुबे पळून जात असतांना त्याला स्वाधीन होण्याची सूचना दिल्यानंतरही तो
थांबला नाही मग पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो यमसदनी गेला. त्याला
यमसदनी धाडण्याच्या मागे सुद्धा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. तो जीवंत राहिला
असता तर त्याच्याशी संबंध असलेल्या अनेकांची नांवे उजेडात आली असती. काही दिवसांपूर्वी
उत्तरप्रदेशात पाच वर्षात 30 हत्या, अनेक गुन्हे केलेल्या व नुकत्याच केलेल्या आठ पोलिसांच्या हत्येनंतर विकास दुबे या गुंडाचे नांव चर्चेत आले. अनेक
पोलीस त्याच्या संपर्कात होते. तसेच विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्याचे
मैत्रीपूर्ण संबंध होते. समाजातील गुंड, समाजकंटक यांची माहिती काढण्यासाठी ज्याप्रमाणे पोलिसांचे खबरे असतात त्याच पोलिस
विभागाच्या खबरी काढण्यासाठी या विकास दुबेने पोलिसांमधूनच आपले खबरे तयार केले
होते. त्याच्या बातम्या जशा पोलिसांना मिळत होत्या त्याचप्रमाणे पोलिस त्याच्या
विरोधात काय पवित्रा घेत आहेत याच्या खबरी सुद्धा त्याला मिळत होत्या. आता प्रश्न
हा उपस्थित होतो की पोलिसांच्या हत्या करण्यास धजावणारा , पोलिसांनाच आपल्या
हाताशी धरणारा विकास दुबे सारखा मोठा गुंड तयारच कसा होऊ शकतो ? भ्रष्ट यंत्रणा
असल्यानेच हे असे होऊ शकते. तसे पाहिले तर आपली व्यवस्था इतकी सक्षम आहे की पोलिसांना
त्यांच्या हद्दीत होणा-या सर्व
घडामोडींची बित्तंबातमी ठाऊक होत असते. “पोलिसांनी कधी मनावर घेतले तर मंदिरासमोरील चप्पल
सुद्धा चोरीला जाऊ शकत नाही” अशा आशयाचा एक संवाद सिंघम सिनेमात आहे. मग असे असल्यावरही
गुंड , अनेकांच्या हत्या करणारा विकास निर्माण होण्याचे कारण निश्चितच भ्रष्टाचार
हेच असल्याचे सिद्ध होते. एखादा गुंड कायद्याचे रक्षण करणा-यांनाच आपले लक्ष्य
बनवून त्यांच्या हत्या करेपर्यंत आपली यंत्रणा काय करीत असते? अनेकदा पोलिस
कार्यवाहीसाठी तयार असतात परंतू मध्येच कुणाचा दबाब येतो आणि तसे होत नाही कारण गुंड
पोसणारे अनेक नेते या लोकशाहीत आहेत. मग हेच गुंड त्याच नेत्यांना सुद्धा डोईजड
होऊ लागतात. समाजातील चित्र हे चित्रपटातून दिसत असते असे म्हणतात याचप्रमाणे वास्तव चित्रपटात पोलीस कसे आपल्या मागे पुढे करतात हे गुंड म्हणतो त्यावर त्याचा सहकारी तुझ्या मागे पुढे करणारे पोलीस हे तुझ्यावर भ्रष्ट नेत्यांचा वरदहस्त आहे म्हणून हतबल असे सांगतो. अगदी असेच विकास दुबे बाबत होते.
उत्तरप्रदेशातील सध्याचे सरकार हे गुंडशाहीच्या विरोधात सुरुवातीपासूनच
उभे ठाकले आहे परंतू आपल्या देशात नोकरशाही आणि आपले जनप्रतिनिधी हे गुंड प्रवृतीच्या
लोकांपासून अलिप्त कसे ठेवता येतील ? याचे संशोधन होऊन यंत्रणेत गुंडांचा अंतर्भाव
होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत जरुरी आहे. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले कित्येक
लोकप्रतिनिधी आपल्या देशात आहेत. भ्रष्ट यंत्रणेतून निर्माण झालेल्या या “विकासा”सारखे कितीतरी गुंड प्रत्येक राज्यात आहे. हे चित्र लवकर नष्ट
होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा गुंडांशी संबंध असलेल्या नेत्यांची, गंभीर गुन्हे दाखल
असलेल्या नेत्यांची संख्या वाढत जाईल व आपल्या लोकशाहीला ते अत्यंत हानिकारक ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा