देशाचे हीरो आणि ‘हीरो’ची भूमिका
(ड्रॅगनचा बॉयकॉट आवश्यकच भाग 4)
चीनला लाल चीन्यांनो खबरदार म्हणत, आपल्या परीने चीनी वस्तूंचा त्याग करून त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. ही भूमिका तर घ्यायचीच आहे तसेच
अनेकांनी तशी भूमिका घेतली सुद्धा आहे. चीनची विस्तारवादी भूमिका जगापासून लपून राहिली
नाही. भारतात व्यापार करून अब्जावधी रुपये कमावून भारताशीच सीमावाद उकरून काढून तसेच पाकिस्तान , नेपाळसारख्या देशांना अर्थसत्तेच्या जोरावर मांडलिक बनवून त्यांना सुद्धा
भारताविरुद्ध चिथावणी देत आहे. चीन कधी डोकलाम तर कधी लडाख चीन सीमेवर आपले सैन्य तैनात करीत असतो. आपल्या हद्दीत चीनी सैनिक घुसत असतात. यामुळेच लडाख मध्ये आपल्या 20 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. चीनशी उद्भवलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढला या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी अचानक लडाखचा दौरा केला. आम्ही मुरलीधर श्रीकृष्णाला तर मानतो परंतू वेळे प्रसंगी आम्हाला सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाचे रूप सुद्धा आठवते, विस्तारवादाचे युग
संपले आहे आता विकासवादाचे युग आहे. हे सांगत त्यांनी चीनकडे अंगुली निर्देश केला आहे
तरीही भारतातील काही नेते पंतप्रधानांनी चीनचे नाव घेतले नाही अशी वृथा ओरड करीत आहेत. लडाखच्या जमिनीवर गवत सुद्धा उगवत नाही म्हणून भारतमातेच्या लडाख
सारख्या एका अंगाला याच नेत्याचे पणजोबा निरुपयोगी जमिन समजत होते व तेंव्हा चीनने त्याचा पुरेपूर फायदा उचलून
अक्साई चीनवर ताबा मिळवला. या घटनेचे सोयीस्कर विस्मरण या नेत्यांना होते किंवा विस्मरण झाल्याचा देखावा करणे त्यांना एखाद्या अभिनेत्यापेक्षा सुद्धा चांगले जमते. चीनचा घुसखोरीचा प्रयत्न, तसेच आपल्या 20 सैनिकांच्या
हौतात्म्यामुळे चीनी वस्तूंचा त्याग करण्याचे आवाहन झाले , अनेक
नागरीकांनी तसे केले , भारत सरकारने सुद्धा चीन संबंधीत अनेक
बाबींवर बंदी घातली हे आपण या चीन विषयक लेख मालिकेत पाहिलेच आहे. अनेक व्यापा-यांनी, उद्योजकांनी सुद्धा चीनशी झालेले करार रद्द केले. यातच एक मोठे नांव आहे हीरो
कंपनीचे. हीरो कंपनीने चीनला सायकलच्या सुट्या
भागांच्या मागणीचे 900 करोड रुपयाचे कंत्राट दिले होते. ते आता हीरो कंपनीने रद्द केले
आहे. आपल्या अनेक कृतींमुळे तसेच एकही इंच भूमी चीनला देणार नाही असे ठाम प्रतिपादन
करणारे , देशावरील संकटाच्या प्रसंगी जवानांना पाठबळ देणारे , जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी सीमेवर जाणारे पंतप्रधान तसेच अत्यंत बिकट
परिस्थितीत सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करणारे आपले जवान हे जनतेला देशाच्या हीरोप्रमाणे
वाटतात. सीमेवर रक्षण करणारे जवान आणि या जवानांचे मनोबल वाढवणारी या देशातील चीनी
वस्तूंचा बहिष्कार करणारी जनता व 900 करोड रुपयांचे चीन सोबतचे कंत्राट रद्द करण्याची
‘हीरो’ कंपनीची भूमिका यांमुळे आगामी काळात चीन नक्कीच वठवणीवर येईल. चीन वस्तूंवरील बहिष्कार जनतेने जर टिकवून ठेवला व निर्मिती आणि उद्योगाचा
ध्यास घेतला, आत्मनिर्भरतेचा वसा घेतला तर आगामी काळात भारत
आणखी प्रगती करेल व चीनच्या बरोबरीत येईल गरज आहे फक्त देशप्रेमाची. प्रखर देशभक्तीच्या भावनेने या देशातील सर्वानांच आपआपले कार्य अत्यंत निष्ठापूर्वक करावे लागेल मग तो नोकरदार वर्ग असो वा व्यापारी, स्त्री असो वा पुरुष , नेता असो वा कार्यकर्ता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा