पूर्वी मुले घरी अनेक
खेळ खेळायची. यात चोर–पोलीस , काडेपेट्यांना दोरा बांधून फोन करणे व त्यावर बोलणे हे व इतर काही तत्सम खेळ असत.परंतू आज-काल लहान मुले मोठ्यांसारखी वागतात अन मोठी माणसे
बरेचवेळा लहान मुलांसारखी वागतात आणि अजब असे काही करतात. सत्ता असली की मग अनेक गोष्टी
सहज शक्य होतात. मग ती राजकीय सत्ता असो किंवा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभामुळे हाताशी
आलेली शक्ती असो. राजकीय सत्ताप्राप्ती झाली की मग एखाद्या जुन्या पिढीतील सदगृहस्थाने समाजासाठी कष्ट सहन करून लोकशाहीचा हा चौथा
आधारस्तंभ बळकट करण्यासाठी स्थापन केलेल्या वृत्तपत्रावर अधिकार करता येतो. तसेच एकट्याच्या
बळावर, लेखणीच्या ताकदीवर राजकीय पक्ष उभारून सत्ताप्राप्ती सुद्धा करता येते. सत्तेतून
वृत्तपत्र आणि वृत्तपत्राव्दारे सत्ता मिळवणारे असे पक्ष पुढे सत्तेचे वाटेकरी होतात.
यातील वृत्तपत्राच्या जोरावर पक्ष उभारलेले मग आपल्या दिवंगत, प्रचंड लोकमान्यता लाभलेल्या
दिवंगत नेत्याच्या सर्व आदर्श , तसेच विचारसरणीस तिलांजली देऊन सत्ता उपभोगतात.
अशांना मग आपले विचार , आपली मते , आपले कार्य (?) , जनतेसाठी , विकासासाठी एकत्र आल्याचा
दिखावा करण्यासाठी स्वत:चीच मुखपत्रे असतात. मग हे कधी स्वत:च्याच प्रमुखांची मुलाखत
घेतात तर कधी आपल्या सहकारी पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्यांच्या मुलाखती घेतात.पूर्वीच्या
आदर्श पत्रकारीतेमुळे सरकारवर एकप्रकारचा वचक राहत असे आणि सरकारने घेतलेले निर्णय,
भ्रष्टाचार इत्यादी बाबत जाब विचारला जात असे. आजकाल अतिशय खालच्या पातळीत लेख
लिहून रोखठोक असल्याचा आव आणला जातो. दुस-यांवर टीका करतांना स्वत:च्या पूर्वीच्या
भूमिका आदींकडे साफ डोळेझाक केली जाते. पदरमोड करून देशासाठी , या देशाने जनतेच्या
हितासाठी कार्य करणारे अनेक आदर्श असे पत्रकार, संपादक आज निव्वळ कार्पोरेट स्वरूप
प्राप्त झालेल्या या क्षेत्रात होऊन गेले आहेत. आज सुद्धा काही असे सन्मानीय पत्रकार, संपादक आहेत. परंतू दिवसागणिक ही संख्या घटत आहे.इंग्रज सरकारला सुद्धा
जाब विचारणारी टिळक , आगरकर यांची पत्रकारिता तसेच स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे
यांची पत्रकारिता या देशाने , महाराष्ट्राने पाहिली आहे. आज ज्यांचे सरकार असते त्यांचीच
वृत्तपत्रे , त्यांचाच मिडीया असतो मग काय सर्व काही लहान मुलांच्या खेळासारखे
सुरु होते. मी हे प्रश्न विचारेल , किंवा हेच प्रश्न विचारा असे आधीच ठरवून मग मुलाखत-मुलाखत
हा खेळ सुरु होतो. त्यातील वक्तव्यांवर आगामी काळातील भुमिकेबाबत चर्वण केले जाते.
मुलाखतीच्या या खेळातून राज्यात कोरोनाच्या काळात , आर्थिक संकटाच्या काळात , एक काय
बोलतो तर दुसरा काय बोलतो , एक बदल्या करतो दुसरा रद्द करतो या खेळ-खंडोब्याकडे सुद्धा
जनतेचे लक्ष असते याचे भान हा मुलाखत-मुलाखत खेळ करणा-यांनी ठेवावे. अर्थात त्यांनी
मुलाखती घेऊ नये असे मुळीच नाही. पत्रकार म्हणून त्यांचा तो अधिकार आहे परंतू एखाद्याने
असे काही मोठे कार्य करावे , विकास करावा , विधायक कार्य करावे , जनहिताचे कार्य करावे
की आपल्याच माणसाने मुलाखत घेण्याऐवजी आपल्याच देशाच्या एखाद्या इतर राज्यातील किंवा
विदेशातील कुणीतरी त्या कार्याची दखल घेऊन मुलाखतीसाठी आले तर तशी मुलाखत ही निश्चितच
जास्त प्रभावी वाटेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा