टेलरचा चहा
संग्रहित चित्र |
कॉलेज मध्ये जाता-येता आम्ही कित्येकदा याच हॉटेलवर कचोरी, चहा घेण्यासाठी म्हणून थांबत असू. खुप गप्पा व धमाल होत असे. यात हॉटेल मालकाचा सुद्धा सहभाग असे. हळू-हळू मालकाशी परिचय वाढत गेला. मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. कधी काळी त्यांनी आयोजित भोजन कार्यक्रमात सुद्धा जाणे झाले. कॉलेज जीवनातील हा आमचा कट्टा होता.
सध्या जगभर कोरोना
महामारी आहे. वाहिन्यांचे सततचे नकारात्मक बातम्यांचे प्रक्षेपण करणे, राजकारण्यांचे
भीषण परिस्थितीतही चालले असलेले राजकारण या सर्वांमुळे मानसिक स्थिती ढासळते आहे. मनाला
जर चांगले खाद्य मिळाले तर त्याने सुद्धा प्रसन्न चित्तवृत्ती होऊन आपण संकटांचा
सामना करण्यास सिद्ध होतो. दिवसातील कितीतरी वेळ नकारात्मक बातम्यांचेच चिंतन
आपसूकच होत असते. आज गुरुवार लेख लिहिण्याचा दिवस. मनात वरील सर्व बाबी होत्याच
तेवढ्यात सौ ने चहा आणला. चहाच्या घोटा सोबत शून्यात पाहत काय लिहावे असा विचार सुरु
होता. चहाचा कप हातातच होता चहाची वाफ माझ्या चष्म्यावर आली , काहीही दिसले नाही. कुण्यातरी
प्रथितयश अशा व्यक्तीने सुध्दा मित्रांसोबत टपरीवर चहा घेण्यात जी मजा आहे त्याची
सर इतर कुठे चहा घेण्यात नाही असे वक्तव्य केल्याचे मला स्मरण झाले आणि तो क्षण
मला गतकाळातील मित्रांसह घेत असलेल्या चहाच्या आठवणीत घेऊन गेला. होय त्याच टेलरच्या
चहाच्या आठवणीत.
गो से महाविद्यालय
खामगांव येथे नुकताच प्रवेश घेतला होता. त्याच काळात नांदुरा रोड जवळील बी एस एन
एल च्या कार्यालया जवळ एक चहाची टपरी सुरु झाली होती. कॉलेज जीवनात चहा म्हणजे
सर्वात लोकप्रिय पेय. सहज म्हणून एक दिवस आम्ही या दुकानात चहासाठी म्हणून थांबलो.
चहा चांगला होता. तेंव्हा हे हॉटेल थोडे खड्ड्यात होते. आता रस्ता रुंदीकरणामुळे
ते रस्त्यास समतल असे आहे. “राजेंद्र मुखशुद्धी कॉर्नर” असे नांव होते. चहा चांगला
वाटला. मग कॉलेज मध्ये जाता-येता आम्ही कित्येकदा याच हॉटेलवर कचोरी, चहा
घेण्यासाठी म्हणून थांबत असू. खुप गप्पा व धमाल होत असे. यात हॉटेल मालकाचा सुद्धा
सहभाग असे. हळू-हळू मालकाशी परिचय वाढत गेला. मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. कधी
काळी त्यांनी आयोजित भोजन कार्यक्रमात सुद्धा जाणे झाले. एक दिवस या हॉटेल मालकाला
कुणीतरी टेलर म्हणून संबोधल्याचे ऐकले. टेलर संबोधन कशामुळे होते , का होते या
भानगडीत आम्ही काही पडलो नाही व आजही ते माहित नाही. पण मग आम्ही सुद्धा त्यांना
टेलरच म्हणू लागलो. दुकान चहा, नाश्त्याचे पण मालक टेलर असे ते अजब समीकरण होते ते. कॉलेज जीवनातील हा आमचा कट्टा होता. काही विद्यार्थी तर असे होते की त्यांचे
सापडण्याचे ठिकाण म्हणजे ही टपरी होती. ते सदा न कदा इथेच दिसत. इथे तास न तास ते
का बसत याची कारणे सुद्धा निराळीच होती. हे हॉटेल कॉलेजच्या हमरस्त्यावर असल्याने
येणारे जाणारे सर्वच विद्यार्थी येथून दिसत असत. त्यामुळेच मग “किसी की एक झलक
पानेके लिये" हे तास न तास बसतात असे त्यांच्याच कंपूतील एकाने सांगितले होते. याच काळात
या टेलरच्या चहाची एक गंमत सुद्धा आठवते. तेंव्हा विवेक नावाच्या माझ्या मित्राकडे
आम्ही गटाने अभ्यास करीत असू. एक दिवस अभ्यास झाल्यावर संध्याकाळी चहा पिण्यास
जाण्याचे ठरले तेंव्हा “आजी कोणी आले तर आम्ही टेलर कडे गेलो म्हणून सांग” विवेक
म्हणाला व आम्ही रवाना झालो. एक मित्र विवेक कडे गेला “आजी कुठे गेले सर्व ?” मित्र ,
“अरे ते सर्व शिंप्याकडे गेले” आजी उत्तरल्या. हा मित्र एक क्षण गोंधळला. एक तर या
विवेकचे घर म्हणजे तेंव्हा गावाबाहेर होते आता कोणत्या शिंप्याकडे गेले सर्व असा
प्रश्न त्याला पडला. पण दुस-याच क्षणी त्याची “दिमाग की बत्ती जल गयी” व त्याने
आम्हाला बरोबर शिंपी अर्थात टेलरच्या टपरीवर येऊन गाठले होते. त्यानी आम्हाला हा किस्सा
सांगितल्यावर एकच हशा पिकला होता.
आज खामगांवात चहाची अनेक दुकाने उघडली आहेत. आकर्षक , सजावट , अंतर्गत रचना state of the art असा लुक असलेली. पण टपरीवरचा चहा तो टपरीवरचा चहा हे अनेकांना पटते. याचे कारण कुणास ठाऊक काय आहे ? तो चहा काही स्वस्त असतो असेही नाही पण मनसोक्त बसता येते, नैसर्गिक वातावरण असते, आपुलकीने विचारणा होते ही कदाचित टपरीच्या चहाच्या पसंतीची कारणे असतील. कालांतराने सर्व मित्र आपआपल्या प्रपंचात व्यस्त झाले , इतस्तत: विखुरले , टेलरच्या टपरीवर जाणे आपोआप कमी झाले पण आजही खामगांव सोडून गेलेले मित्र खामगांवला येतात, येण्याआधी किंवा आल्यावर फोन करतात. भेटण्याचे ठिकाण मात्र तेच पुर्वीचे असते. ते म्हणजे टेलरचे चहाचे दुकान मग चहाच्या घोटासोबत अनेक आठवणी व गप्पांचे घोट सुद्धा रिचवले जातात. या गप्पांमध्ये टेलर सुद्धा सामील होतात.
सद्यस्थितीत तर आपल्या सर्वांनी घरीच राहणे हाच एक चांगला उपाय आहे. कोरोना विषाणू मुळे आज जरी पुर्वीसारखे मोकळेपणे कुठे जाता येत नाही, मित्रांना भेटता येत नाही तरी आज जर काळजी घेतली तर आपला आगामी काळ सुखाचा होणार आहे व नंतर चहा पित बसलेल्या मित्रांच्या गप्पा , दडपण रहित फुललेल्या बाजारपेठा असे चित्र दिसू लागेल.