Click "Follow" Button below To Follow this Blog

०९/०२/२०२३

Article about 40 years of MAruti

 गतीशी तुळणा नसे  

एक चकचकीत शेवाळी रंगाची मारुती 800 माझ्या समोरून गेली. बहुधा मालकाने नवीन रंग दिलेला असावा. मला मारुती 800 उत्पादनास 40 वर्षे झाल्याच्या परवाच्या एका वृत्तपत्रात वाचलेल्या वार्तेचे स्मरण झाले. ती गाडी तर निघून गेली पण तिच्यासारखीच गती माझ्या विचारांना देऊन गेली.

आजच्या लेखासाठी मुलायम यांना पद्मविभूषण , अदानी, पूजा-यांनी जाती निर्माण केल्याचे हे विधान असे विषय मनात घोळू लागले. पण मुलायम यांच्या पद्मविभूषण पुरस्काराबाबत यापुर्वीच भाष्य करून झाले होते. अदानी, करोडो रुपये, श्रीमंतांची यादी, हिंडेनबर्ग अहवालाच्या कोटीच्या कोटी उड्डाणांवर व घसरणींवर भाष्य काही करावेसे यावेळी वाटले नाही. जाती या पंडीतांनी निर्माण केल्या या सरसंघचालकांच्या विधानाने सुद्धा लक्ष वेधले होते परंतू जाती व्यवस्था , वर्ण व्यवस्था निर्माण कशी झाली याचा विचार करण्यापेक्षा ती संपुष्टात कशी येईल यावरच जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे असे वाटले. या विचारांच्या गदारोळात मी रस्त्याने वाटचाल करीत जात असतांना एक चकचकीत शेवाळी रंगाची मारुती 800 माझ्या समोरून गेली. बहुधा मालकाने नवीन रंग दिलेला असावा. मला मारुती 800 उत्पादनास 40 वर्षे झाल्याच्या परवाच्या एका वृत्तपत्रात वाचलेल्या वार्तेचे स्मरण झाले. ती गाडी तर निघून गेली पण तिच्यासारखीच गती माझ्या विचारांना देऊन गेली. मी तेंव्हा प्राथमिक शाळेत असेन. 1983 मध्ये भारतात मारुती 800 या गाडीचे उत्पादन सुरु झाले.  मारुती गाडी आली असे काहीसे तेंव्हा ऐकायला मिळायचे. फियाट आणि अँबेसॅडर या गाड्या पाहिल्या होत्या. फियाट माझ्या मामांकडे होती आणि अँबेसॅडर आमच्याकडे आणि त्यापुर्वी काही काळ जिप सुद्धा होती. अँबेसॅडर सारखी राजा गाडी घरी असल्याने आमची सर्व वडीलधारी मंडळी मारुती कारला नांवे ठेवत होती हे मला स्मरते. "जुने ते सोने" या आमच्या वडीलधा-या मंडळीच्या विचारसरणीमुळे आम्ही कुठेही जायचे असले की पसंती अँबेसॅडरलाच द्यायचो. तेंव्हा अँबेसॅडरचा खप प्रचंड होता. होत्या. टँक्सी म्हणून सुद्धा त्या चालायच्या. ऐसपैस अँबेसॅडरच्या तुलनेत मारुती 800 म्हणजे अगदीच किरकोळ वाटायची, खुजी वाटायची काही लोक तर तिची "आगपेटीची डबी" म्हणून हेटाळणी करायचे. पण तरीही हळू हळू ती लोकांच्या पसंतीस उतरली. चालक धरून पाच व्यक्ती आरामशीर प्रवास करू शकतील अशी गाडी. 800 सीसी चे इंजिन, एसी, पेट्रोलला परवडेल असे मायलेज देणारी गाडी. मारुती लॉँच होताच अल्पावधीतच या गाडीला मागणी वाढली. सुनील गावस्कर या नामांकित क्रिकेटपटूच्या हस्ते पहिली मारुती 800 लॉंच झाली होती.

 लवकरच रस्त्यावर विविध आकर्षक रंगातील मारुती 800 गाड्या दिमाखात, गतीने धावताना दिसू लागल्या. सचिन तेंडूलकर , शाहरुख खान यांनी सुद्धा ही गाडी घेतली होती. सचिनकडे तर ही गाडी अजूनही आहे व त्याच्या एका जाहिरातीत ती दिसते सुद्धा. पुढे मारूतीने झेन, ओम्नी, अल्टो, वँगनार, ईको ,  आर्टिगा,  बलेनो अशा अनेक गाड्या निर्माण केल्या. अल्टो म्हणजे मारुती 800 चेच सुधारीत रूप. परंतू नवीन आलेल्या अल्टोपेक्षा जी अगदी सुरुवातीची मारुती 800 गाडी आहे ती अधिक मजबूत आहे. नवीन अल्टो व इतरही कंपन्यांच्या गाड्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिकच आहे. आता काही वर्षांपासून BS4 , BS 6 इंजीनच्या गाड्यांबाबतची नवीन नियमावली, विदेशी मॉडेलच्या अनेक गाड्यांची सहज उपलब्धता, 15 वर्ष जुन्या गाड्यांवर बंदीचे सरकारचे धोरण या सर्व गोष्टींमुळे मारुती 800 ही गाडी मागे सरली. या गाडीमुळे आणखी एक किस्सा घडला होता. तो म्हणजे या गाडीचे अनेक अपघात हे ट्रकला मागच्या बाजूने धडक दिल्याने झाले होते. कित्येक मारुती 800 गाड्या ह्या ट्रकच्या मागील बाजूने ट्रकच्या खालीच घुसल्या होत्या. त्यामुळे ट्रकला मागील बाजूने कार घुसणार नाही असा मोठा लोखंडी बार लावण्याचे आदेश सरकारनी काढले होते. अशाप्रकारच्या अपघातात बहुतांश वेळी चुक ही कार चालकाचीच होती व सुधारणा मात्र ट्रकवाल्यांना कराव्या लागल्या होता. या निर्णयाचे तेंव्हा बरेच हसे झाले होते. असो ! ती शेवाळी रंगांची मारुती 800 केंव्हाच निघून गेली होती परंतू ती गेली त्या अनेक आठवणी देऊन. मला आणखी अनेक गोष्टी आठवू लागल्या. 7/8 वर्षांपुर्वी माझा फोन खणाणला. माझे मामे भाऊ  डॉ. प्रशांत नाईक 
हे फोनवर होते. "मी तूला माझी मारुती 800 देतोय, घेऊन जा लवकर." त्याने नवीन गाडी घेतल्यावर ही मारुती 800 उभीच होती, त्याला ती विकायची सुद्धा नव्हती. मी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून गाडी घेऊन आलो. आजही ही गाडी सुस्थितीत आहे व चांगली चालते. या गाडीने मी भरपूर प्रवास केला व करतो. गाडीची व्यवस्थित निगा राखली,देखभाल केली तर ती कधीच धोका देत नाही असे माझे तिर्थरूप नेहमीच सांगत असतात. माझ्या काकांनी सुद्धा अँबेसॅडर अगदी कंडिशन मध्ये ठेवली होती. ते नेहमी गाडीचे तेल, हवा, पाणी व बॅटरी यांच्याकडे लक्ष असलेच पाहिजे असे म्हणत. तेल हवा पाणी म्हणजे पेट्रोल/डिझेल, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल आणि रेडिएटर मध्ये पाणी. आता नवीन गाड्यांमध्ये कुलंट असते. उपरोक्त तीन-चार गोष्टींकडे लक्ष असले की तुमची गाडी अनेक वर्ष चांगली चालतेच. पण आता 15 वर्षांचा नियम आला आहे, गाडीला 15 वर्षे झाली की गाडी जरी चालत असली तरी तिला भंगारात काढले जाते. आजकाल क्रयशक्ती वाढल्याने व नवनवीन मॉडेल लवकर येत असल्याने लोक सुद्धा पुर्वीसारखे वर्षानुवर्षे एकच गाडी वापरत नाही. अनेक नवीन मॉडेल, गाडीला दिलेली नवीन 15 वर्षांची वयोमर्यादा यामुळे मारुती 800 चा खप कमी झाला. आता तर 800 सीसी इंजिनच्या मारुती गाडीचे उत्पादन कंपनी मार्च 23 पासून बंदच करणार आहे. 
पहिली मारुती
70 च्या दशकात संजय गांधी या इंदिराजींच्या ज्येष्ठ पुत्रास भारतीयांसाठी एक "पीपल्स कार" लॉन्च करावीशी वाटली त्यातूनच पुढे 1981 मध्ये भारत सरकारने MUL मारुती उद्योग लिमिटेडची स्थापन केली व मारुतीचा प्रवास सुरु झाला. 1983 पासून भारतीयांच्या पसंतीस उतरलेली, मोठा खप झालेली व तत्कालीन गाड्यांच्या तुलनेत वेगाने घावणारी अर्थात गतीशी तुळणा नसणारी हि गाडी भारतीयांच्या सदैव समरणात राहील.
||इति मारुती पुराण संपूर्णम||

०१/०२/२०२३

Article about awarding Padmavibhushan Award to Lt Mulayamsing Yadav.

मुलायम तरीही कठोर

रविना टंडनने पुरस्कार समितीला अशी कोणती "अंखियोसे गोली मारली" कुणास ठाऊक परंतू तिची पद्मश्रीसाठी वर्णी लागली. रविना टंडन एक व्यवसायिक नटी आहे. कला क्षेत्रातून तीचे नांव आले असेल. एकवेळ रविना टंडनला पुरस्कार देण्यास काही हरकत नाही परंतू मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याने मात्र जनतेत रोष व नाराजीच आहे.

मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर ज्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले गेले त्यांची निवड अतिशय योग्य होती. जादव पाएंग - 2015 , बीजमाता राहीबाई पोपरे – पद्मश्री 2020, 125 वर्षे वयाचे स्वामी शिवानंद – पद्मश्री 2022 , रघुनाथ माशेलकर – पद्मविभूषण 2014बी. के. एस. अयंगार- पद्मविभूषण 2014, रामभद्राचार्यपद्मविभूषण 2015. पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्यांपैकी अशी ही काही नांवे पाहून देशात आनंद व्यक्त झाला होता. दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबरच्या या काळात पद्म पुरस्कारासाठी नामांकने केली जातात. या नांवातून पद्म पुरस्कार समिती अंतिम नावांची निवड करते. पंतप्रधान हे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 नामवंत असे मिळून  पद्म पुरस्कार समितीची स्थापना दरवर्षी करीत असतात. ही समिती पुरस्कारांसाठीची नावं सुचवते. ही समिती काही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे सुपूर्द करते आणि अंतिम मंजुरी या दोघांकडून मिळते. या पद्धतीने हे पद्म पुरस्कार दिले जातात. परंतू यंदाची दोन नांवे पाहून मात्र समस्त भारतवासियांना झटकाच बसला. यातील पहिले नांव रविना टंडन व दुसरे पद्मविभूषण पुरस्कार मरणोपरांत मिळालेले मुलायमसिंग यादव हे नांव.  एकवेळ रविना टंडनला पद्मश्री पुरस्कार भेटला तर त्यात तरी निदान काही वावगे वाटणार नाही.  परंतू केंद्रातील भाजपा सरकारने अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्या मुलायमसिंग यादव यांचे नांव पद्मविभूषण पुरस्कारासाठी घोषित केल्यावर तर रविना टंडनच्या नावाच्या झटक्यापेक्षाही कित्येक पटीने अधिक जोरो का असा झटका मुलायमसिंग यांच्या नावाने देशवासीयांना लागला. मोदी व शहा हे आपल्या निर्णयांनी तसे झटके देण्याबाबत प्रसिद्ध आहेतच. 1990 मध्ये अनेक कारसेवकांवर निर्घुणपणे गोळ्या चालवण्याचे आदेश देणा-या मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सरकारने सन्मानित करणे म्हणजे एक मोठे आश्चर्य नव्हे तर त्या कारसेवकांच्या वंशजांवर व नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले. नावात मुलायम असूनही शेकडो वर्षांच्या आक्रमकांच्या गुलामीच्या प्रतिकाच्या स्थानी आपल्या आराध्या करीता जाणा-या आपल्याच देशवासीयांवर गोळ्या घालण्याचा कठोर निर्णय मुलायम यांनी घेतला होता. त्या मुलायम यांना सन्मानित करण्याचा निर्णय हा सर्वांसाठीच मोठा धक्कादायक ठरला. राजकारणात एखादा निर्णय घेण्यामागे काय हेतू दडलेले असू शकतात याचा थांगपत्ता लागणे मोठे कठीण असते. काय दडले आहे याचा फक्त अंदाजच विश्लेषक लाऊ शकतात. काश्मीर मध्ये भाजपाने पीडीपी सोबत युती करणे हा सुद्धा एक असाच निर्णय होता पण पुढे हाच निर्णय 370 कलम हटवण्यास सहाय्यकारी झाला. नंतर भाजपाने पीडीपी युतीचा निर्णय कशासाठी घेतला गेला होता हे सर्वश्रुत झाले. आपल्या मनाचा थांगपत्ता सहसा लागू न देणा-या मोदींचा मुलायमसिंग यादव यांना भारतरत्न नंतर दुस-या क्रमांकाचा पद्मविभूषण हा पुरस्कार देण्याच्या निर्णयामागे काय राजकारण, काय हेतू असावा याचे अंदाज बांधण्यात सर्व गुंतले गेले. अनेकांचे असे म्हणणे आहे की भाजपा कडून अशा राजकारणाची अपेक्षा नाही. परंतू सर्वच पक्षात अशाच प्रकारचे राजकारण होत असते व अनेक राजकीय पक्षांचे त्यांच्या विचारसरणी विरोधी निर्णय घेतांना बरेचदा दिसून आले आहे. मुलायमसिंग यादव यांना मोदी सरकारने पद्मविभूषण दिल्यानंतर अनेकांनी विविध मते मतांतरे व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटणा-यांना रामनाम घेण्याचा अधिकार नाही असेही मत काहींनी नोंदवले. पण सरकारने एखादा निर्णय घेतला व त्यावर समान्यजनास आश्चर्य वाटले तर त्याच्या रामनाम घेण्यावर कुणी कसा काय आक्षेप घेऊ शकतो? ते तर प्रभूचे नांव आहे व ते सज्जन, दुर्जन कुणीही घेऊ शकतो. शिवाय सरकारच्या या मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करणा-या कृतीसारख्या कृतीवर कोट्यवधी लोक त्यांना ही कृती न आवडून ते काही जाहीर वाच्यताही करणार नाही तेंव्हा मग ते सुद्धा रामनाम घेण्याचे अधिकारी राहणार नाहीत का ? असो. काहींनी शिवाजी महाराजांचे सुद्धा दाखले दिले परंतू राजेशाहीतील राजाचे निर्णय घेणे व लोकशाहीतील महत्वाच्या नेत्यांनी निर्णय घेणे यात मोठा फरक आहे. सरकारचा हा निर्णय विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, सरकार समर्थक यांच्यातील अनेकांच्या भूमिका उंचवणारा असाच आहे. "या टोपीखाली दडलंय काय, या मुकुटाखाली दडलंय काय ?" या ओळींप्रमाणे राजकीय निर्णयांचा अंदाज लावणे तितकेसे सोपे नसते. मुलायम यांनी सोनिया नांवास विरोध केल्याने अटलजींचा सत्तामार्ग सुकर झाला होता असेही सांगितले जाते, शिवाय आगामी काळात निवडणुका सुद्धा आहेत. इथे सरकारच्या या निर्णयाचे समर्थन मुळीच नाही. हा सन्मान प्राप्त व्हावा अशी अनेक नांवे आपल्या देशात आहे हे ही तितकेच खरे आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीत नावात मुलायम असूनही कारसेवकांवर गोळीबार करवण्याची मुलायमसिंग यांची कठोर कृती ही प्रभू रामचंद्रांच्या सेनेवर रावणाच्या राक्षसांनी शस्त्रे चालवण्याच्या कृतीसारखीच होती. जनता मुलायमसिंग यांची ही कृती अद्याप विसरली नसतांना त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवणे हे कुणालाच अजिबात आवडलेले नाही. मुलायमसिंग यांच्या ऐवजी बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण देता आले असते असेही अनेकांनी म्हटले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्याची जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मनीषा आहे. लोककार्य या निकषातून पुरस्कार देण्यास अनेक नांवे असतांना मुलायमसिंग यांचे नांव येणे हे या सरकार कडून कुणालाच अपेक्षित नव्हते व बहुतांश जनांना ते रुचले सुद्धा नाही. रविना टंडन हिला सुद्धा कला क्षेत्रातून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. परंतू जरी रविनाचे काही व्यावसायिक सिनेमे गाजले असले तरी कसदार अभिनय प्रकट होईल अशा दमदार भूमिका मात्र तिला साकारायला मिळाल्या नाहीत. रविना टंडन हिने पुरस्कार समितीला अशी कोणती "अंखियोसे गोली मारली" कुणास ठाऊक परंतू तिची सुद्धा पद्मश्रीसाठी वर्णी लागली. रविना टंडन व्यावसायिक सिनेमातून काम करणारी नटी आहे. तीचे काही सामाजिक कार्य असलेही परंतू ते म्हणावे तितके व्यापकही नाही. तरीही एकवेळ रविना टंडनला पुरस्कार देण्यास सुद्धा हरकत नाही परंतू मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याने मात्र जनतेत रोष व नाराजीच आहे. "मुलायम"सिंग यादव यांना जरी सरकारने हा पुरस्कार दिला असला व सरकारला त्याबाबतीत जे काही वाटले असेल ते असो पण अनेक दिवंगत कारसेवक, त्यांचे वशंज व नातेवाईक तसेच या देशातील बहुतांश जनतेला मात्र ही कृती कठोरच वाटली आहे.     

१९/०१/२०२३

Article about theft and illegal cutting of sandal trees.

 प्राकृतिक गुण घाताचे कारण

चंदन वृक्षाला सुद्धा या जगतनियंत्याने सुवासाचा गुण प्रदान केला आहे. मात्र सुवासाचा हा गुणच त्या वृक्षाचा घात करतो. चंदन तस्कर विरप्पन याने तर पुर्वी खुप मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षांची तस्करी केली होती. चंदन वृक्ष अनेक शहरात असतात , त्यांच्या चो-यांचे प्रमाण वाढतच चालले आहे.

ईश्वराने रचलेल्या या सृष्टीत “अफाट जगती जीव रज:कण” या उक्तीनुसार अब्जावधी , नानाविध जीव वास करतात. भूतलावार निराळे, जलधीत निराळे व या आसमंतात उडणारे शेकडो पक्षी, शिवाय ज्यांची मोजदाद करणे सुद्धा अशक्य आहे असे कृमी किटक, नानाविध वृक्षवल्ली यांशिवाय धरणी मातेच्या पोटातून, सागरतळातून प्राप्त होणारी खनीज संपत्ती आहेच. यापैकी अनेक जीवांवर, वस्तूंवर काही गुण वैशिष्ट्यांचे प्रदान, सौंदर्य यांची भरपूर उधळण ईश्वराने केली आहे. ज्याचे पिस भगवंताने आपल्या मुकुटात धारण केले आहे तो मयूर, फुलांमध्ये ज्या फुलाचा धन संपत्तीच्या देवीने, लक्ष्मीने आसन म्हणून केला आहे ते कमलपुष्प , हंसवाहिनी सरस्वतीचा हंस, मृग, वाघ, सिंह इ कितीतरी अशी नांवे घेता येतील. वृक्षांमध्ये चंदन वृक्ष. अशी ही काही नांवे आहेत की ज्यांच्या अंगभूत सौंदर्यामुळेच त्यांचा घात होतो. असे एक सुभाषित / श्लोक सुद्धा आहे परंतू त्याचे स्मरण तूर्तास काही झाले नाही. मोरपिसांसाठी सौंदर्यवान मोराची शिकार होते, कमळ पुष्पे सर्रास खुडली जातात , मृग , वाघ , सिह यांची त्यांच्या कातड्यासाठी व त्यांच्या अवयावांसाठी मोठ्या प्रमाणावर शिकार होत असे व आजही लपून छपून होतेच.    

    हे सर्व विषय, हा ऊहापोह आज ध्यानात येण्याचे कारण असे की, काल खामगांव शहरातील नामांकित नॅशनल हायस्कूल मधील चंदनाचे झाड काल चोरीला गेल्याचे वृत्त. काल रात्री भर वस्तीत असणा-या नॅशनल हायस्कूल मधील हे मोठे चंदनाचे झाड चोरीला गेले. त्याआधी पंचशील होमिओपॅथी कॉलेज व घाटपुरी पाण्याची टाकी परिसर येथील चंदन वृक्ष कापून नेले गेले. काही महिन्यांपूर्वी स्टेट बँकेतील भलेमोठा चंदन वृक्ष व तत्पुर्वी गजानन वायचाळ यांच्या सुटाळा येथील निवासस्थानासमोरील चंदन वृक्ष स्थानिक छोट्या विरप्पन मंडळीने चोरून नेला होता. बुलढाणा शहरात सुद्धा अनेक चंदन वृक्ष आहेत व त्यातील अनेक वृक्ष सुद्धा चोरीला गेले आहेत. कहर म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक परीसरातील चंदन वृक्ष मागे चोरट्यांनी कापून नेला होता. चंदन वृक्षाला सुद्धा या जगतनियंत्याने सुवासाचा गुण प्रदान केला आहे. मात्र सुवासाचा हा गुणच त्या वृक्षाचा घात करतो. चंदन तस्कर विरप्पन याने तर पुर्वी खुप मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षांची तस्करी केली होती. चंदन वृक्ष अनेक शहरात असतात , त्यांच्या चो-यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. चंदन वृक्षाच्या खोडातील गाभा हा सुवासिक असतो व त्याचा उपयोग सुद्धा अनेक वर्षांपासून केला जातो. परंतू प्राचीन काळी आपल्या पुर्वजांना निसर्ग , वृक्षांप्रती नितांत आदर होता, ते प्राणी, पक्षी, वृक्ष यांना पूजत त्यांचा मान राखत. वृक्ष खुप जुना झाला , त्याचे वय झाले की मगच तो तोडत असत. आज मात्र तसे नाही मानव या निसर्गाला ओरबाडू लागला आहे. स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी, निसर्ग धन लुटू लागला आहे. मानवाच्या या अशा वर्तणूकीमुळे पर्यावरणाचा -हास होतो आहे. प्रदूषण , ऋतूचक्रात बदल होत आहे. या अशा जंगलचोर , वृक्ष तस्कर, प्राणी तस्कर , चंदन चोर यांना पायबंद हा बसलाच पाहिजे. अनेकदा चंदन वृक्षांची चोरी झाली अशी वृत्ते येतात परंतू चंदन चोर पकडल्या गेल्याची वृत्ते वृत्त मात्र कमीच येतात हे ही तितकेच कटूसत्य आहे. 

वरील पशू, पक्षी, वृक्ष यांचा त्यांच्या अंगभूत  गुणांमुळे घात होत असला तरी  हा घात करणारे जे तस्कर आहेत त्यांचा छडा मात्र लागायलाच हवा, त्यासाठी चंदना सारखे झिजावे लागले तरी बेहत्तर परंतू हे तस्कर , चोरटे यांना पकडून त्यांना कठोर शासन हे व्हायलाच हवे. ज्या नागरिकांच्या घरी चंदन वृक्ष आहे त्यांनी त्या वृक्षाला चांगल्या जाड ताराचे ट्री गार्ड लावावे जेणे करून चोरट्यांचा वेळ हा ट्री गार्ड कापण्यात जाईल त्याने आवाजही होईल व झाड वाचण्याची शक्यता बळावेल. तसेच चंदन वृक्ष आपल्या बागेत असल्याची रीतसर नोंद सुद्धा वन विभाग व पोलीस खात्यात करण्यास हरकत नाही. अशा काही उपाययोजना करता येऊ शकते. आपल्यासाठी हा निसर्ग सुद्धा आवश्यकच आहे त्याचे संरक्षण, संवर्धन हे व्हायलाच हवे व आपण सर्वानी जागरूक राहायला हवे तेंव्हा या सृष्टीतील या गुणसंपन्न जीवांचा -हास होणार नाही.

१२/०१/२०२३

Article on the occasion of Indian Youth Day

विवेकानंदांना अभिप्रेत भारत घडेल

युवक दिन विशेष

आजच्या युवक दिनी देशभर या विचारांची देवाण-घेवाण होत आहे. आज आपला देश जगात पुढे आलेला दिसत आहे. आपल्या देशाला विशेष असा सन्मान आज प्राप्त होत आहे व आगामी काळात स्वामीजींना अभिप्रेत असा भारत निर्माण होईल अशी आशा देश बाळगत आहे. 

आज सर्वत्र स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजाबाई यांची जयंती साजरी होत आहे. ज्या जिजामातेने शिवबांना घडवले व पुढे त्या शिवबांनी तरुणपणी महापराक्रम केला, स्वराज्य स्थापन केले, आदिलशहा, निजामशहा , मुघल यांना जेरीस आणले , सळो की पळो करून सोडले अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 183 वर्षांनंतर स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. तरुणपणी रामकृष्ण परमहंस यांची भेट झाल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली व त्यांनी युवकांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.  स्वामीजींचा जन्म जरी शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 183 वर्षानंतर झाला असला तरी त्यांना जसे युवक अपेक्षित होते तसेच शिवाजी महाराज होते. असेच युवक आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी निर्माण व्हावे म्हणून स्वामीजींनी मोठे कार्य केले आहे. त्यांनी दिलेल्या अनेक संदेशातून आपल्याला तरुणांसाठी वापरलेले आत्मविश्वास, सकारात्मकता, एकाग्रता, मातृभूमी, धर्म, देश, पिडित, उपेक्षित बांधव असे शब्द दिसून येतात. या शब्दातून त्यांनी तरुणांना आत्मविश्वासी व्हा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, अंगीकारलेल्या कार्यात एकाग्रता बाळगा असे संदेश दिले आहेत. आजच्या युवक दिनी देशभर या विचारांची देवाण-घेवाण होत आहे. आज आपला देश जगात पुढे आलेला दिसत आहे. आपल्या देशाला विशेष असा सन्मान आज प्राप्त होत आहे व आगामी काळात स्वामीजींना अभिप्रेत असा भारत निर्माण होईल अशी आशा देश बाळगत आहे. युवकांची मोठी संख्या आता या देशात आहे स्वामीजींनी दिलेल्या संदेशानुसार आज अनेक शिक्षण संस्था, वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था पिडितांसाठी, उपेक्षितांसाठी स्वामीजींच्या सांगण्यानुसार शिवभावे जीवसेवा अशी चांगली सेवा देत आहे. आज भारतात अध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती होताना दिसून येत आहे. हिंदू धर्म अधिक बलशाली व जागृत होताना दिसून येत आहे. स्वामीजींनी म्हटले होते 

"Up India and Conquer The World with Your Spirituality"

या वाक्यातील संदेशासारखी परिस्थिती आज दिसून येत आहे. आजच्या या युवक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठी युवकांची संख्या असलेल्या या देशात स्वामीजींच्या संदेशानुसार कार्ये घडतील अशी आशा व संकल्प करूया.

०५/०१/२०२३

Article on the occasion of 6 Jan , Journalism Day in Maharashtra.

मुल्याधिष्ठीत पत्रकारीता पुन:स्थापित व्हावी 


टिळकांचे केसरी व मराठा, महात्मा गांधींचे यंग इंडिया, बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक व  इतर अनेक प्रभावी वृत्तपत्रांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठी जनजागृती केली. स्वतंत्रताप्राप्ती मध्ये या माध्यमाचा सुद्धा बराच मोठा वाटा आहे. परंतू दुर्दैवाने आज मात्र या व्यवसायाची स्थिती पुर्वीसारखी मुल्याधिष्ठित राहिली नाही असेच खेदाने म्हणावे लागते.

उद्या 6 जानेवारी, पत्रकार दिन. महाराष्ट्रात

बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी

1832 रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू

केले होते. म्हणूनच महाराष्ट्रात हा दिवस

पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकारीता म्हटली की स्वातंत्र्यापुर्वीची वृत्तपत्रे ती छापणारे भारतीय स्वतंत्रता लढ्यातील सेनानी यांचे स्मरण होते. ब्रिटीशांच्या काळात त्यांच्याच राजवटीत त्यांनाच विरोध करण्यासाठी वृत्तपत्र हे एक चांगले उपयुक्त असे साधन होते. "दर्पण" हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू करून महाराष्ट्रात वृत्तपत्र व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली. तत्पुर्वी बंगाल गॅझेट हे दैनिक भारतात सुरू झाले होते. यानंतर इतरही अनेक थोर मंडळींनी पाक्षिके, साप्ताहिके , दैनिके सुरू केली. स्वातंत्र्य संग्रामाच्या बातम्या जनसामान्यांपर्यन्त पोहचवणारे वृत्तपत्र हे माध्यमांचा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असलेल्या त्या काळात एक प्रभावी व लोकप्रिय असे माध्यम ठरले. याच माध्यमातून "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" असे टिळकांनी ब्रिटीशांना ठणकावले होते. टिळकांचे केसरी व मराठा, महात्मा गांधींचे यंग इंडिया, बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक व  इतर अनेक प्रभावी वृत्तपत्रांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठी जनजागृती केली. स्वतंत्रताप्राप्ती मध्ये या माध्यमाचा सुद्धा बराच मोठा वाटा आहे. पुढे प्र.के.अत्रे यांच्या प्रखर लेखणीतून आलेले अग्रलेख सुद्धा प्रचंड गाजले होते. परंतू दुर्दैवाने आज मात्र या व्यवसायाची स्थिती पुर्वीसारखी मुल्याधिष्ठित राहिली नाही असेच खेदाने म्हणावे लागते. स्वतंत्रताप्राप्ती नंतर हळू-हळू नवनवीन वृत्तपत्रे सुरु झाली. नवीन पिढीत नवीन पत्रकार निर्माण झाले. पुर्वाश्रमीच्या काही वृत्तपत्रांवर राजकीय मंडळीनी ताबे मिळवले व ती वृत्तपत्रे आपली मुखपत्रे बनवली. सरकारी यंत्रणात भ्रष्टाचाराचा चंचूप्रवेश झाला कालांतराने त्याचा विस्तार होऊ लागला. या व्यवहारांवर पत्रकार लक्ष ठेवू लागले, आपल्या गैरव्यवहारांच्या बातम्या उघडकीस येऊ नये म्हणून मग नाना आमिषे देणे सुरू झाले. लोकशाहीच्या या चौथ्या आधारस्तंभात भ्रष्ट घुशींचा शिरकाव सुरू झाला. वृत्ते दडवली जाऊ लागली तर काही वेळा स्वार्थासाठी गैरव्यवहारातील मलई चाखायला मिळावी म्हणून वृत्ते दिली सुद्धा जाऊ लागली. फेड न्यूज हा प्रकार आला त्यावर मोठा गदारोळही झाला. 1980 च्या दशकात तर अनेक छोटी वृत्तपत्रे, दैनिके सुरू झाली. वृत्तपत्र सुरू करण्याची विशेष कठीण नसलेली प्रक्रिया, जाहिरातीततून मिळणारी कमाई, व इतर फायदे यातून "छ्पाईला परवडत नाही" असे पालूपद लावून ही छोटी दैनिके सुरू होती व आहेत. छ्पाईला परवडत नाही असे असूनही मग छपाई होते कशी? हा मुद्दा सुद्धा उपस्थित होतो. ज्या छोट्या दैनिकांना येन केन प्रकारेण चालणारे अर्थकारण जमले नाही ती दैनिके बंद पडली. या व्यवसायात हवसे, नवसे, गवसे अशा अनेकांचा, बेरोजगार तरुणांचा शिरकाव झाला. मिडीयाचे महत्व ओळखून , हे माध्यम आपल्या हाताशी हवे म्हणून काही धनाढय मंडळींनी सुद्धा  दैनिके, साप्ताहिके व पाक्षिके सुरू केली. त्यांच्या दैनिकांसाठी विविध प्रकारचे तरुण काम करू लागले. मराठी भाषा, शब्दसंग्रह, व्याकरणाची विशेष जाण नसणारे, पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण न घेतलेले, वाचनाचा गंध व छंद नसलेले सुद्धा हल्ली पत्रकार हे बिरूद मिरवतात. या  बिरूदाच्या नावाखाली त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधतात. कर्मचारी, अधिकारी, पांढरपेशे, शिक्षक, शाळा यांच्यातील कमी अधिक उणीवा ओळखून त्यांना त्रस्त करतात. उपरोक्त प्रकारातील काही लोक मागे नसती डोकेदुखी नको म्हणून अशा तथाकथित पत्रकारांना खुश करून त्यांची बोळवण करून ससेमिरा सोडवून घेतात. समाजातील समस्या , पाण्यासारखे ज्वलंत प्रश्न, गुन्हेगारी इ. वर आपल्या लेखणीने वचक ठेवण्यापेक्षा ती लेखणी क्षणिक अप्पलपोटीपणासाठी समाजातील काही चांगल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, छोटी मोठी परंतू चांगली कार्ये करणा-यांच्याही विरोधात घासल्या जाऊ लागली. उपरोक्त बाबतीत अनेकांशी संवाद साधल्यावर जनतेतून अतिशय निराशाजनक अशी उत्तरे आली आहेत. जनतेत पुर्वी असलेली या माध्यमाची  प्रतिमा आता तशी राहिली नाही.  हे कटू सत्य अनेकांना न रुचेल असेच आहे परंतु अशी अवस्था आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही. अनेक तोतया सुद्धा आहेत. या तोतयांमुळे चांगले पत्रकार सुद्धा बदनाम होतात. तोतया कसे निर्माण होणार नाही याची सुद्धा दक्षता घेणे आवश्यक आहे. बाळशास्त्री जांभेकर, तानुबाई बिर्जे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे उच्चविद्याविभूषित, प्रकांड पंडित, व्याकरण ज्ञाते यांसारखे पत्रकार असणाऱ्या पुर्वीच्या महाराष्ट्रात आता मात्र यांच्यासारख्याच चांगल्या पत्रकारांची वानवा आहे. काही सन्माननीय अपवाद आजही आहेत परंतु ते संख्येने तुटपुंजे आहेत. 

    उद्या पत्रकार दिन सर्वदूर साजरा होईल, अनेक ठिकाणी सन्मान, गौरव होतील ते अवश्य होवोत परंतू आम्हा पत्रकार मंडळींना या दिनाच्या औचित्याने आत्मपरीक्षण करून पुर्वीसारखी मुल्याधिष्ठित पत्रकारिता पुन:स्थापित करण्याचा प्रयत्न करण्याचा  संकल्प सुद्धा करायला नको का ?