Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/०८/२०१९

Article about 370 abrogation , King Harising of Kashmir and Dr B.R.Ambedkar thaughts about article 370


“महाराजा हरिसिंग, डॉ आंबेडकर आणि कलम 370”
केंद्र सरकारने दि 05 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले तसेच जम्मू काश्मीर पासून लड्डाख वेगळे केले गेले. या नंतर भारतातच काय तर जगात एकच ऊहापोह होत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र आनंदाचे भरते आले आहे.भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर काश्मीर , 370 कलम, 35 ए हे सर्व चर्चिल्या जात होते. काश्मीर मध्ये फुटीरतावादी व दहशतवाद्यांनी नेहमी तणावाचे वातावरण ठेवले. या सर्व पार्श्वभूमीवर स्मरण होते ते काश्मीरचे राजा महाराजा हरिसिंग व ङॉँ आंबेडकर यांचे. हरिसिंग हे काश्मीरचे ऐश्वर्य संपन्न राजे होते. विदेशात शिक्षण,अत्यंत विलासात जीवन व्यतीत करणारे असे ते होते. तीन राण्यांपासून पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणून त्यांनी चौथे लग्न केले व त्या चतुर्थ राणी पासून त्यांना कर्णसिंह हे पुत्र झाले. महाराजा हरिसिंग यांनी काश्मीर राज्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले.काश्मीर मधील महिलांना मुंबई, कोलकाता येथे विकले जात होते म्हणून त्यांनी महीला अपहरण कायद्यात 3 ऐवजी 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली होती. सर्व लहान मुलांना त्यांनी 1930 मध्येच प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते, ग्रामपंचायत, बँकांचे निर्माण केले होते. 1947 मध्ये पाकीस्तानी टोळ्यांनी हल्ला केल्यावर व पाकिस्तानचा भविष्यातील धोका ओळखून त्यांनी काश्मीरचे भारतात विलिनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. परंतू त्या करारात काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असावा असे काही म्हटले नव्हते. विशेष दर्जा असावा हे काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान व नेहरू ज्यांना स्वत:चा भाऊ म्हणत त्या शेख अब्दुल्ला यांचे टुमणे होते. परंतू डॉ॰ बाबासाहेब
आंबेडकर यांनी असा मसुदा बनवण्यास सक्त विरोध केला व असा विशेष दर्जा देणे देशाच्या हिताचे नाही असेही ते म्हणाले होते. आंबेडकर तेंव्हा कायदा मंत्री तसेच संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी कलम 370 बनवण्यास स्पष्ट नकार दिला होता व त्यांना ते असण्याची गरज सुद्धा वाटत नव्हती. बाबासाहेबांच्या विरोधांनंतर 370 कलम चा मसुदा गोपालस्वामी अय्यंगार यांनी बनवला. हे अय्यंगार पूर्वी महाराजा हरिसिंग यांचे दिवाण होते. परंतू त्यांना सुद्धा नंतर त्यांची चूक उमगली होती. कलम 370 रद्द केले हे बरेच झाले.जे पाकीस्तान,जे फुटीरतावादी काश्मीर हे  त्यांचे  असल्याचा दावा करतात ते हे हेतूपुरस्सर विसरतात की आजचे पाकीस्तान हा सुद्धा पूर्वी भारताचाच भाग होता.त्यामुळे काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे.   स्वतंत्रता प्राप्ती होऊन 70 वर्षे लोटली काश्मीर आजही धगधगतच आहे. महाराजा हरिसिंग यांचे 1965 मध्ये मुंबई येथे निधन झाले. तत्पूर्वीच बाबासाहेबांचे महापरीनिर्वाण झाले होते. बाबासाहेबांनी दूरदृष्टीने भविष्य ओळखले होते. महाराजा हरिसिंग यांनी पाकिस्तानचा कावा ओळखला होता. परंतू काश्मीरचे 370 कलम आणि चीनच्या आक्रमणात “गवताचे पातेही उगवत नाही” म्हणून असा भूभाग चीनला देणे अशा इतिहासावर परीणाम करणा-या कृती करणा-या नेहरूंनाच तो कसा काय ओळखता आला नाही देव जाणे.

२४/०८/२०१९

Article on public demand of making Khamgaon as new district


“जेंटल रिमाइंडर”
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस आज पूर्वाश्रमी कॉटन सिटी व आता सिल्व्हरसिटी म्हणून ओळखल्या जाणा-या खामगांव नगरीत येत आहे. जिल्ह्यातील जुने, मोठे, व्यापारपेठ, सांस्कृतिक केंद्र , स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील अग्रगण्य, अनेक राष्ट्रपुरुषांनी भेट दिलेल्या अशा खामगांव शहरास जिल्हा करावा अशी फार जुनी मागणी आहे. भौगोलिक दृष्ट्या घाटाखालील तालुक्यांना बुलडाणा शहरापेक्षा खामगांव शहर अधिक निकट आहे. तसेच खामगांव शहरात अनेक जिल्हा कार्यालये आहेत. विकासाचा समतोल साधायचा असेल तर छोटी राज्ये , छोटे जिल्हे असतील तर विकास लवकर साध्य होतो. खामगांव जिल्ह्याची मागणी जुनी असूनही वाशिम जिल्हा आणि इतर काही जिल्हे निर्माण सुद्धा झाले. खामगांव शहर मोठे आहे साहजिकच येथील जनतेला आपले शहर जिल्हा व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर घाटाखालच्या संग्रामपूर,जळगाव जामोद, शेगांव, मलकापूर, नांदूरा,
खामगांव तालुक्यातील गामिण भागातील जनतेला सुद्धा तसे वाटते. परंतू तरीही खामगांव जिल्हा मात्र अद्याप प्रलंबीत आहे. मा. नरेंद्र मोदी 2014 मध्ये खामगांवात आले असता त्यांनी त्यांच्या व्याख्यानात या मागणीचा व खामगांव-जालना रेल्वे मार्गाचा उल्लेख केला. रेल्वे मार्ग हा केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे म्हणून येथे खामगांव जिल्ह्याच्या मागणीबाबत भाष्य करणे यथोचित आहे. परंतू जालना व खामगांव ही शहरे रेल्वेच्या नकाशावर आली तर व्यापाराला, दळणवळणाला ते हमखास सोयीस्कर होईल. मा. देवेन्द्रजींनी अनेक विषय कुशलतेने हाताळले, ते मंदिरात जाऊ शकले नाही  तरीही विठ्ठल त्यांच्या पाठीशी उभे राहिले. कित्येक घडामोडी घडल्या परंतू देवेन्द्र्जींनी त्या राजकीय चाणाक्षतेने हाताळल्या. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी “अमृत”रूपी संजीवनी आणली. त्यांच्या तरुण वयातील राजकीय प्रगल्भतेचे आणखी अनेक दाखले देता येतील. फडणवीस यांचे अभ्यासू, प्रामाणिक व्यक्तिमत्व असल्याने ज्याप्रमाणे त्यांनी अनेक प्रश्न निकाली लावले त्याप्रमाणे खामगांव जिल्ह्याची जुनी मागणी सुद्धा पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावी. या मागणी बाबत अनेकांनी ऊहापोह केला आहे, पत्रव्यवहार केला आहे , समाज माध्यमांतून लिखाण केले आहे तरीही मायबाप सरकारचे मात्र लक्ष नाही किंवा खामगांव जिल्हा निर्मिती बाबत काहीही वाच्यता किंवा हालचाल नाही. अनेकदा पाठपुरावा होऊन खामगांव जिल्ह्याचे घोडे कुठे अडले आहे कुणास ठाऊक ? त्यासाठीच मेहरबान राज्य सरकारला हे आणखी एक “जेंटल रिमाइंडर”.

२०/०८/२०१९

Legendary music composer Khayyam passed away, article about his songs and works

“हमे आपसे भी जुदा कर चले.....” 

प्रतिभावंतांचे इहलोक सोडून जाणे मोठे वेदनादायी असते. कालचे  एक प्रतिभावान संगीतकार खय्याम यांचे जाणे संगीत रसिकांसाठी  असेच दुख:दायी होते. कैफी आझमी ,साहीर, मजरूह यांसारख्या प्रख्यात  गीतकारांच्या अवीट मधूर अशा गीतांना सर्वांगसुंदर चाली लावणारे खय्याम यांचे जाणे म्हणजे संगीत क्षेत्राची अपरीमित अशी हानी आहे. हिन्दी चित्रपटसृष्टीमुळे अनेक  प्रतिभावंतांना आपली प्रतिभा जगापुढे आणण्याची संधी मिळाली. प्रतिभेपुढे सर्वच नतमस्तक होतात. याची प्रचिती राष्ट्रपती कोविंद यांनी लता मंगेशकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली यावरून येते.  खय्याम सुद्धा तसेच प्रतिभावान. चित्रपटसृष्टीमुळे गीतकार , अभिनेते , संगीतकार इ. अनेक प्रतिभासंपन्न प्रकाशझोतात आले. 1950 ते 60 च्या काळात चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या संगीतकारांमध्ये खय्याम सुद्धा एक होते. मोहम्मद जहूर हाश्मी यांनी प्रख्यात शायर उमर खय्याम यांच्या नावातील खय्याम हे नांव धारण करून संगीत देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांची गती कासवाची होती. परंतू 50-60 च्या दशकात “वो सुबह कभी तो आयेगी”, “ ठहरीये होश मे आऊ” , “जीत ही लेंगे बाजी हम तूम” अशी त्यांची गीते गाजत होती परंतू बर्मनदा, “एस जे“ आदी संगीतकारांच्या मानाने त्यांची दौड धीमी होती. एका पेक्षा एक सरस अशी गाणी मात्र ते देत होते 70 च्या दशकात “मै पल दों पलका शायर हूं“ ,
“मोहोब्ब्त बडे काम की चीज है” , 80 च्या दशकात “ये मुलाकात एक बहाना है” ,“आंखोमे  हमने  आपके  सपने  सजाये” हलके-फुलके “गापुची गापुची  गम  गम” उमरावजान  मधील “दिल  चीज कया है” ,“इन  आंखोकी मस्ती”  ही  गीते  तर अजरामर  झाली  आहेत.  “चाँदनी रातमे एक बार तुम्हे देखा है” “आंखोमे हमने आपके सपने”,  नूरीतील गीतेरजिया सुलतान मधील “ऐ दिले नादान“ व त्यातील मुगलकालीन संगीत अप्रतिम,चीरस्मरणीय व श्रवणीय आहे. खय्याम यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेले काही सिनेमे जरी यशस्वी झाले नसले तरी खय्यामचे संगीत मात्र यशस्वीच राहीले आहे. गजलांच्या जवळपास जाणा-या परंतू तितक्याच शास्त्रीय संगीताचा आधार असलेल्या, हृदयाला भीडणा-या चाली लावणारे संगीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. राजेश खन्नाने तर त्यांच्या संगीतावर खुश होऊन त्यांना कार भेट दिली होती असा किस्सा आहे.किशोरकुमार, लता मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत निर्देशनात अनेक हीट गाणी दिली. खरे तर जुन्या पिढीतील हे सर्व आताच्या नवीन पिढीला काही माहीत सुद्धा नसेल परंतू चाळीसीतील किंवा त्यापेक्षा वडील मंडळींनी  जुनी गाणी ऐकली आहेत. या गीतांचा करीष्मा मात्र अद्याप कायम आहे. आज तसे संगीत नाही, नवीन पिढीतही अनेक गुणी कलावंत आहेत. परंतू लोकांची अभिरुची बदलली आहे. खय्याम यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्यांनी संगीत क्षेत्रासाठी एक ट्रष्ट सुद्धा स्थापन केला व त्याला त्यांनी स्वकमाईतील मोठा वाटा देणगी म्हणून दिला आहे. जुन्या पिढीतील अनेक प्रतिभावंत आपल्यातून गेले काल खय्याम सुद्धा गेले त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकता-ऐकता “हमे आपसेभी जुदा कर चले.....” ही त्यांनीच संगीतबद्द केलेल्या गीतातील ओळ आठवत होती. 

१७/०८/२०१९

Tribute to veteran actress #VidyaSinha

साडीतील नायिका     
70 च्या दशकात देमार चित्रपटांचे युग सुरू झाले होते. याच काळात बासु चॅटर्जीऋषीकेश मुखर्जी यांच्या सारख्या दिग्दर्शकांचे हलके-फुलके चित्रपट सुद्धा याच काळात निर्मात्याला चांगला गल्ला भरून देत होते. सलील चौधरी , जयदेव यांचे शांतसुमधुरकर्णमधुर असे संगीतप्रतिभासंपन्न गीतकारांची गीते रसिकांना मंत्रमुग्ध करीत असत. याच काळात तीचे अभिनेत्री म्हणून पदार्पण झाले होते. तशी ती काही आजच्या काळात असणा-या नटयांप्रमाणे एकदम ग्लॅमरसहॉट वगैरे नव्हती. परंतू तीचे लांब केस , एक वेणी , साडीमध्ये एखाद्या सर्वसामान्यअगदी आपल्या आजूबाजूला दिसणा-या साध्या-सुध्या स्त्रीयांप्रमाणे तीचे ते पडद्यावर दिसणे दर्शकांना सुखावून जात असे. आपण अगदीच काही तरी लार्जर दॅन लाईफवगैरे न पाहता अगदी आपल्यातीलच एखादी गोष्ट सिनेमात पाहतो आहे अशा आशयाचे , कथानकाचे तीचे चित्रपट होते. छोटीसी बात, रजनीगंधा सारखे हलके-फुलके लो बजेट असे ते चित्रपट होते. अशा प्रकारच्या चित्रपटातून दिसणारी ती अभिनेत्री होती विद्या सिन्हा. विद्या सिन्हाचे परवा वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले. तीच्या जाण्याने तीच्या स्मृतींना, तीने वठवलेल्या भूमिकांना उजाळा मिळाला. तशी विद्या काही खूप लोकप्रिय नव्हती किंवा समीक्षकांनी सुद्धा तीची विशेष दखल घेतली नव्हती. छोटीसी बात मधील "जानेमन जानेमन" गाण्यात अमोल पालेकर ला सिनेमा पहातांना  पडद्यावरच्या धर्मेंद्र व हेमा मध्ये तो    विद्या  सिन्हा  दिसतात
.अगदी सर्वसामान्य प्रेक्षकाला  जसे  वाटते तसे ते दृश्य होते. याच चित्रपटात  अमोल  पालेकर, असरानी आणि "लव्ह गुरू" अशोककुमार यांचे धमाल विनोद आहे. रजनीगंधापती,पत्नी और वो अशा चित्रपटातून तीच्या अभिनयाची झलक दिसली.नायिका म्हणून  तीची कारकीर्द संपुष्टात आल्यावर विद्याने जाहिराती आणि काही मालिकां मधून दर्शन दिले. परवा तीच्या निधनाचे वृत्त आले. एखादा व्यक्ती त्याची-त्याची भूमिका, कार्य योग्यरीत्या पार पाडत असूनही त्याला म्हणावी तशी प्रसिद्धी, म्हणावा तसा नावलौकिक मिळत नसतो. तसेच विद्याचे झाले. सर्व चित्रपट गाजले, कुठेही कोणती मारधाडअश्लील दृश्ये नसलेले ते चित्रपट होते. तसे तीचे चित्रपट अगदी बोटावर मोजता येतील इतके. पन्नास पेक्षाही कमी असतील. परंतू तरीही विद्या सिन्हा मात्र चिरकाल स्मरणात राहील. विद्या सिन्हा साडी व्यतिरिक्त इतर कपडे ल्यालेली क्वचितच दिसली. भारतीय स्त्री साडीत जितकी सुंदर दिसते तितकी इतर कपड्यांत नाही हे कदाचित तिला चांगले कळले असावे. विद्याचे अवखळ हसू आणि साडी हे वैशिष्ट्य होते. काही फ्रेम मधून तीच्यात वैजयंतीमालाची झलक दिसे. रजनीगंधातील "कई बार युंही देखा है" या गाण्यातील भाव तीने सुंदर वठवले आहेत. छोटीसी बात मधील अमोल पालेकर तीला वश करण्यासाठी म्हणून "लव्ह गुरु" च्या सहाय्याने नाना त-हेचे प्रयत्न करतो ते कळल्यावर तीला धक्का बसतो तेंव्हा सुद्धा विद्याने सुंदर अभिनय केला आहे. "अधिकार जबसे साजनका हर धडकन पर माना मैने" असे रजनीगंधा चित्रपटातील गीतात म्हणणा-या विद्याला मात्र वैवाहिक जीवनात फार सुख मिळाले नाही. पहिल्या पतीचे निधन झाल्यावर तीने दुसरा विवाह केला होता. दुस-या पतीने सुद्धा तीची फसवणूक केली अशी तक्रार तीने केली होती. सलमान खान चा बॉडीगार्ड हा तीचा अखेरचा चित्रपट. विद्या गेली आणि संपूर्ण चित्रपटभर साडी नेसणा-या नायिकांच्या युगाचा अस्त झाला.      

०८/०८/२०१९

Sushma Swaraj changed bollywood as "Industry"


बॉलीवूडमधेही आणले “स्वराज”      
सोमवार दि. 5 ऑगष्ट रोजी जम्मू  काश्मीर चे 370 कलम हटवण्याची व लड्डाख वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्याचे सर्व भारतीयांना सुखावणारे वृत्त आले. या वृत्ताचा आनंद साजरा करणे पूर्ण होत नाही तोच मंगळवारी रात्री भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे तमाम भारतीय जनतेला दुख:दायी असे दुसरे वृत्त आले. वयाच्या 25व्या वर्षी राजकारणात प्रवेश करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक असलेल्या श्री हरदेव शर्मा यांच्या या कन्येने. आपल्या अमोघ वक्तृत्वाने, प्रामाणिकतेने , साध्या स्वभावाने , मातृ हृदयाने लवकरच सर्वांची मने जिंकली. 1977 मध्ये  हरियाणामध्ये मंत्रीपदावर पोहोचणा-या त्या सर्वात तरुण महिला मंत्री होत्या. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री, केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात सूचना व प्रसारण मंत्री , 2009 मध्ये लोकसभा विरोधी पक्ष नेत्या. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री अशी त्यांची कारकीर्द. परराष्ट्र मंत्री असतांना अनेकांना स्वदेशात आणण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले. हमीद अन्सारी , “भारत की बेटी” गीता, व इतर अनेकांचा यात समावेश आहे. सुंदर, सुशील स्त्री असा आपल्या नावाचा अर्थ सार्थ करणा-या ठसठशीत कुंकू लावणा-या, निट–नेटकी साडी नेसणा-या, आपल्या साडीचा पदर जकेटच्या वरून व्यवस्थित घेणा-या सुहास्यवदना सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त आले आणि त्यांच्या बाबतची विस्तृत माहिती
माध्यमांवरून समोर आली. ज्या-ज्या पदावर त्या होत्या त्या-त्या पदावर कार्य करतांना आपल्या कार्यशैलीची छाप त्यांनी उमटवली. परराष्ट्र मंत्री असतांना अनेक अनिवासी भारतीय,पाकिस्तानच्या ताब्यात असलेले लोक,यांना स्वत: वैयक्तिक प्रयत्न करून सोडून आणले.पासपोर्टची प्रक्रिया किती सोपी केली.दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असतांना सुद्धा त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.यातच आणखी एक कार्य म्हणजे सुषमा स्वराज अटलजींच्या काळात जेंव्हा माहिती व प्रसारण मंत्रीपदी होत्या तेंव्हा त्यांनी एक उल्लेखनीय असा निर्णय घेतला होता.या निर्णयामुळे बॉलीवूडला “इंडस्ट्री”चा दर्जा प्राप्त झाला.चित्रपट निर्माण करतांना भांडवलाची मोठी गरज असते.निर्माते हे भांडवल बाजारातून मोठ्या व्याजदराने मिळवत असत.या भांडवलासाठी मग बॉलीवूड मध्ये “अंडरवर्ल्ड” मधून पैसा येत असे.पैसा देत असल्यानेच मग कोणत्या कलाकाराला चित्रपटात घ्यायचे हे सांगणे,प्रसंगी जबरदस्तीने ,धमक्या देऊन निर्मात्यांना कलाकारांची निवड करण्यास भाग पाडले जात असे. तशी उदाहरणे समोर आली आहेत. या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास करून निर्मात्यांना बँकेतून सुलभरीत्या पैसा मिळाला पाहिजे जेणे करून अंडरवर्ल्ड चा पैसा चित्रपटांत येणार नाही किंवा त्यास आळा बसेल हे जाणून निर्मात्यांना बँकेतून पैसा सुलभ रीत्या मिळवण्याची त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. सुषमा स्वराज यांच्या या निर्णयामुळे बॉलीवूडला इंडस्ट्रीचा दर्जा मिळाला शिवाय अंडरवर्ल्ड मधून येणा-या पैस्याला सुद्धा आळा बसला.यामुळेच चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार सुषमा यांच्या निधनाने व्यथित आहेत. सुषमा स्वराज यांनी त्यांच्या अनेक निर्णयांमुळे भारतीय राजकारणावर आपली छाप सोडली आहे. त्यातीलच हा सुद्धा एक निर्णय होता. बॉलीवूडमध्ये येणा-या अंडरवर्ल्डच्या पैस्याला रोखून एकप्रकारे त्यांनी बॉलीवूड मध्ये “स्वराज” आणले.          

०१/०८/२०१९

Article about cow on roads


दुध मालकाला , त्रास जनतेला
खामगांव शहर विकासाच्या ए टप्प्यातून जात आहे. नांदुरा रस्त्याचे काम वेगात सुरु आहे. रस्त्यासाठी अडथळा होतो म्हणून भली मोठी वृक्षे सुद्धा तोडली गेली. या विकास कामामुळे रहदारीत अडथळा होतो आहे, पाणी पुरवठा कित्येक दिवसांपासून खंडीत झाला आहे. परंतू हे सर्व नागरिक सहन करीत आहे कारण हे सर्व चांगल्यासाठी होत आहे आणि सुरळीत सुद्धा होणार आहे. विकास कामाचा कुणालाही अडसर होत नाही परंतू या मार्गावरील नेहमीच असणारा अडथळा म्हणजे गायींचा. मान्य आहे भारतात गायीला गोमातेचा दर्जा आहे. मातेचा दर्जा देऊन तीला रस्त्यावर सोडणे योग्य आहे का ? शहरातील हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावर सरकारी कार्यालये,विद्यालये खाजगी शैक्षणिक संस्था, दवाखाने इ. अनेक प्रतिष्ठाने आहेत. हे सर्व असल्या कारणाने या हमरस्त्यावर मोठी रहदारी असते. विद्यार्थी वर्ग असतो. त्यातच या मोकाट गायी भर रस्त्यात उभ्या असतात. या गायींमुळे अधिकच कुचंबणा होते. शिवाय या गायी रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करतात व त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अधिकच घाण होते, दुर्गंधी पसरते शिवाय रोगराई निर्माण होते ते वेगळेच. शहरातीलच नागरिकांच्या या गायी पद्धतशीरपणे दुस-याच्या भरवश्यावर पोसल्या जातात. नागरीकांनी दिलेले अन्न , उकिरड्यावरचे प्लास्टीक मिश्रीत अन्न खाऊन मग या हमरस्त्यावर या गायी
आरामशीर पणे रवंथ करीत बसतात. या गायींचे मालक त्यांच्या कार्यात निश्चिंत असतात. त्यांना ठाऊक असते की गाय संध्याकाळी घरी येतेच. फुकटचे खाऊन गाय घरी गेली मालकाला दुध देते. याच मुद्द्यावर 2013 मध्ये सुद्धा एक लेख लिहिला होता. सहा वर्षांपासून ही समस्या आजही कायम आहे. संबंधीत अधिका-यांनी यात लक्ष घालणे जरुरी नाही का ? एखाद्या वेळेस भर रस्त्यात एखादा मस्तावलेला वळू किंवा गाय उधळली तर मोठा अपघात होऊ शकतो. परंतू रस्त्यावर येऊन उभ्या राहणा-या या गायींचा बंदोबस्त करण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. मागील महिन्यात मुंबई आयआयटी मध्ये एक वळू उधळला होता व त्याने एका विद्यार्थ्यास गंभीर जख्मी केले होते.त्याची चित्रफीत माध्यमात झळकली होती. अशाच प्रकारच्या मोकाट जनावरांमुळे जख्मी झालेल्या नागरिकांच्या इतरही अनेक चित्रफिती कमे-यात कैद झालेल्या आहेत. परंतू तरीही या गायींचे मालक , स्थानिक प्रशासन शहरातील या समस्येकडे लक्ष घालत नाही. “चल रहा है चलने दो” ही वृत्ती आहे. नांदुरा रस्त्याप्रमाणे गावात इतरही रस्त्यावर या गायी गस्त घालीत असतात. गावातील रस्ते अरुंद त्यात अनेक प्रकारची विकास कामे सुरु त्यामुळे गावात गाडी घेऊन जाण्याची भीती वाटते. खामगांव शहरात कोंडवाडा आहे की नाही ठाऊक नाही परंतू असेल तर त्याचा उपयोग मात्र नक्कीच शून्य असेल. कुणावर न येवो परंतू या गायींमुळे एखादा बिकट प्रसंग ओढावला तर त्याला कोण जबाबदार ठरेल ? या गायींचा सर्व नागरिकांना रस्त्यावरून येता-जाता त्रास होत असतो. गायींचे दुध मालकाला आणि त्रास मात्र जनतेला अशी “कुणाची म्हैस अन कुणाला उठ बैस” अशी स्थिती खामगावात झाली आहे. गायी मस्त , त्यांचे मालक आणि प्रशासन सुस्त आणि जनता मात्र त्रस्त आहे.