Click "Follow" Button below To Follow this Blog

२६/०३/२०२०

Corona Virus, Covid-19 is dangerous but many people recovering from it , hope for the best

ये सफर बहुत है कठीन मगर .....

चिन मधून  जगभर  पसरलेल्या  कोरोना विषाणूने  जगात  एकच खळबळ उडवून  दिली. हजारो लोक 

रोज मृत्यूमुखी पडत आहेत. इटली , स्पेन , चिन मध्ये ही संख्या हजारोंच्या घरात आहे. सध्या एकमेकांपासून दूर राहणे, Social Distancing हाच सध्या या कोरोनास रोखण्यासाठी एकमेव उपाय आहे म्हणूनच आपल्या मा. पंतप्रधानांनी दि 22 मार्च ला जनता कर्फ्यू घोषित केला होता. त्याला जनतेने सुद्धा प्रतिसाद दिला. परवा दिनांक 24 मार्च रोजी मा. पंतप्रधानांनी संपूर्ण देशच 21 दिवस म्हणजे 14 एप्रिल पावेतो लॉकडाऊन राहील अशी घोषणा केली. संपर्कातून पसरणारा असा हा कोरोना विषाणू असल्याने मा. मोदी यांनी जनतेस हात जोडून घरीच राहण्याचे आवाहन केले. तेंव्हा जनतेला या कोरोनाचे गांभीर्य कळले , जनता ब-यापैकी बंद पाळत आहेत. परंतू एक भीतीचे सावट निर्माण झालेले चित्र दिसत आहे. शहरात रोजगारासाठी गेलेले गरीब मजूर , कामगार , शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी , गरीब जनता यांना कुठेही जाता येत नाही . वाहने बंद , खाण्या-पिण्याची सोय नाही , शेतक-यांचा माल शेतातच पडून आहे. द्राक्ष , आंबे पडून आहेत  कारण वाहनेच नाहीत. ज्यांची काहीच व्यवस्था नाही ते बिचारी जागा मिळेल तिथे पथारी पसरून समाजसेवक , सामाजिक संघटना यांनी दिलेल्या अन्नपदार्थांवर कसे बसे जीवन जगत आहेत. अनेक लोक आपल्या गावी पायीच निघाले आहेत. 1897 च्या प्लेगच्या साथीच्या वेळेस सुद्धा जशी परिस्थिती नव्हती तशी या कोरोनामुळे निर्माण झाली आहे. एकीकडे मध्यम वर्ग , उच्चवर्गीय सोशल मिडीयाच्या आधारे विनोद पाठवून एकमेकांचे मनोरंजन करीत आहेत परंतू दुसरीकडे अनेक गरीब लोक असे आहे की ज्यांच्या जवळ फोनच नाही किंवा बेसिक मॉडेल फोन आहेत. लहान मुले त्यांचे पालक चिंतीत , भयभीत झाले आहेत. देशात फाळणीच्या वेळी जसे चित्र होते    तसेच चित्र आहे यावेळेस कारण मात्र कोरोना हे आहे. सरकारने गरीबांसाठी 1,70000 कोटींचे पॅकेज आणले आहे हा त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. फाळणीच्या वेळी जशी परिस्थिती निर्माण झाली होती जवळपास तशीच स्थिती या कोरोना महामारीमुळे ओढवली आहे. वृत्त वाहिन्यांवर गरीबांवर आलेल्या संकटांच्या बातम्या पाहून मन हेलावून गेले आहे. पालक , बालक सर्वच चिंतीत , भयभीत झाले आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी या निमित्ताने शहरात रोजगारासाठी गेलेले व आता परत गावी परतलेले यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. जिथे नोकरी निमित्त आले ते शहर सोडून जात असल्याने शहरी लोकांनी सुद्धा त्यांच्यावर तोंडसुख घेतले. अनेक गावक-यांनी तर त्यांच्या गावाचे रस्ते दगड, धोंडे , झाडे टाकून शहरवासीयांसाठी बंद केले आहे. कोरोना असल्याने बाजी आणण्यास जाऊ नको या वरून वाद होऊन कांदिवलीत भावाने भावाचा खून केला. असे बिकट दिवस आले आहेत. परंतू नेहमीच सारखेच दिवस नसतात हे दिवस सुद्धा लवकरच जातील. मेहकर जि. बुलडाणा येथील बालाजी मंदिराच्या मागच्या भिंतीवर “हि वेळ पुन्हा येणार नाही” असे ठळक अक्षरात लिहलेले आहे. त्यानुसार आला तसा हा कोरोना लवकरच जाईल. “ये सफर बहुत है कठीन मगर ना उदास हो मेरे हमसफर” याप्रमाणे जरी आता कठीण परिस्थिती आपल्या भारतमातेवर आपल्या सर्वांवर आली असली तरी उदास न होता जगभरात कोरोना मुक्त होणारे लोक सुद्धा लाखाच्या वर आहे असा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन हे दिवस सुद्धा लवकरच सरतील असा विश्वास बाळगायला हवा कारण   

“ नही रहनेवाली ये मुश्किले , के है अगले मोडपे मंजिले
मेरी बात का तू यकीन कर ना उदास हो मेरे हमसफर”

1 टिप्पणी: