कोई रोकोना ये भस्मासुर
कोरोना
चिन मध्ये निर्माण झालेला का केलेला एक विषाणू आज जागतिक चिंता निर्माण करणारा असा
एक विषाणू आहे. हा विषाणू भस्मासुराप्रमाणे कित्येक लोकांना भस्म करीत जगात सर्वत्र धुमाकूळ घालीत आहे. जागतिक अर्थव्यवस्था ठप्प पाडणारा हा विषाणू आहे. पुराणात भस्मासुर नावाचा एक असुर होता ज्याने शंकराची
आराधना केली , घोर तपस्या करून त्याने भोळ्या शंकराला प्रसन्न केले. त्याच्या तपश्चर्येने
प्रसन्न होऊन शंकराने त्याला वरदान दिले की ज्या कुणाच्या डोक्यावर भस्मासुर हात ठेवेल
तो व्यक्ती भस्म होऊन जाईल आणि मग काय ! भस्मासुर सर्वांच्या डोक्यावर हात ठेऊन त्याला
भस्म करण्यास धावू लागला , देव ऋषी यांना तो त्रास देऊ लागला , त्याने एकच उच्छाद मांडला
. सर्व अगदी हैराण झाले आणि भगवान भस्मासुर नावाच्या तत्कालीन विषाणूस मारण्यासाठी ऋषी, मुनी देवता भगवान विष्णू कडे गेले .
विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराला आकृष्ट केले. भस्मासुराने जर मोहिनी प्रमाणे
नृत्य केले तरच ती भस्मासुराशी लग्न करेल असे त्याला म्हटले. मोहिनी नृत्य करू लागते
आणि नृत्य करता करता ती स्वत:च्या डोक्यावर हात ठेवते भस्मासुर सुद्धा तसेच करतो आणि
क्षणात भस्म होतो. कोरोना हा विषाणू म्हणजे सांप्रतकालीन भस्मासुरच म्हणावा लागेल.
एकेका देशात अनेकांना स्पर्शाच्या माध्यमातून तो भस्म करीत सुटला आहे. याला रोखण्यासाठी
जनतेने संयम बाळगणे जरुरी आहे. भस्मासुराला नष्ट करण्यास विष्णू धाऊन आले होते परंतू
कोराना पासून बचाव करण्यास आपणा सर्वांनाच घरी राहणे , संपर्क टाळणे हेच उपाय आहे .
आपल्याला स्वत:लाच विष्णू बनायचे आहे. तरच हा कोरोना भस्म होऊ शकतो. नागरीकांनी घरीच
राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनारुपी भस्मासुरास रोखण्यास त्या कोरोनास आपल्या पर्यंत
न पोहचू देणे हाच उपाय आहे. पुराणात जसे असुर होते तसे विषाणू रुपी असुर चिन सारखे
काही देश निर्माण करीत जगाला छळत आहे. हे असे उपद्व्याप करणा-या राष्ट्रांना काही दंड अथवा शिक्षेची तरतूद झालीच पाहिजे, असे उपद्व्याप करणा-या देशावर इतर देशांनी बहिष्कार
सुद्धा टाकावा. जेणे करून असे विषाणू निर्माण करण्याची कुणी हिम्मत करणार नाही. जैविक
युद्धासारखी परिस्थिती निर्माण करणा-या देशांना आवर घालावाच लागेल. पुराणात देवता या
असुरांना रोखत असत , नष्ट करीत असत. आता आपल्या सर्वांनाच जागरूक राहून या कोरोनारुपी
असुराला नष्ट करावयाचे आहे. डॉक्टर्स , नर्स , वैद्यकीय कर्मचारी , पोलीस विभाग , सैन्यदळ
, जागरूक पत्रकार हे सर्व देवतारुपी जन स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रयत्नांची पराकाष्ठा
करीत आहे. मा. पंतप्रधानांनी काल केलेले कळकळीचे आवाहन जनतेने जरूर पाळायलाच हवे. “कोई
रोकोना ये भस्मासुर म्हणजेच कुणी तरी हा कोरोनारुपी भस्मासुर रोखावा
अशीच सर्वांची भावना आहे. ते कसे करता येईल हेच नेमके मा. पंतप्रधानांनी काल सांगितले
आहे. त्याचेच आपण सर्वानी पालन करावे , संयम पाळावा , थोडे सहन करावे , Social
Distancing ठेवावे
यामुळेच हा कोरोनाचा भस्मासुर भस्म होईल आणि लवकरच सर्व निश्चिंतपणे सर्वत्र वावरू
शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा