सफल हो
गयी आराधना
तीच्यावर एक दुर्दैवी अपघाताचा प्रसंग ओढवला
त्यात ती सुदैवाने वाचली. तिच्या घरची संपन्नता , वैभव सुद्धा गेले. अशातच तिला आधार दिला तीच्या वडीलांनी. आई ,बहीण , भाऊ , काका , वडीलांचे मित्र ही मंडळी सुद्धा होतीच. तीच्या
राहण्याचा प्रश्न निर्माण झाला , मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न
निर्माण झाला. अनेकांनी अनेक सल्ले दिले. परंतू वडीलांच्याच घरातील मागील बाजूस मोकळ्या असलेल्या जागेत तीला वडीलांनीच एक
खोली बांधून दिली. तीच्या पतीची नोकरी बेताचीच. मुले नगर परीषदच्या शाळेत शिकली , एक मुलगी एक मुलगा दोघांनाही कधी शिकवणी नव्हती. बालमन मोठे कोमल असते, परिस्थितीची जाणीव मुलांना लहानपणीच आली. त्यांना बालपणीच थोरपण आले. तीच्या अपघातामुळे व त्यातून
आलेल्या अपंगत्वामुळे, मुलांच्या काळजीने ती निराशेच्या खाईत लोटल्या गेली होती. परंतू तीला तीच्या मुलांसाठी पुन्हा खंबीर होऊन उभे राहायचे होते. पुन्हा वडील
मदतीस धावले त्यांच्या मित्राच्या नव्यानेच सुरू झालेल्या शाळेत ती रुजू झाली. लवकरच बाल गोपालांची ती आवडती शिक्षिका झाली. पुढे बी. एड सुद्धा केले. आता तीला आत्मविश्वास
प्राप्त झाला होता. कालपरत्वे तीला ती नोकरी
सोडावी लागली. प्रश्नचिन्ह काही पिच्छा सोडत नव्हते. पुन्हा नोकरीचा प्रश्न निर्माण झाला. तिच्या वडीलांनी त्यांच्या सुस्वभावाने वडिलांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे त्यातून त्यांनी दुस-या शाळेत तीच्यासाठी प्रयत्न केले. दुस-या शाळेत ती रुजू झाली. तीच्या दोन्ही नोक-या विना अनुदानीत असल्याने वेतन बेताचेच होते. मुले
मोठी होत होती. मुलांचे बारावी झाले. बारावी नंतर तीच्या माजी मुख्याध्यापिका असलेल्या व शिक्षणासाठी सर्वांच्या मदतीला धावणा-या तिच्या मामींनी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. मुलगी व मुलगा दोघेही अभियांत्रिकी पदवीधर झाले.
हे सर्व होतांनाच अनेक कटू-गोड घटनांचा तीने सामना केला. कित्येक दु:खे पचवली. मुलगी
आता तासिका तत्वावर अधिव्याख्याता म्हणून कार्य करू लागली. कुर्मगतीने तीचे दिवस आता पालटू लागले. “दू:खभरे दिन बीते रे भैय्या” अशी परिस्थिती येऊ लागली.“Every Cloud has a silver lining” याप्रमाणे तीच्या दु:खरूपी ढगांना तीच्या वडीलांच्या , माहेरच्यांच्या पाठींब्याची रुपेरी किनार
सुद्धा होती. अशातच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी मिळाली.मुलीच्या लग्नाचा योग जुळून आला. तिच्या बहिणी सुद्धा लग्नाच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या. चांगले लोक. चांगला जावाई मिळाला. जावई सुद्धा खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. तीच्या मुलीला शहरात चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली व गोंडस असे कन्यारत्न सुद्धा प्राप्त झाले. आता ती
आजी झाली. मुलगा आणखी चांगल्या नोकरीच्या प्रयत्नात होताच.कुटुंबातील सर्वांचाच उत्कर्ष व्हावा असा विचार ठेवणा-या तिच्या पोस्टमास्टर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या, पोष्ट खात्याची नोकरी निष्ठेने करणा-या व सेवानिवृत्तीच्या दिवशीही पूर्ण कामकाज करणा-या काकांनी तीच्या
मुलाला डाक विभागातील नोकरीच्या जाहिराती बाबत संगितले. तीच्या मुलाने
परीक्षा दिली. त्यात चांगले गुण सुद्धा मिळवले परंतू काही कारणास्तव त्या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला. एक दिवस अचानक डाक विभागाचे पत्र आले. ते उघडले तर तीच्या मुलाला केंद्र सरकारच्या नोकरीचा सांगावा
धाडणारे ते पत्र होते. ते पाहून तिला कोण आनंद झाला. आनंद वाटल्याने अधिक वाढतो हे ठाऊक असूनही परंतू तीने तो रुजू झाल्यावरच सर्वांना सांगण्याचे ठरवले. मुलाने रुजू होण्यासाठी असणारे योग्य ते सोपस्कार पार पाडले. परवा तो रुजू झाला त्यानंतरच तीने सर्वांना मुलाला केंद्र सरकारी नोकरी लागल्याचे सांगितले. तीच्या स्व. काकांमुळे डाक विभागातील लोक परीचीत होतेच त्या सर्वांनी तीच्या मुलाला योग्य तो सल्ला, मार्गदर्शन, केंद्र सरकारच्या नोकरीचे फायदे सांगितले.
मधल्या काळात अनेकवेळा जेंव्हा तीच्यावर कठीण प्रसंग येत, आर्थिक विवंचना असे, चिंता येई असे काही झाले की तीच्या डोळ्यात अश्रू
येत. तेंव्हा बरेच वेळा तीचा भाऊ “सफल होगी तेरी आराधना काहे को रोये“ या बर्मनदांच्या आवाजातील गीताची ओळ म्हणून तीच्या आशा पल्लवीत ठेवण्याचा प्रयत्न करी. तीच्या मुलाला सरकारी नोकरी प्राप्त झालेली
पाहून देव न मानणा-या तीच्या वडीलांनी सुद्धा “देव दीनाघरी धावला” असे म्हणून देवाचे आधार
मानले. तीने सुद्धा मानले, तीला तीच्या स्वर्गवासी काकांची सुद्धा आठवण येत होती , ते जिथे कुठे असतील ते सुद्धा सुखावले असतील व आशीर्वाद दिला असेल असे तीला मनोमन वाटत होते. तीच्या काकुंना सुद्धा नातू पतीच्या खात्यात रुजू झाल्याने परमानंद झाला.
अपघात , अपंगत्व , नैराश्य , आर्थिक डबघाई, अपमान अशी अनेक संकटे झेलल्यावर, खूप सोसल्यावर तीची मुले स्थिर-स्थावर झाली आणि तीची आराधना सफल झाली.
अपघात , अपंगत्व , नैराश्य , आर्थिक डबघाई, अपमान अशी अनेक संकटे झेलल्यावर, खूप सोसल्यावर तीची मुले स्थिर-स्थावर झाली आणि तीची आराधना सफल झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा