लॉक डाऊन आणि लॉग इन
कोरोनामुळे
लॉक डाऊन घोषित होऊन एक महिना झाला. लॉक डाऊन झाल्या नंतर काही दिवसांनी लोक सोशल
मिडीयावर active झाले. अति active झाले असे म्हणण्यास सुद्धा हरकत नाही. सर्वकसे 24*7
लॉग इन आहेत. त्यामुळे मग कोरोना वर मेसेज पाठवणे. इतर विनोद , अनेक प्रकारचे ज्ञानामृताचे डोस यांची भर उन्हाळ्यात बरसात सुरु झाली.
प्रत्यक्ष भेट होत नाही म्हणून मग ऑनलाईन भेटींच्या अॅपचा बेसुमार वापर सुरु झाला. अशा
अॅप बाबत ज्यांना नवीन महिती प्राप्त झाली त्यांच्यात तर विशेष उत्साह निर्माण
झाला. सरकार अशाप्रकारच्या काही अॅपमुळे वापरकर्त्याची माहिती चोरली जाऊ शकते, ती
माहिती इतर कंपन्यांना विकली जाऊ शकते हे सांगत असूनही लॉक डाऊन मुळे घरात अडकलेले
लोक सरकारच्या त्या आवाहनाकडे डोळेझाक करीत आहे. कोरोनामुळे हे संकट जरी ओढवले
असले तरी कोणतेही संकट कायमचे नसते. हे संकट सुद्धा दूर जाणार. तद्नंतर पुनश्च
सर्व सुरळीत होईलच. “अति सर्वत्र वर्ज्यते” संपर्क जरूर असावा परंतू त्यात सुद्धा
अतिरेक नसावा. अतिरेकीपणे कोणतीही गोष्ट केली की त्याचाही काही ना काही परिणाम होतोच. शिवाय सध्या निव्वळ ऑनलाईन चर्चा करून त्यातून काही ना काही निष्कर्ष निघेलही
परंतू त्यातून विशेष फलदायी असे काही घडण्यासाठी तूर्तास तरी तसे वातावरण नाही. सततच्या
ऑनलाईन चर्चा सुद्धा कदाचित निरस वाटू लागतील. आज आपण जरी घरी असलो बाहेर जाता येत
नाही त्यासाठी जरी इंटरनेट , ऑनलाईन चर्चा हा पर्याय असला तरी सततच्या या चर्चांमुळे
काही दिवसांत ते सुद्धा कंटाळवाणे होणार की नाही ? याचा सुद्धा विचार करणे आवश्यक
आहे. चर्चा आवश्यक असतील तेंव्हाच घ्याव्यात शिवाय त्यात सुसूत्रता असावी,त्यात
ठराविक अंतर असावे. इंटरनेटमुळे सुद्धा पर्यावरणावर परिणाम होतो, एक ई-मेल
पाठवल्याने सुद्धा अल्प का होईना पण प्रदूषण होते, इंटरनेटच्या भल्या मोठ्या सर्वरसाठी
मोठ्या प्रमाणावर वीज लागते असे तज्ञ सांगतात परंतू हे अनेकांना ठाऊकच नाही. इंटरनेट काळाची गरज आहे हे मान्य असले तरी व त्याचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होतांना दिसतो. कोरोना काळात हा वापर
आणखी वाढला आहे. मनुष्य हा समाजशील आहे त्याला समाजात राहणे आवडते , संपर्क आवडतो व
तो त्याला लॉक डाऊन मुळे करता येत नाही. लवकरच त्याला पुन्हा समाजात सर्वत्र जाता
येईलच असा सकारात्मक विचार ठेवायचा आहे. अनेक लोक त्यांच्या परिवारस वेळ देऊ शकत नव्हते ते आज लॉक डाऊनमुळे घरी आहेत. ते घरी असूनही मोबाईलवरून ऑनलाईन चर्चा आदि मध्ये व्यस्त होत असतील तर त्यांच्या परिवाराला आपला कुटुंब प्रमुख लॉक डाऊन मध्ये
घरी असूनही व्यस्त आहे व त्याच्याशी संवाद होत नाही असे साहजिकच वाटण्याची संभावना
आहे. तेंव्हा लॉक डाऊन काळात सतत लॉग इन न राहता
परिवाराला सुद्धा वेळ द्यावा, चांगले वाचन करावे , लिखाण करावे , एखादा ऑनलाईन
कोर्स करून आपले कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा