Click "Follow" Button below To Follow this Blog

२९/०४/२०२०

Article about a sweet song "Bada Natkhat Hai Re Kishan Kanhaiyaa" of 1970s hit movie Amar Prem


“बडा नटखट है”,एक वात्सल्यपूर्ण गीत 
हिंदी चित्रपटसृष्टीने एकाहून एक सरस गीते रसिकांना दिली. अवीट गोडींच्या या गाण्यांचे श्रवण नेहमीच होत असते. इंटरनेट व त्या अनुषंगाने समाज माध्यमे आल्यावर तर ज्यांना अशा गीतांची आवड आहे अशांनी गृप तयार करून अनेक जुनी श्रवणीय गीते पोस्ट करणे सुरु केले. विशेष म्हणजे जुन्या गीतांना आजही मोठ्या प्रमाणात ‘लाईक’ मिळतात. अनेक प्रकारची गीते गीतकारांनी रचली त्यात प्रेमगीतांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली व ती सर्वात जास्त ऐकली जातात. देशभक्ती गीते, अंगाई गीते,लहान मुलांसाठी त्यांच्या पालकांनी म्हटलेली गीते.अशा कितीतरी प्रकारच्या रचना गीतकारांनी केल्या. 1970 च्या दशकातील अमरप्रेम या राजेश खन्ना व शर्मिला टागोरच्या चित्रपटातील गीते सुद्धा श्रवणीय होती. 70 च्या दशकातील या चित्रपटाची माहिती व त्यातील “बडा नटखट है” या गीताच्या माहितीत तरुण वर्गास कितपत रस असेल ते ठाऊक नाही. परंतू जुन्या चित्रपटांच्या व गीतांच्या दर्दीना अमरप्रेम मधील एका गीताबाबत सांगावेसे वाटले आणि लेख लिहिण्यास आरंभ केला. अमर प्रेम म्हणजे पतीने घरातून काढून दिल्यावर काकाने वेश्यागृहात विकलेल्या पुष्पाची (शर्मिला टागोर) , वैवाहिक जीवनात सुखी नसलेल्या आनंद बाबू (राजेश खन्ना) व पुष्पाच्या शेजारी रहायला आलेल्या व सावत्र आई असलेल्या
नंदू (विनोद मेहरा) यांची कथा. लहानगा नंदू पुष्पाच्या वात्सल्यपूर्ण वागणुकीने तीच्या कडे जात असतो. तिच्याकडे जाऊन त्याला घरी मिळत नसलेले मातृप्रेम मिळत असते. शक्ती सामंत यांचा हा चित्रपट याचे कथानक सुद्धा सर्वांगसुंदर आहे. या लेखात ते कथानक सुद्धा समाविष्ट करावेसे वाटत होते परंतू लेखन मर्यादेमुळे त्याला आवर घालावा लागला. आवर्जून पहावा असा हा चित्रपट. बंगाली साहित्यावर आधारीत अनेक हिंदी चित्रपट खूप गाजले आहेत. बंगाली लेखक बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या कथेवर आधारीत या चित्रपटातील “कुछ तो लोग कहेंगे” ,” चिंगारी कोई भडके” ही गीते रसिकांना  आठवतातच. याच चित्रपटात लता मंगेशकर यांच्या आवाजातील  आनंद बक्षी यांचे खमाज रागातील “ बडा नटखट है रे किशन कन्हैय्या, का कारे यशोदा मैय्या” हे सुमधुर , श्रवणीय गीत आहे. आपल्या आवाजातून आईचे प्रेम लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे तसेच पडद्यावर लहानग्या , खट्याळ नंदूच्या मागे धावत शर्मिला टागोरने केलेल्या प्रेमळ आईच्या अभिनयाला तोड नाही. नंदूला आपला मुलगाच समजत “लागे ना किसीकी नजर” , “सबका है प्यारा बन्सी बजैय्या” असे म्हणत त्याच्याशी खेळत , बागडत हे गीत ती म्हणते. गीतात रामकृष्ण परमहंस , विवेकानंद यांच्या तसबिरी सुद्धा दिसतात. जुन्या चित्रपटात थोर व्यक्तींचे फोटो हमखास दिसत. रसिक प्रेक्षक हे गीत ऐकतांना आणि पाहतांना त्याच्याशी समरस होऊन जातो. आताच्या पिढीला हे गीत कितपत आवडेल ते ठाऊक नाही. परंतू पूर्वीच्या चित्रपटात अशी वात्सल्यपूर्ण गीते असत ती कथानकाचा एक भागच असत. बालपणी जीने वात्सल्य दिले त्या गणिकेला उतरत्या वयात मोलकरीणीचे कार्य करतांना पाहून त्याच गावात पुन्हा आगमन केलेला , इंजिनियर झालेला नंदू आश्रय देतो ते पाहून संपूर्ण चित्रपटात I hate tears म्हणणा-या आनंदबाबूंच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात. आज काल मुले, सुना आपल्या वृद्ध माता पित्यांना , सासू सास-यांना वा-यावर सोडतात. अमर प्रेम मधील नंदू मात्र त्याला बालपणी प्रेम देणा-या गणिकेस तिच्या वृद्धापकाळात आश्रय देतो. अशी हि अमर प्रेमाची बोधप्रद कथा पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओलावतात. 
     आता असे चांगल्या साहित्यावर आधारीत कथानक असलेले चित्रपट नाहीत आणि तशी गीतेही नाहीत. अगदी बालवयात आपल्या पाल्यांना दूर करून त्यांना प्ले गृप व अनेक स्पर्धांत ढकलणा-या माय-बापांनी “बडा नटखट है“ सारखी वात्सल्यपूर्ण गीते जरुर पाहावीत,ऐकावीत, प्रेम वात्सल्य असलेले, काहीतरी बोध देणारे चित्रपट पहावेत, त्याच आशयाची पुस्तके वाचावी जेणे करून आगामी 
पिढ्यामध्ये एकमेकांप्रती प्रेम आपुलकी राहील, जिव्हाळा राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा