Click "Follow" Button below To Follow this Blog

०७/०४/२०२०

Streets seen deserted due to lock down in epidemic of Corona virus, Covid-19

सुनी हो गयी शहर की गलीया

या जगात केंव्हा काय होईल काही सांगता येत नाही. आता काही  महिन्यांपूर्वी जगाचे रहाट गाडगे सुरळीत सुरु होते. व्यवहार , बाजारपेठा , नोकरी धंदे , शाळा , महाविद्यालये सर्व व्यवस्थित होते अगदीच काही रामराज्य होते असे नाही परंतू सर्वत्र खुशाली होती. परंतू विपरीत बुद्धीच्या चिन्यांनी जगाच्या खुशालीत मीठ कालवले. चिन्यांच्या उपद्व्यापामुळे वुहान शहरात निर्मित कोरोना विषाणूने सत्यानाश केला. हा विषाणू जगात पसरला, अनेक लोक मृत्युमुखी पडले , अनेकांची शांती भंग झाली , कित्येक बेचैन झाले , कित्येक जिथे आहे तिथेच अडकून पडले , कित्येक विस्थापित झाले. या विषाणूवर काहीही एक इलाज आजपावेतो तरी नाही म्हणून अवघ्या विश्वात चिंतेचे सावट आहे. यावर एकच उपाय सध्या मानवाच्या हात आहे. तो म्हणजे Social Distance ठेवण्याचा. संसर्गातून हा विषाणू पसरतो म्हणून भारतात गेल्या 24 मार्च पासून 21 दिवसांचे Lock Down केले गेले. सर्वत्र शांतता पसरली. दुकाने बंद , व्यापर उदीम बंद, शाळा , महाविद्यालये बंद , अर्थव्यवस्था ठप्प पडली. सर्वत्र शुकशुकाट झाला. काही तुरळक अपवाद वगळता लोक हा बंद हे Lock Down पाळत आहे. काही ठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी खुला वेळ दिला जातो त्यावेळी अनेक लोक Social Distance ठेवतांना दिसत नाही. हे योग्य नाही, आपण सर्वानी आपल्याच हितासाठी हे Social Distancing पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तरीही संचारबंदीमुळे शहरे निशब्द झाली आहेत. या स्तब्द शहरांत पसरलेल्या शांततेने वन्यजीव शहरात दाखल झाले, ही शहरे हे, रस्ते हे पूर्वी या त्यांचेच तर हक्काचे स्थान होते. परंतू विकासाच्या मागे लागलेल्या मानवाने त्यांचे स्थान हिरावून घेतले. प्रदूषणाच्या पातळीत घट झाली. जालंदर मधून हिमालयाच्या रांगा सुस्पष्ट दिसू लागल्या. कोरोनाच्या संकटाने झालेल्या या Lock Down  मुळे प्रदूषणात घट , स्वच्छ हवा ,परिवारासह सुसंवाद स्थापित झाला अशा काही सकारात्मक बाबी जरी झाल्या असल्या तरी मानव हा समाजशील प्राणी आहे. समाज हा मानवाला एकटेपणा पासून
वाचवण्यासाठीच निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे मानव आज घरात अडकून पडला आहे. सोशल मिडीया व्यतिरिक्त त्याला समाजात कुठे जाता येत नाही. दिलेल्या वेळात त्याचे समाजात जाणे झाले तरी मनात संशय घेऊन तो जात आहे , कार्यालयात गेला तर हातावर रोगाणूरोधक , विषाणूरोधक (Sanitizer) टाकून स्वागत होते. विषाणू आपल्या शरीरावर येऊ नये या चिंतेखाली जो-तो वावरतो आहे. का आली अशी वेळ या जगतावर ? तर याचे एकमेव कारण म्हणजे मानवी हव्यास इतरांपेक्षा मी श्रेष्ठ, इतरांवर अधिकार,सत्ता गाजवणे या अशा मानवी वृत्तीतून चिन मध्ये हा विषाणू तयार झाला व त्याने अवघ्या विश्वास शांत केले, थांबवले. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी शहरात जावे तर टपरीवर चहाचे घोट घेत असलेलेले मित्र दिसत नाही, पान ठेल्यावर राजकारण, क्रिकेट, आंतरराष्ट्रीय प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर खडाजंगी नाही, विद्यार्थ्यांचे घोळके नाही, खेळांची मैदाने रिकामी, नाटके, परिसंवाद, सभा ,भाषणे ,उत्सव सारे-सारे बंद झाले. लॉक डाऊन केल्यावर दोन-तीन दिवसाने प्रशासनाने सांगितलेल्या वेळेत दुध आणण्यासाठी म्हणून हमरस्त्याने जात होतो, त्यावेळी रस्त्यावर मी एकटाच होतो, एकही गाडी नाही,कर्णकर्कश्श हॉर्न नाही, उन्हाळा असूनही रसवंत्यांच्या मोटारीला लावलेल्या घुंगरांचा आवाज नाही अगदी नीरव शांतता होती. मला सर्व अतिशय भयाण वाटले, खिन्नता वाटली. सर्वत्र असलेली ती स्मशान शांतता, लहानपणापासून ज्या रस्त्यांवर फिरलो त्या नेहमीच्या परिचित अशा वर्दळीच्या रस्त्याला मी प्रथमच असे पाहत होतो.सर्वत्र सुने-सुने झालेले ते वातावरण त्या सुन्या झालेल्या “शहर की गलीया” हे व सर्व विश्वच कोरोना विषाणूच्या संकटातून धडा घेऊन मानवी वर्दळीने पुनश्च उल्हासित होईल, उभारी घेईल व चिनसारख्या उचापती देशांना यातून सद्बुद्धी सुचेल अशी ईश्वराकडे करुणा भाकत मी घरी परतलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा