कोरोना, डॉक्टरांची अविरत सेवा आणि आठवण डॉ कोटणीसांची

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी झुंज देत असलेल्या, अविरत
सेवेत असलेल्या डॉक्टरांना पाहून आठवण झाली ती डॉ.कोटणीस यांची. डॉ व्दारकानाथ
शांताराम कोटणीस एक विस्मृतीत गेलेले नांव. सोलापूर येथे 10 ऑक्टोबर 1910 मध्ये एका मध्यमवर्गीय
कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 1937 मध्ये जपानने चीनवर हल्ला केला त्यावेळी चीनी कम्युनिस्ट
जनरल झु डे यांनी पंडीत नेहरू व सुभाषचंद्र बोस यांना काही डॉक्टर्स पाठवण्याची
विनंती केली होती. 28 वर्षीय डॉ कोटणीस हे त्याकाळी वैद्यकीय निपुण म्हणून ओळखले
जात असत. त्यामुळे ते चीनला रवाना झाले आणि चीनच्या कानाकोप-यात फिरून त्यांनी
तेथील रुग्णांची जीवापाड सेवा केली.त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या क्यो क्विंगलन
नावाच्या एका नर्सच्या प्रेमात ते पडले. विवाह केला. पुढे माओच्या आर्मीत रुजू
झाले सैनिकांची सुश्रुषा केली. प्रतिकूल हवामान, सतत कार्य, अपुरे अन्न पाणी , हे सारे त्यांच्या अंगाशी आले आणि 9 डिसेंबर 1942 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
चित्रपती व्ही. शांताराम यांनी डॉ कोटणीस यांच्या जीवनावर आधारीत "
डॉ कोटणीस की अमर कहानी" हा चित्रपट 1946 मध्ये निर्मित केला होता. 40च्या दशकातील हा चित्रपट काही
पाहण्यात आला नाही परंतू कोटणीस यांचेबाबत त्या चित्रपटाबाबत वडीलांकडून ऐकले
होते. चित्रपटाच्या कथेत प्लेगवर उपचार करण्यासाठी डॉ कोटणीस स्वत:वर प्रयोग करतात
असे आहे. हा चित्रपट खूप गाजला व त्याला सुवर्ण कमळ हा राष्ट्रपती पुरस्कार
सुद्धा प्राप्त झाला होता.
डॉ कोटणीस यांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये मोठा शोक व्यक्त
करण्यात आला होता. "सैन्यानं एक चांगला सहकारी आणि देशानं एक चांगला मित्र
गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया," असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते
माओ झेदांग यांनी कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते. चीनचे तत्कालीन पंतप्रधान भारत भेटीस आले
असता त्यांनी कोटणीस यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. आजही चीनमध्ये डॉ.
कोटणीस यांच्याबद्दल मोठी आदराची भावना आहे. त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. चीन व
भारत या दोन्ही देशांत त्यांची स्मारके आहेत.दोन्ही देशांनी त्यांच्यावर टपाल
तिकीट सुद्धा काढले होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी क्यो क्विंगलन यांचे डालियन
या शहरात निधन झालं. वैद्यकीय शिक्षण घेत असताना वयाच्या 24 व्या वर्षी या दाम्पत्याच्या मुलाचा
सुद्धा मृत्यू झाला.
डॉ कोटणीस
यांची निस्वार्थ सेवा , त्याग , त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे शिवाय चीनने विषाणू निर्मिती करून छुपे जैविक युद्ध न करता व डॉ कोटणीस यांच्याप्रती केवळ
दिखाऊ आदर सन्मान न दाखवता डॉ कोटणीसांच्या अंगी असलेली संवेदना, निस्वार्थ सेवावृत्ती
याचा जागतिक शांतीसाठी अंगीकार करावा.