Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/१२/२०१६

"Musalman" The only handwritten newspaper in India or may be in the world

"मुसलमान
हा एक धर्म आहे हे कुणीही सांगेल. पंरतू “मुसलमान” नावाचे एक वर्तमानपत्र आहे हे थोड्या लोकांना माहीत आहे आणि हे वर्तमानपत्र भारतातील किंबहुना  जगातील एकमेव हस्तलिखित वर्तमानपत्र आहे हे अगदीच कमी लोकांना ठाऊक आहे.”हस्तलिखित वर्तमानपत्र” ! आश्चर्य वाटले ना ? होय “मुसलमान” हे वृत्तपत्र आजही हाताने लिहिले जाते आणि हेच या वृत्तपत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. एखाद्या गोष्टीने झपाटून जाणे म्हणजे काय असते याचे प्रत्यंतर या वृत्तपत्राची माहिती मिळाल्यावर येते. वर्ष १९२७ , ब्रिटीशकालीन भारत. याच काळात चेन्नई तत्कालीन मद्रास या शहरातील सईद अफजतउल्लाह या व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरु केले.त्याकाळी मुद्रण कला बाल्यावस्थेतच होती आणि म्हणावी तेवढी फोफावली नव्हती म्हणून “मुसलमान” हे हस्तलिखित या प्रकारात सुरु झाले, भाषा उर्दू हे सांगणे न लगे. सईद अफजतउल्लाह यांच्या नंतर या वृत्तपत्राची धुरा त्यांच्या मुलाकडे म्हणजे फजलउल्लाह यांच्याकडे आली. स्वातंत्र्योत्तर काळसुद्धा म्हणावा तितका विकसित नव्हताच त्यामुळे वृत्तपत्र तसेच म्हणजे हस्तलिखित याच प्रकारात सुरु राहिले.फजलउल्लाह यांनी जीवनाच्या अखेर पर्यंत याच वृत्तपत्राचे कार्य सुरु ठेवेल असा निर्धारच केला होता.जेंव्हा त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली होती त्यावेळी ते कार्यालयात वृत्तपत्राचेच कार्य करीत होते.त्यांचे निधन झाल्यावर आता सध्या संपादक म्हणून कार्य पाहणा-या त्यांच्या मुलाने म्हणजेच सईद आरीफउल्लाह यांनी वडीलांचा वारसा सुरु राहावा या प्रेरणेने २००८ पासून वृत्तपत्राची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.मार्केटिंग मध्ये एमबीए झाल्यावर मोठ्या पगाराची नोकरी करण्याच्या संधी असून सुद्धा अत्यल्प उत्पन्न असणा-या या क्षेत्रास केवळ वडिलोपार्जित वारसा सांभाळण्यासाठी आरीफ ने या कार्यास वाहून घेतले.मुस्लीम तहजीब अर्थात मुस्लीम संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याची परंपरा आहे.“कॅलीग्रॅफी” चा वापर करून हस्तलिखित कुराणाच्या प्रती राजे- महाराजे,धनिक यांच्यासाठी लिहिल्या जात असत.मुद्रण कलेतील क्रांती नंतर मात्र हस्तलिखित हा प्रकारच सर्वच संस्कृतीमधून बाद होऊ लागला,आता तर संगणक,स्मार्ट फोनचे युग आहे,हाताच्या बोटाने स्मार्ट फोनवर पेन चालवतात त्याप्रमाणे लिहिता येते,आपण बोललेले संगणकाच्या पडद्यावर टाईप होते.मग कोण कशाला हाताने लिहिणार? परंतू “मुसलमान” मात्र अजूनही हाताने लिहिल्या जात आहे.त्यांना नावे ठेवणारी मंडळी आहे, हसणारे लोक आहेत.तरीही अव्याहतपणे मुसालमानचे कार्य सुरूच आहे.फक्त ७५ पैस्यात मिळणा-या मुसलमानच्या २१००० प्रती रोज निघत आहेत. संपूर्ण भारतात त्याचे वाचक आहेत.३० ते ३५ वर्षांपासून कार्य करणा-या कर्मचा-यांचे कुटुंब तेथे आहे.तीन वार्ताहर  ज्यामध्ये एक हिंदू आहे आणि तीन “कॅलीग्रॅफर्स” आहेत जे टाक किंवा बोरूने आणि शाई ने लिहितात ( नवीन पिढीसाठी टाक-जुन्या काळातील लिहिण्याचे साधन ज्याचे टोक शाईत बुडवून लिहावे लागते ) एक पान लिहिण्यास त्यांना 2 तास लागतात.“मी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर मी माझा “युनिकनेस” माझा वेगळेपणा गमावून बसेल” असे आरीफउल्लाह यांना वाटते आणि म्हणून ते “मुसलमान” ला हस्तलिखितच ठेवणार आहे.आताच्या या झगमगत्या दुनियेत अत्यल्प मोबदला असूनही वडिलोपार्जित व्यवसाय व वारसा जोपासणा-या आरीफउल्लाह व त्यांच्या सहका-यांना सलाम.आरीफउल्लाह हस्तलिखित वृतपत्र सुरु ठेवण्याच्या  “रोजोल्युशनवर” ठाम राहिले.आपण सुद्धा आता “न्यू ईअर रोजोल्युशन” करणारच आहोत,तेंव्हा आपण सुद्धा जे काही रोजोल्युशन करू त्यावर ठाम राहूयात.


नूतन वर्षाभिनंदन ! 

२२/१२/२०१६

Doc Trade Union SRK alias Mr S R Kulkrani passed away on Monday 19 Dec 16 . article to tribute him.


 " SRKची एक्झिट

आता 'SRK' म्हटले म्हणजे तरुण वाचकांना त्यांचा आवडता अभिनेता शाहरुख खान डोळ्यासमोर आला असेल . कारण बॉलीवूड मध्ये शाहरुख खान 'SRK' या टोपण नावाने ओळखला जातो. आपल्या मर्कटचेष्टा आणि विवादास्पद वक्तव्ये करून सवंग प्रसिद्धी मिळवणारा हा 'SRK'. परंतू या 'SRK' च्या जन्माआधीपासून एक 'SRK' फार प्रसिद्ध होता. केवळ प्रसिद्धच नव्हे तर लोकप्रिय सुद्धा. विशेषत: कामगारांमध्ये लोकप्रिय. हा 'SRK' म्हणजे “एस आर कुळकर्णी” अर्थात श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी. तसे हे नाव सामान्यांमध्ये कमी माहित असलेले नांव. गोदी कामगार मात्र हे नांव कदापीही विसरू शकणार नाही. गोदी कामगार म्हटल्यावर इतर लोक त्या क्षेत्रापासून अनभिज्ञ आणि किनारपट्टीपासून कोसो दूर असलेल्या विदर्भातील जनतेला हे नाव माहीत असण्याचे काही कारणच नाही.परंतू आपल्या कार्याद्वारे , निस्पृह्तेच्या गुणाद्वारे संघटनेतील लोकांच्या मनावर राज्य करणा-या, ”स्व” बाजूला ठेवून केवळ कामगार हितासाठी लढणा-या व्यक्तीबाबत आजच्या स्वार्थ प्रथम पहाणा-यांच्या जगात सर्वांनाच माहिती असावी.

'SRK' यांचा जन्म १९२७ ला झाला. त्यांनी साने गुरुजींच्या प्रेरणेने १९४२ च्या आंदोलनात सहभाग घेतला होता आणि वयाच्या १४ व्याच वर्षी ९ महिन्याचा तुरुंगवास भोगला होता. १९४६ मध्ये गोदीतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करण्याच्या संघर्षात त्यांनी सहभाग घेतला होता. “सामोपचाराचा संघर्ष” ही पद्धत त्यांनी गोदी कामगारांच्या मागण्यासाठी वापरली होती. कामगारांना हिंसक बनवले नव्हते. बुद्धीने अत्यंत तल्लख, प्रखर स्मरणशक्ती कित्येक कामगारांची नावे स्मरणात असलेला, कामगारांची सेवा करीत असेलेला हा महाराष्ट्रातील कामगार नेता वृद्धापकाळात  देखील कामगारांची काळजी घेत होता. त्यांच्यातील गुणांची दाखल आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली गेली होती आणि १३७ सदस्य देश आणि ६० लाख सभासद असलेल्या आशिया पॅसिफिक लेबर युनियन चे ते चेअरमन होते. गोदी प्रमाणेच एअर इंडिया. नाशिक सिक्युरीटी प्रेस येथील कामगारांना सुद्धा त्यांनी संघटीत केले होते. कार्यालयाने कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावयास लावून त्यांचे नुकसान केल्यावर कामगारांना सेवानिवृती वेतन लढा देवून त्यांनी मिळवून दिले होते. एस आर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन असले तर सरकारला सुद्धा धडकी भरत असे. स्वत:च्या लाभाच्या पोळ्या शेकणा-या कामगार नेत्यांच्या उदयानंतर सुध्दा एस आर कुलकर्णी निरपेक्ष भावनेने कामगारांसाठी झटतच राहिले. देशात इंग्रजांची सत्ता असूनही कामगारांची संघटना उभी करणे म्हणजे एकप्रकारे राजद्रोह्च. परंतू एस आर कुलकर्णी यांनी ते शक्य केले १९५४ साली त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियन या संघटनेचे नेतृत्व आले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर असलेल्या डॉक वर्कर्स युनियनचे सुद्धा त्यांनी नेतृत्व केले. स्वतंत्रता पुर्वकाळापासून कामगारांसाठी लढा देणा-या या डॉक कामगार नेत्याला १९ डिसेंबर ला कामगारांपासून काळाने हिरावून नेले. तसे एस आर कुलकर्णी यांची विचारसरणी सुद्धा “निस्पृहस्य तृणं जगत्” या प्रकारची होती. जग म्हणजे त्यांच्यासाठी एक गवताची काडीप्रमाणे होते. तरुणांनी जरूर मनोरंजन म्हणून 'SRK' (शाहरुख खान ) कडे पहावे परंतू प्रेरणा घ्यावी , आदर्श ठेवावा तो निष्पृह कामगार नेते 'SRK' म्हणजेच एस. आर. कुळकर्णींचा.       

१६/१२/२०१६

Article On Corrupts Banks and Bank officers who involved in unauthorized currency distribution after demonitization


'प्यारे देशवासी'च नालायक
मा. नरेंद्र मोदीजी
सविनय नमस्कार
सर्वप्रथम आपण देशासाठी काहीतरी करू ईच्छिता यासाठी आपले अभिनंदन आणि आभार.

8 नोव्हेबर 2016 रात्री 8 वा. “ 500 और 1000 की नोट आज से बस एक कागज का तुकडा है” असे आपण जाहीर केले. सर्व देशात एकच गडबड सुरु झाली.जनेतेने आपल्या नोटांचे व्यवस्थापन करणे सुरु केले. सुरुवातीला विरोधकांनी सुद्धा निर्णयाचे स्वागत केले. एकूण चलनाच्या 86% असलेल्या 500 व 1000 च्या नोटांचे चलन बाद झाले आणि 2000 व 500 च्या नवीन नोटा वितरीत करणे सुरु झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात ATM Calibration करणे सुरु झाले कारण नवीन नोटांसाठी तसे करणे आवश्यकच होते. हुशार काळा पैसा बाळगणा-यांनी आपल्या नोटा बदलण्यासाठी एजेंट नेमले. मोठ-मोठ्या रांगा देशभर दिसू लागल्या. जेंव्हा बोटांवर काळी शाई लावणे सुरु झाले तेंव्हा या नोटा बदली करणे बंद झाले. नोटा बंदी होऊन 20-25 दिवस झाले तरी सुद्धा जेवढे पाहिजे तेवढे चलन खेळते झाले नाही. याचे कारण म्हणजे “कुंपणच शेत खाते” हे होय. मोदीजी कदाचित आपण विचार सुद्धा केला नसेल की ज्या सामान्य जनतेसाठी आपण Demonitization केले त्याच सामान्य जनतेला भ्रष्ट बँक अधिकारी आणि काळे पैसे वाले यांनी वेठीस धरले. या भ्रष्ट लोकांनी करोडो रुपये मागच्या दरवाजाने पांढरे करणे सुरु केले, नोटा ATM मध्ये येण्यापुर्वीच या लबाड धनदांडग्यांजवळ करोडो रुपयांच्या संख्येत जाऊन पोहचत होत्या. सर्वात प्रथम चेन्नई येथील छाप्यात नवीन नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या नंतर अनेक शहरात त्या सापडत आहेत. याचा अर्थ काय ? मोदीजी एकीकडे आपल्या निर्णयामुळे सामान्य प्रमाणिक जनता रांगेत असूनही, त्याना त्रास होत असूनही आपला निर्णय चांगला आहे हेच म्हणत आहे. तर दुसरीकडे काळे पैसेवाले नाना क्ल्पृत्या करून आपले धन पांढरे करीत आहे.  काही भ्रष्ट बँकानी व तेथील कर्मचा-यांनी जुन्या नोटांद्वारे धनाकर्ष काढून, 25 % कमिशन घेऊन नंतर धनाकर्ष रद्द करून नवीन नोटा लबाड धनदांडग्यांना दिल्या.जमा झालेल्या नवीन ग्राहकांच्या कागदपत्रांद्वारे नवीन खाते बनवून त्यात पैसे जमा करून ते काढून देण्यात आले. रिजर्व बँकेचा एक अधिकारी सुद्धा या नवीन नोटा अनाधिकृतरीत्या वितरीत करतांना पकडला गेला. मोदीजी आपण देशासठी सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहात, गरीबांसाठी खरोखर काही तरी करू ईच्छित आहात परंतू एक कटू सत्य हे आहे की अनेकांच्या गुलामीत राहण्याची सवय आणि मानसिकता असलेल्या तसेच भारत स्वतंत्र झाला तेंव्हापासून संरक्षण खात्यातील जीप खरेदी प्रकरण, नगरवाला प्रकरण, बोफोर्स , हर्षद मेहताची सूटकेस , 2. जी स्पेक्ट्रम , कोळसा तसेच विविध राज्यांतील विविध घोटाळे असे अनेक घोटाळे या देशातील जनता पाहत आली आहे. या सततच्या घोटाळ्यांमुळे येथील जनता सुद्धा “यथा राजा तथा प्रजा’ या म्हणीप्रमाणे काहीही करा पण पैसे मिळवा या मानसिकतेची झाली आहे. अद्याप एकही आरोप न झालेले राजे म्हणजे लालबहादूर शास्त्रीं नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि तद्नंतर जनता आपल्यालाच पाहत आहे. मोदीजी या अशा जनतेस वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यातील देशप्रेम जागृत करण्याचे आपण सतत प्रयत्न करीत आहात परंतू बँकांमध्ये येणारे नवीन चलन गैरमार्गाने काळे पैसेवाल्यांना देणे आणि सामान्यांची पिळवणूक करणे यावरून हेच सिद्ध होते की ज्यांच्या भल्यासाठी, काळ्या पैस्याचा अटकाव करण्यासाठी , कॅशलेस व्यवहार होण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहात ते आपले प्यारे देशवासीच नालायक आहेत.     

०८/१२/२०१६

Story on invention of biodegradable plastic carry bag by Indian origin industrialist Ashwath Hegde of Maglore current location Quatar

विरघळणा-या कॅरीबॅग !

दिवसेंदिवस काही ना काही नवीन शोध लागत आहेत. आज जे “गॅजेट” आहे ते महिना सहा महिन्यात जुने होत आहे. नवीन भ्रमणध्वनी, नवीन संगणक उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यात तर क्रांती झाली आहे. गंमत अशी की आजचे उपकरण हे जुने झाल्याने त्याला काही किंमत राहत नाही आणि मग अशा वस्तूंचा होतो “ई कचरा”. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक असा हा कचरा होय. पर्यावरणास भेडसावणारी आणखी एक मोठी समस्या ती म्हणजे प्लास्टिक कॅरीबॅगची. कॅरीबॅग म्हणा अथवा प्लास्टिकच्या इतर काही वस्तू .प्लास्टिक हे कधीही नष्ट होत नाही आणि त्यामुळे ते जमिनीस फार हानिकारक ठरत आहे. आपल्याकडे तर आणखी एक समस्या आहे. ती म्हणजे गायींची. आपल्याकडे मालकांनी गायी केवळ नावापुरता पाळल्या असतात आणि त्या मोकाट सोडून दिलेल्या असतात.या मोकाट गायी बहुतांश हमरस्त्यांवर रहदारीस अडथळा करतांना किंवा उकीरड्यावर आढळून येतात. उकीरड्यांवर या गायींच्या पोटात मग प्लास्टिक कॅरीबॅग जातात. गायींचे आरोग्य खराब होते. गोहत्याबंदी योग्य आहे परंतू गोपालन सुद्धा व्यवस्थितरीत्या केले पाहिजे. प्लास्टिक कॅरीबॅगवर जरी बंदी असली तरी विशिष्ट जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग सुरूच आहेत. जाड असो वा बारीक प्लास्टिक कॅरीबॅग ही घातकच आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण, तो अविघटनशील पदार्थ आहे. पर्यावरण बचावासाठी आता अनेक लोक,उद्योग,सामाजिक संस्था तसेच सरकार सुद्धा पुढे सरसावले आहेत. शाळा- महाविद्यालयात आता पर्यावरण हा विषय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पर्यावरण रक्षणाची जागृती झाली आहे. आणि आता आणखी एक चांगली बातमी म्हणजे भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने आता पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक शोधून काढले आहे. विशेष म्हणजे हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होत नाही.मूळच्या मंगलोरच्या परंतू आता कतार येथे स्थित असलेल्या अश्वथ हेगडे यांच्या एन्वीग्रीनया कंपनीने बायोडिग्रेडेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून त्यांनी या पिशव्या तयार केल्या आहेत. हा अभिनव शोध लावणा-या हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या लवकरच भारतात विक्रीसाठी आणण्याची त्यांची मनीषा आहे. यावर्षांच्या अखेरपर्यंत या पिशव्या भारतात विक्रीसाठी आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे.या पिशव्या जवळपास  ३ रुपयांच्या दरात बाजारात उपलब्ध होतील. या पिशव्या २४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळणा-या असतील. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनलेली आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे.आपण सर्वानी पर्यावरण बचावासाठी आपापल्यापरीने प्रयत्नशील रहायला हवे. हेगडेंसारख्या उद्योजकाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार की ज्यांनी स्वत:च्या व्यवसायातून पर्यावरण बचावाचे कार्य सुरु केले आहे.“विरघळणा-या कॅरीबॅग” सारख्या अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणल्यास भारत प्लास्टिकमुक्त होवू शकेल.

०१/१२/२०१६

Revolvers shown to each other in Maharashtra by leaders

.......हे वागणं बर नव्हं !

बंदूक म्हटले की ती पूर्वी सैनिक आणि पोलीसांजवळच असायची. लहान  मुलांना खेळण्यातील आणि फार फार तर आनंद मेळ्यात फुगे फोडण्याची बंदूक असायची. आता मात्र बंदूका आणि बंदूका बाळगणा-यांचा सुळसुळाट झाला आहे. सुमारे एका वर्षापूर्वी एक मंत्री महोदय कंबरेला ‘रीव्हॉल्वर” लाऊन जाहीर समारंभात गेले होते आणि आता स्वत:ला “राष्ट्रवादी” समजणा-या दोन नेत्यांनी जाहीर मेळाव्यात एकमेकांविरुद्ध बंदूका रोखल्या. एकाच पक्षातील नेते असे वागत असतील तर यास काय म्हणावे? तसे आता पक्ष, निष्टा इत्यादी शब्द कागदोपत्रीच शिल्लक राहिले आहेत म्हणा. एकीकडे एकाच पक्षातील नेते जाहीर समारंभात बंदूका काढतात तर दुसरीकडे सरकार मध्ये सामाविष्ट असणा-यांची एकमेकांविरुद्ध शाब्दिक गरळ ओकणे सतत सुरु असते. खरेच “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा”? बंदूका, हाणामा-या म्हटल्या की पूर्वी बिहार आणि उत्तरप्रदेश नजरे समोर तरळायचे. आता मात्र आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील नेते जनते समक्ष एकमेकांवर बंदूका रोखतांना दिसत आहेत. ज्यांच्या कडून देश चालविण्याच्या अपेक्षा असतात ते बंदूका चालवण्याचे पहात आहेत, ते सुद्धा आपल्याच पक्षातील नेत्यावर एवढे वाईट चित्र असेल तर उद्या हे नेते जनतेला बंदुकीने उडवण्यास कमी करणार नाही. मान्य आहे तुम्हे परवाना धारक बंदूकधारी असाल म्हणून काय सतत बंदूक घेवून निघायचे? बंदूक बाळगण्याचा परवाना हा आत्मसंरक्षणासाठी मिळत असतो स्वकीयांविरुद्ध बंदूका रोखण्यास नव्हे. आणि हो तुम्हाला बंदूका रोखण्याची फारच खुमखुमी असेल तर जा ना सीमेवर उगारा बंदूका दहशतवाद्यांवर. तसे कराल  तर ती खरी मर्दुमकी. येथे केवळ धाक दाखवण्यासाठी बंदूक काढता ? येथे काही जंगलराज नाही आहे की ज्याप्रमाणे जंगलात एका वाघाच्या क्षेत्रात दुसरा वाघ जाऊ शकत नाही त्याप्रमाणे नेतेही जाऊ शकत नाही.तुम्ही एकच पक्षातील आहात एकमेकांना तुम्ही पाण्यात पहाता तेथे जनतेचे काय भले पहाणार आहात ? पूर्वीच्या गांधी विचारसरणीच्या पक्षातून फुटून स्वत:च्याच समर्थकांनी घोषित केलेल्या ‘जाणत्या राजाच्या’ नेतृत्वात तुम्ही वेगळी चूल मांडली. जरी वेगळे झाले तरी तुम्हीसुद्धा गांधींची अहिंसेची विचारसरणी मानता. एकीकडे महात्मा गांधींची विचारसरणी दाखवायची आणि दुसरीकडे स्वकीयांविरुद्ध बंदुका काढायच्या हे दुट्टपी वागणे जनतेला आता चांगले कळते आणि म्हणूनच तुम्ही सध्या सत्तेपासून दूर झालेले आहात. तुमच्या अशा वर्तनामुळे तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यातून काय शिक्षा होईल किंवा दंड होईल तो होवो. तसेच पक्षांतर्गत कारवाई होईल की नाही ते सुद्धा देव जाणे कारण तुमच्यापैकी  एक ‘नबाब’ आणि दुसरे “दीनांचे” पुत्र. नबाबावर कारवाई कोण करणार? “वोटबँक” पण सांभाळावीच लागते ना ! सोबतच “दीन” दुबळे व त्यांच्या पुत्रांची मते पण सांभाळावी लागतात . त्यामुळे सरकारी किंवा पक्षांतर्गत कारवाई काहीही होणार नाही आणि झालीच तर थातूर-मातूर होईल आणि तुम्ही पुन्हा मोकळे. जनता काय जनता सर्व विसरतेच.आणि हो जर तुम्हाला एखाद्या भागात किंवा मतदारसंघात स्वत;चे श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व सिद्ध करायचे असेल तर ते विकास कामे करून सिद्ध करा ना ! आज मुंबईच्या पदपथांची निव्वळ वाट लागली आहे. पावसाळ्यात किती दुरवस्था होते आणि इतर अनेक या समस्यांकडे कानाडोळा  करायचा आणि जाहीर मेळाव्यात असे वागायचे ? अहो नेते बुवा देशात होते आहे शोभा हे वागणं बर नव्हं !            
 

२५/११/२०१६

Article on Municipal Election

....आणि ते दिसू लागले
गेल्या १५ ते २० दिवसांपासून म्हणा किंवा नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर म्हणा काही ना काही चहल पहल सुरू झालेली आढळून आली.अनेक ठिकाणी नळांसाठी रस्त्यांवर खोदलेल्या नाल्यांची डागडुजी केल्यागेली, ती दोनच दिवसांत पुन्हा जैसे थे झाली तो भाग वेगळा. काही भागात तुंबलेल्या नाल्या मोकळ्या केल्या गेल्या, तर काही भागात सुशिक्षितांनी रस्त्यावर, ‘ओपन स्पेस ‘ मध्ये सोडलेल्या सांडपाण्याची योग्य यवस्था करण्यात आली. वास्तविक पाहता ही सर्व रखडलेली कामे संबंधितांच्या कार्यकाळात होणे अपेक्षित असते परंतू ही कामे केली जातात ऐन कार्यकाळ संपुष्टात येणाच्या दिवासांत. हे म्हणजे असे झाले की ज्या प्रमाणे एखाद्या ढप्पू विद्यार्थ्याचा अभ्यास सुरु होतो तो ऐन परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर शाळा कालावधीत तो विद्यार्थी उनाडक्या करीत असतो आणि ऐनवेळी केलेल्या अभ्यासामुळे त्याच्या याशप्राप्ततेची शाश्वती नसते. तसेच एकदा का कोणतेही पद मिळाले की बरेचेसे  लोक मोकळे होवून जातात. त्याना ज्या कार्यासाठी ज्या जनतेने निवडले असते त्या जनतेला ते नंतर दिसत सुद्धा नाही किंवा यतकदाचित रस्त्यात कुठे नजरा नजर झाली तर नमस्कार तर सोडाच साधे ‘स्माईल’ सुद्धा देत नाही. अर्थात याला काही सन्मानीय अपवाद सुद्धा आहेत. परंतू ते संख्येत अतिशय अल्प. उमेदवारीच्या काळात लोकाना भेटायचे, लक्ष असू द्या म्हणायचे, प्रणाम करायचे आणि एकदा का पद मिळाले की मग दोन बोके आणि एक माकड यांच्या गोष्टीतील माकड जसा हुशारीने खव्याचा वाटा खात राहते आणि बोके बिचारे तळमळतच राहतात त्याप्रमाणे ठेकेदारीतून कसा वाटा मिळवता येईल याच्याच शोधात राहायचे आणि जनतेला तळमळतच ठेवायचे हेच वर्षानुवर्षे सुरु आहे.कार्यकाळ संपत आला की पुन्हा थोडेफार कार्य करीत आहोत असे प्रदर्शित करायचे. आज सर्वच छोटी शहरे बकाल झालेली आहेत खामगावात पूर्वी यशवंत टॉवर अर्थात भारत रत्न राजीव गांधी उद्यान, नटराज गार्डन, जनुना तलाव अशी उद्याने मोठ्या दिमाखात आपले सौंदर्य दाखवीत होती आज नटराज गार्डन वगळता उर्वरीत दोन उद्यानांची दशा बघवत नाही. नळाचे कनेक्शन आले परंतू पाणी नाही पाण्याआधी पाणीपट॒टीचे देयक येवून धडकले. सियाराम चौक ते लायन्स ज्ञानपीठ किंवा सावजी ले-आउट कडे जाणारा रस्ता वर्षानुवर्षे खराबच असतो. रायगड कॉलनीतून घाटपुरीकडे जाणारा रस्ता एक ते दीड वर्षातच पुन्हा खराब होत आहे. शहरात जवळपास वीस हून अधिक जुन्या पक्क्या पाण्याच्या विहिरी आहेत त्या निव्वळ कचरा कुंड्या झाल्या आहेत.अशा नानाविध समस्या आहेत परंतू निर्वाचितांचे काहीही एक लक्ष याकडे नाही. शहर आपले आहे ते सुंदर दिसले पाहेजे, आपल्याला जनतेने त्याच कार्यासाठी प्रतिनिधित्व दिले आहे ही भावना सुद्धा यांच्या ध्यानी मनी नसते. कार्य करीत नसतील तर परत बोलावण्याच्या अधिकार आपल्या देशातील जनतेला नाही आहे ना म्हणून हे लोक निश्चिंत असतात. सत्ते साठी भ्रष्ट युती करायच्या, स्वजनांना डावलून  कोलांटी उड्या मारणा-यांना पुढे आणायचे विकासभिमूख मात्र काहीही नाही.पाच वर्षातून एकदा ताई, माई आक्का झाले पद प्राप्ती झाली की हे मोकळे आणि मग ते जनतेला पुन्हा पाच वर्षानंतर दिसू लागतात जसे आता ते दिसू लागले आहेत. 

                                                            विनय वरणगांवकर

१३/१०/२०१६

Article on the language used by politicians


गाडी “रेड लाईट” ची...भाषा “रेड लाईट एरिया” ची
            सुसंस्कृत म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रात दिवसेंदिवस राजकारणाची पातळी खालावते आहे.लोकप्रतिनिधी कर्मकां-यांना काय मारतात, असभ्य, अश्लाघ्य भाषेत भाषणे काय ठोकतात त्यांचा तोल केंव्हा ढासळेल काही नेम नसतो.दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्यास त्याच्या बोलण्याचे परिणाम भोगावे लागले होते. ते नेते त्यांच्या बोलण्यामुळे आजही पश्चातापदग्ध आहेत. आता त्याच नेत्यावर सत्त्ताधारी पक्षातील मंत्र्याने गरळ ओकली.”भगवानाच्या” पायथ्याशी जमलेल्या नेत्यांनी जनतेसमोर भाषणे ठोकली आणि विजया दशमीला विजय मिळवल्याचे समाधान सुद्धा मिळवून घेतले. परंतू येथील भाषणांमुळे महाराष्ट्र राज्यातील राजकारण मात्र निम्न दर्जाचे झाले हे स्पष्ट दिसून आले. ज्यांच्यामुळे काही लोक मंत्री पदावर पोहचून “रेड लाईट” गाडीत विराजमान झाले त्यांनी स्वत:चा मोठेपणा, अभिमान दाखवून दिला. तर ज्यांना “रेड लाईट”ची गाडी मिळाली त्यांनी त्यांची भाषा, मग्रुरी दाखवून दिली. महाराष्ट्रात पूर्वी असे नव्हते. शरद पवार यांची काही मदत शिवसेनेला झाली तर त्याचा गवगवा होत नसे, किंवा शरद पवार मोठेपणा दाखवत नसत. मा. बाळासाहेब ठाकरेंमुळे कित्येकांना “रेड लाईट” गाडया मिळाल्या होत्या परंतू त्यांनी कधी अभिमानाने तसे जाहीर भाषणात बोलुन नाही दाखवले. “भगवानाच्या” समाओर मात्र अभिमान, तोरा सर्वच दिसून येत होते. विजया दशमीला शत्रूचा नायनाट करून सर्वांप्रती आदर प्राक्त करावयाचा असतो, आपट्याचे पानं सोने म्हणून देवून नम्र व्हावयाचे असते नेमके त्याच दिवशी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यावर असभ्य भाषेत दिका केली. महाराष्ट्रातील जनतेला वाटले होते की गरीबीतून वर आलेला नेता आहे परंतू सब “जानकर भी अंजाना” अशी यांची वागणूक आहे. आपण सर्व मेळावे घेता तेंव्हा त्या मेळाव्यात तुम्ही काय विकास केला, तुमची पुढील धोरणे काय आहेत, तुमच्याशी संबंधीत खात्यांमध्ये तुम्ही काय भरीव कामगिरी केली हे ऐकण्याची जनतेची अपेक्षा असते. परंतू तुम्ही      जनतेसमोर केवळ स्वस्तुतीपर आणि दुस-याची निंदा नालस्ती करणारेच भाषण ठोकत असता.लोकप्रतिनिधींचा आदर कर्मचा-यांनी करावा असे काहीसे परिपत्रकच निघाले होते परंतू तुमच्या अशा वागणूकीमुळे तुमच्या कार्यकर्त्यांखेरीज तुमचा आदर कोण करेल ही शंका आहे. तुम्ही जेंव्हा चांगली,आदर्श वागणूक ठेवाल तेंव्हाच जनता तुम्हाला मान सन्मान देईल.कुठेही असो कुणा बाबतही असो योग्य उद्गार काढा. अनुद्गार जाहीररीत्या काढल्याने जनतचे मनोरंजन होते परंतू जनता नंतर मात्र तुम्हाला त्याचे फळ देतेच. आपण सुसंस्कृत राज्य म्हणून मिरवतो त्या राज्याचा, राज्यातील महापुरुषांचा आदर्श लक्षात असू द्या. निव्वळ शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र नुसते म्हणून चालत नसते तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सारखी वागणूक सुद्धा असावी लागते. कुणी शिव्या काय देते, कुणाला लघुशंका काय आठवते, कुणाला दस नंबरी नागीन काय आठवते. महाराष्ट्र असा नव्हता. यशवंतराव,वसंतराव असे नेते या महाराष्ट्रानी पहिले, सेतू माधवराव पगडी, एस एम जोशी यासारखे संयमी व्यक्तिमत्वे बघितली अगदी आताचे बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विरुद्ध काय नाही ते बोलले गेले परंतू त्यांनी ब्र सुद्धा काढला नाही असे लोक आपल्या महाराष्ट्रानी पाहेले आहेत त्यामुळे त्यांचा आदर्श अंगी बाणवा. तुम्हाला तुमच्या स्वकर्तुत्वाने असो वा इतर कुणामुळे जी “रेड लाईट” ची गाडी मिळाली आहे ती गाडी मिळण्यास जनता सुद्धा कारणीभूत आहे हे विसरू नका. “रेड लाईटच्या“त्या गाडीत विराजमान होऊन तुम्ही लीन व्हा, तुमच्या जिभेवर, भाषेवर नियंत्रण राखा “रेड लाईट एरिया” मधील भाषेप्रमाणे भाषा वापरू नका नाहेतर जनता तुम्हाला ट्रॅफिक चा “रेड लाईट” दाखवून थांबवून टाकेल.


लोगोका दिल, अगर, हाँ जितना हो तुमको तो, बस मिठा मिठा बोलो

०६/१०/२०१६

Article after the wrong and inappropriate statements by opposition leader about "Surgical Attack" against terrorist of POK

“संजय” उवाच
            महाभारत या महाकाव्यात अनेक पात्रे होती. व्यासांनी प्रत्येक पात्राला विशिष्ट अशा खुबी प्रदान केली आहे. प्रत्येका जवळ काही तरी विशेष गुण अथवा कला व्यासांनी दाखवली आहे. त्यापैकीच एक पात्र होते संजय.धृतराष्ट्राचा सारथी आणि सल्लागार असलेल्या संजयला सुद्धा एक कला अवगत होती.ती म्हणजे त्याला दूरवरचे पाहण्याची. अगदी आताच्या दूरदर्शन प्रमाणे.संजय ह्यास कुरुक्षेत्रातील युद्ध राजमहालात बसल्या बसल्या दिसत होते आणि ते तो धृतराष्ट्रस सांगत असे.त्याला दिव्यदृष्टीचे वरदान होते,तो जवळपास ८० किमी अंतरावरचे पाहू शकत असे.म्हणूनच संजय कुरूक्षेत्रा पासून दूर असलेले युद्ध, आक्रमण पाहून कुरुक्षेत्रावर खरोखर युद्ध होते आहे हे धृतराष्ट्राला सांगणारा,वर्णन करणारा एकमेव पुरावा धृतराष्ट्राजवळ होता.धृतराष्ट्र अंध असल्याने तो काही व्हीडिओ पाहू शकला नसता आणि तेंव्हा तसे तंत्रच मुली नव्हते  त्यामुळे त्याला संजयावर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त होते.आज उलट आहे सर्व म्हणतात भारतीय सैन्याने हल्ले केले आणि एकटा “संजय” नाही म्हणत आहे.आताच्या “संजय” जवळ “सर्जिकल स्ट्राईक” प्रत्यक्ष पाहण्याची दिव्यशक्ती नाही.त्यामुळे मग त्याला सर्जिकल स्ट्राईक कसे दिसणार? म्हूणून मग त्याने परवा सर्जिकल स्ट्राईकचा व्हीडिओ मागितला.त्यातच आताचा हा “संजय” विरोधी पक्षाचा आहे.या कोणतीही “उपमा” न देता येवू शकणा-या “निरुपमेय” संजयास काय सांगावे? एका पक्षाशी एकनिष्ठ न राहता हा स्वत: दुस-या पक्षाच्या वळचणीला जावून बसला.तेथे त्यांच्याच एका मासिक का पाक्षिकात याने त्यांच्याच वारीष्टांची खिल्ली उडवली होती.त्यामुळे त्याला सध्याच्या पक्षात तशी फारशी किंमत नाही. तेथे तो “मुहाजीरच” आहे. मग अशा माणसाला अजून काय सुचणार? ठीक आहे या संजयच्या म्हणण्यानुसार सर्जिकल स्ट्राईक चा पुरावा हवा. मान्य आहे अरे पण तुझ्या पक्षाला नको हवा आहे ना ! आणि तुझ्यासारखे,ओम पुरी सारखे,आजू-बाजूला सर्वत्र चिखल आणि आपणच तेवढे निर्मळ आहोत असे चिखलातूनच उगवणारे ‘अरविंदां’ सारखे विरोधी या देशांत आहे त्याचे पाकड्यांना चांगलेच फावते आहे.अहो सर्जिकल स्ट्राईक तर झाले आहेच परंतू नसते जरी झाले तरी आपण सर्वानी पक्षभेद वापरून एक होवून सर्जिकल स्ट्राईक झालेच आहे असेच म्हणायला हवे.तसे केले तर जगात भारतात पाकिस्तान हा देश दहशतवाद पोसणारा देश आहे हे समजेल ना ! मा. पंतप्रधान पाकिस्तानला एकाकी पडण्याचा प्रयत्न करीत आहे तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढेल.परंतू तेवढे शहाणपण तुम्हाला कसे सुचणार?तुम्हाला तर राज्यातील आगामी निवडणुकांची भीती ! म्हणून मग तुम्ही देशहित सुद्धा बाजूला सारले आहे.अहो अमेरीकेचे उदाहरण पहा जरा ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यावर तेथील विरोधी पक्षातील लोकांनी तुमच्या सारखी बेताल वक्तव्ये केली नव्हती. तुम्ही निव्वळ “बालिश बहु बायकांत बडबडला” सारखे महाभारतातील “उत्तर” सारखे “आम्ही पण केले होते सर्जिकल स्ट्राईक” असे लहान मुला प्रमाणे आता सांगत सुटला आहात. तेंव्हा काय झाले होते सांगायला? परंतू उशिराने सुचलेले शहाणपण हे हास्यास्पद असते हे सुद्धा समजत नसावे काय?

      सर्व पक्षीय प्रतिनिधी, जनता यांनी ध्यानात ठेवावे की इतर कोणत्याही मुद्द्यावर भांडा परंतू पाकिस्तान विरोधात एकजूट राहा.आताच्या “संजयाने” महाभारतातील “संजय” सारखी दिव्यदृष्टी जरी त्याला नसली तरी इतरांबाबतचा, देशाबाबतचा, देशहिताचा दृष्टीकोण तरी निदान चांगला असू द्यावा हे ध्यानात ठेवावे.               

११/०९/२०१६

Reasons of frequent attack on Maharashtra Police

खलनिग्रहणाची वेळ आली आहे   
ज्ञानेश्वर माऊलींनी 800 हून अधिक वर्षांपूर्वी “जे खळांची व्यंकटी सांडो” असे म्हणत पसायदान मागितले होते.ते आजही मागावेच लागत आहे कारण काही दिवसांपूर्वी विलास शिंदे या पोलिसाचा एका तरुणाने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला.त्यानंतर परवा कल्याण जवळील तिसगाव येथे गणपती विसर्जन करतांना नितीन डगळे या पोलिस उपनिरीक्षकास बुडवून मारण्याचा प्रयत्न केला गेला.सुदैवाने नितीन डगळे बचावले.गायकवाड आडनाव असलेल्या चार आरोपीना अटक झाली आहे.हे आरोपी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक असल्याचे सांगितले जाते.काल सुद्धा एका दुचाकीस्वाराने पोलिसास धडक देवून पोबारा केला.या सर्व घटनांपूर्वी एका महिला पोलिसाने हटकले तर त्यांना एक शिवसेनेच्या पदाधिका-याने भर चौकात गाडीतून खेचून मारले होते.गोंदिया का भंडारा येथे एका आमदाराने पोलिसाला मारण्याची चित्रफीत वाहिन्यांवरून झळकली होती.अशा नाना घटना घडल्या.खल प्रवृत्तींची मजल थेट सदरक्षण करणा-या पोलिसांवरच हल्ले करण्यापर्यंत गेली.तेथे सामान्य नागरिकांचे काय?समाजात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.राज्याचे पोलीस महासंचालक यांनी तरुणांना सरकारी नोकरी,पारपत्र मंजुरी आणि इतर शासकीय कामकाजात असे हल्ले केल्याने अडथळे येतील असे स्पष्ट केले.अशा प्रकारांसाठी “फास्ट ट्रॅक” न्यायालय सुरु करण्याचे सुरु झाले.मुळात असे हल्ले का होत आहे?याची सुरुवात कशी काय झाली? या हल्यांची कारणे शोधण्याचे जर ठरवले तर आपणास मुख्यत: पुढील तीन कारणांत या ह्ल्यांचे मूळ असल्याचे लक्षात येते.
पहिले कारण म्हणजे लोकप्रतिनिधींनी सरकारी कर्मचा-यांवर केलेले हल्ले याच्यातून हे हल्ले वाढले.आपले नेते कर्मचारी, पोलीस यांना अगदी कस्पटासमान मानतात तर मग आपण सुद्धा काही केले तर काय बिघडणार?असा कार्यकर्त्यांचा भ्रम झाला त्यांच्या अंगात सुद्धा “जोश” आला आणि मग सरकारी कर्मचारी आणि आता पोलिसांवर सुद्धा हल्ले होण्यास सुरवात झाली.
दुसरे कारण म्हणजे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या आपल्या बोधवाक्याचा खुद्द पोलिसांनाच पडलेला विसर.सामान्य पांढरपेशा नागरिकांशी पोलीस सुयोग्य वर्तन करतांना दिसत नाही असे बरेचदा घडते.पांढरपेशा वर्ग त्यांच्या पाल्यांना लहानपणापासूनच पोलिसांचा धाक, भीती दाखवत असतो.त्यामुळे पांढरपेशा वर्ग काही न करता सुद्धा पोलीस म्हटले की घाबरतोच आणि मग पोलिस त्यांनाच अधिकच धाक दाखवतात.अशातच मग एखादा आपली सहनशक्ती गमावतो आणि हल्ला करतो.
तिसरे कारण म्हणजे आपली हिंदी चित्रपटसृष्टी.हिंदी चित्रपटातून पोलिसांचा जेवढा अपमान करतात तेवढा इतर कुणाचा अपमान होतांना चित्रपटातून दिसून येत नाही.त्यामुळे पोलीस म्हटला की तो भ्रष्टच असा समज आता नागरीकांचा झाला आहे.तसेच या चित्रपटांचा प्रभाव समाजातील खल प्रवृत्ती असेलेल्या लोकांवर सुद्धा पडतो आणि मग ते चित्रपटा प्रमाणेच प्रत्यक्षात सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात.तरीही पोलीस विभाग याच चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांना किंबहुना विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या नट-नट्यांना नाचवण्याचे कार्यक्रम घेतोच.

अशी काही कारणे आहेत इतरही अनेक करणे असू शकतात, असतीलही. असे हल्ले होणे हे कायद्याचा धाक राहेला नाही हे सूचित करणारे आहेत.यावर सरकार, गृह मंत्रालय, पोलीस विभाग त्वरने उपाय शोधतील कारण आता त्यांच्यावरच हल्ले होत असल्यामुळे सामान्य नागरिकांवर हल्ला झाल्याने काय शारीरिक आणि मानसिक यातना होत असतील याची त्यांना कल्पना आली असेल. तेंव्हा पोलिसांनी आता आत्मपरीक्षण करून समाजात पुनश्च आपला आदरयुक्त दरारा निर्माण करावा आता खरेच खलनिग्रहणाची वेळ आलेली आहे.   

०२/०९/२०१६

Sad Story of Dana Manzi of Orisa state

दोन मांझी आणि संवेदनाहीन आपण     
      बातमी जरी ओडीसा मधील असली तरी संवेदनाहीन आपण असेच म्हणावे लागेल.कारण देश हा माणसांचा बनलेला असतो. या नात्याने मग आपण सर्वच संवेदनाहीन नाहे काय? कटू आहे परंतू सत्य आहे की आपण भारतीय दिवसें-दिवस संवेदनाहीन बनत चाललो आहोत. त्यातल्या त्यात वैद्यकीय सेवा म्हटली की विचारूच
नका. बिहार मध्ये पत्नीला वैद्यकीय सेविका त्वरीत पुरवता आली नाही म्हणून मोठा पहाड एकट्याने फोडून रस्ता करणा-या “माऊंटन मॅन” दशरथ मांझी याचा किस्सा नुकत्याच एका चित्रपटाने जागा समोर आणला आणि आता अजून एका दुस-या मांझीचा किस्सा जागा समोर सोशल मिडीयाने आणला. हा दुसरा मांझी म्हणजे ओरिसा राज्यातील दाना मांझी. क्षय रोगाने ग्रस्त पत्नीला रुग्णालयात भरती केल्यावर तिचा तेथे मृत्यू झाला. मांझीचे खेडे रुग्णालयापासून ५० ते ६० किमी अंतरावर. रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. मांझी कितीतरी वेळे प्रतीक्षा करीत तेथे थांबला परंतू रुग्ण आथवा त्याचे आप्त यांची आस्थेने, आपुलकीने चौकशी करतील ते रुग्णालयाचे कर्मचारी कसले? मांझी शेवटी कंटाळला, थकला आणि त्याने पत्नीचे कलेवर कापडात गुंडाळले, खांद्यावर घेतले आणि १२ वर्षाच्या मुलीसह रुग्णालय सोडले. रुग्णालय तेथील कर्मचारी यांचे तरीसुद्धा काही भान नाही. मांझी पत्नीचे शव एकटा खांद्यावर घेवून अंदाजे 15 किमी दोन तास घेवून कुणालाही तक्रार न करीता चालत होता. याला काय म्हणावे ? ६९ वर्षे झाली स्वतंत्रता प्राप्त होवून. या देशातील नागरिक मात्र सुविधांपासून वंचितच, गरीबी हटाव सारख्या शाब्दिक चळवळी करून गरीबी अजून हटलीच नाही. ती उलट वाढतच आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधींची अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती मोजता-मोजता संबंधीत कर्मचा-यांच्या नाकी नऊ येते. मांझीच्या गरीबीमुळे त्याच्यावर ही वेळ आणली होती. शेवटी एका स्थानिक माध्यमाने मांझीची ही करूण गाथा प्रकाशित केली. ‘सोशल मिडीयावर’ झळकली. नंतर मग मृतदेह तेथून पुढे नेण्यासाठी रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. मांझी कडे मदतीचा ओघ पसरला सर्वात आधी मदत कुणी करावी ? सर्वात आधी मदत पोहचली ती ‘बहरीनच्या पतंप्रधानांची.नंतर एका NGO ने मांझीला मुलीचे शिक्षण आणि मुलगी मोठी होई तो दरमहा ठराविक रक्कम देण्याचे ठरवले.
      मांझीला मदत मिळाली खरी परंतू दशरथ मांझी, दाना मांझी यांसारखे अजून किती मांझी आपण निर्माण होवू देणार आहोत? आपल्या मनातील गरीबांविषयीची कळवळ संपली का? आपणास आपले कर्म, आपला पैसा , आपले कुटुंब यांसोबतच इतर भारतीय नागरिकांशी काहीही घेणे देणे नाही का ? स्वामी विवेकानंद म्हणतात “ मै उसी को महात्मा समझूंगा जिसका हृदय गरिबोंके लिये रोता है अन्यथा वो दुरात्माही है” या वाक्याच्या अनुषंगाने आपण सर्वच आता दुरात्मेच झालेलो आहोत. आणि तसे जर नाही आहे तर मग बिहार मधील दशरथ मांझीला एकट्याने पहाड फोडून रस्ता तयार करण्याचे काम पडलेच नसते आणि ओरिसा मधील दाना मांझी यांस पत्नीचा मृतदेह एकट्याने खांद्यावर न्यावा लागला नसता. परंतू तसे नाही आहे आणि म्हणूनच ६९ वर्षानंतर अनेक घोटाळे करून गबर झालेले आणि गरीबी, दुही कायम ठेवणारे लोकप्रतिनिधी असलेल्या आपल्या देशाची ही हार आहे.                                  

२५/०८/२०१६

"Dahi handi" celebration on the occasion of "Janmashtami" should be celebrated as per government and judicial rules and regulation to avoid accidents

दहीहंडीची उंची आणि थरांची युक्ती   
      भगवान श्रीकृष्ण यशोदा माता आणि इतर गोपिकांचे दुध, दही, ताक यांचे त्याच्या सवगड्यांसह चौर्य करून सर्व सर्व मित्र आपासांत वाटून या दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घेत असत. आता श्रीकृष्ण असे का करत असे ? यावर निरनिराळी मते आहेत. असेही सांगितले जाते की मथुरेचा जुलुमी राजा कंस जो नात्याने श्रीकृष्णाचा मामाच होता या कंसाच्या स्त्रीयांना म्हणे कुणी सांगितले होते की जर त्यांनी धी तूप दुध यांनी दररोज आंघोळ केली तर त्या चिरतरुण राहतील. त्यासाठी म्हणून गोकुळातून हे सर्व पदार्थ मथुरेत जात असत. यासाठीच भगवान श्रीकृष्ण ‘माखनचोर’ झाले. मग त्यात नाना कथा आल्या. भारतीय म्हणजे उत्सवप्रिय माणसे मग काय भगवान श्रीकृष्ण यांच्या कडून इतके काही शिकण्यासारखे असताना ते विसरून जाऊन आपणास लक्षात राहिली ती फक्त दहीहंडी. आता तर तीही बनवत दही आणि युरिया मिश्रीत दुधाची. अन्याय झाला तर हाती शस्त्र घ्यावेच लागते मग समोर आपले अन्यायी आप्त का असोना हा आपल्या पवित्र ग्रंथ भग्वदगीता यातील संदेश विसरून जाऊन अहिंसेच्या नको तितक्या आहारी गेलो. असो दहीहंडी हा तसा उत्साहाचा सण. परंतू या सणामध्ये राजकारण्यांनी अति उत्साह आणला मग काय करोडो रुपये आली, मोठ मोठ्याल्या रकमेची बक्षिसे आली, या बक्षीसांच्या प्रलोभोनामुळे गोविंदा पथके दहीहंडीचे उंचच उंच थरावर थर रचू लागले. मग यात अनेक अपघात झाले. अनेक जण यमसदनी गेले तर कित्येक जायबंदी झाले. थोडेफार सांत्वन करून राजकारणी मोकळे झाले आणि जायबंदी झालेले गोविंदा त्यांचे अपंगत्व घेवून एकटेच राहिले. त्यांना आधार, धीर देण्यास त्यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त कुणीच नाही. चांगल्या चांगल्या तरुण मुलांचे नुकसान झाले. मा. न्यायालयाने मग दहीहंडीची उंची २० फुटांच्या वर नसावी असा निर्वाळा झाला. परंतू दहीहंडी 20 फुटांची आणि सलामी साठी वेगळा थर बिना दहीहंडीचा असा उपाय म्हणा किंवा पळवाट म्हणा याचा शोध आपल्या प्रखर बुद्धीवंत जनतेनी लावलाच. आता दहीहंडीच्या बाजूलाच केवळ एक गोविंदांचा उंच थर उभारला जाईल आणि ज्याचा थर जास्त उंच त्याला बक्षीस. म्हणजे पुन्हा जैसे थेच. मा. न्यायालयाचा अवमान आणि आपला अतिउत्साहावर पण विरजण पण नाही मग “कोई जिये या मरे हमको क्या बाबू” या प्रमाणे गोविंदां मृत्युमुखी पडो अथवा त्यांना अपंगत्व येवो आम्हास  काही पर्वा नाही . मा. न्यायालय किंवा सरकार यांच्या नियमांचे बंधन तर पाळावेच तसेच तरुणांनी व लहान असेल तर बालकांच्या पालकांनी बरे वाईट काय समजून दादा, भाऊ यांच्या आवहानास, त्यांच्या बक्षीसांच्या प्रलोभोनास बळी पडू नये. दहेहांडीचा उंच थर रचणे ही एक प्रकारची पैजच होय त्यामुळे समर्थ रामदास उक्ती “पैज होड लावू नये काही केल्या” याप्रमाणे भलतीच, अंगाशी येणारी शर्यत लावून आपल्या प्राणास मुकू नये, कुटूम्बियांवर दु:खाची पाळी आणू नये. ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल या म्हणीप्रमाणे ज्याला वेदना होतात त्याचा त्रास त्याला स्वत:लाच जास्त होतो. त्यामुळे “अखंड सावध असावे” सण साजरे करावे परंतू आपल्या अंगलट येणार नाही याची काळजी घ्यावी. शाळांनी, पालकांनी, मंडळांनी सर्वांच्या जीविताची काळजी म्हणून तसेच मा. न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करून नियमाने व अपघात विरहीत जन्माष्टमी निमित्त असणारी दहीहंडी साजरी करावी.                                                                                      

१९/०८/२०१६

Rakshabandhan Story of Alexander's wife Roxana and Indian King Puru (Porus)

रोक्सानाचे ‘रक्षा बंधन’
रक्षा बंधन आणि इतर सणांच्यावेळी त्या-त्या सणांशी संबंधीत ऐतिहासिक कथांचे स्मरण करणे, नवीन पिढीस त्या ऐकवणे हे महत्वाचे कार्य घरोघरी होणे अत्यावश्य आहे. शाळांमध्ये इतिहासाच्या शिक्षकांनी स्वत: उत्साहाने क्रमिक प्रकरणासोबतच इतर ऐतिहासिक गोष्टी सांगणे आवश्यक आहे. अन्यथा आपणच आपली गौरवशाली परंपरा विसरून जाऊ. अशा कथा मुलांना ऐकवल्यास त्यांना हमखास प्रेरणा मिळेल.

आता ही कोण रोक्साना? असा प्रश्न वाचकांना पडणे स्वाभाविकच आहे. कारण आपल्याला इतिहासाचे ज्ञान फारच जुजबी. शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या बाबत एखाद दोन प्रसंग, घटना इथपर्यंतच आपली मजल. मागच्याच महिन्यात काही महाविद्यालयीन तरुणांना शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नांव विचारले तर माहीत नव्हते. यावर काहींचे असेही मत असेल की मग यात काय झाले? परंतू जिजाऊने सुद्धा शिवरायांना पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा सांगितल्याच होत्या आणि त्यामुळेच शिवाजी राजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा निर्माण झाली. सध्या आपल्या भारतामध्ये सर्वात अत्यावश्यक असलेली गोष्ट म्हणजे मुलांना आपल्या प्राचीन कथा, पौराणिक कथा, अध्यात्मिक कथा सांगण्याची. शाळांतून अशा कथा सांगणे आता हद्दपारच झाले आहे. या प्राचीन कथांमुळे मुलांवर निश्चितच चांगला परिणाम होईल आणि त्यांची वागणूक सुधारेल. त्वरीत रागावून या मुलांचे पाउल आत्महत्या करण्यापर्यंत जाणार नाही. परंतू हा विचार करणार कोण? कुणाला मुळी वेळच नाही आहे. सर्व कसे आप-आपल्या कामात व्यस्त नाहीतर मोबाईल मध्ये तरी व्यस्त(?). साधे शिवरायांच्या आजोबाचे नांव माहीत नसलेल्या तरुणाईला ‘रोक्साना’ माहीत असणे दुरापास्तच. 
     अशा विचाराअंती रक्षा बंधनाच्या पर्वावर आठवण झाली ती रोक्साना आणि पुरू यांच्या रक्षा बंधनाच्या ऐतिहासिक घटनेची. रोक्साना तर राहिली बाजूला आणि आता हा पुरू कोण ? असा अजून एक प्रश्न अनेकांना कदाचित पडला असेल. तर काहींना थोडा “क्लू” मिळाला असेल. परंतू ज्यांना अद्यापही रोक्साना काय ? पुरू काय ? काही कळले नाही त्याना आता कळेल की जगज्जेता अलेक्झांडर अर्थात सिकंदर सध्याच्या पंजाब प्रांतात राज्य करणा-या एका तत्कालीन राजाला कैद केल्यावर व त्याच्या समोर आणल्यावर विचारतो की, “बोल तेरे साथ कैसा सूलूक किया जाए?“ यावर “जैसा एक राजा दुसरे राजाके साथ करता है?” असे बाणेदार उत्तर देणारा राजा म्हणजे पुरू अर्थात पोरस. या सिकंदरच्या पत्नीचे नांव होते रोक्साना. जग जिंकून भारतात आलेल्या आपल्या पतीला येथील लढाई मध्ये मृत्यू येवू नये म्हणून तिने राजा पोरस अर्थात पुरू यांस राखी बांधली होती. लढाईमध्ये जेंव्हा सिकंदरवर पुरू शस्त्र उगारतो आणि त्याचे लक्ष मनगटावरील राखी कडे जाते तेंव्हा त्याला रोक्साना या त्याच्या मानलेल्या बहिणीची आठवण येते आणि तो सिकंदरला अभय देतो. सिकंदरच्या मनावर येथील थोर वैचारीक परंपरा, संस्कृती याचा फार मोठा प्रभाव पडतो आणि मग तो मोहीम अर्धवटच सोडून परतीच्या प्रवासाला लागतो. असे हे रोक्सानाचे रक्षा बंधन. 
       भारतामध्ये रक्षा बंधन या सणाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण, मृत्यू देवता यम आणि यमुना, महाराणी कर्णावती आणि हुमायुं यांच्या रक्षा बंधनाच्या कथा आहेत. याच  कथांच्या शृंखलेत सिकंदर पत्नी रोक्साना आणि राजा पुरू अर्थात पोरस यांच्यातील बहीण भावाच्या संबंधांची ही कथा सुद्धा आहे. रक्षा बंधन आणि इतर सणांच्यावेळी त्या-त्या सणांशी संबंधीत ऐतिहासिक कथांचे स्मरण करणे, नवीन पिढीस त्या ऐकवणे हे महत्वाचे कार्य घरोघरी होणे अत्यावश्य आहे. शाळांमध्ये इतिहासाच्या शिक्षकांनी स्वत: उत्साहाने क्रमिक प्रकरणासोबतच इतर ऐतिहासिक गोष्टी सांगणे आवश्यक आहे. अन्यथा आपणच आपली गौरवशाली परंपरा विसरून जाऊ. अशा कथा मुलांना ऐकवल्यास त्यांना हमखास प्रेरणा मिळेल तसेच एका जुन्या गीता प्रमाणे “सिकंदरने पोरससे की थी लडाई , जो की थी लडाई तो मै क्या करू ? “ अशा नीरस भावनेने इतिहासाकडे पाहू नये. 
(उपरोक्त कथेस ऐतिहासिक पुरावा नाही)
                      

१४/०८/२०१६

Article published in Tarun Bharat Nagpur special edition "Gramoday 2016" on the occasion of its foundation day.

मेरा गाँव मेरा देश
“In Every little Village in the world there are great potential, champions who only need motivation, development and good exercise evaluation”

असे न्युझीलंडच्या एका प्रशिक्षकाने म्हटले होते.
     हिंदी भाषेत जरी गाँव म्हणजे खेडे असा अर्थ होत असला तरी मराठीत मात्र गाव म्हणजे केवळ खेडेच असा तो होत नाही.मराठीत गांव म्हणजे वसतीस्थान आणि मग ते पुढे ‘शहर’ आणि ‘खेडे’ असे विभागले जाते.शीर्षकानुसार गांव म्हणजे खेडेच असा अर्थ प्रतीत होतो.आता खेडे,गांव याचा उहापोह कशासाठी?काही वर्षांपासून खेडी ओस पडत चालली आणि शहरे फुगून राहिलीत. दिवसेंदिवस खेड्यातील तरुण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांपासून दुरावला जातोय. खेड्यातील तरुण खेड्यातच राहून शेती आणि उद्योगधंदा करून ‘खेड्यातून नवीन विकसित भारताचा उदय’ करू शकतच नाही काय?की असे आता शक्यच नाही? असा प्रश्न आताच नव्हे तर गेल्या दीड दोन वर्षांपासून पडला आहे आणि मग "तरुण भारत"च्या “ग्रामोद्यातून भारत उदय” या संकल्पनेतून या विचांरांना अधिक चालना मिळाली. त्यासाठीच खेडी,गांव,विकास हा उहापोह. 
     खेड्यापासून भारताचा विकास करावयाचा असेल,नवीन भारत उदय करावयाचा असेल तर केवळ खेड्यातीलाच नव्हे तर सरकार आणि तमाम जनतेने ‘मेरा गाँव मेरा देश’ हा विचार स्वत:मध्ये रुजवला पाहिजे. माझे ग्राम म्हणजेच माझे राष्ट्र आहे असे आचरण केले तर सर्वच खेडी विकसित होतील आणि नव भारतोदय आपसूकच होईल. परंतु विकसित खेडी ही संकल्पना काही वाटते तितकी सोपी नाही. काहीच पोपटराव पवार, अण्णा हजारे, राजेंद्रसिंग यांसारख्या व्यक्तींनी ते करून दाखवले आहे. परंतु असा ध्यास घेणारे व्यक्ती आताशा फारसे राहिलेले नाहीत. महात्मा गांधीनी जरी “खेड्यांकडे चला” असे म्हटले असले किंवा “खरा भारत खेड्यांमधून दिसतो” असे जरी असले तरी विकासाच्या असमतोलामुळे खेडी ओस पडत असून सर्व लोक शहरांकडे धावत आहेत आणि तिथे गेल्यावर आयुष्यभर धावणे सुरूच ठेवत आहेत. शहरातील चकचकीत वातावरणाकडे ते एखादा पावसाळी कीटक ज्याप्रमाणे विजेच्या दिव्याकडे आकर्षित होतो तसे आकर्षित होत आहेत आणि त्या किटकाप्रमाणेच आयुष्य व्यतीत करत आहेत. खेड्यांमधून भारत उदय साध्य करावयाचा असेल तर ग्रामीण रोजगार, शेती यांना प्रतिष्ठा मिळवून देवून शहराकडे जाणारे युवकांचे जत्थे थोपवावे लागतील. पूर्वी कसे “उत्तम शेती , मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी” अशी संकल्पना होती. या संकल्पनेचे आता उच्चाटन झाले आहे. आता सर्वांनाच हवी आहे नोकरी. कारण छोकरी मिळत नाही ना! मुलींना शेतीवाला मुलगाच नापसंत असतो. जो जगाचा पोशिंदा म्हणविला जातो तो त्यांचा पोशिंदा होईल की नाही याची त्याना शाश्वती नसते. ”मला लगीन कराव पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे“ तसे  “शेतीवाला नवरा सुद्धा पाहिजे” अशी परीस्थिती निर्माण होणे आवश्यक आहे. जुन्या काळाप्रमाणे शेतीला प्रतिष्ठा दर्शित करणारे चित्रपट निर्माण होणे सुद्धा गरजेचे आहे. निव्वळ रस्ते निर्मितीत करोडो रुपये उधळण्यापेक्षा प्रलंबित नद्या जोड प्रकल्प जर केला तर अनेक कोरडवाहू शेतक-यांना त्याचा फायदा होईल. कृषी पर्यटन हा सुद्धा व्यवसाय होऊ शकतो. शाळांतील मुलांच्या सहली ग्रामीण भागात शेती आणि तेथील शेतीपूरक व्यवसाय दाखवण्यास नेल्या गेल्या पाहिजेत. शेतीला भेट देणा-या मुलांच्या पालकाना संपर्क करून शेतकरी मग त्याच्चा माल विक्री करू शकतील. ग्रामीण भागात केवळ शेती, पूरक व्यवसाय अशा दृष्टीकोनातूनच पाहू नये. या भागातून अनेक मैदानी खेळाडू सुद्धा देशास मिळू शकतात. 
“In Every little Village in the world there are great potential, champions who only need motivation, development and good exercise evaluation”
असे न्युझीलंडच्या एका प्रशिक्षकाने म्हटले होते. गावातील युवकांना खेळाकडे, महिलांना व मुलीना त्यांच्याशी संबंधीत व्यवसायांकडे वळवणे असे पर्याय गावा सोबतच देशाचा विकास  करणारे ठरू शकतात. कुण्या एका खेडे गावात एका महिलेने “ब्युटी पार्लर” सुरु केले त्यास यश मिळेल की नाही अशी शंका तिला होती.परंतू खेड्यातील मुली व महिला यांनी भारघोस प्रतिसाद दिला आणि ती स्त्री आज यशस्वी झाली आणि तिच्या घरची परिस्थिती सुद्धा सुधारली. महाराष्ट्रात तर अनेक तरुणांनी, महिलांनी ग्रामीण भागात राहून सुधा प्रगती, उन्नती साधली आहे. इतर तरुण आणि महिला सुद्धा स्वप्रगती सोबतच देशाची प्रगती करून दाखवू शकतात गरज आहे ती वर सांगितल्या प्रमाणे Motivation“ची म्हणजेच त्याना उत्तेजना देण्याची. त्याना फक्त सांगा पटवून द्या की आम्ही तुमच्या सोबत आहोत, “तुम्ही करू शकता” असे म्हणून त्यांच्यातील आत्मविश्वास जागुत करा आणि मग बघा.  यासाठी सर्वानीच ध्यास घेणे जरुरी आहे. खेड्यातून विकास साधून दाखविण्यासाठी गरज आहे ध्यास  घेण्याची. शासन, कृषी खाते यांनी तसा ध्यास घ्यावा.युवक खेड्यातच राहून आपले जीवन कसे समृद्ध करतील याचा विचार होणे आता अतिशय जरुरी झाले आहेत. शहरातील भरमसाठ लोकांच्या भरमसाठ गरजा कशा भागवायच्या? हा एक मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे.शहरात गेलेले सर्वच तरुण काही फार ऐशोआरामाचे जीवन व्यतीत करीत आहेत असेही नाही.बहुतांश तरुण हे अत्यंत हलाखीचे जीवन शहरात घालवत आहेत.शहरात पन्नास टक्क्याहून अधिक ‘प्रच्छन्न बेरोजगार’ (पात्रतेपेक्षा कमी दर्जाची नोकरी) आहेत. या तरुणांना आता शहर सोडता येत नाही सोडले आणि पुन्हा खेड्याकडे आले तर शेतीतले ज्ञान सुद्धा यथातथाच.म्हणजे “...घर का ना घाट का”. मग शेती गिळंकृत करीत आहेत लोकशाहीने गब्बर झालेले नेते,डॉक्टर्स,अवैध सावकार.जवळपासच्या खेड्यापाड्यातून जर फेरफटका मारला तर यांच्याच जमिनी.शेतकरी गेला कुठे? या अशा अवस्थेत युवकांना शेतीचे महत्व,यशस्वी शेतक-यांची यशोगाथा हे पटवून दिले पाहिजे.‘ग्रामोद्यातून भारत उदय’ साध्या करावयाचा असेल तर गरीब शेतक-याच्या मुलांना शेती,शेतीपूरक व्यवसाय.लघु उद्योग या सर्वांच्या प्रशिक्षणासोबतच त्यासाठी सवलती, अल्प व्याजदर असलेली कर्जे देणे गरजेचे आहे.हे करतांना त्याना ‘मोफत’ ची सवय लावू नका.सरकारच्या अनेक योजना आहेत त्या चांगल्या सुद्धा आहेत परंतु त्या योग्य पद्धतीने राबवल्या जात नाहीत. या योजनांचा लाभ घेणा-यांमधून उत्कृष्ट लाभार्थीस बक्षिसे दिल्यास इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा जोमाने  शेतीकडे लक्ष देतील. शासन, NGO यांनी 
हे त्यांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. शेतक-यांकडून योजना कार्यक्षमरीत्या राबवून घेतल्या तर आणि सर्व ग्रामस्थाने फिरून खेड्यातच राहून प्रगती केलेल्या,शेतीच्या उत्पन्नाचे उच्चांक गाठलेल्या, लघुउद्योगात प्रगती केल्लेयांच्या “Success Stories” सांगितल्या पाहिजेत. त्या याशोगाथांचे Projector Show” आयोजित केले गेले पाहिजेत.”तुमच्या खेड्याचा विकास म्हणजेच देशाचा विकास” त्यांच्या पाठीशी शासन आणि जनता उभी आहे असे त्यांना वाटले तर हा बळीराजा अधिक जोमाने कामास लागेल, तर त्याच्या मुलांना सुद्धा शेती आणि पूरक व्यवसाय करण्याची रुची कायम राहीलत्यांच्या खेडे गावालाच ते “मेरा गाँव मेरा देश” समजून विकासात्मक कार्य करू लागतील त्यातूनच मग “ग्रामोद्यातून भारतोदय” होण्यास वेळ लागणार नाही.